मृण्मयी पाथरे

गौतमच्या शाळेत नववीचा निकाल होता. विज्ञानात त्याला शंभरपैकी ब्याण्णव मिळाले होते. पण त्याच्या वर्गातील ऐश्वर्याला मात्र पंचाण्णव मिळून ती विज्ञानात संपूर्ण इयत्तेत पहिली आली होती. गौतमच्या बाबांनी त्याला इतर विषयांत मिळालेल्या मार्काचं कौतुक केलं तर खरं.. पण विज्ञानाचे मार्क बघून ते गौतमला म्हणाले, ‘‘विज्ञानाच्या अभ्यासात जरा जोर लावला असता, तर आता तू पहिला आला असतास! पुढे जाऊन तुला तुझ्या दादासारखंच आयआयटीमधून इंजिनीअिरग करायचं आहे, नाही का? मग आतापासूनच गणित आणि विज्ञानाचा पाया भक्कम असला पाहिजे. आता तळय़ातील लहान माशांच्या पुढे गेलास, तर पुढे समुद्राच्या माशांसोबत स्पर्धा करू शकशील.’’ पुढे दहावीच्या परीक्षेच्या वेळेस त्याला चांगले मार्क मिळावे म्हणून त्याच्या आईने तो कसा आणि किती अभ्यास करतो आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन महिने सुट्टी घेतली होती. गौतमची दहावी संपायच्या आतच त्याचे ‘जेईई’साठी क्लासेस सुरू झाले होते. पण त्याला स्वत:ला नक्की काय हवं होतं, हे मात्र कोणीही विचारलं नाही.

संजना लहानपणापासून आई-बाबांच्या हॉस्पिटलमध्ये जायची. आई-बाबा डॉक्टर म्हणून कसे काम करतात याचं कुतूहलाने निरीक्षण करायची. जुना स्टेथस्कोप गळय़ात घालून मिरवायची. अगदी हॉस्पिटलमधील नर्सेसशीही तिची चांगलीच गट्टी जमली होती. पण जसजशी संजना मोठी होत गेली, तसतसं तिला इतर गोष्टीही आवडू लागल्या – फॅशन डिझायिनग, इंटिरियर डिझायिनग, फाईन आर्टस् संजनाला सगळय़ाच बाबतीत स्पष्टता (clarity) नव्हती, पण तिला कलेमध्ये खूप रस होता. संजनाच्या पालकांना तिने ‘आर्ट्स’ करणं तितकंसं पटत नव्हतं. तिच्या पालकांनी भाडय़ाने घेतलेल्या एका लहानशा क्लिनिकपासून सुरुवात करून सध्याचं पाच मजली हॉस्पिटल उभारायला खूप मेहनत केली होती. आपली लेकही आपल्यासारखी डॉक्टर बनेल आणि हा हॉस्पिटलचा डोलारा सांभाळेल, असं त्यांना वाटत होतं. पण संजनाला नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स असूनही ‘आर्ट्स’चाच अभ्यास करायचा होता.

मनाली शाळेत असल्यापासूनच अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षेत अव्वल असायची. बॅचलर्स पूर्ण केल्यावर तिने रात्रंदिवस मेहनत करून चार वेळेस यूपीएससीची परीक्षा दिली. पण प्रत्येक वेळेस काही मार्कानी परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तिचा ऑल इंडिया रँक (AIR = All India Rank) हुकायचा. पहिल्या वेळेस तिच्या पालकांनी तिला बरंच पाठबळ दिलं. पण पुढच्या परीक्षांदरम्यान ती कुठे कमी पडतेय यावरच त्यांचा जास्त भर होता. मनालीने पाचव्यांदा परत परीक्षा द्यावी असं तिच्या पालकांना खूप वाटत होतं, पण मनाली मात्र आता पार थकून गेली होती. चार र्वष सलग त्याच विषयांचा अभ्यास करणं आणि आजूबाजूची समवयस्क मंडळी कमवायला लागली असताना आपण पालकांवर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून असणं, तिला पटत नव्हतं. ‘आम्हाला आयएएस ऑफिसर होता आलं नाही, पण आपल्या लेकीने तरी व्हावं’, असं तिच्या पालकांना वाटत होतं. मनाली तिच्या मतावर ठाम आहे आणि आपलं काही ऐकणार नाही हे पाहून तिच्या पालकांनी तिच्याशी बोलणं कमी केलं. त्यांना त्यांचं स्वत:चंच स्वप्न भंग झाल्यासारखं वाटत होतं. पालकांनी इतका पािठबा देऊनही मनाली परत परीक्षा का देत नाही, यावर दिवसेंदिवस घरातील वाद वाढू लागले.

गौतम, संजना आणि मनाली यांना वयात येताना आणि वयात आल्यावर या समस्या प्रकर्षांने जरी जाणवायला लागल्या, तरी याची पाळंमुळं लहानपणीच रुजवली गेली होती. पुढे भरघोस उत्पन्न मिळेल अशा एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यास करणं ‘चांगलं’आणि उत्पन्नाविषयी अनिश्चितता निर्माण होईल अशा विषयांचा अभ्यास करणं ‘वाईट’, कुटुंबीयांनी किंवा वडीलधाऱ्या मंडळींनीच सांगितलेल्या गोष्टी करणं ‘चांगलं’ आणि त्यांच्या मताविरुद्ध जाऊन आपल्या आवडीनिवडीनुसार केलेल्या गोष्टी ‘वाईट’ असे विचार त्यांच्या मनात हळूहळू घर करायला लागले होते. तसं पाहिलं तर या चांगलं-वाईट, योग्य-अयोग्याच्या व्याख्या आणि निकष ( conditions of worth) प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळय़ा असू शकतात. ‘चांगलं’ मूल, विद्यार्थी, कर्मचारी/ बॉस कोण याचे निकष आपण वेळोवेळी ठरवत असतो आणि काळानुसार ते बदलतही जातात. पण हे निकष व्यक्तिनिष्ठ (subjective) असतात, हे आपल्या सहसा ध्यानात येत नाही.

आजकाल काही तरुण मंडळी परीक्षेत मिळालेल्या गुणांमुळे निराश झाल्याने स्वत:चं आयुष्य संपवण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात. ‘आम्हीही दहावी-बारावीच्या परीक्षा दिल्या. आम्हालाही घरचे मार्क चांगले कमव म्हणून सतत सांगायचे, पण असा विचार कधी आमच्या मनात आलाही नाही. आम्हाला नव्हतं का प्रेशर?’ असं आपल्यापैकी काही जण सहज बोलून जातात. पण आपल्या वेळचा काळ आणि आताचा काळ यात नक्कीच काही तरी फरक आहे, नाही का? सध्या बाळ रांगायला आणि चालायला लागलं की लगेच प्ले – स्कूलमध्ये प्रवेश घेतला जातो. नर्सरीमध्ये असल्यापासूनच आपल्या मुलांना सर्वाधिक मार्क किंवा ग्रेड कसे मिळतील, याकडे काही पालकांचं लक्ष असतं. शिक्षकांनी तपासलेला पेपर आपण पुन्हा प्रश्नपत्रिकेसहित तपासून पाहणं, शिक्षकांनी मार्क कमी दिले असल्यास त्यांना जाब विचारणं, आपल्या पाल्याच्या मार्काची तुलना इतर मुलांच्या मार्काशी करणं, परीक्षेपूर्वी काही आठवडे किंवा महिने सुट्टी घेऊन आपल्या मुलाचा अभ्यास डोळय़ात तेल घालून घेणं यात आजकाल कोणालाच वावगं वाटेनासं झालं आहे. या ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’मुळे आपण आपल्या पाल्याच्या मनात त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक कामगिरी आयुष्यात सगळय़ात जास्त महत्त्वाची आहे, हे बिंबवतो आहोत हे कोणाच्या लक्षातच येत नाही आहे.

आपल्यापैकी कोणीही ‘मला माझ्या आयुष्यात ताण हवा आहे’, असं स्वत:हून सांगत नाही. खरं पाहता, आपल्या आजूबाजूच्या सिस्टीम्स हा ताण जाणते-अजाणतेपणी निर्माण करत असतात. बऱ्याच वेळेस पालक आणि इतर मोठी मंडळी, त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्नं त्यांच्या मुलांनी पूर्ण करावीत, ही अपेक्षा ठेवतात. याला वायकेरीअस लििव्हग (vicarious living) असंही म्हणतात. ‘माझ्या लहानपणी मला ज्या सुखसोयी नव्हत्या त्या जर मी माझ्या मुलांना देते आहे, तर त्यांनी किमान उत्तमोत्तम मार्क मिळवलेच पाहिजेत’; ‘माझा संसार लवकर सुरू झाल्यामुळे मला काही गोष्टी करता आल्या नाहीत, पण पुढे माझ्या मुलांनी एखाद्या विशिष्ट विषयात पीएच.डी. मिळवणं हे ‘मस्ट’ आहे’; ‘आम्हाला आमच्या पालकांचा पािठबा नव्हता, पण माझ्या मुलांनी परदेशातीलच एखादी नोकरी करायला हवी’; ‘आमच्या वाडवडिलांनी मोठय़ा कष्टाने उभा केलेला बिझनेस पुढे माझ्या मुलांनी चालवायला हवा’ – अशा अपेक्षा स्वप्नांना ओझ्याचं रूप देऊ शकतात.

हे सगळं टाळायचं असेल, तर आपल्या आजूबाजूच्या मंडळींशी, विशेषत: लहान मुलांशी बोलताना आपण त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा आपली स्वत:ची अपूर्ण स्वप्नं आहेत, आपल्या लहानपणी वडीलधाऱ्या माणसांनी आपल्याकडून ठेवलेल्या अपेक्षा आहेत की आपल्या मुलांची स्वत:ची स्वतंत्र स्वप्नं आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे.
viva@expressindia.com