कतरिना कैफच्या या फोटोशूटचं एक वैशिष्टय़ आहे. ते काढलेत मुंबईच्या एका २५ वर्षीय हौशी फोटोग्राफरनी. छंद म्हणून फोटोग्राफी करणारा हा सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे आणि तो जन्मत: अंध आहे. हो.. आपल्या व्यंगावर मात करत छंद जोपासणाऱ्या या जिद्दी तरुणाशी.. भावेश पटेलशी बातचीत त्याची सौंदर्य‘दृष्टी’ दाखवणारी होती.

कोणी तरी आपले सुंदर फोटोज काढले, हे तिच्यासाठी नवीन अजिबात नव्हते. देश-विदेशातील नामवंत फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यांनी आतापर्यंत तिची सुंदर छबी अनेकदा टिपली आहे. पण एका ब्रॅण्डसाठी ‘त्या’ फोटोग्राफरने काढलेल्या तिच्या फोटोजची विशेष दखल घेणं तिलाही भाग पडलं. ती सौंदर्यवती होती, बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ आणि तो फोटोग्राफर होता मुंबईचा पंचवीस वर्षीय भावेश पटेल. भावेशने कतरिनाचं फोटोशूट महत्त्वाचं होतं, कारण भावेश जन्मत: पूर्ण अंध आहे. त्याच्याशी संवाद साधल्यावर त्याचा हा अनोखा छंद जोपासण्यासाठी त्याने केलेली धडपड समोर आली.
मुंबईत विक्रोळीच्या चाळीत आई-वडील आणि दोन भावांसोबत राहणारा भावेश दृष्टिहीन असला तरी कुटुंबीयांच्या मदतीने या अंधत्वावर मात करत त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीही मिळवली. तरीही काही तरी वेगळं करण्याची जिद्द त्याला शांत बसू देईना. दरम्यान, पार्थो भौमिक यांच्या ‘बियॉण्ड साइट फाऊंडेशन’बद्दल त्याला माहिती मिळाली. या संस्थेअंतर्गत पार्थो मुंबईतील अंध मुलांना फोटोग्राफी शिकवत असत. भावेशनेही काही तरी वेगळं करायच्या उद्देशाने या संस्थेत प्रवेश घेतला. योगायोगाने एका डियोड्रंटच्या ब्रॅण्डने ‘गंध’ याच प्रेरणेला अग्रभागी ठेवण्यासाठी अंध फोटोग्राफरकडून फोटोशूट करण्याची कल्पना सुचवली आणि त्यांनी त्यासाठी भावेशला विचारलं. ती जाहिरात कतरिनाची होती आणि एका सेलेब्रिटीचे प्रोफेशनल फोटोशूट करणारा भावेश जगातील पहिला अंध फोटोग्राफर ठरला.
viv09या फोटोशूटची वार्ता लागल्यावर भावेश एकाएकी प्रसिद्धीझोतात आला होता. त्याच्याशी बोलण्यासाठी माध्यमं उत्सुक होती. पण कंपनीशी केलेल्या करारामुळे भावेशला प्रकाशझोतापासून दूर राहावे लागले. एखाद्या व्यक्तीमध्ये अपंगत्व असेल, तर साहजिकच समाजाची सहानुभूती त्यांना मिळण्यास सुरुवात होते. ‘या सहानुभूतीच्या नजरेतून खरं तर सतत आमच्या वैगुण्यावर बोट ठेवलं जातं आणि आम्ही कमकुवत असल्याची जाणीव होते,’ असं भावेश सांगतो. त्यामुळे काहीही करून आपल्या आणि आपल्या अंध मित्रांना मिळणारी ‘बिचारेपणा’ची भावना आपल्याला पुसून टाकायची होती, याच उद्देशाने आपण ही जाहिरात स्वीकारल्याचं तो सांगतो. ‘सेलेब्रिटीसोबत काम केल्यानं मिळणारं वलय मला ठाऊक होतं. या प्रसिद्धीच्या माध्यमातून आम्ही अंध असलो, तरी कोणापेक्षा कमी नक्कीच नाही हे सांगण्याची संधी मला मिळाली, हे तो आत्मविश्वासाने सांगतो.
भावेशने जन्मापासून त्याच्या आजूबाजूचं जग फक्त स्पर्शाच्या माध्यमातून ‘अनुभवलं’ होतं. समोरची वस्तू दिसणारंच नसेल तर त्याची छबी कशी टिपणार? या मूलभूत प्रश्नावर भावेशने शोधलेला मार्ग थक्क करणारा आहे. ‘कोणत्याही माणसाचा फोटो काढण्यापूर्वी मी त्याच्याशी हात मिळवतो. त्याची ख्यालीखुशाली विचारतो. हे करण्यामागे समोरच्याला आपली ओळख करून देण्याचा त्याचा उद्देश असतोच, पण त्याचबरोबर मी तुमची उंची आणि उभं राहण्याची जागा याबद्दल डोक्यात काही गणितं मांडत असतो.’ त्यानंतरच तो समोरच्याची छबी टिपण्यास सज्ज होतो. अर्थात हे झालं माणसांच्या बाबतीत. तेथे आपल्याला समोरच्याचा अंदाज घेणं शक्य असतं, पण भावेशला आवडतं ते निसर्गाची आणि पक्ष्यांची छबी टिपायला. त्यासाठी मात्र त्याला एका साथीदाराची मदत लगते. असाच एक अनुभव भावेश सांगतो, ‘एकदा पार्थोसरांनी कबुतरखान्याला नेऊन आम्हाला काही फोटो काढायला सांगितले होते. अशा ठिकाणी ठरावीक वेळी कबुतरांचे थवे आकाशात उडत असतात. कबुतर उडालं की, सर खूण करत आणि आणि फोटो काढायचो.’ भावेशनं इथे काढलेल्या एका फोटोची निवड ‘बीबीसी’च्या एका स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फोटोंमध्ये झाली होती. याशिवाय एखाद्या टेकडी किंवा झाडाचे फोटो काढताना त्या वस्तूबद्दल माहिती आणि सूर्याचा प्रकाश इत्यादी माहिती देण्यासाठी कोणाची तरी मदत आपल्याला लागते, असं तो सांगतो. समोरच्याने सांगितलेल्या वर्णनावरून आजूबाजूच्या परिस्थितीची तो आपल्या मनात एक प्रतिमा तयार करतो. त्यावरून तो फोटो काढतो.
viva.loksatta@gmail.com