जे न देखे रवि – १

जेफ बेझोसच्या ‘ब्लू ओरिजिन’च्या तिकिटाची किंमत काही कोटींच्या घरात आहे. 

|| सौरभ करंदीकर

१३ ऑक्टोबर २०२१ रोजी अमॅझॉनपती जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या संस्थेचे ‘एन एस १८’ नावाचं अवकाशयान  १० मिनिटांच्या अवकाश सफरीनंतर जमिनीवर परतलं. अवकाशयानाचा दरवाजा उघडला आणि ‘स्टार ट्रेक’ या टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध ‘कॅप्टन कर्क’ बाहेर आला!  पण तो ‘यू एस एस एन्टरप्राईज’ या अवकाशयानाचं नेतृत्व करणारा, सोनेरी पेहरावातला, एका हातात फेझर गन, दुसऱ्या हातात कम्युनिकेटर घेतलेला तरणाबांड कर्क नव्हता, तर तो होता नव्वदीचा विल्यम शॅटनर.

‘एन एस १८’ पृथ्वीपासून केवळ ६६ मैल उंचीवर, म्हणजेच अवकाशाच्या सर्वमान्य सीमारेषेपेक्षा ४ मैल अधिक उंचीवर पोहोचलं. ‘स्टार ट्रेक’ मालिकेत दाखवायचे त्याप्रमाणे प्रकाशापेक्षा अधिक वेगाने, ग्रहताऱ्यांना पळत्या झाडांप्रमाणे मागे टाकत, हे अवकाशयान कुठेही गेलं नाही. जेमतेम चार मिनिटं ‘शून्य गुरुत्वाकर्षणाचा’ (झिरो ग्रॅव्हिटी) थरार शॅटनरसह चार अंतराळवीरांनी अनुभवला, इतकंच. परंतु अवकाशातून आपली पृथ्वी कशी दिसते ते पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं. अवकाशयानातून बाहेर येणाऱ्या विल्यम शॅटनरचे डोळे पाणावले होते. ‘हे कल्पनेच्या पलीकडलं होतं! आपल्या ग्रहाकडे आणि वरच्या काळ्याशार अवकाशाकडे पाहताना रोमांच, साहस वगैरे माझ्या मनातदेखील आलं नाही. केवळ एकच विचार होता – तो म्हणजे आपण जीवन आणि मृत्यू यांच्या मध्यभागी आहोत. आपल्या ग्रहाभोवती पर्यावरणाचं जे कवच आहे, जे जीवनाचा आधार आहे, ते किती नाजूक आणि तलम आहे! आणि आपण त्यालाच प्रदूषित करतोय? मी आता जे पाहिलं ते प्रत्येकाने जरूर पाहावं, अनुभवावं. कदाचित आपल्या विचारात आमूलाग्र बदल होईल.’

अर्थात हे बोलणं सोपं आहे. जेफ बेझोसच्या ‘ब्लू ओरिजिन’च्या तिकिटाची किंमत काही कोटींच्या घरात आहे.  शिवाय हे साहस जीवघेणं ठरू शकतं. शॅटनर मात्र बेझोसच्या कृपेने ‘विदाउट तिकीट’ अंतराळात जाऊन आला. परंतु कुणीही, अगदी नव्वदीचा जख्ख म्हातारासुद्धा अंतराळात जाऊ शकतो, हे या मोहिमेनं सिद्ध केलं. अंतराळवीरांना घ्यावं लागतं तसं कठोर प्रशिक्षण विल्यम शॅटनरला घ्यावं लागलं नाही. केवळ एक अभिनेता असलेल्या, परंतु अवकाश साहसाचं वलय लाभलेल्या शॅटनर ऊर्फ कॅप्टन कर्कला आपल्या यानातून एकदा तरी अवकाशात न्यावं, ही खरं तर जेफ बेझोसची इच्छा. आपल्या लहानपणी आपण स्वत:ला ‘कर्क’ समजून त्याच्यासारखं वागायचो, असं बेझोसनी कबूल केलं आहे. बेझोस कशाला, आपल्यापैकी अनेक वाचकांनीदेखील अगदी हेच केलं होतं! मी चौथीत की पाचवीत असताना रविवारी सकाळी दूरदर्शनच्या ब्लॅक अँड व्हाइट पडद्यावर ‘स्टार ट्रेक’ दाखवलं जायचं. कॅप्टन कर्क, टोकेरी कान आणि तिरक्या भुवया असलेला स्पॉक, डॉक्टर मॅकॉय, त्यांची तबकडीसारखी दिसणारी स्टारशिप, त्यांचं ‘ट्रान्सपोर्टर बीम’मध्ये अंतर्धान पावणं, कुठल्याशा ग्रहावर अवतरणं, एलियन्सचा मुकाबला करणं, हे सगळं माझ्या बालमनावर कमालीची मोहिनी घालणारं होतं. सिगारेटचे खोके, नाही तर काडेपेट्या आणि रबरबँड वापरून तयार केलेला, आपोआप उघडणारा कम्युनिकेटर फोन माझ्याकडे सतत असे. ‘स्टार ट्रेक’मधल्या स्पेसशिपची दारं आपोआप उघड-बंद होत, त्यांचा ‘स्वीश’ असा आवाज काढण्यात मी त्या काळी पटाईत होतो!

हे सगळं आता अत्यंत अशास्त्रीय आणि बालिश वाटेल; परंतु त्या काळात ‘स्टार ट्रेक’चं वेड सामान्य प्रेक्षकांनाच नव्हे तर डॉक्टर्स, तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांनादेखील लागलं होतं. लेखक आणि निर्माता जीन रॉडनबेरी यांच्या ‘स्टार ट्रेक’ या कल्पनाविष्काराने भविष्याचं जे चित्र मांडलं होतं ते आकर्षक होतं. ‘स्टार ट्रेक’ तेविसाव्या शतकात घडतं. (निदान पहिली मालिका). या काळात पृथ्वीवर तिसरं महायुद्ध होऊन गेलेलं आहे. सारी जनता संघर्षाला कंटाळते आणि देशांचं विलीनीकरण एका सर्वव्यापी राष्ट्रात झालेलं असतं. पैसे रूढार्थानं नाहीसे झालेले असतात. त्यामुळे गरिबीदेखील संपलेली असते. मानवी महत्त्वाकांक्षा उरते ती फक्त वैश्विक ज्ञान प्राप्त करण्यापुरती. अशा वातावरणात कॅप्टन कर्क त्याच्या स्पेसशिपमध्ये बसून विविध ग्रहांवर जातो आणि विविध परग्रहवासीयांविषयी जाणून घेतो, प्रसंगी आलेल्या संकटांना समोर जातो, वगैरे.

जीन रॉडनबेरी यांनी तेविसाव्या शतकात तंत्रज्ञान कुठवर पोहोचलेलं असेल त्याच्या काही कल्पना मांडल्या. या कामात त्यांना प्रॉडक्शन डिझाईनर मॅट जेफरीज यांनी मदत केली. जे काही करायचं त्याला शास्त्रीय आधार असावा किंवा निदान कल्पना खऱ्याखुऱ्या शास्त्रीय संदर्भांवर आधारलेल्या असाव्यात असा रॉडनबेरी यांचा आग्रह असे. स्पेस ऑपेरा, म्हणजेच ‘अवकाशात घडणाऱ्या नाट्यमय कथा’ या व्याख्येत बसणाऱ्या ‘लॉस्ट इन स्पेस’सारख्या अनेक मालिका, तसेच ‘स्टार वॉर्स’सारखे चित्रपट प्रसिद्ध होतच होते. परंतु त्यांचं कथानक शास्त्रीय आधारापेक्षा फँटसी, स्वप्नरंजन यावर आधारलेलं असे. पण स्वत: विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते असलेल्या रॉडनबेरी आणि जेफरीज यांना तसं चाललं नसतं. ‘स्टार ट्रेक’चं कथानक ज्या अवकाशयानावर घडतं त्या अवकाशयानाचं डिझाईनदेखील जेफरीजने नासाच्या (अमेरिकेचा शासकीय अवकाश संशोधन विभाग) इंजिनीयर्सकडून तपासून घेतलं होतं. कथानक पुढे नेण्यासाठी आणि कधी कधी चक्क बजेट कमी पडतंय म्हणून ‘स्टार ट्रेक’कर्त्यांनी लढवलेल्या कल्पना आजही शास्त्रज्ञांना, संशोधकांना, तंत्रज्ञांना भुरळ पाडत आहेत.

प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तरी आपल्याला जवळच्या ताऱ्यापर्यंत पोहोचायला काही वर्षं लागतील. तासाभराच्या कथानकात असा संथ प्रवास कसा चालेल? म्हणून रॉडनबेरीनी ‘एंटरप्राईज’ अवकाशयानात ‘वॉर्प ड्राइव्ह’ नावाची काल्पनिक इंजिन प्रणाली वापरली. ज्याच्या आधारे अवकाशयान प्रकाशाच्या वेगाच्या कित्येक पटीने प्रवास करू शकेल, असं त्यांनी दर्शवलं.

आज मंगळावर पोहोचण्यासाठी मानवाला काही महिने लागतील असा अंदाज बांधला गेला आहे. इलॉन मस्क, बेझोस आणि ब्रॅन्सन इत्यादींना असा ‘वॉर्प ड्राईव्ह’ असता तर बरं झालं असतं, असं नक्कीच वाटत असणार.

‘स्टार ट्रेक’च्या कर्त्यांनी लढवलेल्या काही कल्पना सत्यात आलेल्या आहेत, तर काही येत आहेत. निदान कॅप्टन कर्क तरी अवकाशात पोहोचला आहे. परंतु मेडिकल ट्रायकॉर्डर, ट्रान्सपोर्टर बीम, युनिव्हर्सल ट्रान्स्लेटर इत्यादी संकल्पना सत्यात येतील काय? याबद्दल पुढील लेखात जाणून घेऊ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Blue origin organization ns18 spacecraft only 66 miles from earth akp

Next Story
स्टे-फिट : दी आर्ट ऑफ इटिंग
ताज्या बातम्या