vv17नृत्यकलेचा एक नवीन आयाम सध्या अनेकांच्या लक्षात आलाय.. कॅलरी बर्निगसाठीचा. सध्या जमाना आहे फिटनेस डान्सचा. काय आहे हा फंडा? कुठले डान्स यामध्ये येतात? प्रसिद्ध अभिनेते आणि नृत्यप्रशिक्षक नकुल घाणेकर सांगताहेत डान्स अ‍ॅण्ड फिटनेसचं गणित..

सध्या कुठल्याही फिटनेस अँड डान्स स्टुडिओमध्ये चलती दिसतेय ती बॉलिवूड डान्सिंगची. बॉलिवूड डान्सिंग ही खरंच वेगळी शैली आहे का आणि त्याचा फिटनेससाठी कसा उपयोग होऊ शकतो?

एखाद्या नृत्याची, जन्म घेण्याची प्रोसेस समजून घेणे खूप इंटरेस्टिंग आहे. कथक, भरतनाटय़म्सारख्या शास्त्रीय नृत्याची सुरुवात शेकडो वर्षांपूर्वी मंदिरांमध्ये, पूजा किंवा शुभकार्याच्या वेळी झाली असावी. त्यानंतर त्यांचे संगीत तयार होत गेले असावे. विविध नृत्यगुरूंनी आणि नृत्यतज्ज्ञांनी शास्त्रीय शैलींमध्ये नैपुण्य मिळवलं. त्यांनी त्या शैलींची वाद्ये, म्युझिशियन्स यांच्यात सुधारणा किंवा बदल केले असतील. हे बदल होता होता, आज एका ठरावीक संगीतावर, सुनिश्चित वाद्यवृंदावर या शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण होत आहे.
लोकनृत्याची उत्क्रांती वेगळी झाली असावी उदाहरणार्थ भांगडा, लावणी, कोळीनृत्य, सणांच्या वेळी किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी समाजातली एकी, खेळीमेळी, समाजजागृती इत्यादीसाठी लोकसंगीत रचलं गेलं असावं. लोकसंगीतावर हलके-फुलके किंवा कधी-कधी उत्साहवर्धक दमदार नृत्यसंरचना, मुक्तशैलीचा वापर, दैनंदिन व्यापार, उत्सवाचे साजरीकरण, त्यात परंपरा आणि संस्कृतीची जोड या सगळ्यामुळे लोकनृत्यांचा जन्म झाला असावा.
हिंदी चित्रपट सृष्टीची परंपरा घेऊन आणि त्याला आपल्या सिनेसंस्कृतीची जोड यामधून जन्म झाला एका अनोख्या नृत्याचा! बॉलिवूड डान्सिंग. (ज्याला परिभाषेवर आधारून लोकनृत्य म्हटलं तर फार चुकीचं वाटणार नाही.) आजकाल यूएस, यूके, ऑस्ट्रेलियामध्ये भारतापेक्षाही जास्त चर्चीली जात असलेली भारतीय नृत्यशैली म्हणजे ‘बॉलीवूड डान्सिंग.’
नावाप्रमाणे या नृत्यशैलीत हिंदी सिनेमांच्या गाण्यांवर केलेले नृत्य म्हणजे बॉलीवूड डान्सिंग. कथकमध्ये ता-थै-थैतत् आथै थैतत् असे बेसिक पदसंचलन आहे असे ढोबळ मनाने म्हणता येईल. साल्सा मध्ये १-२-३-५-६-७ असे डाव्या व उजव्या पायाचे बेसिक पदसंचलन आहे असे म्हणता येईल. पण ‘बॉलीवूड’ डान्सिंग ही एकमेव जगातील नृत्यशैली आहे. ज्यात भारतीय लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, हिप हॉप, कंटेंपररी, बेली डान्सिंग, बॉलरूम डान्स, जॅझ अशा अनेक नृत्यशैलींचे बेसिक स्टेप्स थोडय़ाफार बदलाने वापरल्या जातात.
गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत केलेल्या नाचाला ‘गणपती डान्स’ असे नाव  आता जगमान्य झालं आहे, तसेच बॉलीवूडच्या संगीतावर केलेल्या कोणत्याही स्टेप्सना बॉलीवूड डान्स असं म्हटलं जातं. ‘झुंबा’ या व्यायामाच्या नृत्यसदृश प्रकारात बॉलीवूडसारख्याच वाटणाऱ्या स्टेप्स् दिसतात. ‘झुंबा’ हे लॅटिन संगीत किंवा आफ्रो-कॅरिबीयन संगीत किंवा नुसत्या इंग्रजी भाषेतील पॉप संगीतावर केले जाते. परंतु मी झुंबाचे असेही काही वर्ग पाहिले आहेत ज्यात बॉलीवूड संगीतावर बॉलीवूड डान्सिंग केलं जातं. अशा वेळी बॉलीवूड कुठे संपतं आणि झुंबा कुठे सुरू होतं, हे सांगणं कठीण आहे. तसेच गणपती डान्स करताना, त्यात लोकनृत्य सदृश भाग कुठे संपतो आणि बॉलीवूडचा भाग कुठे सुरू होतो, हे सांगणे कठीण आहे.
‘बॉलीवूड डान्सिंग’ची खासियत अशी आहे की लहानांपासून मोठय़ांपर्यंत कोणीही बॉलीवूड संगीतावर नुसती कंबर जरी हलवली ना तरी त्याला ‘बॉलीवूड डान्स’ असं नाव दिलं जातं. एखादी नृत्यशैली जिचं स्वत:च्या अशा बेसिक स्टेप्स नाहीत, तिला आज ज्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे, ते खरंच आश्चर्यकारक आहे.  एखाद्या शहरात जर १० कथक नृत्याचे वर्ग असतील तर बॉलीवूडचे ५० वर्ग असतात. जरी बॉलीवूड डान्स हे शास्त्रोक्त नृत्य नसलं तरीही लाखो विद्यार्थी बॉलीवूड संगीतावर आज जगभरात पाय थिरकवत आहेत. हे करताना रसनिर्मिती तर होतेच, पण शारिराच्या चपळ हालचालींमुळे व्यायाम घडतो आणि आज अनेकांचे शरीर स्वास्थ्य सुधारत आहे.
बॉलीवूड नृत्याचं मोफत शिबिर पुढच्या आठवडय़ात ठाण्याच्या (नौपाडा)डिफरंट स्ट्रोक्स डान्स स्टुडिओमध्ये आयोजित केलं आहे. बॉलिवूड डान्सिंगचं फिटनेसच्या अंगानं महत्त्व तिथे उलगडलं जाईल. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९९३०२९९९५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
नकुल घाणेकर -viva.loksatta@gmail.com

एखादी नृत्यशैली जिचं स्वत:च्या अशा बेसिक स्टेप्स नाहीत, तिला आज ज्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे, ते खरंच आश्चर्यकारक आहे. बॉलिवूड डान्सिंगला शास्त्रशुद्ध शैली नसली तरीही फिटनेससाठी त्याचं महत्त्व आहे. बॉलीवूड नृत्य करताना सहाजिकच तणावमुक्ती होतेच, परंतु शरीराचा कार्डियो व्यायामही होतो. तासाला ४३०-५५० इतक्या उष्मांकाची ऊर्जा बॉलीवूड नृत्यातून वापरली जाते. म्हणजेच तेवढय़ा कॅलरीज बर्न होतात.