‘पुस्तकांचा आपल्याला मूक आधार असतो’ असं क्षितिज मानतो. गेल्या एक- दोन वर्षांत जेव्हा त्याचं वाचन थांबलं होतं तेव्हा हाच ‘आधार’ आपल्या आयुष्यातून निघून गेला आहे की काय असं त्याला वाटून गेलं. पण तो आता पुन्हा वाचनाकडे वळला आहे. नुकतीच त्याने पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. तेव्हाही इतकी पुस्तकं, लेखक, वाचक आणि ते वातावरण पाहून अगदी भारावून गेलो, अशी भावना त्याने व्यक्त केली. तो म्हणतो, ‘पुस्तकांचा सहवास फार सुखावणारा आहे. नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध मला अतिशय प्रिय आहे’.

वाचनाची आवड आणि निवड या दोन्हीची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. मात्र, आपल्या कामाच्या गरजेनुसार केवळ संदर्भासाठी वाचन करू नये तर त्याव्यतिरिक्त अवांतर वाचन करायला हवं, असं त्याला वाटतं. आपल्याला ‘स्क्रीनटाइम’ची इतकी सवय लागली आहे की यामुळे आपण वाचनापासून दुरावत चाललो आहोत, असं त्याने सांगितलं. याविषयी प्रयत्नपूर्वक सवयी बदलत त्याने केवळ संदर्भासाठी वाचन करण्याबरोबरच अवांतर वाचन करायला सुरुवात केली. ‘हळूहळू स्क्रीनटाइमची आपल्याला सवयच लागते. सध्या हीच सवय जाणीवपूर्वक बाजूला ठेवून पुन्हा वाचनाकडे वळलो आहे. पुस्तकं अशी गोष्ट आहे की ज्याच्या स्पर्शामुळे तुमचं आणि पुस्तकाचं छान नातं तयार होतं. जे नातं स्क्रीनटाइम आणि मोबाइलमुळे होत नाही. म्हणूनच या नव्या वर्षात पुस्तकांच्या जवळ जाण्याची प्रचंड इच्छा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत’, असं तो म्हणतो.

सध्या क्षितिज विविध विषयांवरील पुस्तकं वाचतो आहे. यात ‘ऐस पैस गप्पा दुर्गाबाईंशी’ हे प्रतिभा रानडे यांनी लिहिलेलं पुस्तक तो वाचतो आहे. या पुस्तकाविषयी आणि दुर्गाबाई भागवत यांच्याविषयी सांगताना तो म्हणाला की, ‘अशा प्रकारची पुस्तकं वाचताना केवळ प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वांची ओळख होत नाही तर त्यांच्या जगण्याचं तत्त्वज्ञान, त्यांनी घेतलेला ध्यास आणि त्यांचा व्यासंग यांचीही ओळख होते. ‘मनसमझावन’ हे संग्राम गायकवाड यांचं आणि वारली आदिवासी संस्कृतीबद्दलचं एक पुस्तकही मी वाचतो आहे. याचबरोबर ‘युगप्रवर्तक छत्रपती’ या नरहर कुरुंदकर यांच्या पुस्तकाचं वाचनही सुरू आहे. वाचनाच्या शिस्तीसाठी दररोज चाळीस ते पन्नास पानं वाचायची सवय मी स्वतःला लावून घेतली आहे’.
आयुष्याच्या विविध टप्प्यांवर खरं तर पुस्तकं ही मार्गदर्शकच होती, असंच क्षितिज मानतो. लहानपणीच्या पुस्तक वाचनाच्या आठवणीही त्याने सांगितल्या. ‘लहान असताना मी विश्वास पाटील याचं ‘झाडाझडती’ हे पुस्स्तक वाचलं होतं आणि त्या पुस्तकाने मला फार प्रभावित केलं. पु. ल. देशपांडे यांची सर्वच पुस्तकं प्रचंड आवडती आहेत. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर ही पुस्तकं माझ्यासोबत होती. जी. ए. कुलकर्णी यांची ‘पिंगळावेळ’ आणि ‘काजळमाया’ ही आवडती पुस्तकं आहेत. त्यातही त्यांचं ‘काजळमाया’ हे माझ्या अतिशय जवळचं आणि आवडणारं असं पुस्तक आहे. पूर्वी मी आत्मचरित्र हा साहित्यप्रकारही वाचत होतो. भा. द. खेर यांचं चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यावर लिहिलेलं ‘हसरे दुःख’ हेही तेव्हा आवडतं पुस्तक होतं. मला काव्यसंग्रह वाचायला आवडतात. शांता शेळके, इंदिरा संत यांची पुस्तकं आणि ग्रेस यांचं ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ हा माझा आवडता काव्यसंग्रह आहे’. हे सर्व साहित्य आयुष्यात विविध टप्प्यांवर वाचायला मिळाल्याने तो स्वतःला भाग्यवान मानतो. तो म्हणतो, ‘ही सगळी पुस्तकं आयुष्याच्या विविध टप्प्यांवर वाचल्यामुळे त्याचा फायदा झाला आणि वाटलं आपण खरंच किती भाग्यवान आहोत, आपण अशा भाषेत जन्मलो, जिथे असे प्रतिभावंत साहित्यिक आहेत. त्यांच्यामुळे वेळोवेळी पुस्तकांनी मला आनंद दिला आणि अजूनही तो आनंद मी अनुभवतो आहे.’

वाचन ही समृद्ध करणारी गोष्टी आहे, असं त्याचं ठाम मत असलं तरीही केवळ वाचनानेच समृद्ध होता येतं असं नाही, हेही तो आवर्जून सांगतो. ‘प्रत्येकाला केवळ वाचनातूनच प्रेरणा मिळेल असं काही नाही आणि असा आग्रहही आपण धरता कामा नये. काहींना प्रवासातून प्रेरणा मिळते, काहींना फोटोग्राफीतून मिळते. म्हणजे माझ्या परिचयात असे अनेकजण आहेत, जे फारसं वाचत नाहीत, मात्र त्यांच्यापाशी प्रत्यक्ष अनुभवांचं संचित आहे’ असं क्षितिजने सांगितलं.

समाजमाध्यमांवरील लिखाणावरही तो मोकळेपणाने व्यक्त झाला. तिथलं लिखाणही तो बऱ्यापैकी वाचतो, पण समाजमाध्यमांवरील लिखाण हे केवळ प्रतिसादात्मक लिखाण असतं, असं त्याचं मत आहे. ‘केवळ काहीतरी घडलं आहे म्हणून आपण त्या विषयावर लिहायला हवं अशा उद्देशाने लोक तिथे व्यक्त होतात. त्यामुळे अनेकदा एखाद्या घटनेविषयी मत तयार होण्याआधीच त्या विषयावर लोक घाईत व्यक्त होतात. त्या विषयावर नाटक, कादंबरी, कविता यासारखं काहीतरी सर्जनशील करणार असाल, तर घाईत व्यक्त होण्याच्या सवयीने आपली संपूर्ण ताकद वाया जाते. अर्थात, प्रत्येक विषयावर चित्रपट, कादंबरी किंवा नाटक होत नाही. अशा वेळी आपल्याला जे मांडायचं आहे त्यासाठी समाजमाध्यम हे उत्तम व्यासपीठ आहेच, मात्र काहीतरी सकस करायचं असेल तर शांतपणे आपल्याला माध्यम निवडता यायला हवं’, असं तो म्हणतो. चौफेर वाचनातून झालेली क्षितिजची जडणघडण आणि एक सर्जनशील लेखक, दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडून घडलेल्या कलाकृती दोन्ही अनुभवणं आपल्यासाठी आनंदाचं देणंच आहे.