संयत व्यक्तिमत्त्वासाठी स्त्री आणि पुरुष यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे असते. जर परस्परांमध्ये सुसंवाद नसेल तर तिथे वाद निर्माण होतो. आज प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्वत:ची स्पेस जाणीवपूर्वक सांभाळते आहे, जेव्हा एकत्र कुटुंब पद्धतींऐवजी विभक्त-न्युक्लिअर कुटुंब पद्धती रुजू पाहाते आहे, स्त्रिया आणि पुरुष समानतेच्या सूत्रामुळे नोकरी करू लागले आहेत, अशा वेळी परस्परांना समजावून घेणे आणि परस्परांत सुसंवाद असणे ही गरज आहे. मात्र सेकंदांच्याही विभाजनावर जगण्याची सवय झालेल्या आपल्या पिढीला श्रोता होणं कुठलं जमतंय? आपलं म्हणणं दुसऱ्याने ऐकावे ही अपेक्षा असणारी, जिंकण्याची -स्पध्रेत आघाडीवर राहण्याची- ती आघाडी कायम राखण्याची खुमखुमी असणारी आपण मंडळी क्षणभर उसंत दाखवून समोरच्या व्यक्तीच्या-जोडीदाराच्या भावना समजावून घेऊ का, याच प्रश्नाचा ऊहापोह करणारे पुस्तक जॉन ग्रे या लेखकाने लिहिले आहे आणि पुस्तकाचे नाव आहे.. ‘मेन आर फ्रॉम मार्स अ‍ॅण्ड वुमेन आर फ्रॉम व्हिनस’. स्त्री-पुरुष संवादातील कळीचे मुद्दे हलक्या-फुलक्या भाषेत समजावून सांगणारे हे पुस्तक.
एकूण १३ प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागले गेले आहे. पुरुषांची मंगळीय वैशिष्टय़े आणि स्त्रीची शुक्र ग्रहाचे प्रतीक म्हणता येईल अशी स्वभाववैशिष्टय़े मोठय़ा रंजक पद्धतीने लेखकाने पहिल्या प्रकरणात चितारली आहेत. किंबहुना या प्रकरणाचेच शीर्षक पुस्तकाला देण्यात आले आहे. कोणत्याही संवादासाठी एखादी व्यक्ती जे बोलली आहे तेच समजावून घेणे गरजेचे असते. मात्र अनेकदा बोलले जाणारे वाक्य आणि त्याचा घेतला जाणारा अर्थ यात भिन्नता आढळते. स्त्रीने एखाद्या प्रश्नाद्वारे व्यक्त केली जाणारी काळजी हा कदाचित आपल्यावर दाखवलेला अविश्वास असे पुरुषाला वाटू शकते आणि इथेच नाते फिस्कटायला सुरुवात होते. हे चित्र बदलण्यासाठी मुळात समोरची व्यक्ती काय म्हणते आहे हे समजावून घेणे आवश्यक आहे. ग्रे यांनी या पुस्तकात हाच मुद्दा दैनंदिन जीवनातल्या अनेक साध्या साध्या उदाहरणांद्वारे समजावून सांगितला आहे. पुरुषासमोर एखादा प्रश्न जर आ वासून उभा राहिला असेल, तर तो त्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी चिंतन करू लागतो आणि स्वत:च्या कोषात जातो तर स्त्री आपली समस्या ‘शेअर’ करून सोडविण्याचा प्रयत्न करते. स्वभावातील हा मूलभूत फरकच सुसंवादात अडचण निर्माण करतो. ग्रे यांनी पुस्तकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणांत या मुद्दय़ांचा ऊहापोह केला आहे.
संवादाची भाषा ही जशी भिन्न आहे तसाच या दोघांच्या वृत्तीतही फरक आहे. पुरुष हे एखाद्या रबरासारखे असतात जे काही वेळाने- काही कालावधीने पूर्ववत होतात तर स्त्रिया या एखाद्या लाटेसारख्या असतात. स्वाभाविकच परस्परांच्या प्रतिसादात या वृत्तीचा फरक उरतो. या मुद्दय़ावरील चिंतन लेखकाने सहाव्या आणि सातव्या प्रकरणांमध्ये मांडले आहे. त्यापुढील प्रकरणांमध्ये एकमेकांना कसे जिंकून घ्यावे, परस्परांच्या व्यक्तिमत्त्वातील खटकणाऱ्या गोष्टी एकमेकांना कशा सांगाव्यात, व्यक्तिमत्त्वाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, त्या कशा व्यक्त कराव्यात अशा अनेक बाबी लेखकाने सहज अंमलात आणता येतील अशा पद्धतींद्वारे सूचित केल्या आहेत.
लौकिकार्थाने हे जरी पती आणि पत्नी या नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी लिहिले गेलेले पुस्तक असले तरीही त्याची व्याप्ती मोठी आहे. मुलगा-आई, मुलगी-बाबा, भाऊ-बहीण, मित्र-मत्रीण अशा प्रत्येक छटेला हे पुस्तक न्याय देते आणि हे संयत व्यक्तिमत्त्व घडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. म्हणूनच कौटुंबिक सौहार्दतेसाठी आपल्या ‘शेल्फ’वर असावेच, पण त्याहीपेक्षा प्रत्येकाने वाचून ‘जगावे’ असे हे पुस्तक.!
पुस्तक    –    मेन आर फ्रॉम मार्स अ‍ॅण्ड विमेन आर फ्रॉम व्हिनस
लेखक    –    जॉन ग्रे
पृष्ठे    –    १६९
प्रकाशक    –    हार्पर कॉलिन्स
मूल्य    –    ३०० रुपये