रेश्मा राईकवार
कुठल्याशा परदेशातील एका छोटय़ा कंपनीचा इथे भारतात विस्तार झाला आणि मग तो फॅशन ब्रॅण्ड म्हणून नावारूपाला आला किंवा एखाद्या भारतीय कल्पक फॅशन डिझानयरच्या वा उद्योजकाच्या ध्यासातून जन्माला आलेल्या फॅशन ब्रॅण्डबदद्ल आजवर आपण या सदरातून माहिती घेतली आहे. मात्र फॅशन उद्योगात रिटेलर म्हणूनच उतरलेल्या आणि नावारूपाला आलेल्या ब्रॅण्डपैकी अग्रणी म्हणून आपले अस्तित्व टिकवून ठेवलेला ब्रॅण्ड म्हणजे ‘ग्लोबस’. एकेकाळी फॅशन रिटेलिंग उद्योगात जे बडे समूह उतरले होते त्यातला बिनीचा शिलेदार म्हणून ‘ग्लोबस’ने आपली ओळख निर्माण केली होती. आजही या ब्रॅण्डचा लौकिक कमी झाला नसला, तरी सगळय़ांसाठी सगळेच नको.. प्रत्येकासाठी काही खास, वेगळे देणारा ब्रॅण्ड म्हणून ‘ग्लोबस’ने आपली पुढची वाटचाल निश्चित केली आहे.

नव्वदच्या दशकात फॅशन रिटेल उद्योगात ‘पॅंटलून’, ‘ग्लोबस’, ‘शॉपर्स स्टॉप’सारख्या ब्रॅण्ड्सचा उदय झाला. या ब्रॅण्ड्सच्या मांदियाळीत ‘ग्लोबस’चा जन्म हा तसा उशिराच म्हणजे नव्वदच्या उत्तरार्धात झालेला. ‘ग्लोबस’ हा फॅशन ब्रॅण्ड राजन रहेजा ग्रुपचा भाग आहे. १९९८च्या जानेवारीत ‘ग्लोबस’ची स्थापना झाली होती. मुंबईस्थित या ब्रॅण्डने त्यानंतर वर्षभराने आपले पहिले ब्रॅण्ड स्टोअर इंदौरमध्ये सुरू केले. ३५ हजार स्क्वेअर फूट इतक्या मोठय़ा जागेत या पहिल्यावहिल्या स्टोअरची सुरुवात झाली होती. मोठमोठय़ा जागा घेऊन तिथे मॉलसदृश स्टोअर उभे करणं ही त्याकाळच्या ब्रॅण्ड्सची खासियत होती. ‘ग्लोबस’ही त्याला अपवाद नव्हता. नव्वदच्या पिढीने आपलेसे केलेले हे ब्रॅण्ड्स खास तरुणाईसाठीच होते. पाश्चिमात्य पेहरावाचा प्रभाव असलेले हे ब्रॅण्ड्स अल्पकाळात तरुणाईमध्ये लोकप्रिय झाले आणि एकमेकांमधली स्पर्धाही वाढत गेली. फॅशन आणि रिटेल क्षेत्रातील वेगवेगळी वादळं पचवून हे ब्रॅण्ड आजही टिकून आहेत. मात्र त्यांचा एकमेव असण्याचा दिमाख अर्थातच स्पर्धेमुळे आणि फॅशनमधील सतत बदलत राहिलेल्या ट्रेण्डमुळे हळूहळू कमी होत गेला. अर्थात, फॅशन रिटेल उद्योगातील सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या यादीत आजही ‘ग्लोबस’ पहिल्या दहामध्ये आपले स्थान टिकवून आहे. त्यामुळे या ब्रॅण्डची यशस्वी वाटचाल समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

तरुणांचा ब्रॅण्ड म्हणूनच ‘ग्लोबस’ने फॅशन बाजारपेठेत पाऊल ठेवले होते. त्यामुळे १८ ते ३५ वर्षे वयोगटातील स्त्री-पुरुषांची अभिरुची, त्यांच्या गरजा आणि फॅशनचे नवनवे ट्रेण्ड्स यांचा मेळ घालत ‘ग्लोबस’ने आपले कलेक्शन्स स्टोअर्समध्ये उपलब्ध करून दिले. सुरुवातीला भारतीय फॅशन विश्वावर एकूणच पाश्चिमात्य शैलीतील पेहरावाचा प्रभाव होता. त्यामुळे साहजिकच डेनिम, मिडीज – स्कर्ट्स, टॉप्स आणि टी-शर्ट्समधले वेगवेगळे प्रयोग त्यावेळच्या सगळय़ाच ब्रॅण्ड्सची खासियत होती. ‘ग्लोबस’ या बाबतीत सगळय़ांना बाजूला सारून पहिल्या पसंतीचा ब्रॅण्ड म्हणून लौकिक मिळवता झाला. चेन्नई, मुंबई, पुणे असा आपला व्याप वाढवत २००८ पर्यंत हा ब्रॅण्ड देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये २४ स्टोअर्समधून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचला होता. २००४ पर्यंत या ब्रॅण्डची धुरा वेद प्रकाश आर्य यांच्याकडे होती. सध्या विनय गजानन नाडकर्णी हे ‘ग्लोबस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. गेल्यावर्षीपर्यंत ‘ग्लोबस’ हा ब्रॅण्ड देशभरात २२ शहरांमध्ये सर्वदूर पसरला आहे. फॅशन विश्वाने एका क्षणी आपल्या अंगावर चढलेली फक्त पाश्चिमात्य कपडय़ांची झूल बाजूला केली. इंडो – वेस्टर्न फ्युजन असलेले कपडे अधिक पसंतीचे ठरू लागले. भारतीय पिंट्र्स, कापड याला तरुणाईकडून अधिकाधिक पसंती मिळू लागली. त्यामुळे ‘ग्लोबस’नेही भारतीय पिंट्र्स आणि देश – परदेशातील फॅशन ट्रेण्ड्स लक्षात घेत लोकप्रिय ठरतील अशी डिझाईन्स, कट्स यांचा मिलाफ साधत आपले कलेक्शन्स सादर केले. कॅज्युअल वेअर, एथनिक वेअर, सणसमारंभ आणि कॉर्पोरेट इव्हेंटपासून वेगवेगळय़ा ओकेजननुसार लागणारे फ्युजन स्टाईलचे कपडे असे विभागवार कलेक्शन्स ‘ग्लोबस’च्या ताफ्यात आहेत. अगदी आत्ताच्या ट्रेण्डनुसार कपडय़ांनुसार ज्वेलरी आणि ॲक्सेसरीजचे पर्यायही ‘ग्लोबस’ने उपलब्ध करून दिले आहेत. बॉलीवूड कलाकारांची स्वतंत्र क्लोदिंग लाईन हा आता नवीन विषय राहिलेला नाही. ग्लोबसने मात्र अभिनेत्री करीना कपूरला ब्रॅण्ड ॲम्बेसेडर करत २००७-०८ साली करीनाने डिझाईन केलेले कपडे ‘ग्लोबस’च्या कलेक्शनमधून मार्केटमध्ये आणले होते. स्त्री आणि पुरुषांसाठी एकाच ठिकाणी कलेक्शन्स ठेवत मोठमोठय़ा स्टोअर्समधून ‘ग्लोबस’ने आपले वेगळे अस्तित्व ग्राहकांना जाणवून दिले होते. आज मात्र दिमाखात मिरवणारे हे मोठमोठे स्टोअर्स गेले कुठे, असा प्रश्न पडतो.

२०१३ पर्यंत ‘ग्लोबस’ने आपले ३६वे स्टोअर भारतात सुरू केले होते. आता मात्र या ब्रॅण्डचा विस्तार काहीसा मंदावल्यासारखा वाटतो. ब्रॅण्ड म्हणून ‘ग्लोबस’ची लोकप्रियता, दर्जा कायम असला तरी ब्रॅण्डच्या मूळ स्वरूपात काही बदल झाले आहेत किंबहुना ते करावे लागले आहेत. कधीकाळी स्वतंत्र मोठमोठय़ा स्टोअर्समधून दिसणारा हा ब्रॅण्ड आता मॉलमध्ये एकत्रित ब्रॅण्ड्सबरोबर दिसतो. रिटेल क्षेत्रातील समकालीन ब्रॅण्ड्सबरोबरची स्पर्धा हा एक घटक जसा ‘ग्लोबस’च्या विस्ताराला वेग घालणारा ठरला. तसंच ऑनलाइन बाजारपेठेमुळेही ब्रॅण्डला धक्का बसला. खरंतर परदेशी गुंतवणूक स्वीकारत सातासमुद्रापार जाणं ब्रॅण्डला सहजशक्य होतं, मात्र आपली भारतीय ओळखच कायम ठेवायची हा ब्रॅण्डचा निर्धार आजवर त्यांनी पाळला आहे. मात्र ऑनलाइनचे स्तोम वाढल्यामुळे साहजिकच इतर ब्रॅण्ड्सप्रमाणे मिंत्रा, फ्लिपकार्टवर आपले कलेक्शन्स आणणं ‘ग्लोबस’नेही स्वीकारलं. सध्या हा ब्रॅण्ड ऑनलाइनवरही उपलब्ध आहे. रिअल इस्टेटचे चढे दर हा आणखी एक महत्त्वाचा घटक ‘ग्लोबस’च्या दिमाखदार वाटचालीला रोखणारा ठरला. सुरुवातीप्रमाणे मोठमोठय़ा जागांवरील आऊटलेट्समधून ब्रॅण्ड सादर करणं आता परवडेनासं झालं आहे. त्यामुळे छोटय़ा-छोटय़ा स्टोअर्सची संख्या वाढवत न्यायची आणि मोठमोठय़ा मेट्रो सिटीबरोबरच इतर छोटय़ा शहरांमध्येही प्रवेश करायचा ब्रॅण्डचा मानस आहे. आपले मूळ स्वरूप बदलण्याबरोबरच वुमेन आणि मेन ॲपरल्स स्टोअर स्वतंत्र करत हा ब्रॅण्ड आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.
viva@expressindia.com