रेश्मा राईकवार

पर्यावरणाचा समतोल साधत फॅशन विकसित करायला हवी ही गरज असल्याचे सांगत सध्या अनेक आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रॅण्ड्स सस्टेनेबल फॅशनचा उदो उदो करताना दिसतात. त्यामुळे फॅशन उद्योगाच्या दृष्टीने ‘फास्ट फॅशन’ हा एके काळी परवलीचा असलेला शब्द सध्या जितका दूर ठेवता येईल तितका ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि तरीही जगभरात खास फास्ट फॅशनसाठीच ओळखले गेलेले असे काही ब्रॅण्ड्स आहेत जे आजही आपला रुबाब टिकवून आहेत. ‘झारा’ हा अशा काही आघाडीच्या ब्रॅण्ड्सपैकी एक.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
Bird Wardha
आंतरराष्ट्रीय पक्षीगणना ! वर्धा जिल्हा नोंदणीत अग्रेसर, आढळले ‘हे’ पक्षी

फास्ट फॅशनच्या ध्यासामुळेच जगभरात नावारूपाला आलेला ‘झारा’ हा ब्रॅण्ड आपल्याकडे मात्र अजूनही तसा खिशाला न परवडणारा किंवा चैनीचा ब्रॅण्ड म्हणूनच पाहिला जातो. त्यामुळे आली शॉपिंगची लहर आणि थेट केली जाऊन खरेदी.. असं किमान सर्वसामान्यांचं ‘झारा’च्या बाबतीत होत नाही. आणि तरीही या ब्रॅण्डचं आकर्षण फॅशनप्रेमींना काकणभर जास्तच आहे. किमान त्याला प्रतिष्ठेची झालर तर आहेच. स्पेनच्या कुठल्याशा गावात जन्माला आलेल्या या ब्रॅण्डच्या नावाची कथा तरी फिल्मी अर्थात चित्रपटाशी जोडली गेलेली आहे. अमॅन्सिओ आर्तेगो हा या ब्रॅण्डचा किमयागार. जगभरातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत गणल्या जाणाऱ्या अमॅन्सिओंची साधी राहणी आणि फॅशन उद्योगाच्या बाबतीत आजही अगदी फास्ट असलेली त्यांची विचारसरणी लोकांना आजही नवल करायला लावणारी अशीच आहे. गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या अमॅन्सिओ यांनी लहान वयातच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी एका शिंप्याकडे काम करायला सुरुवात केली होती. एके काळी हाताने कपडे शिवणारे अमॅन्सिओ पुढे जाऊन एका मोठय़ा कपडय़ांच्या रिटेल कंपनी समूहाचे मालक असतील ही कल्पनाही तशी फिल्मीच.. पण त्यांनी ती प्रत्यक्षात आणली.

१९७४ साली स्पेनमध्येच त्यांनी ‘झारा’ या ब्रॅण्डची सुरुवात केली होती. सुरुवातीला त्याचे नाव ‘झोर्बा’ असे होते. त्याकाळी प्रदर्शित झालेल्या ‘झोर्बा द ग्रीक’ या त्यांना आवडलेल्या चित्रपटावरून त्यांनी हे नाव घेतले होते. पण आपल्या दुकानापल्याड काही अंतरावर याच नावाचा बार आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आहे त्या शब्दातील अक्षरांमध्ये फेरबदल करून अखेर आपल्या ब्रॅण्डचे नामकरण ‘झारा’ असे केल्याचे सांगितले जाते. अर्थात, या ब्रॅण्डच्या यशाची कथा त्याच्या नावात नाही तर कामात आहे आणि त्यामुळेच एखादा ब्रॅण्ड यशस्वी कसा ठरतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या सदरात ‘झारा’चा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. उंची कपडय़ांची नक्कल कमीत कमी वेळात आणि कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अमॅन्सिओ यांनी सुरुवातीपासूनच केला होता. त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली तोवर फॅशनची बाजारपेठ चांगलीच विकसित झाली होती. त्यामुळे अगदी कमी वेळात सातत्याने नवनवे डिझाइन्स आणत राहायचे ही त्यांची योजना या ब्रॅण्डच्या भरभराटीसाठी चांगली फळाला आली. ‘इन्स्टन्ट फॅशन’ ही कल्पना त्यांनी तेव्हा प्रत्यक्षात आणली होती आणि आजही ती या ब्रॅण्डची खासियत मानली जाते.

‘झारा’च्या जन्मानंतर अवघ्या आठ वर्षांत त्यांनी फास्ट फॅशनच्या बळावर स्पेनमध्येच मोठमोठय़ा शहरांत नऊ स्टोअर्स सुरू केले. १९८५ मध्ये त्यांनी ‘इंडिटेक्स’ या रिटेल समूहाची स्थापना केली. तेव्हापासून हा ब्रॅण्ड या समूहाचा भाग आहे. कोणत्याही उत्पादनाची वा कंपनीची सुरुवातीची वाटचाल ही प्रसिद्धीच्या बळावर केली जाते. त्यासाठी जाहिरातीचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. मात्र अमॅन्सिओ यांनी जाहिरातीवर पैसा खर्च केला नाही. त्याउलट त्यांनी अधिकाधिक स्टोअर्स सुरू करणं, निर्मितीची प्रक्रिया जलद करणं आणि वितरणाचं जाळं वाढवणं या गोष्टींवर भर दिला. त्यामुळे पुढच्या दहा वर्षांत पोर्तुगाल, न्यूयॉर्क, स्वीडन, नॉर्वे, बेल्जियम, मेक्सिको अशा विविध देशांत ‘झारा’ने आपले हातपाय पसरले. आज ९६ देशांतून या ब्रॅण्डचा कारभार सुरू आहे. ‘इन्डिटेक’ समूहात आणखीही काही ब्रॅण्ड्सची भर पडलेली आहे.

नवीन डिझाइन्स बाजारात आणली की ती फार काळ राहू द्यायची नाहीत. एकदा ग्राहक तुमच्या डिझाइन्सशी जोडला गेला की त्याने नव्या कलेक्शनसाठी तुमच्याकडे लगेच धाव घेतली पाहिजे. किंबहूना, ‘झारा’च्या नव्या डिझाइन्स कोणत्या येतील याकडे त्यांचे लक्ष असले पाहिजे, अशा पद्धतीची डिझाइन्स आणि निर्मितीची प्रक्रिया आजही कायम आहे. त्यामुळे वर्षांला किमान १२,००० नवीन डिझाइन्स आणि कलेक्शन ‘झारा’ या ब्रॅण्डकडून जगभरातील बाजारपेठेत पोहोचतात. ब्रॅण्डचा हा लौकिक आणि विश्वास आजही कायम आहे. ग्राहकांच्या आवडी-निवडीशी जोडला गेलेला ब्रॅण्ड हाही विश्वास या ब्रॅण्डने कमावला आहे. जगभरातील आपल्या स्टोअर्समध्ये ग्राहकांकडून काय काय विचारणा होते, कोणत्या प्रकारच्या डिझाइन्सना, कपडय़ांना प्राधान्य दिले जाते याचा सातत्याने अभ्यास-संशोधन केले जाते आणि त्यानुसार ब्रॅण्डच्या जगभरातील सगळय़ा स्टोअर्समध्ये ते ते कलेक्शन उपलब्ध केले जाते. त्यामुळेच एकदा ब्रॅण्डशी जोडला गेलेला ग्राहक सहसा त्यापासून दूर जात नाही. अमॅन्सिओ यांचं हे व्यवसायाचं गणित आजही नेमाने पाळलं जात असल्यानेच बहुधा ब्रॅण्ड्सच्या या भाऊगर्दीत ‘झारा’ आपला रुबाब आजही टिकवून आहे.