तेजश्री गायकवाड

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय फॅशनमध्ये बदलाचे वारे जाणवू लागले. अनेक नव्या कल्पना, डिझाईन्स, स्टाईलसह फॅशन व्यवसायात परिवर्तित होऊ लागल्या. या बदलाची शैली ओळखत एका व्यक्तीने फॅशन व्यवसायात आपलं स्थान निर्माण करायचं ठरवलं. स्वप्नपूर्ती कधीही सहज होत नाही. आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी मुळात पैसा उभा करणं ही पहिली गरज असते. अगदी कमीत कमी भांडवली पैसे उधार घेऊन, डिझाईनर-चपराशी-माल वाहतूकदार सगळय़ाच भूमिका एकटय़ाने वठवत आपल्या मार्गावर पुढे जात राहिलेला देशी ब्रॅण्ड म्हणजे ‘मुफ्ती’. नावावरून तो बाहेरचा वाटला तरी अजून हा ब्रॅण्ड देशाबाहेर गेलेला नाही, किंबहुना तिथे जाण्यापेक्षा इथे ‘दादा’ होऊन राहण्यात ब्रॅण्डला जास्त स्वारस्य आहे.

Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
Dealing with anti-recipe trolls on social media
एका पाककृतीविरोधातील ट्रोलधाडीला सामोरे जाताना…

मेन्स फॅशनमध्ये हटके काही देऊ पाहणारा आणि मेन्स फॅशन ब्रॅण्ड म्हणूनच लोकप्रिय झालेल्या ‘मुफ्ती’ या ब्रॅण्डचे कर्तेधर्ते आहेत कमल खुशलानी. ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे जग धावतं आहे म्हणून न धावता हळूहळू पण सातत्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली की शर्यत जिंकता येते याची प्रचीती कमल खुशलानी यांनी स्वानुभवाने घेतली. एकटय़ाच्या मेहनतीतून उभा राहिलेला हा ब्रॅण्ड म्हणूनच इतर फॅशन ब्रॅण्ड्समध्ये उठून दिसतो. आज ‘मुफ्ती’ हा देशातील सर्वात प्रसिद्ध पुरुष फॅशन ब्रॅण्ड आहे.

१९९२ मध्ये कमल खुशलानी यांनी ‘मिस्टर अँड मिस्टर’ नावाने पुरुषांसाठी शर्ट बनवणारी कंपनी सुरू केली. त्यांनी त्या वेळी बाजारात विकल्या जाणाऱ्या इतर ब्रॅण्डच्या कपडय़ांपेक्षा वेगळय़ा पद्धतीने सुरुवात केली. तेही त्यांच्याकडे त्या वेळी उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांतूनच त्यांनी या व्यवसायाचा गाडा सुरू केला. १९९८ मध्ये डेनिम कॅज्युअल वेअर ब्रॅण्ड अशी वेगळी ओळख घेऊनच ‘मुफ्ती’ या ब्रॅण्डचा शुभारंभ झाला. आज ‘मुफ्ती’ची उत्पादने देशभरात ३०० हून अधिक विशेष ब्रॅण्ड आऊटलेट्स, १,४०० मल्टी-ब्रॅण्ड आऊटलेट्स, तसेच शॉपर्स स्टॉप आणि सेंट्रलसारख्या मोठय़ा फॉरमॅट स्टोअर्समध्ये विकली जातात. मुफ्तीचे हे कपडे ई-कॉमर्स पोर्टलवर आणि कंपनीच्या वेबसाइटवरही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मुफ्तींच्या उत्पादनांमध्ये शर्ट, जीन्स, ट्राऊजर, टी-शर्ट, शॉर्ट्स, ब्लेझरसह फुटवेअरचाही समावेश होतो.

इतर अनेक देशी ब्रॅण्डप्रमाणेच ‘मुफ्ती’ची सुरुवातही कमल खुशलानी यांनी राहत्या घरातूनच केली होती. घरातून सुरू केलेला उद्योग ते देशातील नामांकित ब्रॅण्ड बनण्याचा त्यांचा प्रवास एकूणच रंजकही आहे आणि संयम-जिद्दीच्या जोरावर यश कसं मिळवता येतं हे प्रत्यक्ष शिकवणाराही आहे. कमल यांना पहिल्यापासूनच फॅशन रिटेल व्यवसायात रस होता, पण मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेले आणि वयाच्या १९ व्या वर्षी वडील गमावल्यामुळे फार लवकर आर्थिक जबाबदाऱ्या त्यांच्या अंगावर पडल्या होत्या. त्यामुळे स्वत:चा व्यवसाय उभारण्याचं स्वप्न पाहणं हे फार व्यवहार्य नव्हतं आणि स्वप्नांना आकार देण्यासाठी पैसेही नव्हते. दैनंदिन खर्च भागवण्यासाठी ते एका व्हिडीओ कॅसेट कंपनीत नोकरी करू लागले. एक एक दिवस जात होता, पण त्यांची  फॅशन व्यवसायातील रुची कमी होत नव्हती. फॅशनच्या व्यवसायात नुसती रुची असून भागत नाही, तर ग्राहकांची गरज काय आहे, मार्केटमध्ये सध्या काय उपलब्ध आहे, याचाही पुरेपूर अभ्यास असावा लागतो आणि तेच कमल खुशलानी यांचे वैशिष्टय़ ठरले. त्यांनी व्यवसायाला सुरुवात करायची ठरवली तेव्हा देशात लोकप्रिय असलेले जवळपास सगळेच जीन्सचे ब्रॅण्ड्स बूटकटपासून बेलबॉटमपर्यंतचे डिझाईन्स देत होते. त्यांचे पॅटर्न्‍सही ठरलेले होते. यापेक्षा वेगळे काही करायचे, असे मनात निश्चित केलेल्या खुशलानी यांनी मेन्ससाठी स्ट्रेचेबल जीन्सचा पर्याय उपलब्ध करून दिला. मेन्स स्ट्रेचेबल जीन्स आणणाऱ्या पहिल्या ब्रॅण्ड्सपैकी ते होते, असा दावा खुशलानी करतात; पण फॅशन ब्रॅण्ड्सपैकी लोकप्रिय मेन्स फॅशन ब्रॅण्ड म्हणून ‘मुफ्ती’ची ओळख आहे यात कुठलीही शंका नाही.

अगदी छोटय़ा स्तरापासून केलेले काम हे या यशाचे द्योतक आहे. १९९२ मध्ये खुशलानी यांनी आपल्या मावशीकडून १०,००० रुपये उसने घेऊन सुरुवात केली होती. वरती उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला ‘मिस्टर अँड मिस्टर शर्ट’ कंपनीची स्थापना करून जेन्ट्स शर्ट्सचे उत्पादन आणि विक्री सुरू केली. भारतात ज्या प्रकारची संस्कृती आणि फॅशन आहे ती जगभर पसरू शकते, असा त्यांचा विश्वास होता. कमल खुशलानी स्वत: फॅशन डिझायिनग शिकले. सुरवातीला वेगवेगळ्या कापडांचा ढीग घेऊन ते मार्केटमध्ये पोहोचायचे. डिझाईन्सनुसार कपडे शिवून घ्यायचे आणि ते पुन्हा सायकलवरून घरी आणायचे. त्या वेळी घरात डायिनग टेबलाखालची जागा गोदामासारखी वापरली जायची, असं ते सांगतात. खूप सामान घेऊन ट्रॅफिकमधून वाट काढताना अडकून पडायला लागायचं आणि सहप्रवाशांच्या चेष्टेचाही विषय ठरायचो, अशी आठवण सांगतानाच याच मेहनतीतून ब्रॅण्ड मोठा करण्याची जिद्दही वाढत गेल्याचं ते म्हणतात. ‘मुफ्ती’ हा एक हिंदी शब्द आहे जो भारतीय सैन्यदलाकडून वापरला जातो. याचा अर्थ ‘कॅज्युअल ड्रेसिंग’ म्हणजेच वर्दीच्या विरुद्ध असा पोशाख. कमल यांनी हे नाव निवडले, कारण कंपनीने त्या काळात इतर ब्रॅण्डच्या कपडय़ांपेक्षा खूप वेगळे कपडे बनवले होते. त्यामुळे उत्पादनातील वैविध्य हे नावातही उठून दिसायला हवं, हा त्यांचा आग्रह कायम होता.

२००० नंतरच्या दशकात खऱ्या अर्थाने मुफ्तीला लोकप्रियता मिळाली. सध्या कंपनीकडे ३०० पेक्षा जास्त विशेष ब्रँड आऊटलेट्स, सुमारे १२०० मल्टी-ब्रँड आऊटलेट्स आणि ११० शॉपर्स स्टॉप आणि सेंट्रलसारखे मोठे फॉरमॅट स्टोअर्स आहेत. कंपनीच्या पे-रोलवर सहाशेपेक्षा अधिक कर्मचारी आहेत आणि अप्रत्यक्षपणे ते दोन हजारांहून अधिक लोकांना ते रोजगार देतात. १० हजार रुपये उधार घेऊन सुरु केलेल्या ब्रॅण्डची आजची वार्षिक उलाढाल सुमारे ४०० कोटी आहे. दूरदृष्टी, जिद्द आणि मेहनत यांचा मिलाफ साधून कमल खुशलानी यांनी ‘मुफ्ती’ला भारतीय बाजारपेठेत वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

viva@expressindia.com