scorecardresearch

Premium

‘ब्रॅण्ड’ टेल : फॅबइंडिया मेड इन इंडिया ब्रॅण्ड

सातासमुद्रापार आलेल्या कोण्या एका व्यक्तीच्या कल्पनेतून उभं राहिलेलं कपडय़ाचं छोटंसं दुकान.

‘ब्रॅण्ड’ टेल : फॅबइंडिया मेड इन इंडिया ब्रॅण्ड

तेजश्री गायकवाड

सातासमुद्रापार आलेल्या कोण्या एका व्यक्तीच्या कल्पनेतून उभं राहिलेलं कपडय़ाचं छोटंसं दुकान. शुभारंभापासूनच त्याची नाळ जोडली गेली ती भारतीय कलापरंपरेशी. नावातच भारतीयत्व घेऊन जन्माला आलेला हा ब्रॅण्ड गेली सहा दशके भारतीय कला, कपडा आणि कारिगर यांच्याशी मुळापासून घट्ट जोडला गेला आहे. आधुनिक फॅशनचे कितीही वारे येऊ दे.. काळाच्या ओघातही आपला ‘मेड इन इंडिया’ स्वॅग टिकवून ठेवणारा  आणि तेवढय़ाच दिमाखाने मिरवणारा ब्रॅण्ड ‘फॅबइंडिया’.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

एखादा साधासुंदर, कोरीव जरीकाम, कशिदाकाम असलेला कुर्ता किंवा अप्रतिम कारागिरी असलेली एखादीच साडी आपल्या कपाटात असेल तर ती ‘फॅबइंडिया’ची.. दीर्घकाळ जपून ठेवावी अशी साठवणीतली आठवण देऊन जाणारं पण थोडंसं खिशाला सहजी न परवडणारं कलेक्शन ही या ब्रॅण्डची कित्येक वर्षांची ओळख. एक काळ हा ब्रॅण्ड एका वर्गापुरता मर्यादित होता. कारागिरांनी हाताने बनवलेले कपडे लोकांच्या रोजच्या वापराचा भाग व्हावेत, या दृष्टीने प्रयत्नशील राहिलेला हा ब्रॅण्ड आज अनेकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. एका विदेशी माणसाने सुरू केलेला हा ब्रॅण्ड आज अस्सल भारतीय ब्रॅण्ड म्हणून ओळखला जातो. ‘फॅबइंडिया’ या प्रसिद्ध ब्रॅण्डची सुरुवात १९६० साली झाली. जॉन बिसेल नावाच्या अमेरिकन व्यापाऱ्याने १९५८ मध्ये भारताला भेट दिली आणि नंतर ते भारतातच राहिले. बिसेल यांनी एका दुकानापासून ‘फॅबइंडिया’ची सुरुवात केली होती. आज त्याच्या  स्थापनेच्या ६२ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड म्हणून नावाजल्या गेलेल्या ‘फॅबइंडिया’चे जाळे देश-विदेशापर्यंत विस्तारले आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जॉन बिसेल यांच्या वडिलांनी त्यांना भारताविषयी माहिती दिली होती. बिसेल १९५८ साली भारतात फोर्ड फाऊंडेशनचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. गावखेडय़ातील लोकांना निर्यातयोग्य वस्तूनिर्मितीसंदर्भात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी बिसेल यांना देण्यात आली होती, त्यासाठी त्यांना अनुदानही देण्यात आलं होतं. या दोन वर्षांच्या काळात गावपातळीवर वेगवेगळे कारागीर, त्यांची कला यांच्या संदर्भातील कामाचा अनुभव त्यांच्याशी जोडला गेला. इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्रीला प्रोत्साहन मिळालं तर त्यांची कला देशविदेशात पोहोचू शकेल हा विश्वास त्यांना वाटू लागला होता. त्यांनी ‘फॅबइंडिया’ची सुरुवात ही खरंतर होम फर्निशिंगच्या वस्तू निर्यात करण्यासाठी केली होती. मात्र भारतीय हातमाग विणकर, त्यांची कारागिरी यातलं त्यांचं स्वारस्य वाढतच गेलं. त्यांनी ‘फॅबइंडिया लिमिटेड’ची सुरुवात केली, ज्याअंतर्गत रग्ज आणि कार्पेट्स सारख्या स्थानिक कापडाने बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या आणि त्यांची निर्यात केली. १९६० साली सुरू झालेला त्यांचा निर्यात व्यवसाय मजबूत होत गेला आणि साठच्या दशकाच्या मध्यापर्यंत त्यांची उलाढाल २० लाखांपेक्षा जास्त झाली.

हळूहळू त्यांनी १९७६ मध्ये ग्रेटर कैलाश, नवी दिल्ली येथे पहिल्या स्टोअरसह देशांतर्गत रिटेल विक्रीमध्ये प्रवेश केला. आज फॅबइंडियाची भारतातील ११८ शहरांमध्ये ३२७ स्टोअर्स आणि १४ आंतरराष्ट्रीय स्टोअर्स आहेत. फॅबइंडिया हा ब्रॅण्ड निर्यातदार म्हणून मर्यादित न राहता देशांतर्गत आणि देशाबाहेर त्याचा साखळी उद्योग निर्माण करण्याचं श्रेय हे जॉन बिसेल यांचा मुलगा विल्यम बिसेल याचं आहे. १९८८ मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी व्यवसायाची सूत्रं हातात घेतली. सुरुवातीच्या काळात, विल्यम यांनी कारागीर सहकारी ‘भद्राजुन कारीगर ट्रस्ट’ (BAT) ची स्थापना केली, जी राजस्थानमधील विणकरांबरोबर काम करत होती. २००५ मध्ये फॅबइंडिया हे प्रीतम सिंग, रितू कुमार, मधुकर खेरा आणि लैला तयबजी यांसारख्या डिझाइनर्सना बरोबर घेऊन ‘ऑल इंडिया आर्टिसन्स अँड क्राफ्ट वर्कर्स वेल्फेअर असोसिएशन’ (एआयएसीए) चे संस्थापक सदस्य बनले. २०१० मध्ये संस्थेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त, कंपनीने आपल्या सर्व ८४२ कर्मचाऱ्यांना भागधारक बनवले. आजपावेतो फॅबइंडियाने ५५ हजाराहून अधिक क्राफ्ट आधारित ग्रामीण उत्पादकांना शहरी बाजारपेठांशी जोडले आहे.  ज्यामुळे कुशल आणि शाश्वत ग्रामीण रोजगार निर्माण झाला. देशभरात घराघरात हा ब्रॅण्ड पोहोचावा यासाठी विल्यम्स यांनी केलेले प्रयत्न भारतीय विणकर, कारागीर यांना मुख्य बाजारपेठेशी जोडण्याच्या दृष्टीने जसे महत्त्वाचे ठरले. तसेच देशभरातील नागरिकांना आपल्याकडील टेक्स्टाईल इंडस्ट्री, परंपरा, नक्षीकाम, हरतऱ्हेचे फॅब्रिक यांची ओळख फॅबइंडियाने खऱ्या अर्थाने करून दिली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

विल्यम यांच्या नेतृत्वाखाली  दिल्लीत फक्त दोन रिटेल स्टोअर्स असलेल्या फॅबइंडियाने आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड म्हणून मान्यता मिळवत प्रगती केली. जॉन बिसेल यांनी एका रिटेल दुकानापासून सुरुवात केली आणि विल्यम यांनी रिटेल साखळी बनण्याच्या मार्गावर देशांतर्गत बाजारपेठेकडे लक्ष केंद्रित करण्यात मोलाचा वाटा उचलला. भारतीय कला परंपरा या फक्त टेक्स्टाईल इंडस्ट्रीपुरत्या मर्यादित नाहीत. कपडे, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, होम डेकोर अशा कित्येक क्षेत्रात भारतीय कला परंपरांनी आपला असा ठसा उमटवला आहे. हा कला वारसा याही वस्तूंशी जोडून घेत त्यांनाही फॅबइंडियाशी जोडण्याचा विल्यम यांचा प्रयत्न यशस्वी ठरला. सध्या कापड आणि हातमागाच्या कपडय़ांपासून ते स्टेशनरी, फर्निचर, घरगुती उपकरणे, सिरॅमिक्स, सेंद्रिय पदार्थ आणि पर्सनल केअर उत्पादने आणि होम फर्निशिंग सामान या सर्व श्रेणीतील उत्पादनाची विक्री फॅबइंडिया करते.

स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या या ब्रॅण्डने कला आणि व्यवहार दोन्हीची उत्तम सांगड घातली. आणीबाणीच्या काळात बदललेले नियम, एका निवासी इमारतीतून सुरू झालेला उद्योग योग्य व्यावसायिक वास्तूत आणत केलेली वाटचाल, ज्या कारागिरांशी नाळ जुळली त्यांनाच योग्य वेळी व्यवसायात भागीदार करत भारतीय हातमागकलेला मुख्य प्रवाहात आणणे अशा कित्येक उलाढाली काळाच्या हरएक टप्प्यावर या ब्रॅण्डने अनुभवल्या. भारतीय कलापरंपरांच्या मुळाशी जोडून घेत सुरू झालेल्या या उद्योगाचा वटवृक्ष आजही त्या परंपरा मिरवत दिमाखाने बहरला आहे.

आधुनिक आणि फास्ट फॅशनचा वाराही या ब्रॅण्डला लागू शकत नाही, असा विश्वास या ब्रॅण्डचे कर्तेधर्ते व्यक्त करतात. स्लो फॅशनचे युग मिरवण्यात आम्हाला रस आहे. भारतीय कारागिरांकडून तयार झालेला रेडी टु वेअर चुडीदार – कुर्ता असेल वा सहज फॅशनेबल पध्दतीने नेसता येणारी वेगवेगळय़ा भारतीय प्रिंट आणि फॅब्रिकची साडी असेल या गोष्टी ग्राहकांच्या कपाटात दीर्घकाळ राहतील अशा हव्यात. किंबहुना काही काळानंतरही हे कपडे टाकून न देता त्याला नव्याची जोड देत मिसमॅच पध्दतीने आपले कलेक्शन वाढत जावे, हाच ब्रॅण्डचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अगदी गेल्यावर्षी या ब्रॅण्डला ‘जश्न-ए-रिवाज’ नावाच्या खास दिवाळीत आणलेल्या नवीन कलेक्शनच्या प्रमोशनल पोस्टरवरून वादाला सामोरं जावं लागलं. दिवाळी सणासाठी ‘जश्न-ए-रिवाज’ हा शब्द वापरण्यावर आक्षेप घेत समाजमाध्यमावरून टीका करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने पोस्टर मागे घेतले आणि दिवाळीसाठीचे म्हणून ‘झिलमिल-सी दिवाळी’ हे कलेक्शन सादर केले. मात्र ते करतानाही भारतातील सगळय़ाच कलापरंपरांचा समावेश आणि सन्मान आपल्या ब्रॅण्डमध्ये केला जातो आणि तो कायम राहील, असं ठामपणे त्यांनी सांगितलं. ‘फॅबइंडिया’चा हा ‘मेड इन इंडिया’ बाणाच फॅशनप्रेमींच्या मनात घर करून राहिला आहे. 

viva@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×