स्वप्निल घंगाळे

एके काळी हौस म्हणून मिरवल्या जाणाऱ्या गोष्टी आता गरज म्हणून वापरल्या जातात. अशा अनेक गोष्टींची मोठी यादीच तयार करता येईल. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मोबाइल फोन. आता उपनगरांमध्ये आणि सधन वर्गात या मोबाइलमध्येही त्यांच्या मॉडेल्सप्रमाणे विचारसरणी अपग्रेड होताना दिसते आहे. म्हणजेच एके काळी श्रीमंतांचा फोन असा सामान्य समज असणारा आयफोन आता सर्वसामान्यांनाही परवडू लागला आहे. अर्थात हे परवडणं आणि अजूनही अनेकांना ‘इतका महाग फोन’ वाटणारा आयफोन सालाबादप्रमाणे यंदाही नवीन व्हर्जन म्हणजेच ‘आयफोन १४’ लॉन्च झाल्यानंतर चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या चर्चेत येण्याला बूस्टर डोस दिला आहे तो सणासुदीनिमित्त दिल्या गेलेल्या वेगवेगळय़ा ऑफर्स आणि ऑनलाइन सेलने. पण हे सेल नसले तरी आयफोन हा मागील काही वर्षांपासून सातत्याने मागणी वाढत जाणाऱ्या फोन्सपैकी एक आहे.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..

अमेरिकेत आयफोन वापरणाऱ्यांनी अँड्रॉइड वापरकर्त्यांना संख्येच्या शर्यतीत मागे टाकल्याचं मध्यंतरी एका अहवालात प्रसिद्ध झालं होतं. असाच काहीसा प्रकार भारतात किमान महानगरांमध्ये होतो की काय, असा प्रश्न पडावा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खास करून तरुणाईत सध्या आयफोनला मागणी आहे. यामध्ये नव्या व्हर्जनला मागणी अधिक आहे हे साहजिक असलं तरी अजूनही ‘आयफोन १२ मिनी’पासून ते सेकण्ड हॅण्ड फोन्सही लोक मोठय़ा उत्साहाने विकत घेताना दिसतात. आजही या फोनकडे प्रेस्टीज सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं. आयफोनने मागील एका तपात आपली क्रेझ आणि वेगळेपण जपलं आहे याचीच ही पोचपावती आहे. त्यामुळेच तर नुकत्याच संपलेल्या नवरात्री ऑनलाइन सेलमध्ये सर्वाधिक मागणी असणाऱ्या फोनच्या यादीत आयफोन हा अव्वल स्थानी राहिला आहे.

एके काळी आपल्या बजेटबाहेर वाटणारा हा फोन आता तरुणाईला भुरळ घालताना दिसतो आहे, अर्थात यामागे त्यांची आपापली कारणं आहेत. पण कारणं काहीही असली तरी आयफोन मिरवणाऱ्यांपेक्षा तो खऱ्या अर्थाने वापरणाऱ्यांची संख्या वाढल्याचं चित्र दिसतं आहे. बरं हे आयफोन विकत घेणारी मुलं स्वत: पैसे साठवून वगैरे आयफोन विकत घेताना दिसत आहेत. आतापर्यंत आपल्या आईवडिलांवर निर्भर असलेली आणि नुकतीच कामाला लागलेली अनेक मुलं ईएमआय किंवा ऑफर्सममध्ये बेस्ट डील म्हणून आयफोनला प्राधान्य देत असल्याचं दिसतं. वापरून तर पाहू असं म्हणण्याऐवजी हा खरेदीचा निर्णय तरुणाईने फार विचारपूर्वक केलेला असतो. काही महिन्यांपूर्वीच स्वत:च्या साठवलेल्या पैशांमधून आयफोन १३ विकत घेणारी श्रृंखला नाईक ही अशाच फस्र्ट टाइम युजर्सपैकी एक. ‘‘आयफोन हा श्रीमंत वापरतात असं मला पहिल्यांदा कळलं तेव्हापासून आयफोन घ्यायचं मनात होतं. मी नोकरीला लागल्यानंतर माझ्या पैशांनी हा फोन घ्यायचं ठरवलं होतं, पण काही केल्या या ना त्या कारणाने योग जुळून येत नव्हता. यापूर्वी मी अनेक १५ हजारांपर्यंतचे फोन वापरले आहेत. मला फोटो काढायला आणि व्हिडीओ शूटिंग करणं फार आवडतं. माझं यूटय़ूब चॅनेलही आहे. त्यामुळेच मी आयफोनची निवड केली. साठवलेल्या पैशांमधून हा फोन घेतल्याचं समाधान आहे. हा फोन वापरायला लागल्यानंतर लोकांमध्ये याची क्रेझ का आहे हे समजलं. अगदी आयओएसपासून ते अपडेट्सपर्यंत सर्व काही उत्तम आहे. व्हॅल्यू फॉर मनी म्हणतो तसं..’’ असं श्रृंखला सांगते.

बरं हा फोन वापरण्यास अधिक युजर फ्रेण्डली आहे असं केवळ वापरणाऱ्यांचं म्हणणं आहे अशातला भाग नाही. तर कंपनी मुळात हे फोन तयार करतानाच तंत्रज्ञानाऐवजी वापरकर्त्यांचा अधिक विचार करते, असं युजर इंटरफेस एक्सपर्ट असणारे सौरभ करंदीकर सांगतात. याच कारणामुळे आयफोन हे अधिक आकर्षक वाटतात आणि चर्चेचा विषय ठरतात. ‘‘ज्याला आपण या फोनची क्रेझ म्हणतो ती टिकून राहण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी सुरुवातीच्या प्रॉडक्टपासून अ‍ॅपलने युजर एक्सपिरियन्सला फार महत्त्व दिलं. ते मानसिकदृष्टय़ा वापरकर्त्यांचा फार अभ्यास करतात. अगदी बटणापर्यंत जाणारा युजरचा मिली सेकंदाचा काळही मोजण्याइतपत सूक्ष्म स्तरावर ते विचार कतात. डॉन नॉर्मन हे पूर्वी कंपनीच्या संशोधन विभागाचे प्रमुख होते. त्यांनीच ‘युजर एक्सपिरियन्स’ हा शब्द पहिल्यांदा वापरला. एखाद्या व्यक्तीला एखादं प्रॉडक्ट दिलं तर ते त्याला पाहता क्षणी समजलं पाहिजे. ते वापरावं कसं हे सहज वापरकर्त्यांना पाहताक्षणी लक्षात आलं पाहिजे, असा कंपनीचा प्रयत्न असतो,’’ असं करंदीकर सांगतात.

तसेच जागतिक बाजारपेठ आणि विविध प्रांतांतील स्थानिक बाजारपेठ यात ताळमेळ बसवण्यातही अ‍ॅपल कंपनी इतर कंपन्यांपेक्षा सरस आहे. ‘‘लोकलायझेशन आणि इंटरनॅशनलायझेशनला ही कंपनी फार महत्त्व देते. सगळय़ा जगात सगळय़ा व्यक्तींना काय वापरायला सोपं पडेल किंवा वापरायची सवय लागेल याची ते काळजी घेतात. ती गरज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिलिव्हर होईल याचीही ते काळजी घेतात. स्क्रीन टाइम त्यांनी पहिल्यांदा आणला. तसं हे मोबाइल वापराविरोधातील तंत्रज्ञान आहे असं वाटू शकतं; पण ते तंत्रज्ञान म्हणून विचार करत नाहीत तर वापरकर्त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करतात,’’ असं करंदीकर यांनी सांगितलं. याच वेगळेपणामुळे या फोनबद्दलची उत्सुकता दर वर्षी अधिक वाढलेली दिसते.

आता या फोनच्या वापरकर्त्यांची संख्या भारतात वाढते आहे, कारण याआधीची महागडा फोन ही आयफोनबद्दलची  संकल्पना आता मागे पडत चालली आहे, असं करंदीकर म्हणतात. ‘‘किंमत हा फॅक्टर आता अडसर राहिलेला नाही. आयफोन आता अनेकांना परवडतो, त्यामुळे यात तो किमतीवाला दृष्टिकोन अडथळा ठरत नाही. आयफोन वापरणारा अ‍ॅण्ड्रॉइडकडे जात नाही. एखादी व्यक्ती जेव्हा अ‍ॅपलचं प्रॉडक्ट घेते तेव्हा आयटय़ून आणि वॉच यांसारखी संपूर्ण इको सिस्टीम दिली जाते. हा फोन एखादा वापरतो तेव्हा तो इतरांनाही तो वापरण्याचा सल्ला देतो, त्यामुळे हा रेकमेण्डेबल फोन आहे,’’ असं त्यांनी सांगितलं.

वापरकर्त्यांमध्येही या आयफोनला पसंती देण्यामागची वेगवेगळी कारणं आहेत. अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर नुकताच ‘आयफोन १३’ विकत घेतलेल्या सिद्धी शिंदेने याच मोबाइलला प्राधान्य का दिलं, याबद्दल सांगताना कॅमेऱ्याचा उल्लेख केला. ‘‘आयफोन घेण्याचं मुख्य कारण म्हणजे कॅमेरा. बाजारात अनेक असे फोन आहेत ज्यातून फोटो व व्हिडीओ चांगले येऊ शकतात, मात्र त्यात अनेकदा अनैसर्गिक वाटणारे फिल्टर वापरल्यासारखे वाटतात. असं आयफोनबाबत होत नाही. शिवाय व्हिडीओ एडिटिंगसाठी लागणारे सॉफ्टवेअर आयफोनच्या (आय टीव्ही) प्रणालीत उत्तम गतीने काम करतात. मला यूटय़ूब व्हिडीओ शूट करायचे असल्याने उत्तम कॅमेरा व एडिटिंगची सहजता पाहता मी आयफोनमध्ये गुंतवणूक केली आहे,’’ असं सिद्धी सांगते.

तसेच या फोनची डय़ुरॅबिलिटी म्हणजेच एकदा घेतला की तो पाच ते सहा वर्षे सहज वापरू शकतो इतकी असल्याने अनेक जण दर दोन वर्षांनी फोन बदलत बसण्याऐवजी एकदाच छान फोन घेऊ असा विचार करताना दिसतात. थोडक्यात काय, तर कारणं काहीही असली तरी या फोनची क्रेझ वाढते आहे. गरज, तंत्रज्ञान आणि किमतीचा अडसर कमी झाला असल्याने तरुणाईत तर सध्या ‘आयफोन माझ्या आवडीचा..’ ठरतो आहे.