दरवर्षी फ्रान्समधील ‘कान फिल्म फेस्टिवल’ सुरू झाला की सगळ्यांचं लक्ष असतं ते रेड कार्पेटवरच्या भारतीय सेलेब्रिटींकडे! सोशल मीडियावर तर वेगळाच उत्साह दिसायला लागतो. रेड कार्पेटवरील लुक्स, सेलिब्रिटींचे फोटो, ॲक्सेसरीज, मेकअप आणि फॅशनचे प्रयोग यांची चर्चा जिकडेतिकडे रंगू लागते. काही वर्षांपूर्वीपर्यंत कान हा भारतीयांना दूरचा, केवळ आंतरराष्ट्रीय चित्रपट विश्वाशी संबंधित सोहळा वाटत होता. मात्र, आता भारताची उपस्थिती या महोत्सवात सातत्याने वाढताना दिसते आहे. केवळ बॉलीवूड नव्हे तर दक्षिण भारतीय, प्रादेशिक आणि मराठी कलाकारांनाही आता कान फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर बोलावलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे हा फेस्टिवल आता भारतीय मीडिया आणि सोशल मीडियासाठी केवळ फॅशनचा मंच राहिलेला नाही, तर जागतिक पातळीवर भारतीय सिनेमाची सांस्कृतिक ओळख करून देण्याची एक संधी बनला आहे.

या वर्षी विशेष लक्ष वेधून घेतलं ते मराठी कलाकारांच्या उपस्थितीने. मराठी इंडस्ट्रीमधून काही कलाकार प्राजक्ता माळी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि काही इन्फ्लुएन्सर्सनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. पूर्वी कान फेस्टिवल म्हटले की काही मोजक्या हिंदी सेलेब्रिटींचीच नावं डोक्यात येत असत; पण आता प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही तिथे मान मिळायला लागला आहे. मराठी कलाकारांनी पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा समतोल राखत दाखवलेली उपस्थिती अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली. विशेषत: मराठी संस्कृतीची झलक असलेले पोशाख, दागिने किंवा साड्यांची निवड यामुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक झाले. प्राजक्ता माळीने पारंपरिक सिल्कची नऊवारी, अंकिता वालावलकर हिने गुलाबी रंगाची पैठणी नऊवारी तर निवेदिता सराफ यांनी पैठणी नेसून व शेला घेऊन रेड कार्पेटवर लक्ष वेधून घेतलं. मात्र, पैठणीच्या करण्यात आलेल्या फ्युजन आणि प्रयोगांमुळे मराठी कलाकारांचे रेड कार्पेट लुक्स चांगलेच चर्चेत आले.

केवळ पैठणीच नव्हे तर त्या निमित्ताने सगळ्याच भारतीय सेलेब्रिटींच्या लुक्समध्ये झालेल्या वेगवेगळ्या प्रयोगांची सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली. गेल्या काही वर्षांत भारतीय सेलिब्रिटींमध्ये ‘फॅशन प्रयोग’ करण्याची स्पर्धाच पाहायला मिळते आहे. सेमी इंडियन किंवा सेमी वेस्टर्न वा इंडो- वेस्टर्न अशा उद्देशाने केलेले हे प्रयोग अनेकदा ‘क्लासिक’ लुक देण्याऐवजी ‘कन्फ्युज्ड’ लुक प्रेझेंट करतात. काही वेळा हे प्रयोग चर्चेत राहतात, पण अनेकदा ते कृत्रिम किंवा अति वाटतात. या वेळी देखील अनेक सेलेब्रिटींच्या ‘प्रयोगशील’ लुक्सची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली गेली, मात्र त्यात पॉझिटिव्ह कमी आणि जोक्स, टीका किंवा मीम्सच मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले दिसून आले. प्रयोग करताना त्यातलं सौंदर्य, एलिगन्स आणि स्टाइलही टिकवून ठेवणं हे चॅलेंज असतं. प्रत्येक वेळी केवळ वेगळेपणा पुरेसा नसतो; त्यामागे एक प्रकारची सहजता आणि अभिरुचीही अपेक्षित असते.

याच तुलनेत ऐश्वर्या राय बच्चनच्या स्टाइलिंगकडे पुन्हा पुन्हा लक्ष वेधलं जातं. गेली अनेक वर्षं कान फिल्म फेस्टिवलमध्ये तिची उपस्थिती भारतीय प्रेक्षकांसाठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट ठरली आहे. विशेष म्हणजे ती नेहमीच प्रयोगशील पोशाख निवडते असे नाही; उलट तिच्या शैलीमध्ये एक प्रकारची क्लासिक देखणेपणा आणि सहजता दिसते. भव्य गाऊन असो, पारंपरिक साडी असो किंवा साधा एलिगंट लूक, ऐश्वर्या रेड कार्पेटवर उठून दिसते, कारण तिच्या व्यक्तिमत्त्वात एक आत्मविश्वास जाणवतो. ऐश्वर्याने साडी नेसली तेव्हा तिने अगदी सिंदूरपासून दागिन्यांपर्यंत पूर्णपणे पारंपरिक लुकमध्येच एन्ट्री घेतली. मात्र, जेव्हा ऐश्वर्याने बॉल गाऊन परिधान केला तेव्हा पूर्ण लुक वेस्टर्न प्रिन्सेससारखा करण्याची काळजीही तिने घेतली. त्यामुळेच अनेक फॅशन प्रयोग चर्चेत येतात, पण ऐश्वर्याचे क्लासिक लुक्स मात्र लोकांच्या लक्षात कायम राहतात. कानमध्ये भारतीय सौंदर्याची जागतिक प्रतिमा तयार करण्यात तिचा मोठा वाटा आहे, असं म्हणायला हरकत नाही.

या सगळ्या रेड कार्पेटच्या फॅशन सोहळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न मात्र कायम उपस्थित केला जातो, तो म्हणजे या सगळ्याचा भारतीय चित्रपटसृष्टीला नेमका किती आणि कसा फायदा होतो? रेड कार्पेटवरील ग्लॅमर आणि फॅशन चर्चांमुळे भारतीय कलाकारांना जागतिक स्तरावर ओळख नक्कीच मिळते. आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष भारताकडे वेधले जाते, भारतीय डिझायनर्सना मोठी ग्लोबल संधी मिळते आणि भारतीय सौंदर्यदृष्टीची चर्चा जागतिक स्तरावर होते. अनेक ब्रॅण्ड्स, निर्माते, कलाकार, प्रॉडक्शन हाऊसेस यांच्यासोबत संपर्क व्हायलाही अशा प्लॅटफॉर्मचा उपयोग होतो. त्यामुळे भारतीय इंडस्ट्रीची ‘सॉफ्ट पॉवर’ वाढायला मदत होते. पण, दुसरीकडे हेही मत आहे की भारतात कान फिल्म फेस्टिवलची चर्चा अनेकदा चित्रपटांपेक्षा फॅशनपुरती मर्यादित राहते. कोणत्या भारतीय चित्रपटाला दाद मिळाली, कोणत्या दिग्दर्शकाचे कौतुक झाले किंवा कोणती कथा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचली यापेक्षा कोणाची फॅशन चांगली होती याची चर्चा अधिक रंगते. त्यामुळे खर्‍या अर्थाने भारतीय सिनेमाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केवळ रेड कार्पेट पुरेसे नाही; तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दर्जेदार कथा, ताकदीचे दिग्दर्शन आणि प्रादेशिक चित्रपटांची समृद्ध परंपरा यांनाही स्थान मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने पाहिलं तर कान् फिल्म फेस्टिवलमधली वाढती उपस्थिती ही नक्कीच सकारात्मक बाब मानली जाऊ शकते. मराठी सिनेमातील आशयप्रधान कथा, वास्तववादी मांडणी आणि सांस्कृतिक समृद्धी यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची क्षमता आहे. जर रेड कार्पेटवरील उपस्थितीसोबत मराठी चित्रपट, दिग्दर्शक आणि निर्माते यांनाही तिथे मान आणि स्थान मिळालं, तर भविष्यात मराठी सिनेमासाठी नवे दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे कान फिल्म फेस्टिवलकडे केवळ फॅशन शो म्हणून न पाहता, भारतीय आणि मराठी सिनेमाच्या जागतिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहण्याची गरज आहे.

viva@expressindia.com