वैष्णवी वैद्या मराठे

यंदा बहुप्रतिष्ठित आणि बहुआयामी मानल्या जाणाऱ्या ग्लॅमरस कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे ७७ वे वर्ष होते. या फेस्टिव्हलचा मूळ उद्देश म्हणजे सिनेमा या माध्यमाचा दर्जा उंचावणे आणि विविध प्रकारच्या सिनेमांचे विविध स्तरावर स्वागत करणे. काळानुरूप त्याचे ग्लॅमर आणि तामझाम वाढत गेला, तसतसा सिनेमा हा मूळ उद्देश असूनही इथे येणाऱ्या तारेतारकांची फॅशन हाही आकर्षणाचा विषय ठरला.

कान फेस्टिव्हलमध्ये जगभरातील फॅशन इन्फ्लुएन्सर्स, मॉडेल्स, डिझायनर्स उपस्थित राहतात आणि सहभागी होतात. आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वातही ‘कान’च्या फेस्टिव्हल हे खणखणीत वाजणारे नाणे आहे. कान्सच्या दिवसांमध्ये फक्त फ्रान्स देशातच नाही तर जगभरच हाय-एन्ड फॅशनचा माहौल तयार होतो. यंदा इथल्या फॅशनमध्ये कुठले ट्रेण्ड्स पाहायला मिळाले.

केप्स : सोप्या भाषेत बोलायचे तर कुठल्याही ड्रेसवरचा विशेषत: वन-पीस वरचे जॅकेट किंवा श्रगला ग्लॅमरस भाषेत केप्स म्हणतात. मुळात, केप्सचा वापर हा वारा किंवा पाऊस यासारख्या हवामानापासून संरक्षण म्हणून केला जात होता. थंड हवामानात बाहेर झोपेत असताना ते शरीराभोवती गुंडाळले जात होते. मध्ययुगीन काळात, युद्धात संरक्षण मिळवण्यासाठी जाड कपड्यापासून बनवलेले केप्स परिधान करायची पद्धत होती. यंदाच्या कान फेस्टिव्हलमध्ये सेलिब्रिटींनी केप्सचा ट्रेण्ड मोठ्या उत्साहात स्वीकारल्याचे दिसले. वेगवेगळ्या टेक्सटाइल्स आणि कापडांमधले केप्स फार सुंदर दिसत होते. क्रिस्टेनसेन विव्हिएन वेस्टवूडमध्ये टॉल्कीनच्या राजकुमारीसारखी दिसत होती, तर फ्रेंच निर्माते निकोलस सेडोक्स गुलाबी फ्लोरलमध्ये होते. जेन फोंडानेदेखील खांद्यावर कोट घेऊन केप बनवला होता. या पोशाखात फोटो अतिशय नावीन्यपूर्ण येतात, कारण या कपड्यांची रचना एखाद्या सुपरहिरोच्या पोषाखासारखी दिसते.

हेही वाचा >>> यह देखने की चीज है…

विंटेज फॅशन : कोणताही रेड कार्पेट सोहळा विंटेज फॅशनशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. यंदा फारशी विंटेज फॅशन दिसली नाही तरी एक उल्लेख करायला हवा! ‘फ्युरिओसा: ए मॅड मॅक्स सागा’ या चित्रपटाच्या प्रीमियरला सुपरमॉडेल नाओमी कॅम्पबेलने १९९६ मध्ये झालेल्या शनेलच्या ऑट कुटुअर शोसाठी घातलेला ड्रेस पुन्हा परिधान केला होता. सेलिब्रिटी स्टायलिस्ट लॉ रोच यांनी त्यांची स्टायलिंग केली होती. तिनेच पहिल्यांदा हा ड्रेस घालून रॅम्पवॉक केले होते. आणि इतक्या वर्षांनी हा विंटेज ड्रेस परिधान करत कानच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या नाओमीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बेला हदीदने वर्सेचीच्या ९० च्या दशकात प्रसिद्ध असलेल्या रोमँटिक, पांढऱ्या शुभ्र गाऊनची निवड केली होती.

हॅट्स : समर-फॅशनचा ट्रेण्डसुद्धा कान फेस्टिव्हलमध्ये यंदा पाहायला मिळाला तो म्हणजे किंग-साइझ हॅटच्या स्वरूपात. मोठ्या आकाराची जॅकमसची स्ट्रॉ हॅट परिधान केलेल्या आन्या टेलर-जॉयने हॅट्सचा ट्रेण्ड लक्षवेधी केला. मेरील स्ट्रीप पांढरा सूट, शर्ट आणि मोठी हॅट घालून आली तेव्हा अगदी परफेक्ट समर लुक दिसत होता.

नावीन्यपूर्ण नेकलाइन्सचे गाऊन : वर्षानुवर्षे लोकप्रिय असलेल्या गाऊन या पोशाखाचे काळानुरूप प्रकार आणि पद्धती बदलल्या आहेत, पण त्याची फॅशन काही कालबाह्य झालेली नाही. अभिनेत्री एल्सा पटाकी आणि ग्रेटा गेरविगपासून ते फ्रेंच मॉडेल आणि माजी मिस फ्रान्स मॅवा कूकेपर्यंत, बऱ्याच नामांकित कलाकारांनी अगदी सुंदर अशा नेकलाइनचे गाऊन परिधान केले होते.

हेही वाचा >>> सफरनामा : कुटुंब निघालय टूरला…

रेड कार्पेटवर गाजलेल्या तारेतारका…

डेमी मूर : कान फेस्टिव्हलमध्ये प्रथमच प्रदर्शित झालेल्या ‘द सबस्टन्स’ या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री डेमी मूर समारोप समारंभात दागिने आणि स्टेटमेंट बो असलेला ब्लॅक आणि व्हाइट रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून आली होती. हा आकर्षक लुक कॅनेडियन-अमेरिकन ब्रॅड गोरेस्की यांनी स्टाइल केला होता. तिने या वेळी शोपार या ब्रॅण्डची ज्वेलरी घातली होती. शोपार हा अतिशय लक्झरी ब्रॅण्ड असून तो विशेषत: लक्झरी घड्याळ, अॅक्सेसरीज आणि दागिने यासाठी प्रसिद्ध आहे.

लिओमी अँडरसन : ब्रिटिश मॉडेल लिओमी अँडरसन ही डॅमियानी मिमोसा दागिने आणि सोफी कुटुअरच्या काळ्या, ऑफ शोल्डर टॅफेटा गाऊनमध्ये खास दिसली. या पोशाखाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ओव्हरसाइज गाऊन होता.

डायन क्रुगर : जर्मन अभिनेत्री डायन क्रुगरने तिचा नवीन सिनेमा ‘द श्राऊड्स’ प्रमोट केला. त्यासाठी तिने चमकदार रॉयल-ब्लू वर्साचे गाऊन परिधान केला होता ज्यावर युनिक अशी नेकलाइन होती. तिनेसुद्धा शोपार ब्रॅण्डचे दागिने परिधान केले होते आणि ब्लॉन्ड केसांमुळे तिचा लुक फार रॉयल आणि एलिगंट दिसत होता.

सिएना मिलर : सिएना मिलर ही अमेरिकन वंशाची ब्रिटिश अभिनेत्री आहे. सिएना मिलरने रेड कार्पेटवर बॉयफ्रेंड ओली ग्रीन आणि आपल्या ११ वर्षांची सुंदर मुलगी, मार्लो स्टरीज यांच्यासोबत रॅम्पवॉक केले. या प्रसंगी मिलरने बोहो डिझाइनला पसंती दिली होती. तिने हलका आणि सुंदर असा क्लोईचा गाऊन घातला होता आणि त्याचा रंगही तिला सूट होईल असा मऊशार फिकट निळा होता.

सेलेना गोमेझ : सेलेना गोमेझ कायमच साध्या – सोप्या पद्धतीच्या आरामदायी फॅशनवर भर देते. तिची डौलदार अंगकाठी आणि सुबक चेहऱ्यामुळे कितीही साधे कपडे घातले तरी ते एलिगंट वाटतं. तिने सेंट लॉरेंटचा मखमली काळा गाऊन, ज्यामध्ये क्रीम रंगाचा ऑफ शोल्डर नेकलाइन असा एलिगंट पोषाख केला होता. त्यावर तिने लाल रेखीव नखं, बॅन स्टाइल अपडो आणि क्लासी बुल्गारी नेकलेस परिधान केला, ज्यामुळे क्लासिक आणि आधुनिक असा दोन्ही प्रकारचा लुक साधला गेला.

प्रतीक बब्बर : श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘मंथन’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग कान फेस्टिव्हलमध्ये झाले. या स्क्रीनिंगसाठी अभिनेता प्रतीक बब्बरसुद्धा उपस्थित होता. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांना ट्रिब्यूट म्हणून प्रतीक बब्बरने कानच्या रेड कार्पेटवर संपूर्ण काळ्या रंगाचा टक्सिडो परिधान केला होता, त्यांच्या लुकबद्दल एक खास गोष्ट म्हणजे त्याने गळ्यात खास आई स्मिता पाटीलची आठवण असलेला काळ्या-पांढऱ्या रंगाचा स्कार्फ घातला होता.

कान फेस्टिव्हल हा एक अनुभव आहे, जिथे कला आणि फॅशन विश्वाची वेगवेगळी छटा नेहमीच पाहायला मिळते. या फेस्टिव्हलचा सिनेमा आणि फॅशनचाही एक भव्य इतिहास आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय कलाकारही कानच्या रेड कार्पेटवर अभिमानाने मिरवत आहेत आणि जगाला आपली दखल घ्यायला लावत आहेत. फॅशनचे बहुरंगी, बहुढंगी प्रतिबिंब दाखवणारा कान हा एकमेव फिल्म फेस्टिव्हल ठरला आहे.

कान गर्ल : नॅन्सी त्यागी

उत्तर प्रदेशातील बरवा गावातून आलेल्या २३ वर्षीय फॅशन इन्फ्लुएन्सर नॅन्सी त्यागीने कानच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवू असा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र तिच्या कान फेस्टिव्हलच्या पदार्पणातच ती प्रसिद्ध झाली आहे. या फेस्टिव्हलसाठी नॅन्सी त्यागीने स्वत: डिझाइन केलेला, तयार केलेला गाऊन घातला. तिचा गुलाबी गाऊन तयार करण्यासाठी तिला महिना लागला. हजार मीटरचे फॅब्रिक वापरून केलेला हा गाऊन वीस किलोचा होता. तिच्या या गाऊनची इतकी चर्चा झाली की नॅन्सी थेट बॉलीवूडचा लोकप्रिय डिझायनर मनीष मल्होत्राला टक्कर देणार अशा चर्चा रंगल्या. या फेस्टिव्हलनंतर तिला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी स्टायलिंग आणि कपडे डिझायनिंगची ऑफर दिली आहे. नॅन्सीने फॅशन डिझायनिंग किंवा टेक्सटाइलमध्ये कोणतेही शिक्षण किंवा औपचारिक डिग्री घेतलेली नाही, परंतु तिचे कौशल्य आणि पॅशन याच्या जोरावर ती इथवर पोहोचली आहे. तिचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

मराठमोळी छाया

अभिनेत्री छाया कदम यांची भूमिका असलेला, पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटाला कान महोत्सवात ग्रान प्री पुरस्कार मिळाला. या चित्रपटाच्या निमित्ताने कान महोत्सवात रेड कार्पेटवर टेचात मिरवताना छाया कदम यांनी डिझायनर सागरिका राय हिने तयार केलेला ब्लॅक पर्ल रंगाचा कट लेहेंगा, व्हाइट शर्ट, डिझायनर ब्लाऊज आणि ब्लॅक कोट घातला होता. तर गळ्यात गोल्ड चोकर, हातात ब्रेसलेट आणि बोटात अंगठी घातली होती. हा हटके लुक पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्मोकी आय आणि पिंक लिपस्टिक लावली होती. तर केसांचे फ्लेक्स काढून बॅक पोनी बांधली होती. त्यांच्या या अनोख्या लुकचे जगभरातील चाहत्यांकडून कौतुक झाले.

viva@expressindia.com