– अश्विनी खांडेकर

कार्यालयीन भूमिकांमधील बदल, वाढती जबाबदारी आणि टीम लीडर म्हणून पुढे येणं… हे सगळे विषय या पुढच्या काही महिन्यांत कमी-अधिक प्रमाणात चर्चेत असतील. पदोन्नती किंवा बढतीच्या निमित्ताने जेव्हा माझ्याकडेही नवीन जबाबदारी आली, तेव्हा माझं यापुढचं वागणंबोलणं कसं असेल, याबद्दल नाही म्हटलं तरी मनात विचार येत होते. कामाच्या ठिकाणी मिळणार्‍या बढतीचा प्रभाव आपल्या मनावर पडतो आणि मग त्याचे परिणाम केवळ कार्यालयातच नव्हे तर अगदी मित्रमैत्रिणींबरोबरच्या आपल्या वागण्या-बोलण्यातही दिसू लागतात.

एखाद्या मोठ्या पदासाठी तुमची निवड झाल्यानंतर येणारा नेतृत्वाचा विषय हा अनेकदा नीट समजून घेतला जात नाही, काही वेळा त्याविषयी बोलताना अतिशयोक्ती केली जाते. कधीतरी माझ्या वरिष्ठांबद्दल विचार करताना, ‘मी मॅनेजर झाले तर असं अजिबात वागणार नाही’ असा विचार माझ्या मनातही डोकावून गेला आहे. पण, ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा ते कळे’ याची प्रचिती आपल्याला तेव्हाच येते जेव्हा आपण स्वत: त्या भूमिकेत वावरतो. अनेकांना वाटतं की एखाद्या टीमचं नेतृत्व करणं म्हणजे फक्त कामं वाटून देणं आणि टीम योग्य पध्दतीने काम करते आहे की नाही हे पाहणं. काहीजण असंही सांगतात की त्यांनी इंटर्न किंवा एक्झिक्युटिव्ह असताना खूप मेहनत घेतली आहे. याचा अर्थ मोठ्या पदावर गेल्यावर, टीमचा लीडर म्हणून तुमच्यावर जबाबदारी आल्यानंतर तुमचं काम कमी होणार किंवा तुम्हाला इतरांवर देखरेख करण्याशिवाय कामच उरणार नाही असा होत नाही. उलट, करिअरमध्ये वरच्या पदावर गेल्यानंतर तुमची कामं आणि जबाबदारी दोन्ही अधिक वाढतात.

इंटर्न किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही फक्त तुमच्या कामासाठी जबाबदार असता, पण मॅनेजर किंवा तत्सम वरच्या पदावर गेल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या टीमच्या कामगिरीचीही जबाबदारी येते. अनेकदा पडद्यावर दिसणारं कलाकारांचं काम आपल्याला आनंद देऊन जातं आणि आपण त्यांना महत्त्व देतो, पण त्यासाठी पडद्यामागे घडणार्‍या अनेक गोष्टी कारणीभूत असतात. तसंच, व्यवस्थापकीय पदावर असणार्‍या व्यक्तींचं महत्त्व आहे. आता कामाच्या ठिकाणी उत्तम नेतृत्व कोणाचं असतं? कसं वागलं म्हणजे चांगलं आणि वाईट अशी ठोस मांडणी करता येत नाही. प्रत्येकाची लोकांशी वागण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे काहींना ‘अ’ व्यक्ती आवडते, तर काहींना ‘ब’ व्यक्ती. यात बरोबर किंवा चूक असं काही नसतं. योग्य नेतृत्वाचे असे काही मापदंड नाहीत. त्यासाठी नेतृत्व करणं म्हणजे काय? हे आधी लक्षात घ्यायला हवं. कार्यालयीन दृष्टिकोनातून नेतृत्वाचा विषय समजून घेत असताना आपण ‘व्यवस्थापक’ हा शब्द वापरूयात. कारण, इथे हे फक्त पद नाही तर त्यामागचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.

व्यवस्थापक म्हणजे अशी व्यक्ती जी त्याच्याबरोबर काम करणारे लोक, एकूण कामाचे स्वरूप, अपेक्षा, अंमलबजावणी आणि त्यातून अपेक्षित असलेली प्रगती या सगळ्याचं व्यवस्थापन करते. आणि या प्रत्येक व्यवस्थापकीय जबाबदार्‍यांना दोन बाजू आहेत. म्हणजे एकीकडे व्यवस्थापकाकडे असलेली टीम त्यांच्या कामाचा अहवाल त्याला देणार आहे, तर दुसरीकडे टीमसह केलेल्या आपल्या कामाचा अहवाल वरिष्ठांना द्यायची जबाबदारी त्या व्यवस्थापकावर आहे. त्यामुळे तुमची स्वत:ची कामगिरी आणि दुसरी म्हणजे तुमच्या टीमची कामगिरी, या दोन्हींचा समतोल साधणं ही व्यवस्थापकीय भूमिकेची किंवा नेतृत्व कौशल्याची खरी कसोटी आहे.

करिअरमध्ये पुढे जाताना तुमच्या भूमिकेचं स्वरूप बदलत जातं. आधी तुम्ही फक्त तुमच्या कामासाठी जबाबदार असता, आता तुम्हाला इतरांकडूनही ते काम पूर्ण होतं आहे की नाही, यासह त्याचे जे बरेवाईट परिणाम असतील त्यांची जबाबदारीही घ्यावी लागते. इथे फक्त तुमची मेहनत उपयोगी नाही, तर तुमच्या जबाबदार्‍यांबद्दल असलेली स्पष्टता अधिक महत्त्वाची ठरते. तुमचं यश फक्त तुम्ही काय करता यावर नाही, तर तुमची टीमच्या कामगिरीवर बव्हंशी अवलंबून असतं. आणि इथेच अडचण होते. पदोन्नती मिळाल्यावर आनंद वाटतो, पण प्रत्यक्षात ती मोठी जबाबदारी आहे. इथवर पोहोचण्यासाठी तुमची वैयक्तिक कामगिरी उंचावण्यासाठी तुम्ही ज्या पध्दती अवलंबल्या आहेत, त्या व्यवस्थापक म्हणून काम करताना तितक्याच उपयुक्त ठरतील असं नाही. अनेकदा व्यवस्थापक म्हणून जबाबदारी आल्यानंतर काहीजण प्रत्येक गोष्ट स्वत: सहभाग घेऊन करण्याच्या प्रयत्नात असतात, काहीजण टीमला खूप नियंत्रणात ठेवतात, तर काहीजण पूर्णपणे टीमवर काम सोपवून स्वत: नामानिराळे राहतात. अशी वरवरची भूमिका घेणं योग्य नाही. तुमच्या टीमला सतत सूचना नको असतात, तर त्यांना योग्य दिशा हवी असते. वारंवार जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांना आवडलो पाहिजे, यासाठीची धडपड. प्रत्येकाशी आपुलकीने वागणं महत्त्वाचं आहे, पण म्हणून सगळ्यांची आवडती व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. कारण, तसं करताना कामाच्या बाबतीत तडजोड होते. टीमला नेहमी आवडता व्यवस्थापक नको असतो, तर ठोस निर्णय घेणारा, स्पष्ट अपेक्षा असलेला आणि सातत्यपूर्ण काम करणारा व्यवस्थापक हवा असतो.

वेळेत निर्णय घेणं हेसुध्दा व्यवस्थापकासाठी महत्त्वाचं आहे. निर्णय उशिरा घेतल्याने गोंधळ वाढतो. प्रत्येक वेळी आपल्याला परिपूर्ण माहिती मिळेलच असं नाही, किंवा अनेकदा आपल्याकडे निश्चित माहिती नसेल तेव्हा ते मान्य करून मी शोधून सांगेन, ही भूमिका घेण्यात काहीच गैर नाही. निर्णय घेणं आणि टीमला एकत्र ठेवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. वरिष्ठांच्या तसेच हाताखाली काम करणार्‍यांच्या अपेक्षांचं व्यवस्थापन ही आणखी एक महत्त्वाची जबाबदारी. वरिष्ठांना उत्तर देताना कामातली पारदर्शकता, अतिआश्वासनांचा मोह टाळणं आणि काही अडचण उद्भवणार असल्यास वेळीच माहिती देणं गरजेचं असतं. तसंच, आपल्या टीमला कामाची उद्दिष्ट स्पष्टपणे सांगणं, विनाकारण अपेक्षांचं ओझं न टाकणं आणि शेवटच्या क्षणी गोंधळ होणार नाही, याची काळजी घेणंही आवश्यक आहे. आपल्या टीमचा पूर्वानुभव, त्यांच्या क्षमतांचा नीट विचार करून त्यांच्याकडून असलेल्या कामाच्या अपेक्षा, जबाबदार्‍या निश्चित करणं हेही महत्त्वाचं व्यवस्थापकीय कौशल्य आहे.

मोठ्या पदावर काम करणं म्हणजे प्रत्यक्ष कामांपासून दूर राहणं नाही, तर कामाशी वेगळ्या पध्दतीने जोडलं जाणं आहे. सगळंच स्वत: करत राहणं योग्य नाही, तसंच गरज पडली तर पुढे येऊन ते काम करणं हेही तितकंच आवश्यक आहे. शेवटी प्रत्यक्षात काम पूर्ण होतं आहे की नाही, याची जबाबदारी व्यवस्थापकावरच असते हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही काम करत असलेल्या टेबलवर नेहमी काही पुस्तकं ठेवणं हा चांगला उपाय ठरू शकतो. एखाद्या वेळी मन विचलित होतं किंवा दिशा हवी असते, तेव्हा कोणतंही एक पुस्तक उघडून वाचल्याने बहुतांश वेळा तुम्हाला पुढे जाण्यासाठी असा एखादा विचार किंवा कल्पना मिळण्यास मदत होऊ शकते. कधी कधी थोडा वेळ कामापासून स्वत:ला लांब ठेवत घालवलेला शांत वेळही उपयुक्त ठरू शकतो.

परिपूर्ण नेतृत्व असं काही नसतं. तुमच्या जबाबदार्‍या निभावताना काही दिवस चांगले जातात, अनेकदा गोष्टी चुकतात आणि हे होणं स्वाभाविक आहे. प्रत्येक परिस्थितीत जोपर्यंत तुम्ही आणि तुमची टीम हार न मानता काम करत राहता तेव्हा पुढची वाट सुकर होत जाते. शेवटी सतत सगळ्यांसमोर मिरवण्यापेक्षा सगळ्यांबरोबर भक्कमपणे उभं राहून काम यशस्वी करून दाखवणं हे खरं नेतृत्व आहे, ही खूणगाठ मनाशी बांधायला हवी.

viva@expressindia.com