वेदवती चिपळूणकर

गेलं वर्ष करोनाच्या भीतीने सगळय़ाच सेलिब्रेशनवर काट मारणाऱ्या तरुणाईने नव्या वर्षांचं स्वागतही घरातल्या घरात नाही तर ऑनलाइन पद्धतीने केलं होतं. खरं तर वर्क फ्रॉम होमचा फायदा घेत दूर कुठे तरी हिमालयात जाऊन रोजच्या कार्यालयीन कामालाही वर्केशन बनवणाऱ्या तरुणाईला चार भिंतीआड राहून पार्टी किंवा सेलिब्रेशन करण्याची कल्पनाही तशी न पचणारी आहे. त्यामुळे यंदा लसीकरण पूर्ण करून किंवा अगदी सतत टेस्ट कराव्या लागल्या तरी बेहत्तर पण घराबाहेर पडून सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाई आसुसली आहे.

२०२० च्या मार्च महिन्यात करोना आला आणि सगळं जग एका जागी थांबून गेलं. मागचं संपूर्ण वर्ष करोनाच्या भीतीच्या सावटाखाली कोणीच कोणाला भेटलं नाही, कोणते सण साजरे झाले नाहीत की कोणतंच सेलिब्रेशन झालं नाही. या वर्षी मात्र परिस्थिती बरीच वेगळी आणि सुधारलेली आहे. बहुतेकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे, करोनाची भीती थोडी कमी झाली आहे आणि स्वत:ची काळजी घेऊनही आपलं जीवन नॉर्मल सुरू ठेवणं सगळय़ांना जमलेलं आहे. त्यामुळे या वर्षीपासून सगळय़ा सणांचं आणि ओकेजन्सचं सेलिब्रेशन पुन्हा पूर्वपदावर येईल असं चित्र दिसतंय. ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टी सध्या सगळय़ांच्याच प्लॅनमध्ये आहे. करोनाचे नियम पाळून आणि त्यातही कल्पक उपाय शोधून हे सेलिब्रेशन सहज करता येईल.

दोन र्वष घरात बसून आणि एकमेकांना न भेटून कंटाळलेल्या तरुणाईला रिचार्ज करायला मोठय़ा सेलिब्रेशनची गरज तर आहेच, मात्र त्याच वेळी स्वत:ची आणि इतरांची पूर्ण काळजी घेणंही आवश्यक आहे. यासाठी सगळय़ात सोपा पर्याय म्हणजे हाऊस पार्टीज! मोजक्या जवळच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना बोलवून घरीच सेलिब्रेशन करणं हे सगळय़ात सोयीचं आणि सुरक्षितसुद्धा ठरेल. हाऊस पार्टीत काही तरी थीम ठेवून हे सेलिब्रेशन अधिक इंटरेस्टिंग करता येऊ शकतं. क्लब्ज, हॉटेल्स, पब्ज अशा ठिकाणी खूप गर्दी होण्याची शक्यता असते, अशा लोकेशन्सवर काही निर्बंध असण्याची शक्यता असते, मात्र हाऊस पार्टी मुळातच कमी लोकांत आणि छोटेखानी स्वरूपात होत असल्याने निर्धास्त राहून पार्टी एन्जॉय करता येईल.

ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सुट्टय़ांचा फायदा घेऊन अनेक जण दरवर्षी पिकनिकला जातात. त्यात या वर्षी ३१ डिसेंबर शुक्रवारी आल्याने सगळय़ांना लॉन्ग वीकएंड मिळणार आहे. गेल्या वर्षी फारसं कोणी ट्रॅव्हल केलं नाही, हॉटेल्स आणि रिसॉर्टसची बुकिंग्ज झाली नाहीत, आउटडोअर पार्टीज ऑर्गनाईजच केल्या गेल्या नाहीत. या वर्षी मात्र सगळय़ांचे सगळे प्लॅन्स पुन्हा एकदा उत्साहात ठरले आहेत. ‘ट्रीपर जर्नीज’ची श्वेता बंडबे सांगते, ‘सगळय़ा हॉटेल्सची, ट्रेन्सची, एअरलाइन्सची सगळी बुकिंग्ज इयर एण्डसाठी आता फुल झालेली आहेत. बहुतेकांच्या लशी घेऊन झालेल्या आहेत. ट्रॅव्हल करताना आर.टी.पी.सी.आर. टेस्ट करायलाही लोक तयार आहेत. मात्र कोणत्याही पद्धतीने ठरलेल्या ट्रिप्स रद्द करायच्या मन:स्थितीत कोणीही नाही आहे. करोनाबद्दल सरकारने वेळोवेळी घालून दिलेले सगळे नियम पाळून आणि अटी पूर्ण करूनसुद्धा फिरायला जायची लोकांची तयारी आहे.’ गेल्या वर्षी घरात बसून कंटाळलेल्या तरुणाईने या वर्षी सेलिब्रेशन दणक्यात करायचा जणू चंगच बांधला आहे. एका मोठय़ा ट्रॅव्हल कंपनीत काम करणाऱ्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, ‘सर्व टुर्स बुक्ड आहेत आणि सरकारचे काही निर्बंध लागले नाहीत तर त्या ट्रिप्स जशाच्या तशा पार पडतील, त्यात कोणताही बदल होणार नाही. याउलट टुर्स बुक केलेल्यांना ही चिंता आहे की ट्रिप रद्द होऊ नये. त्यांची सगळय़ा टेस्ट करायची तयारी आहे मात्र ट्रिप रद्द होणं ग्राहकांना नको आहे.’

करोनाचे नवनवीन व्हेरिएंट येतच राहणार आणि आपल्याला काळजी घ्यायचीच आहे, याबद्दल लोकांची मानसिक तयारी आता पूर्णपणे झालेली आहे. मात्र आपलं नॉर्मल जीवन रुळावर आणण्याचा प्रयत्न प्रत्येकच जण करतोय. गेल्या दीड वर्षांत अनुभवलेल्या सगळय़ा नकारात्मकतेला झटकून टाकून फ्रेश होण्यासाठी, नव्याने सुरुवात करण्यासाठी कोणतं तरी मोठं सेलिब्रेशन प्रत्येकालाच गरजेचं आहे. नवीन वर्ष पॉझिटिव्ह विचारांनी आणि पॉझिटिव्ह मूडमध्ये सुरू करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणजे कितीही जास्त काळजी घ्यावी लागली, कितीही जास्त टेस्ट कराव्या लागल्या तरीही तरुणाई ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीज दणक्यात साजरी करणार यात शंका नाही.     viva@expressindia.com