वेदवती चिपळूणकर

ती आपल्याला सगळय़ांना माहितीच आहे, जणू आपल्या घरातलीच आहे. जवळजवळ रोज भेटते ती आपल्याला.. आपल्या दिवसातला काही ठरावीक वेळ आपण तिच्यासाठी राखून ठेवलेला असतो. वेगवेगळय़ा भूमिकांमधून ती आपल्यासमोर येत असते. तिने रंगवलेल्या प्रत्येक पात्राचं आपल्याला कौतुक वाटतं, तिच्या प्रत्येक विनोदाने आपण मनापासून हसतो आणि तिच्या टॅलेंटला दिलखुलास दाद देतो. दिवसभराच्या शिणवटय़ानंतर तिला टीव्हीवर पाहण्याने सगळा ताण निघून जातो. ती म्हणजे सगळय़ा प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री श्रेया बुगडे.

preparation for merchant navy
प्रवेशाची पायरी : मर्चंट नेव्हीसाठी सीईटी
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
ग्रामविकासाची कहाणी

गेली आठ ते नऊ वर्ष ‘चला हवा येऊ द्या’मधून श्रेया सातत्याने नवनवीन प्रयोग करते आहे. श्रेयाच्या करिअरमधला हा काळ तिला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. मात्र त्याआधीदेखील अनेक वर्ष ती या क्षेत्रात काम करते आहे. आईने पाहिलेल्या स्वप्नाला आपल्या टॅलेंटची आणि जिद्दीची जोड श्रेयाने दिली. आईचा सपोर्ट हाच तिच्यासाठी सगळय़ात मोठा क्लिक फॅक्टर ठरला असं श्रेया सांगते. ‘माझ्या आईला अभिनयात खूप रस होता. तिचं सगळं लहानपण अलिबागला गेलं. तिथे राहून तिला जे शक्य होतं ते सगळं तिने अभिनयासाठी केलं. तिचे बाबा म्हणजे माझे आजोबाही खूप सपोर्टिव्ह होते. एका नाटकात आईने श्रीकांत मोघेंची भूमिका केली होती आणि त्यात तिने सिगरेट ओढताना दाखवणं अपेक्षित होतं. त्या वेळी सिगरेट कशी धरली म्हणजे ते खरं वाटेल, हे माझ्या आजोबांनी तिला शिकवलं होतं. पण तिच्या स्वत:साठी तिला ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही’. आईने कशा पद्धतीने मुलींच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले हे सांगताना श्रेया म्हणते, ‘आईने माझ्या मोठय़ा बहिणीला या क्षेत्रात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. पोर्टफोलिओ केला होता, मॉडेल को-ऑर्डिनेटर्सशी संपर्क केला होता, तिला अभिनय शिकवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र माझ्या बहिणीला अभ्यासाची जास्त आवड होती. मी शाळेत वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अशा अनेक स्पर्धामध्ये भाग घेत असायचे. आमच्या शेजारी राहणाऱ्या एका आजींनी मी सहा महिन्यांची असताना आईला सांगितलं होतं की हिचे डोळे खूप बोलके आहेत, हिला टीव्हीत घाल. माझ्या बहिणीला अभिनयात रस नाही हे लक्षात आल्यानंतर आईने माझा विचार केला आणि बालनाटय़ासाठी मला मीना नाईक यांच्याकडे पाठवलं’.  बालनाटय़ापासून श्रेयाचा प्रवास सुरू झाला आणि या क्षेत्रातील पंचविशी पूर्ण करून तिची पुढची वाटचाल सुरू आहे.

‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम म्हणजे श्रेयाच्या प्रसिद्धीचा क्लिक पॉइंट होता. वेगवेगळय़ा भूमिका सतत करत राहिल्यानंतर ‘फू बाई फू’च्या एका सीझनमध्ये तिला गेस्ट म्हणून बोलावलं. त्या वेळी तिने अभिनेता हेमंत ढोमेसोबत काम केलं. ‘फू बाई फू’च्या पुढच्या सीझनसाठी पुन्हा तिला बोलावलं गेलं. या वेळी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेसोबत तिने ‘फू बाई फू’चा एक संपूर्ण सीझन केला. यानंतर तिला ‘चला हवा येऊ द्या’साठी विचारणा झाली. श्रेया सांगते, ‘भाऊ कदम, कुशल आणि डॉक्टर हे तिघे शोमध्ये फिक्स झालेले होते. मला नक्की कुठे आणि कसं फिट करणार होते याबद्दल मलाही कल्पना नव्हती. कधी कधी माझ्याकडे एपिसोड रोल झाल्यानंतरसुद्धा संवाद नसायचे किंवा काही पात्र नसायचं. मग मी भाऊची मुलगी करू का, कुशलची बहीण करू का, डॉक्टरची मैत्रीण म्हणून एन्ट्री घेऊ का असं आयत्या वेळी ठरवूनही माझं पात्र ठरायचं. मग कुशल तुझा एक पंच मला दे ना, भाऊ तुझा हा डायलॉग मी घेऊ का?, असं बार्गेिनग व्हायचं. कधीतरी मी एखादा पंच, एखादा संवाद घ्यायचे, कधीतरी केवळ रिअ‍ॅक्शन द्यायचे. पण या सगळय़ा प्रक्रियेत मला माझ्या अंगी नैसर्गिक असलेल्या विनोदी स्वभावाचा उपयोग झाला, आणि या सगळय़ानंतर हे माझ्या लक्षात यायला लागलं की माझ्याकडे विनोदाचेही गुण आहेत जे प्रेक्षकांना आवडतात.’ श्रेयाला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे कॉमेडी या एकाच प्रकारातही तिने अनेक पात्रं साकारली, अनेक नकलाही केल्या आणि नवनवीन प्रयोगही केले. या कार्यक्रमाने श्रेया बुगडे या नावाला घराघरात पोहोचवलं. २०१४ मध्ये एका मालिकेत व्हिलनची बायको, असा बुजरा, घाबरट, आणि विनोदी नसलेला रोल केला होता. केवळ कॉमेडी हाच श्रेयाचा बाज नाही, तर आताही ‘समुद्र’सारख्या नाटकात तिने अत्यंत वेगळय़ा धाटणीची भूमिकाही ताकदीने साकारली आहे. कोणत्याही फील्डमध्ये कामाचा ध्यास घेत नाही तोपर्यंत आपल्याकडून पूर्ण प्रामाणिकपणे काम होणार नाही, यावर तिचा विश्वास आहे. टेलिव्हिजन या माध्यमावर तिचं प्रचंड प्रेम आहे. मनोरंजन क्षेत्रात कितीही बदल होऊ देत, टीव्हीचं स्थान अढळ आहे, याबद्दल ती ठाम आहे. ‘चित्रपट किंवा ओटीटीवर काम केलं म्हणजेच माझी प्रगती झाली असं मला अजिबात वाटत नाही. टेलिव्हिजनची ताकद वेगळी आहे,’ असं श्रेया वारंवार सांगते. ‘चला हवा येऊ द्या’च्या आतापर्यंतच्या पावणेआठशे भागांमध्ये पाचशे पात्रं रंगवणाऱ्या श्रेया बुगडेला विलक्षण अभिनेत्रीच म्हणायला हवं.