२०२५ हे वर्ष ‘जनरेशन बीटा’चं वर्ष ठरलं. गेल्या दीड शतकात जे जागतिक बदल घडले त्या अनुषंगाने जगभरातील विविध वयोगटांतील लोकसंख्येला विशिष्ट जनरेशनच्या नावांनी ओळखलं जातं. या वर्षीपासून जन्माला येणाऱ्या जेनबीटासाठी एआय, ऑटोमेशन आणि स्मार्ट तंत्रज्ञान हा दैनंदिन जीवनाचा अगदी नैसर्गिक भाग असणार आहे. याआधीचे म्हणजे सध्या १५ वर्षांच्या आतले असणारे जेन अल्फा लहान असतानाच स्क्रीन स्वाइप करायला शिकले. सध्या १६ ते २८ वयोगट असणारे जनरेशन झेड ही डिजिटल युगात जन्मलेली, वाढलेली खऱ्या अर्थाने डिजिटल नेटीव पिढी. १९८१ ते १९९४ या कालखंडात जन्मलेले मिलेनियल्स ही पहिली टेक्नो सॅव्ही पिढी. डिजिटल युगात नवीन तंत्रज्ञान, त्यांचे सकरात्मक- नकारात्मक परिणाम अशा विषयांची चर्चा होताना बहुतेक वेळा याच पिढ्या नजरेसमोर येतात.
मात्र, १९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेले आधीचे बेबी बूमर्स आणि १९६५ ते १९८० दरम्यान जन्मलेले जनरेशन एक्स म्हणजे आजचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नागरिक यांना या चर्चेत स्थान नसतं. त्यांना तंत्रज्ञान वारसा म्हणून मिळालं नव्हतं; उलट त्यांनी ते स्वतः शिकत–समजत, चुका करत–सुधारत आणि प्रचंड जिद्दीने आपल्या आयुष्यात सामावून घेतलं. काहीजण आज उत्तम टेक्नो-सॅव्ही झाले आहेत, तर काही अजूनही हळूहळू, चाचपडत शिकत आहेत. पण आयुष्याच्या उत्तरायणात वय, आरोग्याच्या मर्यादा आणि शिकण्याची नवी आव्हानं सांभाळत तंत्रज्ञानाच्या वेगाशी जुळवून घेणाऱ्या या पिढीची दखल घेणं नक्कीच गरजेचं ठरतं.
भारतातील ज्येष्ठ नागरिकांचा डिजिटल साधनांचा उपयोग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी याबद्दल हेल्पएज इंडियाच्या २०२५ च्या ‘इंडिया इंटरजनरेशनल बॉन्ड्स’ या अहवालात महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत. या अहवालानुसार, देशातील सुमारे ४१ टक्के ज्येष्ठ नागरिकांकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे. वाढत्या वयोमानानुसार डिजिटल उपकरणांच्या वापरातील घटसुद्धा या अहवालात नमूद करण्यात आली आहे. ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांमध्ये स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण फक्त २६ टक्के आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी फक्त १३ टक्के ज्येष्ठ नागरिक इंटरनेट, सोशल मीडिया, वेब ब्राउझिंग आणि इतर वेब सर्व्हिसेसचा प्रभावीपणे वापर करताना आढळतात. उर्वरित बहुतांश ज्येष्ठ कॉल-व्हिडीओ कॉल करणं, काही मेसेज पाठवणं, फोटो पाहणं अशा मूलभूत कामांपुरताच स्मार्टफोन वापरतात.
डिजिटल माध्यमांनी ज्येष्ठांचं आयुष्य अनेक प्रकारे सुकर केलं आहे. ऑनलाइन बँकिंगमुळे आता पेन्शनसाठी बँकेत जाऊन रांगेत उभं राहण्याची गरज राहत नाही. बिल भरणं, तिकीट काढणं, दैनंदिन गरजेच्या वस्तू मागवणं घरबसल्या शक्य झालं आहे. सहज साधता येणारा संवाद हे जणू ज्येष्ठांसाठी डिजिटल साधनांचं मोठं वरदान ठरलं आहे. नातेवाईक-स्नेहीजन एका क्लिकवर जोडले जाणं, परदेशातील नातवंडांना रोज व्हिडीओ कॉलवर पाहता येणं; शारीरिक अस्वास्थ्यामुळे बाहेर पडता न येणाऱ्या समवयस्कांशी रोजच्या गप्पा, यातून ज्येष्ठांना भावनिक आधार मिळतो. हेल्पएज इंडिया आणि लॉंगिट्युडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया यांनी केलेल्या लॉकडाउनमधील अभ्यासातून असं दिसून आलं की, जे ज्येष्ठ नागरिक नियमितपणे व्हिडीओ कॉल करत होते, त्यांच्यामध्ये नैराश्य आणि चिंतेचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होतं.
ज्येष्ठांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही डिजिटल साधनांचा मोठा उपयोग होताना दिसतो. स्मार्टवॉच आणि त्यासंबंधित ॲप्स रक्तदाब, ऑक्सिजन पातळी, हृदयगती अशा महत्त्वाच्या मापदंडांवर सतत लक्ष ठेऊ शकतात. काही उपकरणांमध्ये गरज पडल्यास आपोआप इमर्जन्सी अलर्ट पाठवण्याची सुविधा असते, टेलिमेडिसिन ॲप्समुळे घरबसल्या वैद्यकीय सल्ला, रिपोर्ट्सची पाहणी, औषधांबाबत मार्गदर्शन हे सर्व सहज शक्य झालं आहे.
सगळ्या वयोगटांप्रमाणेच ज्येष्ठांसाठीही मोबाइल हे मनोरंजनाचं प्रमुख साधन बनला आहे. मोबाइलवरील बातम्या, मालिका, प्रवचनं, माहितीपट, चित्रपट यात ते रमतात. अनेकजण मोबाइलचा वापर एखादी रेसिपी किंवा नवीन भाषा, नवं कौशल्य शिकून घेण्यासाठीही करतात. विविध ब्रेन गेम्स, पझल्स, मेमरी गेम्स मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठी मदत करतात. पण, नाण्याची दुसरी बाजू बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. डिजिटल माध्यमांनी ज्येष्ठांच्या आयुष्यात अनेक सोयी आणल्या असल्या, तरी त्याचबरोबर काही नवीन समस्या आणि अडचणीही निर्माण केल्या आहेत. बहुतांश ज्येष्ठांच्या तरुणपणात तंत्रज्ञान खूप मर्यादित होतं.
या पिढीने अगदी ॲनालॉग ते डिजिटल हा मोठा बदल डोळ्यांसमोर अनुभवला. संगणक आणि पहिले साधे मोबाइल आले तेव्हा त्यांनी तेही मनापासून शिकण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या काही वर्षांत झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे तंत्रज्ञानाचा वेग इतका झपाट्याने वाढू लागला की अनेक ज्येष्ठांना त्याच्याशी जुळवून घेणं कठीण जाऊ लागलं. टचस्क्रीन मोबाइल, त्यावरचे असंख्य ॲप्स, इंटरनेटवरील शेकडो वेबसाइट्स आणि माहितीचा सतत वाहणारा महापूर, या सगळ्यामुळे गोंधळल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे. त्यात आता दैनंदिन जीवनातील जवळजवळ सगळंच झपाट्याने डिजिटल होत चाललं आहे. गॅस सिलिंडरचं बुकिंग, सरकारी सेवांसाठी अर्ज अशा अनेक प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन झाल्या आहेत. डिजिटल साधनांमध्ये सहजतेने काम करू न शकणाऱ्या ज्येष्ठांच्या अडचणीत त्यामुळे आणखी भर पडते.
हेल्पएज इंडियाच्या अहवालानुसार अजूनही सुमारे ५९ टक्के ज्येष्ठांकडे स्मार्टफोनच नाही. तरीही त्यांच्याकडून सहजपणे डिजिटल कामांची अपेक्षा ठेवली जाते. पासबुक अपडेट करायला किंवा एफडी मोडायला बँकेत आलेल्या एखाद्या आजोबांना अनेकदा ‘हे ऑनलाइन करता येतं, तिथूनच करा’ असं सहज सांगितलं जातं, पण त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे का याचा विचार फारसा होत नाही. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, त्यांनाही तो सफाईदारपणे वापरता येतोच असं नाही. त्यामुळे ‘व्हॉट्सॲपवर फोटो पाठवा’, ‘ऑनलाइन अर्ज भरून द्या’, ‘यूपीआयने पैसे भरा’, ‘लोकेशन शेअर करा’ असं सहजतेने सांगताना हे ज्येष्ठाना करणं खरंच जमू शकतं का, याचा विचार मात्र क्वचितच केला जातो.
स्मार्टफोन वापरणाऱ्या अनेक ज्येष्ठांना तो हाताळताना सतत एक भीती वाटत राहते. ‘चुकीचं बटण दाबलं तर काही डिलीट होईल का?’, ‘पैसे चुकीच्या ठिकाणी ट्रान्सफर होतील का?’, ‘काही चुकून सेंड किंवा पोस्ट तर होणार नाही ना?’, अशा अनेक शंका त्यांच्या मनात घोळत राहतात. या दडपणामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो आणि अगदी साधं काम करतानाही कुणाची तरी मदत घ्यावी लागते. यातून निर्माण होणारं डिजिटल अवलंबित्व अनेक ज्येष्ठांसाठी त्रासदायक ठरतं. नवीन नंबर सेव्ह करणं, फोनचं स्टोरेज फुल झाल्यावर काही डेटा डिलीट करणं, यूट्यूबवर एखादा भजन किंवा व्हिडिओ शोधणं अशा अगदी साध्या गोष्टींसाठीही काहीजणांना मुलांना किंवा नातवंडांना वारंवार सांगावं लागतं. आयुष्यभर स्वकर्तृत्वावर मोठमोठी जबाबदारी सांभाळलेले, प्रतिष्ठेच्या पदांवरून निवृत्त झालेले ज्येष्ठ जेव्हा अशा छोट्या तांत्रिक कामांसाठी हतबल होतात ,तेव्हा याचा परिणाम त्यांच्या मन:स्वास्थ्यावर होऊ शकतो.
ज्येष्ठांचा सायबर सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तंत्रज्ञानाची पूर्ण ओळख नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक हे अनेकदा स्कॅमर्सचे सोपे लक्ष्य बनतात. फेक फोन कॉल्स, डिजिटल अरेस्टची भीती दाखवणे , KYC अपडेटच्या नावाखाली बँक तपशील मागणे असे हे प्रकार ज्येष्ठांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. डिजिटल माध्यमात रमू पाहणाऱ्या काही ज्येष्ठांचं वर्तन कधी कधी इतरांना थोडं त्रासदायक किंवा मजेशीर वाटू शकतं. डिजिटल ‘प्रायव्हसी’ ही संकल्पना न कळल्याने अनेकदा घरातील कौटुंबिक घडामोडींपासून ते आरोग्यविषयक तपशिलांपर्यंत अनेक गोष्टी सहजपणे सोशल मीडियावर पोस्ट केल्या जातात. व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज पुढे फॉरवर्ड करणं, शुभ सकाळ किंवा सुविचारांच्या इमेजेस रोज पाठवत राहणं, परस्परांशी काहीही संबंध नसलेल्या विविध विषयांचे अनेक स्टेटस एकत्र टाकणं अशा काही गोष्टी निरागस उत्साहातून केल्या जातात, पण सगळेच ही भावना समजून घेऊ शकत नाहीत.
वृत्तपत्र आणि दूरदर्शन हे विश्वासार्ह माहितीचे मुख्य स्रोत असलेल्या काळात वाढलेल्या या पिढीसाठी ‘जे छापील तेच सत्य’ अशी एक सहज प्रवृत्ती मनात रुजलेली असते. त्यामुळे फेसबुकवरील प्रत्येक पोस्ट, व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज, यूट्यूब व्हिडीओ यावर ते पटकन विश्वास ठेवू शकतात. त्यात एआयद्वारे निर्मित व्हिडीओ, कृत्रिम आवाज, बनावट स्क्रीनशॉट इतके वास्तववादी दिसू लागले आहेत की टेक्नो-सॅव्ही तरुणाईही फसते, तिथे ज्येष्ठांनी गोंधळून जाणं खरंतर स्वाभाविकच आहे. पण अशा चुकीच्या माहितीवर, अफवांवर विश्वास ठेवणं अनेकदा धोक्याचं ठरू शकतं.
तासनतास रील्स बघणं, फेसबुक पोस्ट वाचत बसणं, गेम खेळणं, खऱ्या गप्पांपेक्षा चॅटिंगमध्ये रमणं… या अशा डिजिटल सवयींमध्ये अनेक ज्येष्ठही आता हळूहळू गुंतू लागले आहेत. नकळत मोबाइलच्या व्यसनात अडकले जात आहेत. यामुळे एकाग्रता कमी होणं, झोपेची गुणवत्ता ढासळणं, चिडचिडेपणा-अनाठायी भीती वाढणं, हळूहळू नैराश्यासारखी लक्षणं दिसू लागणं असे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मोबाइलचा वापर वाढत असेल, तर वेळीच सावध होणं गरजेचं.
डिजिटल साक्षरता ही ज्येष्ठांपुढे उभ्या राहणाऱ्या अशा अनेक समस्यांवर प्रभावी उपाय ठरू शकते. डिजिटल साधनांचा वापर हा आजच्या काळाची अत्यावश्यक गरज बनला आहे; त्यामुळे त्यापासून पूर्णपणे दूर राहण्याऐवजी स्मार्टफोन, सोशल मीडियाचा वापर, डिजिटल प्रायव्हसी, सायबर सुरक्षेच्या मूलभूत गोष्टी ज्येष्ठांनी स्वतः शिकून घेणं गरजेचं ठरतं. अनेक संस्था अशा प्रशिक्षण कार्यशाळा घेत आहेत, त्यांची मदत घेता येऊ शकेल. खरंतर या कामात टेक्नो-सॅव्ही तरुणांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आपल्या परिसरातील सोसायट्या, ज्येष्ठ नागरिक मंडळं इथे ज्येष्ठांना असे विषय सांगता येऊ शकतील. या डिजिटल शिक्षणाची पहिली पायरी घरातूनच सहज सुरू होऊ शकते.
दुधावरच्या सायीनंच दुधाला गोड करावं. ज्या सायमाखल्या हातांनी लहानपणी दूधभात भरवला होता, त्याच हाती स्मार्टफोन द्यावा. ज्यांनी चिऊ काऊच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यांना टेक्नोलॉजीचे धडे द्यावेत. फक्त आपल्याला अगदी सोप्या वाटणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन आणि कधी कधी अवघड असू शकतात याचं भान महत्त्वाचं आहे. ‘किती वेळा तेच तेच सांगायचं’ असं वाटू शकेल तेव्हा आजीआजोबांनी आपल्या हट्टामुळे आपल्या आवडीची गोष्ट न कंटाळता पुन्हा पुन्हा किती वेळा सांगितली होती हे आठवावं. नातवंडांनी आपल्या आजीआजोबांना अशा गोष्टी न कंटाळता, संयमाने आणि अगदी सोप्या भाषेत शिकवल्या तर ज्येष्ठ डिजिटल साक्षर होतीलच आणि नात्याची वीणदेखील घट्ट होईल. ज्येष्ठांच्या आयुष्याच्या उत्तरायणात असे डिजिटल वारे वाहत असताना, त्यात आपुलकीचे सुखद पतंग उडावेत यापेक्षा सुंदर दृश्य ते काय?
