मितेश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेमध्ये श्री स्वामी समर्थाची भूमिका साकारणारा चतुरस्र अभिनेता अक्षय मुडावदकर हा पेशाने शेफ आहे. अक्षयला उपलब्ध जिनसांमध्ये उत्तम खाबूगिरी करण्याचा अनुभव आहे. आज त्याने खाण्याचे शिष्टाचार या विषयावर ‘फुडी आत्मा’ सदरात खास गप्पा मारल्या आहेत. 

‘ब्रेकफास्ट लाइक अ किंग, लंच लाइक अ प्रिन्स, डिनर लाइक अ पॉपर’ १९ व्या शतकातील आहारातज्ज्ञ एडले डेव्हिस हिचे हे उद्गार म्हणजे अक्षय मुडावदकरच्या आहाराचे ब्रीदवाक्य आहे. नाश्त्याला महत्त्व द्यायलाच हवं असं सांगणाऱ्या अक्षयच्या खाद्यचर्येची सुरुवात भरपेट नाश्ता करून होते. अक्षयला नाश्त्यासाठी ढोकळा, इडली, डोसे, उपमा, पोहे खायला आवडतात. ‘नागलीची खिशी’ हा आजीने मला शिकवलेला जगात भारी नाश्ता आहे, असं सांगतानाच या खिशीचं रहस्यही त्याने उलगडून सांगितलं. ‘मी मुळचा नाशिकचा. नाचणी, नागली किंवा रागी या नावाने ओळखलं जाणारं हे भरड धान्य नाशिककरांच्या आहारात मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतं. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या भाकरी आणि पापडापर्यंत नागलीचा आहार नाशिककर घेताना दिसतात. लहानपणापासून माझा सगळय़ात आवडता नाश्ता म्हणजे ‘नागलीची खिशी’ होय. ही खिशी बनवण्याची पद्धतही मॅगीसारखी अतिशय सोपी आहे. थोडय़ाशा तेलात जिरे परतायचे. त्यात पाणी घालायचं. पाणी उकळल्यावर त्यात नागलीचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून ते मिश्रण चांगलं एकजीव करायचं. परतून झाल्यावर एक उकड तयार होते. त्यालाच खिशी असं म्हणतात. या गरमागरम खिशीवर वरून तेल ओतून खाण्यात मला परमोच्च आनंद मिळतो’, असं अक्षय सांगतो.

‘सध्या या गुणी नाचणीचं महत्त्व तरुणांना खूपच जाणवायला लागलं आहे. लोह आणि कॅल्शियम यांनी युक्त असलेली नाचणी आहारात असायलाच हवी. नाचणीमुळे मुळात वजन नियंत्रणात राहतं. पोटदुखी, अपचन या तक्रारी दूर होतात, अशक्तपणा दूर होतो. शरीरातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहतं. त्यामुळे माझ्या नाश्त्यात मी नागलीचा समावेश करून घेतला आहे’ असं तो सांगतो. अक्षय ग्लुटेन फ्री आहार घेतो. ग्लूटेन हे गव्हातलं एक प्रोटीन असतं. त्याने कणकेला, मैद्याला चिवटपणा येतो. पावामधली हवा पकडून त्याला स्पंजसारखं करायची जादू ग्लुटेनचीच असते, त्यामुळे अक्षय गहू न खाता ज्वारी खातो. ज्वारीच्या पिठात ग्लुटेन नसतं, त्यामुळे रोज दुपारच्या जेवणात ज्वारीची भाकरी खाण्याचा त्याचा नियम आहे. त्याबरोबर कोशिंबीर, भाजी आणि वरणभात तर असतोच. रात्रीच्या जेवणात सोयाबीन आणि कडधान्ये खाण्याकडे त्याचा कल असतो. अक्षयला डाएट आणि जिम फॉलो करायला मनापासून आवडतं,  त्यामुळे हेल्दी आणि प्रोटीनयुक्त आहार घेण्यावर त्याचा भर असतो.       

अभिनय क्षेत्राकडे वळण्याआधी अक्षय हा पेशाने शेफ होता. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी शिक्षण व मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट या विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून अक्षयने काही वर्षे हॉटेल इंडस्ट्रीत नोकरीसुद्धा केली. त्याचबरोबर तो नवीन मुलांना शिष्टाचार शिकवण्यासाठी ट्रेिनगसुद्धा घ्यायचा म्हणून जेवणाचे शिष्टाचार त्याला खूप महत्त्वाचे वाटतात. याविषयी सविस्तर माहिती देताना अक्षय म्हणतो, ‘शिष्टाचार ही प्रत्येक क्षेत्रातील एक महत्त्वाची बाब आहे. क्षेत्रागणिक शिष्टाचार बदलतात. खाण्याचेही शिष्टाचार असतात जे प्रत्येकानेच पाळायला हवेत. मी काही  दैनंदिन जीवनातील सोपे खाण्याचे शिष्टाचार सांगण्याचा प्रयत्न इथे करतो आहे. सगळय़ात पहिला नियम म्हणजे हात धुऊन जेवायला बसणे. जेवण वाढून झाल्याशिवाय जेवायला सुरुवात करू नका. असे केल्याने जेवण बनवणाऱ्याच्या मनात तुमच्याविषयी एक आदर निर्माण होतो. तसंच जेवण वाढणाऱ्याला संकोच राहात नाही. पोळी, चपाती, नान इत्यादी एकाच हाताने तोडावे. दोन्ही हाताने जेऊ नये. जेवताना तोंडाने आवाज करू नये झ्र् म्हणजेच तोंड बंद करून जेवावं. डाळ-भात हाताने खाताना फक्त बोटांची टोकं वापरावी; त्याखाली बोटं खरकटी करू नयेत. पाण्याचं भांडं आणि वाढायचे चमचे खरकटय़ा हाताने उचलू नका. ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असं आपण भारतीय मानत असल्याने ताटात काही वाया घालवू नये. यजमानांनी पाहुण्यांना आग्रह करणं योग्य मानलं जातं, पण इतकाही आग्रह करू नये की पाहुणे जिकिरीस येतील. जेवणानंतर तृप्तीची मोठी ढेकर देणं आजकालच्या शिष्टाचारात बसत नाही.. बिझनेस एन्टरटेिनगमध्ये तर नाहीच नाही! त्यामुळे मोठय़ाने ढेकर देऊ नका’.

घरातल्या खाण्याच्या शिष्टाचारांबरोबरच हॉटेलमध्ये जेवतानाही अनेक शिष्टाचार आहेत त्याबद्दलही त्याने सविस्तर माहिती दिली.  हॉटेलमध्ये चॉपस्टिक्सने जेवायची वेळ आली तर चॉपस्टिक्स उदबत्तीसारख्या भातात खोचू नका. जेवायच्या वेळी उत्साहाच्या भरात चॉपस्टिक्सने ‘दांडिया’ खेळू नका. चॉपस्टिक्सचा आवाज हॉटेलमध्ये होणार नाही याची काळजी घ्या. त्याचबरोबर हॉटेलमध्ये नॅपकिन वापरण्याचेही काही शिष्टाचार आहेत. नॅपकिन उघडून मांडीवर ठेवावा. खूप मोठा असल्यास त्याची अर्धी घडी घालून मांडीवर ठेवता येतो. लहान बाळांच्या गळय़ाभोवती ‘बिब’ लावतात तसा स्वत:च्या गळय़ाभोवती नॅपकिन लावू नका. सूप पिण्याचे शिष्टाचारही अत्यंत महत्त्वाचे आहेत. सूप कितीही गरम असलं तरी त्यावर फुंकर मारू नका. थंड करण्यासाठी सूप अलगद चमच्याने ढवळावं. खाताना फुर्र फुर्र आवाज करू नये. चमच्यातून थेंब सांडण्याचा संभव असेल तर चमच्याची खालची बाजू बाऊलच्या काठाला पुसून घ्यावी. सूप ओठांच्या खाली ओघळल्यास नॅपकिनने अलगद पुसावं. हॉटेलमध्ये गेल्यावर सगळय़ात मोठी चूक आपल्याकडून होते ती म्हणजे वेटरला नोकरासारखं वागवलं जातं. मुळात सगळय़ाच वेटरला उत्तम ट्रेनिंग दिलेलं असतं. सगळेच जण अदबीने सेवा करत असतात. अशा वेळी त्यांना शिट्टी मारून बोलवणं, खाणाखुणा करून बोलावणं किंवा वेटर म्हणून हाक मारणं चुकीच आहे. वेटर पाणी द्यायला तुमच्या टेबलवर आल्यावर त्याला तुम्ही नाव विचारा आणि त्या नावाने त्याला हाक मारा. तुमच्या या साध्या कृतीने तो तुमची मनापासून सेवा करेल.. अक्षयच्या तोंडून ही भलीमोठी शिष्टाचाराची यादी ऐकताना नुसतंच खाण्यापलीकडेही अन्नाशी असलेल्या आपल्या नात्याचा किती सखोल विचार केला जातो हे जाणवतं.      

अक्षय पेशाने शेफ असल्यामुळे तो उत्तम स्वयंपाक करतो. त्याच्या स्वयंपाकघरातील कलेविषयी आणि  सेटवरच्या खाबूगिरीविषयी सांगताना अक्षय म्हणाला, ‘सेटवरची खाबूगिरी ही जोरात असते. आम्ही गेली चार वर्षे एकत्र काम करत असल्यामुळे एकमेकांना एकमेकांबद्दलची खाण्यापिण्याची आवड माहिती झाली आहे. त्यामुळे आपसूकच आवडते पदार्थ हे डब्यात आणले जातात. आम्हा चार – पाचजणांचा ग्रुप आहे. आम्ही एकत्र डबा खातो. आम्ही टेबलवर डबे मांडतो तेव्हा अक्षरश: बुफे लागल्याचा भास होतो. वेगवेगळय़ा घरातली चव या निमित्ताने कळते. माझी बायको उत्तम कोशिंबीर बनवते. त्यामुळे तिच्या कोशिंबिरीचे चाहते सेटवर आहेत. मी उपलब्ध जिनसांमध्ये खाबूगिरी करणारा माणूस आहे, त्यामुळे जेव्हा घरी मी जेवण बनवतो तेव्हा घरात काय काय जिन्नस, भाज्या, मसाले आहेत ते पाहून जेवण बनवतो. मी मसालेदार वांग्याची भाजी उत्तम बनवत असल्याने मी भाजी केली म्हटल्यावर सेटवर आणि घरी सगळे तुटून पडतात. शेफ असल्यामुळे अर्थातच माझा जेवण बनवण्याचा स्पीड जास्त आहे. बायकोला पंधरा मिनिटं भाजी बनवायला लागत असतील तर मी तेवढय़ा वेळात किमान दोन पदार्थ तरी बनवतो. सुट्टी असल्यावर घरी किचनमध्ये जर बायको जेवण बनवत असेल तर माझ्यातला शेफ आपोआप जागा होतो. सल्ले दिल्याशिवाय मी किचनमधून बाहेर पडूच शकत नाही. त्यामुळे मी किचनमध्ये जाण्याचा मोह टाळतो’ असंही तो गमतीने सांगतो.    

आजच्या काळात उन्हाळय़ाची सुट्टी म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याचे दिवस. वेगवेगळय़ा शिबिरांमध्ये भरती होऊन दिवस घालवण्यासाठी उन्हाळी सुट्टीचा वापर आजकाल केला जातो, पण आमच्या वेळी उन्हाळय़ाची सुट्टी म्हणजे घरच्या घरी भावंडांबरोबर केलेल्या धमाल-मस्तीबरोबरच आईला वाळवणांमध्ये मदत करायचे दिवस होते, असं सांगत अक्षयने लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘मध्यमवर्गीय घरांमध्ये उन्हाळय़ातली वाळवणं हा एक नाजूक विषय आहे. नाशिकमध्ये उन्हाळा सुरू झाला रे झाला की कुरडई आणि पापड बनवण्याचा हंगाम आजही सुरू होतो. पण माझ्या लहानपणी तो हंगाम म्हणजे एक प्रकारचा उत्सवच असायचा. आपण त्याला वाळवणोत्सव म्हणू शकतो. आठवडाभर आधीपासूनच आजी आणि आईचं प्लॅनिंग चालायचं. घरात वाळवण होणार याची वातावरणनिर्मिती म्हणून की काय..घरातली लोखंडी कॉट किंवा पलंग वाळवणासाठी बाहेर आणून ठेवलेला असायचा. त्यावर एक मोठं प्लास्टिक अंथरलं जायचं. हे प्लास्टिक आई इतर महत्त्वाच्या वस्तूंप्रमाणेच खूप निगुतीने जपून ठेवायची. मला दगडाचे तुकडे गोळा करण्याचं काम असायचं. हे तुकडे त्या पलंगावरच्या प्लास्टिकभोवती आधार म्हणून ठेवायचे. आणि मग लहान पातेल्यातून आणलेला चीक सोऱ्यात भरून त्यातून कुरडईचा जन्म व्हायचा. कुरडयांची खरवड फस्त करायला आम्हा भावंडांची झुंबड उडायची. मी मदतीपेक्षा ओले पापड फस्त करायचो. त्यामुळे आई मला जास्तवेळ गच्चीत उभंही नाही करायची’ अशी आठवण त्याने सांगितली.    

अक्षयच्या मते अन्न हे परब्रह्म मानलं जातं. नुसतं पोटभरीसाठी नाही तर यज्ञकर्म आहे म्हणून अन्नग्रहण करताना तो एक शारीरिक धर्म म्हणून पाळू नये. तर अध्यात्मिक अनुभूती म्हणून अन्नग्रहण झालं पाहिजे. जेवताना फक्त स्वत:चा विचार करायचा नाही तर चराचर सृष्टीचा विचार करायचा आहे. निसर्गातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म जीवाचाही विचार अनेक अन्नविधीतून दिसतो. वैश्वदेव, काकबली, चित्राहुती, अतिथी देवो भव.. हे सर्व विधी अन्नग्रहण ही निव्वळ प्रकृती नव्हे तर आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन आहे याची प्रचीती आणून देतात, हे तो ठामपणे सांगतो.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chat with actor akshay mudwadkar on food topic zws
First published on: 05-05-2023 at 06:21 IST