भारत हा विविधतेने नटलेला सहिष्णू देश आहे. इथे सगळेच सण उत्साहाने साजरे होतात. २१व्या शतकाच्या नांदीत जागतिकीकरण, तांत्रिक प्रगती, नावीन्यपूर्ण माध्यमांचा वापर या सगळ्यामुळे तरुण पिढी उत्क्रांतीची पिढी ठरली. तसंच, कॉस्मोपॉलिटन संस्कृती मोठ्या प्रमाणात विस्तारल्यामुळे तरुणवर्गाची मैत्री, नोकरी, सण-समारंभ या सगळ्यांचीच व्याप्ती खूप मोठी आहे. ते ज्या उत्साहाने आपले मराठी सणवार साजरे करतात, तेवढ्याच जल्लोषात त्यांच्या समुदायातल्या मित्रपरिवाराचे उत्सवसुद्धा साजरे करतात. गेल्या काही वर्षांत ख्रिसमस सेलिब्रेशन त्यांच्या आवडीचा भाग झाला आहे. आणि या सेलिब्रेशनमध्येही ख्रिसमस केकला खास मनामनात स्थान मिळाले आहे.

ख्रिस्ती समुदायात पारंपरिक पद्धतीने ख्रिसमस कसा साजरा केला जातो? याबद्दल पुण्याचा अनिकेत अँथनी सांगतो, ‘ख्रिसमस साजरा होण्याची सुरुवात अॅडव्हेंट सीझनपासून होते. डिसेंबरच्या पहिल्या रविवारी सुरू होणारे आणि ख्रिसमसच्या आधीचे चार रविवार. हा काळ ख्रिसमसच्या मानसिक आणि आध्यात्मिक तयारीचा मानला जातो. अनेक कुटुंबांमध्ये प्रार्थना, आत्मचिंतन आणि काही ठिकाणी उपवासही केला जातो. या काळात चार (कधी पाच) मेणबत्त्यांचा अॅडव्हेंट रिथ पेटवण्याची परंपरा आहे. ख्रिसमस जवळ आला की कॅरोल सिंगिंगला सुरुवात होते. गटागटाने लोक घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची कथा सांगणारी स्तुतिगीते आणि सणासुदीची गाणी गातात, तर सांता क्लॉज, रुडॉल्फ आणि भेटवस्तूंच्या कल्पनांनी वातावरण अधिक रंगतदार होते. कॅरोल गाणाऱ्यांचा घरोघरी तयार होणारी ख्रिसमस मिठाई देऊन सत्कार केला जातो. २४ डिसेंबर, म्हणजेच ख्रिसमस ईव्हला परिवारासह चर्चमध्ये मिडनाइट मासला उपस्थित राहून येशूच्या जन्माचे स्वागत केले जाते. त्यानंतर घरी परतल्यावर केक, मिठाई आणि वाईनसह उत्सव पहाटेपर्यंत सुरू राहतो’. ख्रिसमसचा दिवस मोठ्या कौटुंबिक जेवणाच्या तयारीत, नातेवाईक-मित्रांसोबत घालवला जातो, तर घरातील लहान सदस्य शेजाऱ्यांना मिठाई वाटण्याचे काम करतात. हशा, आनंद आणि एकत्रित येण्यातून आलेल्या उत्साहात हा संपूर्ण दिवस साजरा केला जातो, असेही अनिकेतने सांगितले.

ख्रिसमस सेलिब्रेशनबरोबरच ख्रिसमस केक म्हणजे फक्त एक गोड पदार्थ नाही, तर तो या सणाच्या आनंदाचा, सामूहिकतेचा आणि परंपरेचा आत्मा आहे. डिसेंबर महिना सुरू झाला की बेकऱ्यांच्या खिडक्यांतून दिसणारे गडद रंगाचे, सुकामेवा आणि सुगंधी मसाल्यांनी भरलेले केक आपोआप लक्ष वेधून घेतात. भारतात, विशेषतः मुंबई, गोवा, पुणे यांसारख्या शहरांमध्ये ख्रिसमस केकने वर्षानुवर्षे एक खास सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. परंपरेनुसार ख्रिसमस केक तयार करण्याची प्रक्रिया अनेक आठवडे आधी सुरू होते. सुकामेवा रम किंवा वाइनमध्ये भिजवणे, योग्य प्रमाणात मसाले मिसळणे आणि हळूहळू केक बेक करणे, या सगळ्यासाठी संयम, अनुभव आणि प्रेम लागते. त्यामुळे हा केक ‘फास्ट फूड’ नाही, तर वेळ आणि भावना गुंतवून तयार होणारा उत्सवी पदार्थ आहे. अनेक ख्रिस्ती कुटुंबांमध्ये आजही आजी-आईच्या रेसिपी जपून ठेवल्या जातात आणि त्या पुढच्या पिढीकडे दिल्या जातात.आजच्या काळात ख्रिसमस केकचे स्वरूप बदलले असले तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. पारंपरिक प्लम केकसोबतच ऑरेंज झेस्ट, डार्क चॉकलेट, ड्राय फ्रूट्सचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स, अगदी अंड्याविना (एगलेस) किंवा व्हेगन केकही लोकप्रिय होत आहेत. होम बेकर्स आणि आर्टिझन बेकरींमुळे ख्रिसमस केक आता फक्त ख्रिश्चन समाजापुरता मर्यादित राहिलेला नाही; तो सर्व समुदायांमध्ये एक ‘फेस्टिव्ह केक’ म्हणून स्वीकारला जात आहे.

व्यवसायाने शेफ असलेल्या आणि दादरच्या ‘होमशेफ’ या लोकप्रिय कॅफेच्या को-ओनर अदिती लिमये कामत सांगतात, ‘जेन्झीची या वर्षीची आवड म्हणजे मिनी केक्स, बटर क्रीम, क्रीम आयसिंग. गेल्या काही वर्षांत अल्कोहोल-फ्री केक्सचा बऱ्यापैकी ट्रेंड आहे, त्यामुळे आम्ही हल्ली रम इसेन्स वापरून केक बनवतो. तसेच जेन्झीला हल्ली टेस्टपेक्षा दिसायला रेखीव, सुंदर आणि सोशल मीडिया फ्रेंडली गोष्टी हव्या असतात. आमच्याकडे यावर्षी कस्टमाइज्ड कपकेक्सची डिमांड बरीच होती, ज्यामध्ये क्रिकेट, फुटबॉल, टीव्ही शो, व्हिडीओ गेम्स अशा थीम्स होत्या’. ख्रिसमस सेलिब्रेशनच्या पद्धतीत झालेल्या बदलांबद्दल बोलताना, ‘हल्ली सगळेच ख्रिसमस साजरा करतात, त्यामुळे ख्रिसमस स्पेशल केकसाठी मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. तुम्ही ख्रिस्ती नसलात तरी घराघरात ख्रिसमस साजरा केला जातो, या दिवसांमध्ये जवळपास प्रत्येक घरातून एकदा तरी केक आणून सेलिब्रेशन केले जाते’. लोकांची हा सण साजरा करण्याची आणि पाहुणचाराची पद्धतही बदलली आहे, आणि त्याचा परिणाम ऑर्डर्सच्या संख्येत झालेल्या वाढीत दिसतो, असेही त्या सांगतात. ‘होमशेफ’मध्ये असेही ग्राहक येतात ज्यांनी ख्रिसमस पार्टीसाठी बिर्याणीची ऑर्डर दिलेली असते, पण डेझर्ट म्हणून त्यांना ख्रिसमस केक किंवा पुडिंगच हवे असते. हे चित्र काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी दादर परिसरात फारसे दिसत नव्हते, असे निरीक्षणही अदिती यांनी नोंदवले.

ठाण्याची होम बेकर वैजयंती वीरकर सांगते, ‘साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दिवसांत माझ्या किचनमध्ये ख्रिसमस केक किंवा विंटर केक तयार होतात. त्यात अल्कोहोल फ्री, एगलेस, गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवलेला केक हे माझे यूएसपी आहेत. सध्या डाएट फूडबद्दल सजगता निर्माण झाली असल्याने, कमी गोड, कमी फॅट्स आणि मिलेट्स युक्त अशा केकचीही मागणी होते आहे. त्यात सोशल मीडियामुळे जाहिरात करणेसुद्धा सोपे झाले असल्याने एकंदरीतच या दिवसांत सगळ्याच वयाच्या आणि समुदायाच्या लोकांकडून केक्सना भरपूर मागणी असते. बहुतांश लोकांना आपल्या चवीचे कस्टमाइज्ड केक हवे असतात. डाएटचे वारे सध्या वाहत असले तरीही ख्रिसमसचा प्लम केक हा माझ्या अनुभवाप्रमाणे तरी एक श्रीमंत केक आहे, कारण तो केक भरपूर ड्रायफ्रुटस, बटर, कँडीने भरलेला असतो. त्यामुळे अगदी ऑथेंटिक ख्रिसमस केक हा फार डाएटचा विचार न करता घ्यावा असं मला वाटते’ असेही वैजयंतीने सांगितले. तर पुण्यातील होम बेकर पद्मिनी पै हिनेही सध्या मिलेट केक्सना अधिक मागणी असते या म्हणण्याला दुजोरा दिला.

पद्मिनी अनेक वर्षे घरच्या घरी क्रिसमस केक्स, चीज् केक्स आणि सेराडुरासारखे डेझर्ट्स बनवून पुण्यातल्या विविध कॅफे आणि रेस्टॉरंटना पुरवठा करते. ‘हल्ली लोकांच्या मागणीमुळे बेकिंगसाठी मैद्याऐवजी नाचणीच्या पिठाचा वापर केला जातो. अल्कोहोलमुक्त केकसाठी फळं संत्र्याच्या रसात भिजवली जातात, पण लोकांना पारंपरिक प्लम केक्सची रेसिपी माहिती असते. त्यामुळे अनेकदा ऑथेंटिक ख्रिसमस केक्सचीच डिमांड केली जाते. पारंपरिक प्लम केक बनवण्याच्या पद्धतीत १०-१२ प्रकारचे ड्रायफ्रुटस ओल्ड मंकमध्ये वर्षभर भिजवून केक बनवला जातो. सध्या डाएटच्या ट्रेंडमुळे काही ग्राहक ग्लूटेन-फ्री केकसुद्धा कस्टमाइज्ड करून मागतात’, असे ती सांगते. आपल्याकडे ख्रिसमस केक्सची आवड निर्माण होण्याचं कारण सोशल मीडिया आहे, आमचे बरेच ग्राहक सोशल मीडियावर आमच्या केकची प्रशंसा करतात. त्यातूनच नवे ग्राहक जोडले जातात, त्यामुळे एकाअर्थी सोशल मीडिया हा आमच्यासाठी मोठा आधार ठरला आहे, असे तिने सांगितले.सोशल मीडियामुळे क्रिसमस केकचा ट्रेंड प्रचलित झाला असला तरी त्यामुळेच हा केक दिसायला चांगला हवा, ही आग्रही मागणी होत असल्याचेही पद्मिनीने सांगितले.

सोशल मीडियाच्या जगात चवीबरोबरच केकचा पोतही चांगला दिसायला हवा, असं सांगणारे ग्राहक नेहमीच्या केकपेक्षा नवीन फ्लेवर्सचे केक खाण्यावर अधिक भर देत असल्याचे तिने सांगितले. पारंपरिक व्हॅनिला, चॉकलेट किंवा फ्रुट केक यांच्याबरोबरीने वेगळे आणि प्रयोगशील फ्लेवर्स तरुणाईत अधिक लोकप्रिय होत आहेत. पिस्ता-आधारित केक, पिस्ता-व्हाइट चॉकलेट किंवा पिस्ता-रोझ कॉम्बिनेशन सध्या खूप ट्रेंडमध्ये असून सोशल मीडियावरही ते आकर्षक दिसतात. स्ट्रॉबेरी – मँगो आणि सायट्रस फळांसोबत, कमी गोड आणि ‘मॉडर्न’ चव म्हणून तरुणांना हे फ्लेवर आवडतात. ब्लॅक सेसमे, टारो यांसारखे आशियाई फ्लेवर्स फ्यूजन फूडप्रेमींमध्ये लोकप्रिय होत आहेत. लोटस बिस्कॉफ, सॉल्टेड कॅरॅमल आणि हनी बटरसारखे गोड-खारट कॉम्बिनेशन्स कॅफे संस्कृतीत हिट ठरत आहेत. उबे (जांभळा रताळा) सारखे व्हायब्रंट रंगाचे केक त्यांच्या लुकमुळे सोशल मीडियासाठी खास आकर्षण ठरतात. एकूणच, आजचे तरुण कमी गोड, जागतिक प्रभाव असलेले, वेगळ्या चवीचे आणि दिसायला ‘इन्स्टाग्रामेबल’ केक अधिक पसंत करत आहेत.

ख्रिसमस केकचे सामाजिक महत्त्वही तितकेच मोठे आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने भेटवस्तूंमध्ये केक देणे हा प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छांचा एक गोड मार्ग मानला जातो. ऑफिसमधील सहकारी, शेजारी, मित्रपरिवार… सगळ्यांना एका केकच्या स्लाइसने जोडणारी ही परंपरा आहे. त्यामुळे ख्रिसमस केक हा केवळ चवीपुरता मर्यादित न राहता, नातेसंबंध दृढ करणारा एक सांस्कृतिक दुवा बनतो. बदलत्या ट्रेंड्ससोबत ख्रिसमस केक नवनवीन रूप घेत राहील, पण सणाच्या टेबलवर त्याचे स्थान कायमच खास असेल, कारण हा केक म्हणजे एकाअर्थी उत्सवातील गोडव्याचे आणि नव्या आशेचे प्रतीक ठरला आहे.