scorecardresearch

क्लिक पॉईंट : पूरी जिंदगी स्ट्रगल है

अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधून अभिनेत्री म्हणून तिला सगळय़ाच प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

वेदवती चिपळूणकर

अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधून अभिनेत्री म्हणून तिला सगळय़ाच प्रेक्षकांनी पाहिलं आहे. तिने प्रोडय़ूस केलेल्या मालिकाही प्रेक्षकांना आवडल्या आहेत. चित्रपटात ती काम करतेच आणि दिग्दर्शनही करते. नाटकाच्या रंगमंचावरही प्रेक्षकांना तिचं काम आवडलं आहे. केवळ वेगवेगळी पात्रंच नव्हे तर मनोरंजन क्षेत्रात वेगवेगळय़ा भूमिका निभावणारी ही कलाकार म्हणजे मनवा नाईक.

बालनाटय़, एकांकिका, नाटय़स्पर्धा असा प्रवास करत मनवाने तिचं करिअर घडवलं आहे. लहानपणापासून रंगभूमीचे संस्कार झालेली मनवा पहिल्यांदा अभिनेता विजय चव्हाण यांच्यासोबत नाटकाच्या स्टेजवर गेली ती केवळ सहा महिन्यांची असताना! बालवयापासून नाटकांच्या तालमी पाहिल्यामुळे ते वातावरण आपोआपच तिच्यात भिनत गेलं. मनवा म्हणते, ‘मी ठरवलं आणि तेच झालं, असं या क्षेत्रात होत नाही. आपण काय करतो आहोत, ते बरोबर आहे की नाही, आपला निर्णय योग्य आहे की नाही, याबद्दल आपल्याला संकेत मिळत असतात. आपल्या मनाचा तो आवाज ओळखायचा असतो. एखादं प्रोफेशन मी निवडलं, त्यासाठी अभ्यास केला, डिग्री घेतली आणि काम सुरू केलं, अशी प्रोसेस मनोरंजन क्षेत्राची नसते’. मात्र तुमचं नशीब, तुमच्यातलं टॅलेंट आणि योग्य वेळ – योग्य ठिकाण अशा सगळय़ाचा मेळ जमून आला तर तुम्हाला संधी मिळते, यश मिळतं, हेही ती स्पष्ट करते. यातली एखादी गोष्ट नसली तरी करिअर म्हणून याचा विचार करता येत नाही. आणि संधी मिळाली, लोकांना तुमचं काम आवडलं, तरीही ते वारंवार सिद्ध करत राहावं लागतं, हेही ती ठळकपणे नमूद करते. ‘कलाकार स्वत:हून इतरांना ही मुभा देतो की इतरांनी त्याला जज करावं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी तितकंच चांगलं काम करत राहावं लागतं’, असं सांगणारी मनवा प्रेक्षकांना आपलं कौतुक किंवा आपल्यावर टीका अशा दोन्हीचा हक्क मिळतो आणि त्यामुळे आपली कामातली सिन्सियरिटी टिकून राहते, या मताची आहे.

 ‘माझा एक मित्र मला म्हणाला होता की आपल्या क्षेत्रात संपूर्ण आयुष्यभर स्ट्रगलच आहे. त्यामुळे त्यातही मजा शोधली तरच दीर्घकाळ इथे टिकून राहता येऊ शकतं,’ असं मत मनवा व्यक्त करते. तिच्या दृष्टीने कोणती एक विशिष्ट घटना तिच्या करिअरसाठी क्लिक पॉइंट नव्हती. उलट लहानपणापासून आजूबाजूला असलेल्या वातावरणामुळे तिचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक क्षण आणि तिचं प्रत्येक काम तिच्यासाठी क्लिक पॉइंट ठरत गेला. आज कलाकार असणारी मनवा जर या क्षेत्रात नसती तर तिने इंटिरियर डिझायिनगमध्ये काहीतरी केलं असतं किंवा पर्यटनक्षेत्रात! मात्र संकटं किंवा अपयश यांच्यामुळे मागे हटून आपला मार्ग बदलणं तिला पसंत नाही. ती म्हणते, ‘इथे एका चित्रपटाच्या यशाचं मोजमाप शुक्रवारी होतं तर मालिकांचं भवितव्य गुरुवारी येणाऱ्या टीआरपीवर ठरतं. एका आठवडय़ात भरपूर तिकीट विक्री किंवा एका आठवडय़ात वरचा टीआरपी, याने हुरळून जाता येत नाही’, असं ती म्हणते. एखादं प्रोजेक्ट सुरू करताना, काम शोधताना पन्नास ऑडिशन दिल्या की एक कॉल येतो, पन्नास वेगवेगळी पिच केली की एखाद – दोन आवडतात. तरीही ते प्रोजेक्ट प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी आर्थिक जमवाजमव करायची असते, त्यावेळी त्या चॅनेलला त्या स्टोरीची गरज असली पाहिजे, त्यांना जशी गरज असेल तशी गोष्ट वळवता आली पाहिजे, कलाकार हवे तसे मिळाले पाहिजेत, अशा अनेक गोष्टींतून पार पडून मग एक प्रोजेक्ट सुरू होतं. आणि तरीही त्याच्या यशाची परीक्षा रोज होत असते. पण या सगळय़ा गोष्टींपासून मला कधीही पळून जायचं नव्हतं’, अशा शब्दांत अभिनयाबरोबरच निर्माती म्हणून कशा पध्दतीने रोजच्या रोज नव्या आव्हानांना सामोरं जावं लागतं हेही तिने सांगितलं. मनवाने पाहिलेले चढउतार, अपयश, कष्ट हेच तिच्यासाठी पुन्हा पुन्हा नव्याने क्लिक पॉइंट ठरत राहिले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 कोविडच्या काळात मनोरंजन क्षेत्रानेच सगळय़ांना मानसिक आणि भावनिक आधार दिला. या काळात चित्रीकरण करणं हे मालिकांना, चित्रपटांना अत्यंत अवघड जात होतं. अनेकांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन शूटिंग करण्याचा पर्याय निवडला. मनवा सांगते, ‘मला शूटिंगसाठी जावं लागणारच होतं. सगळय़ांना माझी काळजी वाटत होती, मला जाऊ द्यायला घरचे सगळे तयारही नव्हते. मात्र त्यावेळी माझ्या बाबांनी घरच्यांना फक्त ‘जाऊ दे तिला’ एवढं एकच वाक्य म्हटलं आणि मला त्याचा प्रचंड मोठा आधार वाटला. काहीही झालं तरी आपलं काम थांबता कामा नये यासाठीची जबाबदारी माझ्यावर होती, आणि त्याची जाणीव बाबांच्या या वाक्यामुळे मला पुन्हा झाली. मी अजून जोमाने आणि उत्साहाने शूटिंगला गेले.’

 तिच्या हातून तयार झालेल्या प्रत्येक चांगल्या कलाकृतीचं श्रेय मनवा तिच्या टीमला देते. आपल्यावर संपूर्ण काम अवलंबून आहे याची तिला कायम जाणीव असते. ‘एन्जॉय द प्रोसेस’ म्हणत पुढे जाणारी मनवा, कलाकार आणि व्यक्ती म्हणून नेहमीच विनम्र असते.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Click point author vedvati chiplunkar actress marathi hindi series audiences audience loved ysh