वेदवती चिपळूणकर

पहिल्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाची ताकद दाखवणारा आणि पहिल्याच चित्रपटासाठी अनेक पुरस्कार पटकावणारा सेल्फ-मेड कलाकार म्हणजे आरोह वेलणकर. अभिनयाची कोणतीही बॅकग्राऊंड नसताना, केवळ स्वत:च्या मेहनतीने त्याने मनोरंजन क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. महाविद्यालयीन एकांकिकांपासून सुरुवात करून प्रमुख भूमिका असणाऱ्या सिनेमांपर्यंतचा त्याचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

इंजिनीअिरगचा विद्यार्थी असणाऱ्या आरोहने अभ्यास, परीक्षा यांना वेळप्रसंगी साइडट्रॅक करून एकांकिकांमध्ये काम केलं आहे, त्यासाठी तालमी केल्या आहेत. सलग चार वर्ष सातत्याने स्पर्धामध्ये भाग घेऊनही आरोहला एकही बक्षीस मिळालं नव्हतं. आरोह म्हणतो, ‘चार वर्ष ‘पुरुषोत्तम करंडक’मध्ये मी भाग घेत होतो, पण मला एकदाही, कोणतंही बक्षीस मिळालं नाही. स्पर्धासाठी मेहनत घेऊन बक्षीस मिळालं नाही की वाईट वाटतं. मी परीक्षा, अभ्यास सगळं थोडं थोडं कॉम्प्रोमाइज करून यासाठी मेहनत घेत होतो. बक्षीस न मिळणं हे माझ्यासाठी प्रत्येक वेळी निराशाजनकच होतं. पण चौथ्या वर्षी मला पुरुषोत्तम करंडकमध्ये केशवराव दाते पारितोषिक, जे सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी दिलं जातं ते मिळालं. आतापर्यंत मोहन गोखले, विक्रम गोखले अशा अनेक मोठय़ामोठय़ा कलाकारांनी या पारितोषिकाची शोभा वाढवली आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते हे पारितोषिक मला मिळालं. त्या वेळी माझ्या हे लक्षात आलं की माझ्यात काहीतरी गुण नक्की आहेत ज्यावर मला मेहनत घ्यायला हवी. मी पूर्णवेळ करिअर कोणतंही निवडलं तरी मी अभिनय सोडता कामा नये हे मला त्या वेळी जाणवलं.’

पूर्ण वेळ अभिनयासाठी द्यायचा आणि करिअर म्हणून मनोरंजन क्षेत्राकडे बघायचा निर्णय आरोहने ‘रेगे’ या चित्रपटाच्या यशानंतर घेतला. मात्र कोणतंही मार्गदर्शन नसताना स्वत:चे संपूर्ण निर्णय स्वत: घेणं, आपल्यासाठी योग्य-अयोग्य कामाची पारख करणं, अशा गोष्टींसाठी आरोहला थोडी धडपड करावी लागली. तो सांगतो, ‘कोणत्याही कामासाठी लेखी कॉन्ट्रॅक्ट करायचं असतं हे मला माहितीच नव्हतं. नुसती एखाद्याची कथा ऐकून नव्हे तर आधी स्क्रिप्ट वाचून, त्यांचं म्हणणं ऐकून, आपल्याला असलेल्या शंका विचारून मगच कोणत्याही कामाला होकार द्यायचा असतो हेही मला माहिती नव्हतं. स्क्रिप्ट बघायची म्हणजे नेमकं त्यात काय काय बघायचं इथपासून माझी सुरुवात होती. चार वेळा वेगवेगळय़ा पद्धतीने धडा शिकल्यावर मग मला प्रत्येक गोष्टीची समज येत गेली’. कोणी फसवलं, कोणी फिल्मच बंद केली, कोणी पैसे बुडवले, कोणी बोलल्यापेक्षा वेगळंच काम प्रत्यक्षात सांगितलं, कॉन्ट्रॅक्टमध्ये काही लूपहोल्स ठेवले गेले जे वेळ निघून गेल्यानंतर समजले, अशा अनेक प्रसंगांतून जाऊन मी या क्षेत्रातला तांत्रिक आणि प्रोफेशनल भाग शिकलो आहे, असं सांगणारा आरोह या सगळय़ासाठी प्रचंड मेंटल स्ट्रेन्थची गरज आहे हे आग्रहाने सांगतो. ‘आपण फसवले गेलोय, आपलं काम पडद्यावर आलंच नाही, आयत्या वेळी गोष्टच बदलली, अशा सगळय़ा प्रसंगांतून आपल्याला स्वत:लाच बाहेर पडावं लागतं,’ असंही तो सांगतो. आरोहच्या मतानुसार कलाकाराच्या आयुष्यात ५ टक्के कामाचा आनंद आणि उरलेले पंचाण्णव टक्के इनसेक्युरिटी असते, पण आपलं काम पडद्यावर आल्याचा, लोकांनी ओळखल्याचा, कौतुक केल्याचा तो ५ टक्के आनंद सगळय़ा नैराश्याला सहज मागे टाकतो.

आरोह अनेक जणांकडून अनेक गोष्टी शिकला आहे. कोणी एक गुरू किंवा मेंटर आहे असं म्हणण्याऐवजी प्रत्येक बघितलेल्या कामामधून, चित्रपटामधून, प्रत्येक नावाजलेल्या कलाकाराकडून काहीतरी शिकलो आहे, असं तो म्हणतो. ‘ज्या वेळी अनिश्चिततेचे विचार खूप त्रास द्यायला लागतात, त्यावेळी माझं कुटुंब ही माझी शक्ती असते,’ असं आरोह म्हणतो. ‘आणि आतापर्यंत पाहिलेली सगळी उत्तम नाटकं, चित्रपट, कोणतीही कलाकृती आणि त्यातले दिग्गज यांच्याकडे बघत नैराश्याचा काळ पॉझिटिव्हिटीमध्ये बदलतो. कॉलेजमध्ये असताना माधव वझे सर मला म्हणाले होते की तू मोहन गोखलेंसारखं काम करतोस. त्यांच्यासारखं काम तर प्रत्यक्षात मला अजून जमलेलं नाही, पण असं कौतुक सतत आठवत राहिल्याने सकारात्मकता मिळते. अविनाश धर्माधिकारी सरांच्या हस्ते मला एक पुरस्कार मिळाला होता. मी त्यांचा विद्यार्थी नसलो तरी ते मला कायमच प्रेरणादायी वाटतात. नाना पाटेकर यांचा एक किस्सा आहे की, त्यांच्या ‘पुरुष’च्या प्रयोगात एका स्त्रीने त्यांना चप्पल फेकून मारली होती आणि ही आपल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांनी ती चप्पल जपून ठेवली आहे. प्रभाकर पणशीकर यांचा ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा शेवटचा प्रयोग मी पाहिला होता, त्यातलं त्यांचं काम मला नेहमी आठवतं. अशा प्रसंगांच्या आठवणींमधून प्रेरणा घेत राहायची, असा माझा प्रयत्न असतो. कोणत्या प्रसंग किंवा घटनेपेक्षा माझ्यावर इतर माणसांचा जास्त प्रभाव आहे असं मला वाटतं’, अशा सहजशब्दांत तो आपली जडणघडण उलगडत जातो.

आरोहच्या म्हणण्यानुसार एखादा कलाकार जेव्हा काम करतो, तेव्हा तो स्वत: एक प्रॉडक्ट म्हणून स्वत:चं काम प्रेझेंट करत असतो. कोणत्याही प्रॉडक्टला कधी स्वत:चं मत, भावना, इच्छा असं काही नसतं, मात्र कलाकार माणूस आहे, त्याला या सगळय़ा इमोशन्स आहेत आणि म्हणूनच हे क्षेत्र अवघड आहे. स्वत:च्या भावनांशी सतत खेळत राहाणं आणि तरीही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असं काम करणं हेच आव्हान आहे. आरोहचा पुढच्या आठवडय़ात प्रदर्शित होणारा चित्रपट ‘फनरल’ हासुद्धा त्याच्या करिअरसाठी एक क्लिक पॉइंट आहे, असं तो मानतो.

viva@expressindia.com