वेदवती चिपळूणकर

महाविद्यालयीन काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला धडपडीचा, चाचपडण्याचा काळ. शिकण्याच्या, वेगवेगळ्या व्यक्तींच्या सहवासातील अनुभवांच्या प्रक्रियेतून आपल्याला नेमकं काय करायचं आहे ही गोष्ट कुठल्यातरी एका क्षणी क्लिक होते. आणि मग त्यादृष्टीने आपली ठोस वाटचाल सुरू  होते. विविध क्षेत्रात कर्तृत्ववान ठरलेल्या तरुण व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यातील या क्लिक पॉइटविषयी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न या सदरातून केला जाणार आहे.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

‘सक्सेस’ किंवा ‘यश’ या संकल्पनेची प्रत्येकाची स्वतंत्र व्याख्या असते. आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा असा एक सक्सेस मंत्रा असतो. काहींचा मेहनतीवर खूप विश्वास असतो तर काहींना संधीचा फायदा करून घेत पुढे जायला आवडतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा काही काळ किंवा प्रसंग येतो ज्या वेळी ही यशाची संकल्पना हळूहळू तयार होत असते आणि तिथे पोहोचण्याचा आपापला मार्ग निश्चित होत असतो. सामान्यत: टीनएजचा काळ हा या सगळय़ा चढउतारांनी व्यापलेला असतो. याच काळात स्वत:च्या क्षमतांची ओळख होत असते आणि करिअरची दिशा ठरत असते. त्या वयात योग्य मार्गदर्शन मिळालं आणि ते सकारात्मकतेने स्वीकारलं तरच करिअरला आणि आयुष्याला योग्य वळण लागू शकतं. या महाविद्यालयीन वर्षांमध्ये घेतलेल्या काही निर्णयांचे परिणाम संपूर्ण आयुष्यावर होत असतात. याची जाणीव ठेवून मॅच्युरिटीने निर्णय घेणारा कलाकार म्हणजे ललित प्रभाकर! 

शाळेच्या वर्षांत नाटक, वक्तृत्व अशा उपक्रमांमध्ये उत्साही असलेल्या ललितने अकरावी-बारावीच्या दरम्यान कला क्षेत्राकडे पाहिलंदेखील नाही. मात्र त्या दोन वर्षांत जाणवलेल्या स्टेजच्या ओढीमुळे बिर्ला कॉलेजला पदवीला असताना ललितने कॉलेजच्या आर्ट्स सर्कलशी स्वत:ला जोडून घेतलं. त्या वेळी त्या नाटकाच्या ग्रुपमधील इतर मुलं कोणाकडे तरी गाइडन्ससाठी जातात हे त्याला कळलं आणि तिथून त्याचा कल्याणच्या ‘मितीचार’ या संस्थेत प्रवेश झाला. ललित म्हणतो, ‘सगळेजण जात होते म्हणून मीही जायला लागलो, पण त्याने नाटकाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. कॉलेजमध्ये नाटय़स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धा करण्याचं वेड असतंच, पण आपण आपल्या स्वत:च्या कामात काय विचार करायला हवा, आपल्याला अजून किती शिकायचं आहे, किती बघायचं आहे हे मला लाखे सरांच्या या संस्थेत जाणवलं. मेंटिरग जे त्या वयात गरजेचं असतं ते मला सरांकडून मिळालं. योग्य वेळी आणि योग्य वयात मी त्या संस्थेत होतो. आम्ही तिथे स्पर्धासाठी म्हणून कधी नाटक बसवलं नाही, कारण स्पर्धेला डेडलाइन असते. आम्ही प्रत्येक नाटकाला, एकांकिकेला जेवढा वेळ लागेल तेवढा देत होतो. जितका जास्त विचार करता येईल, जितकी जास्त मेहनत घेता येईल तितकं ते नाटक मनासारखं व्हायचं. तो वेळ लागायचा कारण आम्ही त्या नाटकाचा पुरेपूर अभ्यास करायचो. एखाद्या लेखकाचं नाटक बसवायला घेतलं की त्या लेखकाचं इतर लेखन, इतर नाटकं वाचायचो, त्या प्रकारातली इतर नाटकं वाचायचो आणि आपण नेमकं काय करायला हवं ते समजून घ्यायचा प्रयत्न करायचो. या सगळय़ा प्रोसेसमुळे आम्हाला कधीही कोणतं वेगळं वर्कशॉप वगैरे करावं लागलं नाही.’

ललितच्या मेहनतीला जोड मिळाली ती त्याच्या पेशन्सची! इतकी मोठी प्रोसेस करून नंतर प्रत्यक्ष रंगमंचावर उभं राहायचं यासाठी कमालीचा संयम गरजेचा आहे. सगळय़ाच अचिव्हमेंट्स अगदी सहज हव्या असणाऱ्या वयात हा पेशन्स दाखवणं ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. स्पर्धामध्ये मिळणाऱ्या बक्षिसांची एक काहीशी फसवी बाजू त्या काळात ललितच्या लक्षात आली. एखाद्या नाटय़स्पर्धेत किंवा एकांकिका स्पर्धेत बक्षीस मिळालं म्हणजे आपलं काम सर्वोत्तमच आहे आणि परफेक्टच आहे असा समज करून घेणं किती चूक आहे हे त्याच्या सरांनी त्याला शिकवलं. ‘उद्या जर सगळय़ा नाटय़स्पर्धा बंद झाल्या तर कितीजण नाटक बसवतील? अगदी मोजके! मग अशा वेळी या स्पर्धामध्ये मिळालेल्या बक्षिसांनी किती खूश व्हायचं?’ ललित म्हणतो, ‘आम्ही कितीही मेहनत केली तरी सर संपूर्ण कौतुक कधीही करायचे नाहीत. प्रत्येक वेळी त्यांना काही ना काही चूक सापडत राहायची. अशा वेळी तुमच्या पेशन्स आणि इच्छाशक्तीचा खरा कस लागतो. ज्यांना त्या क्रिटिसिझमचा त्रास होतो ते तिथूनच मागे फिरतात. आम्ही मात्र आमचं आणखी कुठे चुकतंय ते शोधून त्याच्यावर काम करायचो. त्यामुळे कौतुक होण्यासाठी पेशन्स हवेत, काम मिळण्यासाठी पेशन्स हवेत, करत असलेलं काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पेशन्स हवेत हे सगळं आम्ही अनुभवातून शिकलो. गधामेहनत करून नुसतीच पुन्हा पुन्हा तालीम न करता विशिष्ट दिशेने स्वत:वर काम करायला सरांनी शिकवलं. या संस्थेत जाणं हाच माझ्या करिअरचा पाया ठरला.’

संपूर्ण भारतातून केवळ तीस जणांना मिळणारी ‘यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप’ ललितला मिळाली आणि करिअर म्हणून पूर्णवेळ अभिनय क्षेत्र निवडण्यासाठी त्याला आत्मविश्वास मिळाला. करिअर प्लॅनिंगबद्दल ललित सांगतो, ‘माझा प्लॅनिंगवर विश्वास नाही. आपण ठरवतो तशी प्रत्येक गोष्ट होतच नाही. पण माझं हे नक्की होतं की मला इतर कोणत्याच कामात मजा येत नव्हती, मी रमत नव्हतो. मी मास्टर्स केलं होतं. एखादी नोकरी करून उरलेल्या वेळात नाटक करावं अशा घरच्यांच्या विचाराने मी बँकेच्या परीक्षा वगैरेही दिल्या, पण त्यातलं काहीच मनापासून करावंसं वाटत नव्हतं. त्याच वेळी मला ही स्कॉलरशिप मिळाली आणि मला इतरांना सांगण्यासारखं काहीतरी हाती लागलं. मी माझ्यापुरतं नक्की कमवू शकेन असा विश्वास मी घरच्यांना दिला आणि पूर्णवेळ करिअर म्हणून या क्षेत्राकडे वळायचं ठरवलं. या दुसऱ्या घटनेने माझा विचार आणि निर्णय बळकट केला.’

सगळय़ा पद्धतीची बॅकस्टेज आणि ऑनस्टेज कामं करून अनुभवाने समृद्ध असलेल्या ललितचा बॅकअप प्लॅनवर विश्वास नाही. ‘बॅकअप प्लॅन असला म्हणजे आपण आपल्या पहिल्या प्लॅनला ध्येय बनवत नाही आणि त्यामुळे आपलं शंभर टक्के देऊन प्रयत्न करत नाही. ज्या वेळी आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो तेव्हा आपण दिवसरात्र एक करून, जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारख्या अप्रोचने स्वत:ला झोकून देतो. आणि अशा पद्धतीने मेहनत करूनही अचिव्ह होणार नाही असं या जगात काहीच नाही.’ प्रायोगिक रंगभूमीपासून दैनंदिन मालिकांपर्यंत सर्वत्र ललितचा वावर आहे. प्रायोगिक रंगभूमीवर ‘दुरुस्त्या आणि देखभाल’ या दीर्घाकाचं दिग्दर्शन आणि प्रयोग करत असतानाच ललित चित्रपटांमध्येही काम करतोय. ‘झोंबिवली’ या चित्रपटातून तो लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. ललितची ‘बहुआयामी अभिनेता’ ही ओळख निर्माण होण्यात त्याच्या कॉलेजच्या वर्षांचा मोठा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

viva@expressindia.com