– वेदवती चिपळूणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली, मात्र ते करत असतानाच तिला तिची वेगळी कलात्मक आवड आणि ओढ जाणवली. तिने वेळीच तिचं क्षेत्र ओळखलं आणि आपलं संपूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित केलं. तिच्या फोकस, मेहनत आणि ओरिजिनॅलिटीमुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये तिचं नाव कौतुकाने घेतलं जातं. अशी मराठमोळी फॅशन डिझायनर म्हणजे वैशाली शडांगुळे अर्थात वैशाली एस.

अगदी तुमच्या-आमच्यासारखी असणारी वैशाली शिक्षण कॉम्प्युटर सायन्सचं घेत होती, मात्र त्याच काळात तिला स्टायलिंग आणि डिझायिनगची गोडी लागली. क्लासमेट्सचे युनिफॉर्म रिस्टाइल करणं, जिममधल्या क्लाएंट्सचं स्टायलिंग करणं तिला आवडत होतं. या सगळय़ातून तिला स्वत:ला तिचा कल, तिचा ओढा कशाकडे आहे हे लक्षात येऊ लागलं होतं. वैशाली म्हणते, ‘छोटय़ा छोटय़ा अशाच घटनांमधून मला हे लक्षात आलं की ही माझी आवड आहे, हे माझं पॅशन आहे. लहान लहान हिंट्स, लोकांनी केलेलं थोडंसं कौतुकसुद्धा मला या दिशेकडे वळवायला कारणीभूत ठरलं. जेव्हा मी ठरवलं की मला फॅशन हेच क्षेत्र निवडायचं आहे तेव्हा माझ्यातला निश्चय, जो मलाच आतापर्यंत अपरिचित होता, तो माझा आधार ठरला.’ कॉलेजच्या दिवसांत विज्ञान शाखेत कॉम्प्युटरचं तंत्रशुद्ध शिक्षण घेत असताना अचानक कला, आणि त्यातही फॅशन क्षेत्र निवडलेल्या वैशालीसाठी तिने केलेले कॉलेजमधले स्टायलिंगचे प्रयोग हाच पहिला क्लिक पॉइंट म्हणावा लागेल.

वैशालीने तिचं स्वत:चं पहिलंवहिलं शॉप (स्टुडिओ) सुरू केलं किंवा तिने मास्टर्स करण्यासाठी देशाबाहेर जायचं ठरवलं अशा अनेक पॉझिटिव्ह गोष्टी तिच्यासाठी एक-एक स्टेपिंग स्टोन ठरत होत्या. मात्र तिला आलेले वाईट, निगेटिव्ह किंवा त्रासदायक अनुभव तिला जास्त मदत करत होते. फॅशन या क्षेत्रात आलेले बहुतांशी लोक त्याचं रीतसर शिक्षण तरी घेऊन येतात किंवा त्यांना त्या क्षेत्राची काही ना काही तरी बॅकग्राऊंड असते. मात्र यापैकी काहीच वैशालीकडे अगदी सुरुवातीच्या काळात नव्हतं. आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलताना ती म्हणते, ‘आपल्याला आऊटसाइडरसारखं वागवलं जातं, मोठय़ा ब्रॅण्डकडून आपल्या ब्रॅण्डचा वेगवेगळय़ा प्रकारे गैरफायदा घेतला जातो. अशा अनेक अनुभवांमधून मी खूप शिकले. प्रत्येक वेळी काही तरी वाईट अनुभव आला म्हणजे आपल्या निश्चयाची परीक्षा आहे आणि मोठं काही तरी चांगलं पुढे येणार आहे अशी खूणगाठ मी बांधली. अशा प्रसंगांनी मला टफ बनवलं, अधिक डिटरमाइन्ड बनवलं. अडथळय़ांवरून उडी मारून पुढे जायला शिकवलं.’ करिअरमध्ये आलेल्या निगेटिव्ह अनुभवांकडेसुद्धा क्लिक पॉइंट्स म्हणून बघणारे वैशालीसारखे आयडॉल्स कमीच!

कोणतीही अडचण आली तरी निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यावर नवीन एनर्जी मिळते, असं वैशाली म्हणते. तिच्या डिझाईन्सची, कलेची प्रेरणा म्हणजेच इन्सपिरेशन तिला निसर्गाकडून मिळतं. कोणत्याही आर्ट फॉर्ममध्ये ओरिजिनॅलिटी असली पाहिजे आणि त्यासाठी निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहणं उपयोगी पडतं, असं वैशाली म्हणते. ती सांगते, ‘कोणाचं तरी कॉपी करून, एखाद्या डिझायनरसारखं किंवा कलाकारासारखं व्हायचा प्रयत्न करून जास्तीत जास्त तुम्ही कोण बनू शकता? तर एक मिडिऑकर डिझायनर किंवा कलाकार.. त्यामुळे टिपिकल आर्ट स्कूलमध्ये ज्या टिपिकल गोष्टी सांगितल्या जातात त्या जशाच्या तशा ऐकू नका. तुमची कला, तुमचं क्रिएशन हे ओरिजिनल असू द्या. तुमची स्वत:ची शैली शोधा. मग ती कोणत्याही आर्टची असेल.’ तिचं हे स्वत:चं वैशिष्टय़, स्वत:ची शैली शोधणं हेच आज तिला फॅशन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देणारं ठरलं आहे. गेल्या वर्षी पॅरिस फॅशन वीक आणि या वर्षी मिलान फॅशन वीकमध्ये आपले कलेक्शन सादर करणारी ती पहिली भारतीय महिला फॅशन डिझायनर ठरली आहे. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर फॅशनच्या माध्यमातून संवाद साधत तिथल्या फॅशनप्रेमींना आपल्याशी जोडून घेणं हे एक आव्हान होतं. स्वप्नपूर्ती झाल्याचा हा क्षण. पॅरिस आणि मिलान दोन्ही फॅशन शोजमधून भारतीय डिझायनर म्हणून प्रतिनिधित्व करता आलं. खूप आनंददायी अनुभव होता,’ असं ती म्हणते. वैशालीने मिलान फॅशन वीकमध्ये सादर केलेल्या ‘स्रोत’ या कलेक्शनलाही फॅशनप्रेमींची पसंती मिळाली. सस्टेनेबल फॅशनचा आग्रह धरणाऱ्या वैशालीच्या या क्षेत्रातील कामानेही तिला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

फॅशन डिझायिनगची कोणतीही बॅकग्राऊंड नसताना, कोणीही गॉडफादर पाठीशी नसताना वैशालीने या कठीण, ग्लॅमरस अशा स्पर्धेच्या क्षेत्रात इतकी वर्ष स्वत:चं नाव टिकवून ठेवलं आहे. केवळ भारतीय टेक्स्टाइलवर काम करणारी डिझायनर अशी तिची ओळख आहे आणि ते वेगळेपणदेखील तिने जपलेलं आहे. केवळ स्वत:च्या अनुभवातून शिकत, प्रत्येक धक्क्यातून सावरत, स्वत:च्या कामावर ठाम विश्वास ठेवत आणि स्वत:ची ओरिजिनॅलिटी जपत मराठमोळी वैशाली फॅशन विश्वात काम करते आहे. ‘आऊटसाइडर’ ते ‘आऊटस्टँडिंग’ हा प्रवास वैशालीने स्वत:च्या बळावर करून दाखवला आहे. क्षेत्र कोणतंही असो, प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनतीने त्यात नैपुण्य मिळवण्यासाठी निग्रहाने, झोकून देऊन काम करणारी वैशाली ही संपूर्ण तरुण पिढीसाठी इन्स्पिरेशन ठरली आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Click point find your own style computer science designing sweet ysh
First published on: 22-04-2022 at 00:02 IST