वेदवती चिपळूणकर

बारा वर्षांच्या करिअरमध्ये तीन लोकप्रिय दैनंदिन मालिकांमधून प्रेक्षकांचा लाडका बनलेला आणि सध्या सुरू असलेल्या ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेचा निर्माता असलेला अभिनेता म्हणजे चिन्मय उदगीरकर. अभिनयाशिवाय मी अपूर्ण आहे, अशी त्याची भावना आहे आणि त्याचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं याबद्दल तो समाधानीदेखील आहे. लहानपणापासून अभिनय हे क्षेत्र आवडत असलेला चिन्मय शिक्षणाने मात्र वकील आहे. वकिलीचं शिक्षण आणि नाटक या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळत चिन्मयने त्याची अभिनयाची आवड जपली आणि जोपासली आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

शाळेत असताना नाटकात काम करणाऱ्या चिन्मयने अकरावी- बारावीची दोन्ही र्वष मात्र नाटक बंद केलं होतं. त्या वेळी जाणवलेली पोकळी त्याला भरून काढायची होती आणि त्यासाठी त्याने लॉसोबतच नाटक चालू ठेवायचं ठरवलं. चिन्मय सांगतो, ‘पूर्णवेळ अभिनय करायचा आहे किंवा त्यातच करिअर करायचं आहे असं काही घरी सांगण्याची हिंमत माझी होत नव्हती. आपल्याला अभिनय नुसता कितीही आवडत असला तरी खरंच पूर्णवेळ आपण यात काही करू शकणार का? असा थोडासा सेल्फ डाऊटसुद्धा होता. त्यामुळे मी ठरवलं की, शिक्षण असं घ्यावं, की जे पुढे जाऊन करिअर बनू शकेल आणि त्याच वेळी मला अ‍ॅक्टिंगवरही लक्ष देता येईल, त्यातही धडपड करता येईल.’ करिअरसाठी आवश्यक शिक्षण आणि अभिनय या दोन्ही गोष्टी कशा साध्य झाल्या याबद्दल तो विस्ताराने सांगतो. ‘लॉ करत असताना मी नाटकासाठी ‘जीनियस’ नावाचा एक ग्रुप जॉइन केला होता. तेव्हा हे जाणवलं की हिरोइजम आणि कॅरेक्टर या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत. तिथे तेंडुलकर, एलकुंचवार या सगळय़ांच्या कलाकृतींशी ओळख झाली. वेगवेगळय़ा फेस्टिव्हल्समध्ये, ‘आविष्कार’मध्ये मी पूर्ण फोकसने सहभागी झालो. मग सेल्फ डाऊट वगैरे काही उरला नाही आणि माझा फोकस पूर्ण ठरला,’ असं तो सांगतो. त्याच काळात ‘झी मराठी’वर ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मध्ये चिन्मयने घरी न सांगता भाग घेतला होता. पहिल्या फेऱ्यांनंतर मुंबईला जातेवेळी मात्र त्याने घरी सांगितलं आणि या संधीच्या वेळी काही जमलं नाही तर मात्र परत येऊन वकिली करेन, असा शब्द देऊन तो मुंबईला गेला. चिन्मय म्हणतो, ‘त्यात मी खूपच गांभीर्याने काम केलं, मेहनत केली; पण स्वत:चं काम एन्जॉय करायला मला जमलं नाही. त्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर परत येऊन मात्र मी आईच्या ऑफिसमध्ये जायचं ठरवलं. आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही तरीही आपण मनापासून केलेलं काम कोणी ना कोणी तरी पाहत असतं, तसं माझ्याकडे ‘स्टार प्रवाह’च्या ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेसाठी विचारणा झाली. मात्र मी आई-वडिलांना प्रॉमिस केलं होतं, त्यामुळे त्याचा विचार केला नाही; पण माझ्या नाटकाचे सर मला न सांगता आई-वडिलांशी बोलले, माझ्या भावाने मला सपोर्ट दाखवला आणि मी ती ऑफर स्वीकारली.’

‘स्वप्नांच्या पलीकडले’ ही मालिका थेट चार र्वष चालली. त्या मालिकेनंतर चिन्मयने वर्ष-सव्वा वर्षांचा गॅप घेतला. तो म्हणतो, ‘दैनंदिन मालिकेत जे जे करणं शक्य होतं ते सगळं मी माझ्या पहिल्याच मालिकेमध्ये केलं होतं. मला त्या मधल्या काळात असं वाटत होतं की, मला काम केल्याशिवाय राहता येत नाही आहे, पण खरं तर मला अ‍ॅक्टिंग करत नसल्यामुळे अस्वस्थ वाटत होतं. माझ्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा तेव्हा थोडा अवघड काळ होता. मात्र त्या काळात मग मी माझं दुसरं पॅशन फॉलो करायचं ठरवलं. सुपरहिरो ही माझी फॅंटसी होती आणि सुपरहिरो हे एकदम सिक्स पॅक्स वगैरे असतात अशी साधारण कल्पना होती, त्यामुळे मी ठरवलं की आता जिमवर लक्ष द्यायचं आणि त्या वर्ष-दीड वर्षांच्या काळात मी रोजचे तीन-तीन तास जिममध्ये घालवायचो. त्या वेळी मला एक कळलं, की आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, ती त्या क्षणी होत नाही, तेव्हा ती लेट-गो करता आली पाहिजे. आपलं लक्ष दुसऱ्या ठिकाणी केंद्रित केलं पाहिजे. कारण आपली इच्छा पूर्ण होण्याची ती वेळ कदाचित नसते, पण ती आज ना उद्या पूर्ण होते. त्यामुळे मी माझ्या फिटनेसवर काम करायला लागल्यानंतर मला पुढचं काम मिळालं. मला असं वाटतं याचं कारण हे मी नुसतं वाट बघत बसण्याऐवजी स्वत:वर काही तरी मेहनत घेत राहिलो म्हणून असावं.’

चिन्मयने त्यानंतर ‘नांदा सौख्य भरे’, ‘घाडगे आणि सून’ यांसारख्या मालिका केल्या आणि त्या सुपरहिट ठरल्या. प्रेक्षकांचं प्रेम, त्यांच्या प्रतिक्रिया हीच सगळय़ात मोठी प्रेरणादायी गोष्ट असते असं चिन्मय मानतो. आपण स्क्रीनवर करत असलेल्या पात्राबद्दल प्रेक्षक एवढा विचार करतात, ते त्या पात्रांशी स्वत:च्या भावना जोडतात असे अनुभव चिन्मयला अनेकदा आले आहेत. सध्या तो प्रोडय़ूसर असलेली मालिका सुरू आहे. त्याबद्दल तो सांगतो, ‘मला डायरेक्शन, एडिटिंग, प्रॉडक्शन या सगळय़ा गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटायच्या. रात्री १० वाजता रिक्वायरमेंट कळल्यानंतर सकाळी ६ च्या शिफ्टला कशी काय सगळी तयारी मॅनेज होते? एवढय़ाशा वेळात एवढे कपडे कसे इस्त्री करून अ‍ॅक्टर्सना मिळतात, एका रात्रीत मर्सिडीज कुठून आणतात, एका रात्रीत पाचशे लोकांचा मॉब कसा गोळा करतात, असे अनेक प्रश्न मला पडायचे. शंकर महाराजांचा विषय सहज म्हणून चॅनेलसमोर मी मांडला होता मात्र मीच प्रॉडक्शन करावं असं त्यांनी सुचवलं. महाराजच परीक्षा घेत आहेत. तर त्यांच्यावरच विश्वास ठेवून देऊन टाकू परीक्षा.. म्हणून मी ही जबाबदारी घेतली आहे.’ ‘नील’, ‘अक्षय’ अशा सगळय़ा नावांनी ओळखला जाणारा चिन्मय आता मालिकानिर्मितीत रमला आहे. त्याने याआधीही मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. लवकरच त्याच्या नवीन चित्रपटातूनही तो प्रेक्षकांना पुन्हा भेटणार आहे.