वेदवती चिपळूणकर
आंतरमहाविद्यालयीन एकांकिकांपासून सुरुवात करून मराठी – हिंदूी मालिका, अनेक जाहिराती, चित्रपट अशा सर्व क्षेत्रांत वावरलेली अभिनेत्री म्हणजे दीपा परब. मुंबईच्या महर्षी दयानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली दीपा सहज म्हणून एकांकिका स्पर्धेत उतरली आणि अभिनयातच स्थिरावली. मात्र तिने स्वत:ला एकाच माध्यमापुरतं मर्यादित ठेवलं नाही. राकेश सारंग, अनुराग बसू अशा दिग्गजांसोबत तिने हिंदूी मालिका केल्या.‘पिंपळपान’सारख्या मराठी मालिका, ‘क्षण’ सारख्या मराठी चित्रपटांतून ती आपल्याला दिसली. चौदा वर्षांनंतर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ म्हणत दीपाने केलेला कमबॅक प्रेक्षकांनीही उत्साहाने स्वीकारला आहे.

महर्षी दयानंद कॉलेजमध्ये शिकत असताना दीपाला क्लास – वन ऑफिसर व्हायची इच्छा होती. दीपा म्हणते, ‘माझे आई – बाबा दोघं इन्कम टॅक्समध्ये होते, त्यामुळे मलाही लहानपणापासून असंच वाटायचं की मीही हेच करणार. मला क्लास वन ऑफिसर व्हायचं होतं. मी कॉलेजमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा करायचे. आमच्या कॉलेजमधल्या चंद्रकांत पडवळ सरांनी मला सांगितलं की तू वक्तृत्व करतेस, तर एकांकिकेत पण चांगलं काम करू शकशील. त्यांनी सांगितलं म्हणून मी ते करून पाहायचं ठरवलं आणि एकांकिकेत सहभागी झाले’. ‘ऑल द बेस्ट’ ही दीपाने केलेली पहिली एकांकिका होती. त्याची आठवण सांगताना ती म्हणते, परीक्षक एन. चंद्रा होते आणि मला त्यातल्या मोहिनी या पात्रासाठी बक्षीस मिळालं होतं. रवींद्र नाटय़मंदिरला बक्षीस समारंभ सुरू होता. मी बक्षीस घ्यायला जाताना आमच्या टीमने आणि त्यांच्यामुळे सगळय़ांनी ‘मोहिनी मोहिनी’ म्हणून ओरडायला सुरुवात केली. तो थिएटरमध्ये घुमणारा आवाज मला इतका भावला की मला हेच करायचं आहे हा निर्णय मी तेव्हाच घेऊन टाकला’. एकांकिकेतील भूमिकेसाठी मिळालेलं पारितोषिक, त्याच्या टाळय़ा आणि त्या कौतुकाची दीपाला भुरळ पडली ती कायमची!

‘ऑल द बेस्ट’ या एकांकिकेचं जेव्हा नाटक म्हणून रंगमंचावर येणार होतं त्या वेळी त्यात भरत जाधव आणि अंकुश चौधरी काम करणार होते. दीपा सांगते, ‘ही काही मनाला लावून घेण्यासारखी गोष्ट नव्हती, ते दोघं खूप चांगले अॅक्टर होते, सीनियर होते, म्हणून त्यांना घेतलं. माझी भूमिका लहानशी होती, पण तरीही त्या वेळी असं वाटलं की आपल्यालाही करायला मिळालं पाहिजे. आणि त्या जिद्दीने मी नवीन काम शोधत आणि करत राहिले.’ जिद्दीने काम शोधणाऱ्या दीपाला मनासारखी कामं वेगवेगळय़ा क्षेत्रात मिळत गेली. ‘मी शिल्पा तुळसकरला अॅडफिल्ममध्ये पाहिलं होतं. तसंही काहीतरी मला करून पाहायचं होतं. माझ्या नशिबाने मला हवी तशी कामं नेहमीच मिळत राहिली. इक्विनॉक्सचे राम वाधवानी यांच्यासोबत मी अॅडफिल्म केली. मोहन जोशी यांच्या ‘मनोमनी’ या नाटकात मी काम करत होते. हिंदूीमधली माझी पहिली सीरियल ‘आंचल की छाव में’ राकेश सारंग यांच्यासोबत केली आणि त्यातही लीड रोल केला. त्या मालिकेत रीमा दीदी होत्या, वंदना मावशी होत्या, मोहन जोशी होते, स्वप्निल जोशी होता. या सगळय़ांसोबत मला खूप शिकायला मिळालं. जे करायचं ते पूर्ण शंभर टक्के देऊन करायचं असा माझा स्वभाव असल्याने मी हिंदूीतही माझ्या उच्चारांवर मेहनत घेतली, बोलण्याचा लहेजा, पद्धतीवर काम केलं’, असं तिने सांगितलं. दीपा स्वत: पॅशन आणि डेडिकेशनने काम करणारी व्यक्ती आहे आणि तिला इतर माणसंदेखील तशीच भेटत गेली. यामुळे तिच्या करिअरचा प्रवास चांगला झाला असं ती म्हणते.

हिंदूी मालिका किंवा हिंदूी चित्रपट केले म्हणजे आपण खूप काही कमावलं आहे आणि पुन्हा मराठीकडे फिरकायची गरज नाही असं मानणारे अनेक लोक पाहायला मिळतात. मात्र दीपाचा विचार वेगळा आहे. प्रत्येक क्षेत्रातून चांगल्या गोष्टी घेऊन स्वत:ला समृद्ध करायचं आणि आपल्या मातृभाषेत काम करताना त्याचा उपयोग करायचा अशा विचाराने दीपा काम करते. ‘अनुराग बसू यांनी मला हिंदूीमध्ये काम करत असताना काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी सांगितलं होतं की माझी इमोशनल डेप्थ चांगली आहे, माझे डोळे बोलके आहेत, मात्र मी समोरच्या व्यक्तीच्या ॲक्शनला रिॲक्शन द्यायला सुरुवात केली पाहिजे. ती गोष्ट मी नीट लक्षात ठेवली’, असं दीपा सांगते. दीपा केवळ दिग्गजांचं म्हणणं लक्षात ठेवते असं नाही तर तिला मिळालेली प्रेक्षकांची कौतुकाची पावतीही तिने मनात जपून ठेवली आहे. ती म्हणते, ‘घोडबंदरच्या परिसरात मला एक बाई भेटल्या ज्या खऱ्या आयुष्यातल्या अश्विनी आहेत असं मला वाटलं. त्या मला म्हणाल्या की त्या मालिकेतल्या माझ्या पात्राशी स्वत:ला रिलेट करू शकतात. त्यांचे स्वत:चे दोन सलोन आहेत. त्यांच्या सासऱ्यांनी मला सांगितलं की त्यांच्या सुनेने, म्हणजे मला भेटलेल्या त्या बाईंनी, स्वत:च्या हिमतीवर आधी एक आणि मग दोन सलोन यशस्वीरीत्या सुरू केली.’ या खऱ्या आयुष्यातल्या प्रतिक्रिया आपल्याला आपल्या कामाची पोचपावती देत असतात असं दीपा म्हणते.

‘मला केवळ अभिनयच करता येतो, त्यामुळे मी कोणताही बॅकअप प्लॅन वगैरे ठेवला नाही’, असंही ती सांगते. आपल्याला काय करायचं आहे यावर आपण ठाम असलो की तात्पुरतं यश किंवा अपयश आपल्याला मागे ओढू शकत नाही असं दीपाचं म्हणणं आहे. थोडा संयम ठेवून काम केलं की हवे तसे परिणाम निश्चितच मिळतात, यावर दीपाचा विश्वास आहे.
viva@expressindia.com