scorecardresearch

क्लिक पॉईंट: महाराष्ट्राचा सुपरस्टार

एका तपापूर्वी ‘झी मराठी’वर पाहिलेल्या ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतला अभिजीत पेंडसे म्हणजेच अभिजीत खांडकेकरला प्रेक्षकांनी नायक म्हणून प्रेमकथेत आणि खलनायक म्हणून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमधून अक्षरश: डोक्यावर घेतलं.

वेदवती चिपळूणकर
एका तपापूर्वी ‘झी मराठी’वर पाहिलेल्या ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतला अभिजीत पेंडसे म्हणजेच अभिजीत खांडकेकरला प्रेक्षकांनी नायक म्हणून प्रेमकथेत आणि खलनायक म्हणून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमधून अक्षरश: डोक्यावर घेतलं. महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर अभिजीतने केलेल्या पहिल्याच मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आवाजाच्या बळावर मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलेला अभिजीत आता जणू प्रत्येकाच्या घरातला परिचयाचा चेहरा झाला आहे.
स्वत:बद्दलची मतं तयार होण्याच्या वयात इतरांच्या बोलण्याचा खूप मोठा परिणाम प्रत्येकाच्या मनावर होत असतो. त्याच वयात कोणतीही व्यक्ती आपलं भविष्य घडवते किंवा बिघडवते. शाळेतल्या इतर मुलामुलींच्या मतांचा, त्यांच्या रिअॅ क्शन्सचा परिणाम नकळतपणे होत असताना त्याबद्दल समजुतीने विचार करणं फार थोडय़ा लोकांना जमतं. अभिजीतला ते त्या वयात जमलं आणि त्याच्या आयुष्याची कन्स्ट्रक्टिव्ह सुरुवात झाली. तो म्हणतो, ‘माझ्या वडिलांची नोकरी महाराष्ट्र बँकेत होती. त्यामुळे त्यांच्या बदल्या होत असत आणि त्यांच्यासोबत माझ्याही अनेक शाळा बदलल्या. बीड, परभणी यांसारख्या ठिकाणी मी खूप राहिलेलो आहे. माझं सगळं शिक्षणही मराठी माध्यमातून झालेलं होतं. त्यामुळे माझ्या भाषेला वेगळा लहेजा, ग्रामीण लहेजा होता. काही ठिकाणी जेव्हा लोक मला त्यामुळे हसायचे, तेव्हा मला वाईट वाटायचं. माझं दिसणंही फारसं काही बरं नाहीये, माझ्या चेहऱ्यावर मुरमं आहेत, असंही मला वाटायचं. पण भाषेच्या बाबतीत मात्र मी इरेला पेटून स्वत:वर मेहनत घेतली. तुम्हाला प्रमाण मराठी हवंय, मी प्रमाण मराठी शिकतो. तुम्हाला बोलण्यात मध्ये मध्ये इंग्रजी शब्द हवेत, मी इंग्रजीही शिकतो. अशा हिरिरीने मी स्वत:वर मेहनत घेत होतो. ही एक फेज होती.’ टीनएजमध्ये असा अनुभव घेतलेला अभिजीत लोकल न्यूज चॅनेलवर सहा र्वष वृत्तनिवेदक होता तर पुण्यासारख्या शहरात प्रायव्हेट एफ.एम.वर चार ते पाच र्वष आर.जे. होता. आपण ठरवलं तर काहीही करून दाखवू शकतो असा कॉन्फिडन्स अभिजीतला आला. हा त्याच्या आयुष्यातला पहिला क्लिक पॉइंट म्हणता येईल.
कॉर्पोरेटमध्ये काही र्वष काम केल्यावर जसा तोचतोचपणा येतो तसा अभिजीतला काही वर्षांनी रेडिओमध्ये जाणवायला लागला. त्या वेळी त्याच्या बाबांनी त्याला त्याच्या अभिनयाच्या आवडीची आठवण करून दिली होती. अभिजीत सांगतो, ‘बाबांनी मला त्या वेळी सांगितलं की तुला कॉलेजमध्ये नाटकात वगैरे इंटरेस्ट होता, तर तू ते का करत नाहीस? त्या वेळी मला कॉन्फिडन्स नव्हता की मुंबईत येऊन एवढं काही करू शकेन. या क्षेत्रात कोणी गॉडफादर असल्याशिवाय जम बसवता येत नाही असं मला नेहमी वाटायचं, पण अनेकांना घरून सपोर्ट मिळत नाही म्हणून ते या क्षेत्राला मुकतात असं चित्रही मला माहिती होतं. त्यामुळे मला सपोर्ट असताना मी प्रयत्न करून पाहायला हवा असं मला वाटलं आणि मी ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मध्ये भाग घेतला. त्यानंतर मला मृणाल दुसानीससोबत पहिली मालिका मिळाली. ज्या वेळी किचन ड्रामा एकदम ट्रेण्डमध्ये होता आणि लव्ह स्टोरी चालत नाहीत असं चित्र होतं त्या वेळी प्रेक्षकांनी मला लव्ह स्टोरीचा नायक म्हणून स्वीकारलं. माझ्या नावाचीच व्यक्तिरेखा मला मिळणं हाही मी अत्यंत चांगला योगायोग समजतो.’ टीव्हीवरची ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ ही स्पर्धा आणि त्यानंतर मिळालेली ही मालिका याने अभिजीतच्या मनोरंजन क्षेत्रातल्या करिअरची, दृकश्राव्य माध्यमातील नव्या इिनगची सुरुवात झाली.
त्या मालिकेदरम्यानचाच एक अनुभव अभिजीत आवर्जून सांगतो, ज्या घटनेने त्याला स्वत:च्या कामाची ताकद समजली. तो सांगतो, ‘एक दिवस मला एका सामाजिक कार्यकर्त्यां असलेल्या बाईंचा फोन आला. त्यांनी मला एका मुलीशी बोलायची विनंती केली. तेव्हा असे फॅन्सचे फोन सर्रास यायचे. त्यामुळे मीही त्या मुलीशी थोडंसं बोललो, पण ती मुलगी मात्र अगदी मोजकं आणि कमी बोलत होती. मला थोडं वेगळं वाटलं, पण मी फार विचार केला नाही. एक महिन्याने मला त्या बाईंचा पुन्हा फोन आला आणि त्यांनी त्या मुलीची स्टोरी सांगितली. ती एक अनाथ मुलगी कॅन्सर पेशंट होती. कोणत्याही प्रकारे ती औषधं घ्यायला तयार होत नव्हती, तिला जगण्याची फारशी इच्छा नव्हती. तिच्याशी बोलण्याच्या प्रयत्नात त्या बाईंना हे लक्षात आलं की ती ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही मालिका आवर्जून नियमित बघते. म्हणून त्यांनी स्वत: हिंदूी भाषिक असून ती मालिका बघायला सुरुवात केली आणि तिला माझ्याशी बोलायला देण्याच्या बहाण्याने औषधं घ्यायला तयार केलं. माझ्याशी फोनवर बोलल्यानंतर तिचा रिस्पॉन्स चांगला होता आणि त्या बाईंनी मला पुन्हा फोन केलेला तेव्हा तिची शेवटची केमोथेरपी होऊन ती पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाली होती’. या प्रसंगानंतर एक कलाकार म्हणून अभिजीतचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. ‘या घटनेने मला एकदम जाणीव झाली की आपण स्क्रीनवर आणि स्क्रीनच्या बाहेरही जे करतो, वागतो, बोलतो त्याचा अनेकांवर भरपूर प्रभाव पडत असतो. मी जे काम कधी कधी कंटाळून करतो, कधीतरी त्या हेक्टिक शेडय़ुलला वैतागून करतो, ते काम कोणासाठी तरी खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर मी कायम विचार करून व्यक्त होणं, कधीही कामात कंटाळा येऊ न देणं अशा गोष्टी जाणीवपूर्वक सांभाळायला लागलो,’ असं तो विश्वासाने सांगतो.
अत्यंत संवेदनशील आणि विचारी असलेला अभिजीत खांडकेकर आज कोणीही गॉडफादर नसताना, मुंबईत आणि तेही मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वत:च्या अभिनयाच्या बळावर टिकून राहिला आहे. आणि तो नुसता टिकून राहिला आहे, असं नाही, तर त्याने नायक साकारला काय किंवा खलनायक साकारला काय.. तो कायम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. टेलीव्हिजन विश्वातला हा नायक प्रेक्षकांच्या गळय़ातला ताईत बनला आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Click point maharashtra superstar series audience by series constructive reactions languages click point amy

ताज्या बातम्या