वेदवती चिपळूणकर

‘सेव्ह ॲनिमल्स’चा प्रचार करणारी आणि सरकारी ऑफिसात ताडताड भांडणारी सावित्री असू दे किंवा आपल्या हाऊस – हेल्परला भयानक वेगाने गुजरातीतून सूचना देणारी रमा लेले- शहा असू दे, तिची मनमोकळी ॲक्टिंग प्रेक्षकांच्या हमखास लक्षात राहते. रिलेटेबल भूमिकांमधून प्रेक्षकांना भावलेली आणि नॅचरल अभिनयाने आपलीशी वाटणारी ‘भाडिपा’ची जुई म्हणजेच मृण्मयी गोडबोले.
लहानपणापासून नाटकाचं आणि अभिनयाचं वातावरण घरी असलेल्या मृण्मयीने खरं तर याच कारणामुळे मनोरंजन क्षेत्रात न येण्याचं ठरवलं होतं. ती म्हणते, ‘माझे बाबा इंजिनीअर आहेत, त्यांनी नोकरी सांभाळून या क्षेत्रात काम केलं आहे. घरी नाटकाचं वातावरण लहानपणापासून होतं. ‘ग्रिप थिएटर’ ही बाबांची संस्था आहे त्यातच माझी अख्खी सुट्टी जायची. त्यामुळे मोठं होऊन पुन्हा हेच नाही करायचं असं माझं म्हणणं होतं आणि घरातले सगळे तेच करतायेत तर मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मी वयाच्या अकराव्या वर्षांपासून बास्केटबॉल खेळते आहे आणि मी नॅशनल लेव्हलची प्लेअर आहे. इंजिनीअर व्हायचं म्हणून मी फग्र्युसन कॉलेजला सायन्सला ॲडमिशन घेतली होती. अकरावी आणि बारावी मी सायन्सला होते.’ इतका पक्का निर्णय असूनसुद्धा मृण्मयीची मनोरंजन क्षेत्रात एन्ट्री झालीच! त्या एन्ट्रीसाठी कारणीभूत ठरला ‘पुरुषोत्तम करंडक’.
कॉलेजमधल्या नाटकाच्या वातावरणाबद्दल आणि ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेच्या अनुभवाबद्दल मृण्मयी सांगते, ‘ज्युनिअर कॉलेजमध्येच नाटकाच्या एका वर्कशॉपला मी गेले होते. मला त्यात खूप मजाही आली होती, मला त्यासाठी फार कष्ट पडत नव्हते आणि मी अत्यंत नॅचरली त्यात फिट होत होते; पण तरीही मला ते करिअर म्हणून करायचं नव्हतं. मात्र ‘पुरुषोत्तम करंडक’च्या वेळी सिनिअर्सना माझ्यावर काहीतरी जबाबदारी द्यायचीच होती. अॅतक्टिंग तर मला करायची नव्हती, मग मी प्रॉडक्शनची जबाबदारी घेतली. स्वानंदी टिकेकर त्या नाटकात काम करत होती. त्या नाटकाच्या वेळी असं झालं की सुरुवातीचा एक सीन होता ज्यात एकांकिकेचा विषय समजण्यासाठी एका डॉक्टर पात्राची एक एन्ट्री होती. पण त्या एन्ट्रीचा कोणीच विचार केला नव्हता, कोणाच्या ती बहुतेक लक्षातच आली नव्हती. मी प्रॉडक्शनमध्ये असल्याने मला ते लक्षात आलं आणि आयत्या वेळी कोणाला उभं करणार म्हणून ती चार वाक्यांची एन्ट्री मी घेतली.’ मृण्मयीने केवळ वेळ मारून नेण्यासाठी घेतलेल्या एन्ट्रीची दखल दिग्दर्शक समीर विद्वांसने घेतली. त्याने ती एकांकिका पाहिल्यानंतर मृण्मयीला त्याच्या नाटकात मुख्य भूमिकेसाठी विचारलं. आपण इतक्या कॅज्युअली घेतलेली एन्ट्री एवढी प्रभावी असेल अशी मृण्मयीला कल्पना नव्हती, मात्र तिचा नैसर्गिक प्रवेश, वावर, बोलणं, या सगळय़ामुळे ती वेगळा काही अभिनय करतेय असं वाटलं नाही. या जाताजाता केलेल्या प्रवेशामुळे तिला तिचं भविष्य क्लिक झालं. समीर विद्वांसचं दिग्दर्शन, धर्मकीर्ती सुमंत याचं लेखन आणि अमेय वाघ सहकलाकार असलेल्या या नाटकात मृण्मयीने काम केलं आणि तिच्या करिअरला हेडस्टार्ट मिळाला.
नाटकाचं वर्कशॉप केल्यानंतर त्यांनी सगळय़ांना नाटक पाहायला नेलं होतं. त्याआधी मृण्मयीने अनेक नाटकं पाहिली होती, पण आपल्याला हे करून बघायचं आहे, यातून काही घ्यायचं आहे या दृष्टीने कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे तिच्यासाठी हा अनुभव नेहमीपेक्षा वेगळा होता. त्या अनुभवाबद्दल मृण्मयी सांगते, ‘आसक्त या संस्थेचं मोहित टाकळकरचं ‘तू’ हे नाटक पाहायला आम्ही गेलो होतो. रुमीच्या कवितांवर ते नाटक होतं आणि राधिका आपटे त्यात काम करत होती. त्या वेळी मी जे पाहिलं ते मॅजिकल होतं, तो अनुभव मॅजिकल होता. मग मला असं वाटलं की हे मॅजिक आपण घडवू शकतो रंगमंचावर! मग मी सायन्सकडून आर्ट्सवर शिफ्ट झाले आणि नाटकाकडे पर्यायाने अभिनयाकडे पूर्ण लक्ष द्यायला लागले.’
मृण्मयीसाठी अजून एक महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे गुजराती रंगभूमीवर तिने केलेलं काम! प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांच्यासोबत मृण्मयीने गुजराती नाटक केलं होतं. त्या कामाने तिला वेगळा कॉन्फिडन्स दिला. मृण्मयी म्हणते, ‘मी आणि गिरिजा ओक ती भूमिका करणार होतो. तिला गुजराती भाषा येत होती, मला अजिबात येत नव्हती. त्यामुळे तालमीच्या वेळी मी शांतपणे बसून इतरांचं फक्त ऐकायचे, ऑब्झव्‍‌र्ह करायचे. एकदा तालमीला गिरिजा फोनवर बोलत बाहेर गेली होती आणि तिच्या एन्ट्रीच्या वेळेपर्यंत आली नाही. नाटक मध्येच थांबू नये म्हणून मी काहीही न विचार करता एन्ट्री घेतली आणि पुढचे तिन्ही सीन्स सलग करून टाकले. मलाही कळलं नाही मी ते कसं केलं, पण ते झालं. त्याने माझा भाषेबद्दलचा आत्मविश्वास पण वाढला आणि ओव्हरऑलच कॉन्फिडन्स वाढला.’
पी.आर. प्रमोशन, या सगळय़ा गोष्टींचा मृण्मयीला कंटाळा येतो. पण कॅमेरा रोल झाल्यानंतर आणि पडदा उघडल्यानंतर जे समाधान मिळतं, त्यासाठी कितीही कंटाळवाण्या गोष्टी करायला मृण्मयीची तयारी आहे. मात्र सतत असणारे मानसिक चढउतार सांभाळण्यासाठी सतत काहीतरी सकारात्मक करत राहावं, असा सल्ला मृण्मयी देते. ती स्वत: वाचन, ग्रुप वाचन अशा गोष्टींमध्ये रमते. लहानपणापासून जे विश्व तिने अनुभवलं होतं. त्यात कळत-नकळतपणे उतरलेली आणि मग मनापासून या मॅजिकल अभिनय विश्वाचा भाग होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मृण्मयीसारखे तरुण कलाकार दुर्मीळच म्हणायला हवेत.
viva@expressindia.com