विनय नारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘वस्त्रान्वेषी’ या सदरातील लेखमालेतून आपण मराठी वस्त्र परंपरांचा आणि वस्त्र संस्कृतीचा धांडोळा घेतला. आपल्या वस्त्र परंपरा आणि वस्त्र संस्कृती यांचे विविध पदर उलगडून पाहिले. मराठी साहित्य आणि मराठी लोकजीवन यामधील वस्त्रांचे स्थान अलौकिक आहे. शेकडो वर्षांपासून विविध प्रकारच्या मराठी साहित्यात वस्त्रांबद्दलचे अनेको उल्लेख येत राहिले आहेत. या वस्त्र प्रतिमा फक्त अलंकरण म्हणून न येता, आशय गडद करण्यासाठी बऱ्याचदा येतात. विविध वस्त्रांच्या उल्लेखांनी आपल्या साहित्यातून वस्त्रांचे दस्तऐवजीकरणही साधले आहे. विविध प्रकारचे भावसमुद्र घेऊन येणारी ही वस्त्रांकित अभिव्यक्ती जुन्या मराठी साहित्याचा अनोखा पैलू आहे. आपल्या समाजातील वस्त्रांबद्दलची संवेदनशीलता, आपण याबाबत साधलेल्या उंचीचे निदर्शक आहे. ही उंची, हा दर्जा गाठायला आपल्या पूर्वजांच्या पिढय़ान् पिढय़ांचे योगदान कारणीभूत आहे. कित्येक पिढय़ांनी आपल्याला मिळालेल्या या वारशामध्ये भर घालून पुढच्या पिढीकडे हा वारसा सुपूर्द केला आहे. प्रत्येक पिढीचे हे एक प्रकारे कर्तव्यच आहे.

आजचा आपला समाज पाहता काय दिसून येते, आपण आपल्या वस्त्र संस्कृतीच्या वारशामध्ये काही भर घालतोय का? भर घालणे बाजूला ठेवू, हा वारसा आपण सांभाळतो आहोत का? गेल्या शतकात आपल्या जीवनात आमूलाग्र बदल झाले, त्यानुसार आपण बदलत्या राहणीमानाला प्रतिसाद देत बऱ्याच नवीन गोष्टी स्वीकारल्या. समाजाने बऱ्याच अंगाने प्रगती केली, तशा बऱ्याच गोष्टी गमावल्यादेखील. मानवी समाज प्रगती करत रहाणार हे वैश्विक सत्य आहे. पण आपल्या वस्त्र परंपराच्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो का? आपण वस्त्रांच्या दर्जाच्या बाबतीत, सौंदर्याच्या बाबतीत उलटा प्रवास करत आहोत का?, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. या जागतिकीकरणाच्या काळात जसे आपल्या समोर असंख्य वस्त्र पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत, ते आपण स्वीकारत आहोत, तसेच आपण एक समाज म्हणून दुसऱ्यांना काही पर्याय देऊ शकतोय का?

मराठी समाज म्हणून आपली वस्त्रांकित ओळख कितपत शिल्लक आहे? एक उदाहरण म्हणून पाहिल्यास लग्न समारंभांमधून आपणांस वधू वरांची वस्त्रे सहसा मराठी दिसून येत नाहीत. पंजाब आणि काही उत्तर भारतीय पेहरावांचा नको तितका पगडा मराठी समारंभांवर दिसून येतो. नवरदेवाच्या पोषाखांमध्ये तर हे खूप जाणवते. वधूच्या पेहरावाचा विचार करता, आजकाल नऊवारी ही परत आवडीने नेसली जात आहे, असे दिसून येते. परंतु अखंड, न शिवलेले वस्त्र ही आपली ओळख का आहे, याचे पूर्ण विस्मरण आपल्याला झालेले दिसते. नऊवार शिऊन जेव्हा नेसली जाते, तेव्हा एक सपाटपणा त्यात येतो, वस्त्राचा अपेक्षित फॉल पडत नाही. त्यामुळे पोषाखात व त्या समारंभातही एक बेगडीपणा दिसून येतो. कृत्रिम धाग्यांच्या, मिलमधे बनणाऱ्या, जसे वेलवेट, नेट व तत्सम नऊवारींचा तर आपण इथे विचारच करत नाही आहोत.

वधूकडून नेसण्यात येणाऱ्या साडय़ा पाहाता, मराठी साडय़ांपैकी पैठणी हे वधूवस्त्र म्हणून आजही आपला दिमाख टिकवून आहे. परंतु पैठणी हे वस्त्रच आपलं ‘‘पैठणीपण’’ टिकवून आहे का, हा सगळय़ात मोठा प्रश्न आहे. पैठणीमध्ये अपेक्षित असणारा घरंदाजपणा आजच्या पैठणीमध्ये दिसतच नाही. पैठणीमध्ये काळाच्या ओघात इतके बदल झाले की पैठणी ही फक्त तांत्रिकदृष्टय़ा पैठणी राहिली आहे. काळाच्या ओघात कोणत्याही कारगिरीमध्ये बदल होणे स्वभाविक आहे. किंबहुना कालसुसंगत बदल होत राहिल्यामुळे एखादी कला टिकून रहाण्यात मदतच होते. हे बदल करताना त्या कला किंवा कारागिरीमधील तांत्रिक बाबींचा व त्यातील सौंदर्यशास्त्राचा अभ्यास होणे हे गरजेचे असते. असा सारासार विचार न झाल्यामुळे पैठणीमधील सौंदर्यतत्वाचा ऱ्हास झाल्याचे आपल्याला पाहावे लागते आहे. अगदी अपवादानेच काही रचनाकारांच्या पैठण्यांमध्ये याचे मर्म जपल्याचे दिसून येते. सर्वसामान्यपणे दुकानांमधून व ऑनलाईन मिळणाऱ्या पैठण्यांचे भडकपणा हे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. पैठणी तंत्राचा नीट अभ्यास करून, त्यातील शक्यता समजून घेणे, त्यातील कोणत्या शक्यता या मूर्त रूप आल्यानंतर सुंदर दिसतील, याचा विचार होत नाही. कोणत्याही कला कारगिरीच्या काही तांत्रिक व काही सौंदर्याच्या अंगानेही मर्यादा असतात. या मर्यादा समजून घेतल्या तरच यांतील सौंदर्य अविष्कृत होऊ शकते. सर्वच प्रकारच्या रचना पैठणीमध्ये सुंदर दिसू शकत नाहीत. हे समजून घेण्यासाठी जु्न्या पैठण्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण मला खूप महत्वाचे वाटते. पैठणीमध्ये एक आकार खूप प्रचलित आहे. जुन्या पैठण्यांपासून आजच्या पैठण्यांपर्यंत हा आकार लोकप्रिय आहे. तो म्हणजे ‘मुनिया’. मैना किंवा पोपट पैठणीवर विणण्यासाठी कधी काळच्या विणकरांनी किंवा रचनाकारांनी हा आकार बनवला. त्यांना वास्तवदर्शी मैना – पोपट करता आले नसते का? पैठणीमध्ये इतके बदल झाले पण ही ‘मुनिया’ आजपर्यंत टिकून राहिली, ती सुंदर आहे म्हणूनच ना. याच्या मागचा विचार न करता, काहीतरी नवीन करायचे म्हणून करायचे, असा प्रकार सध्या होतो आहे.

मराठी वस्त्र परंपरांमध्ये रंगांची विशिष्ट ओळख आहे. एखाद्या प्रदेशाची रंग संवेदना विकसित होण्यात तिथल्या भौगोलिक बाबी कारणीभूत असतात. राजस्थान – गुजरात, तसेच पंजाबमध्ये जसे उजळ आणि भडक रंगांचे प्राबल्य असते, तसे महाराष्ट्रात गडद रंगांचे असते. इथल्या वस्त्रांमध्ये तसा भडकपणा शोभून दिसत नाही. तशा अनुकरणांमुळे पैठणीवर भडकपणा लादण्यात आलेला आहे. आजच्या काळातही पैठण्यांची उर्जितावस्था पाहून आनंद वाटतो, पण त्यातील सौंदर्याचा ऱ्हास पाहून विषाद वाटतो.

आपल्या वस्त्र परंपरांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे यांतील रचनांमधील प्रमाणबद्धता. साडय़ांचे काठ असोत, पदर असो वा चौकडा, यांतील प्रमाणबद्धतेमुळे या रचना खूप ठाशीव होतात. या प्रमाणबद्धतेमुळेच मराठी साडय़ा किंवा दख्खन साडय़ा, साध्या असल्या तरी मनावर ठसतात. मराठी साडय़ांमध्ये पैठणी किंवा चंद्रकळा सोडली तर अंगावरचे बुट्टे अपवादानेच दिसून येतात. हे बुट्टेही सहसा फार मोठे नसतात. मी काही वर्षांपूर्वी पैठणीवर आणि ब्लॉक प्रिंटमध्ये मराठी नथीची बुट्टी बनवली होती. मराठी संस्कृतीतले एक प्रतीक म्हणून मी त्याचा वापर केला होता. या बुट्टीचे मोठय़ा प्रमाणावर अनुकरण झाले, तेही ठीक आहे. परंतु या नथीचा आकार वाढत जाऊन एका फुटापर्यंत पोहोचला आहे. या सुंदर अलंकाराला अतिशय बटबटीत स्वरूप आले आहे. आपल्या वस्त्र परंपरांमधील प्रमाणबद्धतेचा अभ्यास न केल्यामुळे असे घडते आहे. पैठणीवरील नक्षी आणि बुट्टय़ांच्या बाबतीतही हेच होते आहे.

महाराष्ट्रातील कित्येक वस्त्र परंपरा नष्ट झाल्या, काही हातमागावरून यंत्रमागावर आल्या, काही सुती धाग्यावरून कृत्रिम धाग्यांवर आल्या. हजारो विणकर बेरोजगार झाले. त्यांना त्यांचे वंशपरंपरागत कौशल्य सोडून देऊन कमी प्रतिष्ठेची कामे करावी लागत आहेत. एक समाज म्हणून आपली वस्त्र परंपरांबद्दलची संवेदना नष्ट होत गेल्यामुळे या गोष्टी होत आहेत. या लेखमालेद्वारे वस्त्र संस्कृतीबद्दलची आपली संवेदना वाढीस लागावी, आपल्या परंपरांचा अभ्यास वाढीस लागावा व नवीन वस्त्र निर्मिती होताना आपण जास्त सजग व्हावे, अशी अपेक्षा होती. पर्यायाने आपल्या आयुष्यातील सौंदर्य वाढीस लागावे, हेच पसायदान मिळावे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clothing seekers beauty womens culture ysh
First published on: 31-12-2021 at 00:02 IST