कट्टा म्हणजे कॉलेजचा अविभाज्य भाग. हे पोट्टे एखाद वेळेस कॉलेजमध्ये लेक्चरला बसणार नाहीत, पण कट्टय़ावर हजेरी मात्र रेग्युलर लागते. कारण लेक्चरला बसून काय डोक्यात शिरणार नाही, पण कट्टय़ावरची दुनियादारी लाइफ बदलवून टाकते, हे त्यांच्या डोक्यात फिट असतं, तसं घडतंही. कट्टेकरी आपलं पुचाट/ अचाट तत्त्वज्ञान मांडत एखाद्याचा पोपट करत, काहींना बकरा बनवत आणि बऱ्याच आणाभाका घेत रोजच धम्माल उडवत असतात. पण जेव्हा एक्झाम जवळ येतात तेव्हा मात्र कट्टा थोडासा सीरियस झालेला असतो, कॉलेजला येऊन अभ्यासही करायचा असतो हे त्या वेळी त्यांना कळतं हे नशीबच म्हणायचं.
वर्षभर फक्त अटेंडन्स क्लीअर व्हावा यासाठी हे कट्टेकरी लेक्चरला बसतात, काही जण तर प्रॉक्सी लावतात. त्यामुळे वर्षभर मन कधीच लेक्चरमध्ये नसतं, पण एक गोष्ट या कट्टेकऱ्यांमध्ये असते आणि तो म्हणजे एकपाठीपणा. फक्त एकदाच वाचलं की त्यांच्या डोक्यात ते फिट बसतं आणि बसत नसेल तर एक कट्टेकरी दुसऱ्या कट्टेकऱ्याला पास होण्याचा नैतिक किंवा अनैतिक मार्गही दाखवतो. फक्त आपण पुढच्या वर्षीही एकाच वर्गात असायला हवं, हे या गेममागचं एम असतं. लेक्चरला कोणीही बसलेले नसल्याने नोट्स नसतात. मग ज्या ढापण्याला किंवा ज्या काकूबाईला या लोकांनी वर्षभर पिडलेलं असतं, त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून, कटिंगचं किंवा वडापावचं आमीष दाखवून नोट्स हे कट्टेकरी मिळवतात. कारण दुनियादारी त्यांच्या रक्तातच भिनलेली असते. नोट्सच्या झेरॉक्सही लवकर मिळतात. नोट्स मिळाल्या की या नोट्सवाल्याला कटवायचं कसं, हे त्यांना समजलेलं असतं. एखादा बोलबच्चन यादरम्यान एखाद्या मॅमना बरोबर मस्का लावून किंवा एखाद्या सरांना फटाका पोरगी घायाळ करीत आयएमपी मिळवते आणि मग कट्टय़ावर हे सगळं शेअर होतं. ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू कट्टेकरी’ ही म्हण या वेळी सार्थकी लागते. ज्याचा एखादा विषय पक्का असेल तो दुसऱ्यासाठी चक्का क्लास घेतो. पेपरच्या आदल्या दिवशी कट्टेकरी झोपलेला नसतो, तर सर्व जण एका मित्राच्या घरी सीरियसली अभ्यास करीत बसलेले असतात. सकाळी फ्रेश होऊन पहिलं कट्टय़ावर जाऊन कटिंग मारायची आणि पेपरला बसायचं हे पक्कं असतं, कारण याच कटिंगने या कट्टेकऱ्यांची नाळ जोडलेली असते.