‘वर्क- लाइफ बॅलन्स’ची कालबाह्य़ होत चाललेली संकल्पना आणि व्यावहारिकदृष्टय़ा ‘इंटिग्रेशन’ चा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वाढतं प्रमाण असं काहीसं चित्र कॉर्पोरेट जगतात निर्माण झालंय. नवी पिढी या ‘वर्क-लाइफ इंटिग्रेशन’शी जुळवून घ्यायचा प्रयत्न करते आहे. ‘वर्क- लाइफ बॅलन्स की इंटिग्रेशन?’ तुमचा अनुभव काय? ‘व्हिवा’ने (दि. २४ एप्रिल) विचारलेल्या प्रश्नावर अनेक तरुण नोकरदारांनी आपापल्या प्रतिक्रिया पाठवल्या. त्यातलेच काही प्रातिनिधिक विचार..     

ओन्ली वर्क.. नो लाइफ
माझा अनुभव सांगायचा झाला तर, मी अॅमेझॉनमध्ये काम करते आणि अॅमेझॉनसारख्या मोठय़ा कंपन्या ज्या वर्क-लाइफ बॅलन्सच्या बाबतीत आघाडीवर आहेत, तिथेसुद्धा वर्क-लाइफ बॅलन्स हा प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगळा आहे. फुलफिलमेंट सेंटरमधली वस्तुस्थिती अशी आहे की तिथे फक्त वर्क हे एकच पारडं आहे. ‘लाइफ’ नाही. लेखामध्ये उल्लेख केलेल्या पाळणाघर, जिम, इत्यादी सुविधा या एखाद्या विभागापुरत्या मर्यादित आहेत. सर्वासाठी नाहीत. ही अपेक्षा आहे की, आठवडय़ातून तुम्ही ६० तास काम केले पाहिजे. त्यामुळे फक्त वर्क आणि फावल्या वेळात लाइफ असे समीकरण आहे. अॅमेझॉनसारखी कंपनी इतर कंपन्यांप्रमाणे कधी सुट्टीवर नसते. त्यांची दारे आणि चक्रे कायम चालूच ठेवावी लागतात. त्यामुळेच गोष्टी वेळेत डिलिव्हर होतात. साहजिकच यांसारख्या कंपन्यांच्या नोकरदारांवर अधिक तणाव आहे. ही गोष्ट दुर्दैवी वाटली तरीही ही वस्तुस्थिती आहे.
– मेघना गुळवणी

स्विच ऑन .. स्विच ऑफ
‘वर्क लाइफ बॅलन्स’ या संकल्पनेला आपल्या भारतामध्ये अजूनही नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते, हे एक कटुसत्य आहे. ८ – ९ तास पूर्ण एकाग्रतेने काम करूनदेखील जेव्हा एखादा अधिकारी वेळेवर ऑफिस सोडतो तेव्हा वरिष्ठ व्यवस्थापनाच्या लेखी तो कारकुनी मनोवृत्तीचा ठरतो. काही अधिकारी तर ऑफिसमध्ये पाय ठेवल्यावर शेअर मार्केटचे ट्रेडिंगचे काम आधी करतात आणि मग ऑफिसच्या कामाला हात लावतात. त्यामुळे हाताखालील इतर कर्मचाऱ्यांना उशिरा सूचना दिल्या जातात. मग त्या सर्वाना कामे पूर्ण करण्यासाठी नाइलाजाने ऑफिस अवर्सनंतर काम करावे लागते. अशा परिस्थितीमध्ये वर्क लाइफ बॅलन्स साधणे कठीण होणारच. याउलट कधी कधी कर्मचाऱ्यांकडून सवलतींचा गैरफायदा घेतला जातो. ऑफिस व्यवस्थापनाने मोठय़ा विश्वासाने दिलेल्या वर्क फ्रॉम होम सवलतीचा काही कामचुकार कर्मचारी गैरफायदा घेतात व त्यामुळे इतर प्रामाणिक कर्मचारीवर्गाला हीच सुविधा भविष्यात नाकारली जाते. वर्क लाइफ बॅलन्स साधण्याची एक संधी हुकते. पु. ल. देशपांडेच्या मते, जीवनात उपजीविकेसाठी नोकरी करावी पण त्यासोबत एखादा छंद पण जोपासावा, ज्यामुळे वर्क लाइफ बॅलन्स साधण्यासाठी प्रेरणा मिळते. गाडीचे गिअर बदलतो तसे करिअरचे गिअर पण बदलत राहा. परिवाराला आपली आत्यंतिक गरज असेल तर काही काळासाठी पार्ट टाइम करिअर निवड. ज्या विषयात गोडी आहे त्याच विषयात करिअर करा, त्यामुळे काम सजा न वाटत मजा वाटेल. स्वत:च्या मनात एक ऑन-ऑफ स्विच निर्माण करा. घरातील टेन्शन्स घरात आणि ऑफिसमधील टेन्शन्स ऑफिसमध्येच ठेवा.  
– प्रशांत दांडेकर
असिस्टन्ट व्हाइस प्रेसिडेंट – एच. आर.
पॅनोरॅमिक युनिव्हर्सल लिमिटेड

जीवघेणं प्रेशर
स्त्री असो अथवा पुरुष, आजच्या काळात वर्क- लाइफ बॅलन्स साधणं अवघड होऊन बसलंय. त्याचा ताबा आता ‘वर्क लाइफ इंटिग्रेशन’ ने घेतलाय. कामाच्या प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा असताना स्पर्धेत तग धरून राहण्यासाठी स्वत:लाच प्रोत्साहन द्यावं लागतं. यासाठी सतत गतिशील असणाऱ्या तंत्रज्ञानाला धन्यवाद! या सगळ्या जबरदस्त प्रोसेसमध्ये वाढत्या प्रेशरमुळे येणारा ताण आणि नैराश्य यामुळे कुठे तरी सगळ्याशी सामना करण्यात आम्ही कमी पडतो. इंटिग्रेशनच्या प्रक्रियेमुळे फ्लेक्झिबली काम करणं शक्य झालेलं असलं तरी वाढत्या स्पर्धेमुळे स्वत:बरोबर प्रेशर वाहून नेलं जातंच. घरी, घराबाहेर, कुटुंबासोबत किंवा अगदी रजेवर असताना खऱ्या अर्थाने ‘रजा’ कमीच मिळते. साहजिकच, कामाच्या प्रेशरचा परिणाम कुटुंबावर होतो. ‘व्हिवा’च्या लेखात म्हटल्याप्रमाणे कुटुंबासोबत रजेवर जाण्यासाठी आणि जिमसाठी सुविधा मिळतात पण त्या सुविधा उपभोगण्यासाठी खरंच वेळ मिळतो का? आम्हाला फक्त स्वत:साठीचा वेळ हवा असतो. असा वेळ माणसाला विश्रांती आणि विरंगुळा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतो. साध्या साध्या गोष्टींमधून मिळणारा आनंद माणसाला रिचार्ज करायला आणि चांगली कामगिरी करण्यासाठी फायद्याचा ठरतो. गुगलचा सीएफओ पॅट्रिक पशेटने फॅमिली लाइफसाठी राजीनामा दिला, पण हे सोल्युशन प्रत्येकासाठी असू शकत नाही. अशी एक वेळ नक्की येईल जेव्हा कामाच्या प्रचंड ताणामुळे लोक कौटुंबिक जबाबदाऱ्या टाळतील. पुढच्या पिढीतील मुलांच्या भविष्याबाबत त्यांच्या सद्य:स्थितीचा अंदाज घेऊन अनेक प्रश्न निर्माण होतील. ते लग्न करतील की कमिटेड रिलेशनशिपमध्ये राहतील? त्यांना कुटुंब हवं असेल का? या व्यवस्थेचं भवितव्य काय असेल?
– श्रुती पत्की

आहे प्रमोशन तरीही..
माझ्यासारख्या वर्किंग विमेनसाठी वर्क लाइफबॅलन्स साधणं खूप महत्त्वाचं आहे. उच्चशिक्षित असणं आणि एखाद्या चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणं ही अभिमानास्पद गोष्ट असते. मी सीए आहे आणि मला वेळोवेळी प्रमोशन्स आणि इतर सहकारी कर्मचारी आणि वरिष्ठांकडून आदर मिळालेला आहे. पण इतक्या वर्षांच्या कामगिरीनंतर मी पुढील निष्कर्षांवर येऊन पोहोचले. काम आणि घर यातला बॅलन्स साधणं आव्हानात्मक असतं, कारण वय आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या टाळता येत नाहीत. कामाशी बांधीलकी ठेवताना तडजोड करून चालत नाही. आपल्या कुटुंबासाठी आपला किमती वेळ देण्याची गरज असते. या सगळ्याचे स्त्रीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. युरोपियन देश आणि अमेरिका, ऑस्ट्रेलियाप्रमाणे आपल्याकडेही तीन-चार दिवस पूर्ण वेळ काम आणि तीन-चार दिवस हाफ डे अशा कामाचे पर्याय असावेत. जेव्हा लहान मुलं ०-५ वर्ष वयोगटात असतात तेव्हा त्यांच्याकडे सर्वतोपरी लक्ष देण्याची गरज असते. अशा वेळी स्त्रियांना घरीच बसून काम करणं किंवा आठवडय़ातून दोन-तीन दिवस काम करणं हे पर्याय फायदेशीर ठरतील. घरातील इतर सदस्यांचा रोजच्या कामात सहभाग असावा. विश्रांतीसाठी पुस्तकं वाचावीत, गाणी ऐकावीत, फिरायला जावं आणि इतर छंद जोपासावेत. सकाळी घर ते ऑफिस प्रवास करताना ऑफिसच्या रोजच्या कामाचं नियोजन करावं आणि ऑफिसमधून घरी परतताना घराच्या कामांचं नियोजन करावं. सामाजिक संस्था आणि समाजाप्रति बांधीलकी असलेल्या गटांशी संलग्न असावं. व्यक्त होण्याची ही संधी दिल्याबद्दल लोकसत्ता ‘व्हिवा’चे मनापासून आभार.
– सीमा नानिवडेकर, सीए, मुंबई</strong>
(संकलन – लीना दातार)