रसिका शिंदे-पॉल

परंपरागत व्यवसाय किंवा क्षेत्रात करिअर करणे सोपे असते. मात्र, नवीन क्षेत्र निवडून त्यात स्वत:ला सिद्ध करणे महाकठीण काम असते. डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ या परिचित करिअरपलीकडे नवी वाट शोधण्यात तरुणाई पारंगत झाली आहे. अगदी फोटोग्राफीसारख्या ग्लॅमरस क्षेत्राकडे वळताना तिथेही अनेक प्रकारच्या करिअरची वहिवाट त्यांनी शोधून काढली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. फॅशन, फूड, वाइल्डलाइफ फोटोग्राफी याबरोबरीने सेलिब्रिटी फोटोग्राफी हाही प्रकार भलताच लोकप्रिय होत चालला आहे. अर्थात, छबीदार छबी टिपण्याची संधी देणारा हा करिअरचा प्रकार जितका वलयांकित तेवढाच अवघड आहे.. असे या क्षेत्रातील तरुण फोटोग्राफर सांगतात.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

तुमच्या आवडीला तुमचे करिअर बनवा

बऱ्याचदा आपले शिक्षण वेगळय़ा क्षेत्रातील असते आणि आपण नोकरी वेगळय़ा क्षेत्रात करत असतो. याचे एकच महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक स्थैर्यता असणे. फोटोग्राफी या क्षेत्रात पैसा मिळतो का? असा प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केला जातो. याचे उत्तर सेलिब्रिटी फोटोग्राफर आशय तुलालवार याने दिले आहे. आशय म्हणतो, ‘‘सेलिब्रिटी फोटोग्राफी या क्षेत्रात तुम्ही मेहनतीने काम करून आर्थिकदृष्टय़ा नक्कीच सक्षम होऊ शकता. फोटोग्राफीची आवड असल्यास हे क्षेत्र नक्कीच तुमच्यासाठी आर्थिक पाठबळ देणारे ठरू शकते; परंतु या क्षेत्रात तग धरून ठेवण्यासाठी संयम आवश्यक असणे फार गरजेचे आहे.’’ तुमच्या आवडीच्या कलेला ज्या वेळी तुम्ही तुमचे करिअर म्हणून निवडता त्या वेळी मेहनतीने अधिक काम करण्याची तयारी कायमच दाखवली जाते; परिणामी आर्थिक पाठबळ हे बळकट होत जाते. याविषयी सेलिब्रिटी फोटोग्राफर मयूर नारंगीकर म्हणतो, ‘‘फोटोग्राफी क्षेत्रात स्वत:ची वेगळी शैली निर्माण करावी लागते. त्यासाठी सातत्याने फोटोग्राफी केली पाहिजे. सेलिब्रिटींचे फोटो काढताना आधी डोक्यात आपल्याला त्या व्यक्तीला आपल्या कॅमेऱ्यातून कसे दाखवायचे आहे याचा विचार केला पाहिजे आणि मगच तुमच्या शैलीतून फोटोग्राफी केली पाहिजे. एखाद्या कलाकाराबरोबर तुम्ही काम करत असाल तर नक्कीच तुमची कला ही इतरांपेक्षा वेगळी आहे हे सिद्ध होते.’’

समाजमाध्यमातील अस्तित्व महत्त्वाचे

करोनाकाळात समाजमाध्यम हे तरुणांसाठी गरजेचे झाले आहे. त्यातूनच करिअरच्या संधीही याच समाजमाध्यमाकडून तरुणांपर्यंत पोहोचत आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून नावारूपास यायचे असल्यास आधी स्वत:चे समाजमाध्यमावर असलेले तुमचे अस्तित्व बळकट केले पाहिजे, असे सेलिब्रिटी फोटोग्राफर गणेश परब म्हणतो. तसेच सेलिब्रिटी फोटोग्राफी हे क्षेत्र समाजमाध्यमामुळे अधिक नावारूपाला आल्याचेही गणेशने सांगितले. ‘‘प्रत्येक कलाकार त्यांचे फोटोशूट केल्यानंतर मेकअप, फोटोग्राफी, वेशभूषा कोणी केली आहे याची प्रसिद्धी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून मिळवून देतो. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या किंवा या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या तरुणाईने आपले समाजमाध्यमावरील अस्तित्व अधिक बळकट केले पाहिजे,’’ असे गणेशने सांगितले. तर या क्षेत्रात काम करत असताना समाजमाध्यमांचे विशेषत: इन्स्टाग्रामचे ट्रेण्ड फॉलो करणे आणि आपली कामे अर्थात आपले फोटो, त्यामागची मेहनत अलीकडच्या काळात ज्याला ‘बिहाइंड द सिन्स’ असे म्हणतात त्याचेही छोटे-छोटे व्हिडीओ इन्स्टाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, कलाकारांपर्यंत पोहोचवणेही तितकेच गरजेचे असल्याचे मयूर सांगतो. त्यामुळे आपल्या कामाला ओळख मिळते आणि फोटोग्राफर म्हणून यशस्वी करिअर घडवण्याचा मार्गदेखील मोकळा आणि सोयीस्कर होत असल्याचा सल्ला मयूरने दिला.

कलाकारांपर्यंत स्वत:हून पोहोचणे महत्त्वाचे

आपला फोटोग्राफीत हातखंडा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मार्ग फार कमी होते, मात्र आता आधुनिक तंत्रज्ञान आणि समाजमाध्यम यामुळे आपली कला जगाच्या कानाकोपऱ्यात काही क्षणांत जाऊ शकते. याबद्दल अधिक माहिती देताना मयूर म्हणाला, ‘‘काही वर्षांपूर्वी कलाकारांपर्यंत पोहोचणे किंवा आपल्या फोटोग्राफीची कला त्यांच्यापर्यंत पोहोचवणे फार कठीण होते. मात्र, आता तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोप्पा झाला आहे. आपल्याला ज्या कलाकारासोबत काम करायचे आहे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाऊन त्यांना तुम्ही थेट मेसेज करू शकता किंवा त्यांच्या बायोमध्ये ईमेल आयडी किंवा संपर्क क्रमांक असल्यास त्यावर थेट बोलणे करू शकता.’’

तरुणींसाठी फोटोग्राफी हे क्षेत्र फार सुरक्षित

फोटोग्राफी क्षेत्रातही पुरुषांबरोबरच स्त्रिया तितक्याच दिमाखाने वावरताना दिसतात. तरीही फोटोग्राफी क्षेत्र मुलींसाठी सुरक्षित आहे का, अशी शंका आजही व्यक्त केली जाते, असे सेलिब्रिटी फोटोग्राफर सारिका भनगे सांगते. ‘‘फोटोग्राफी हे क्षेत्र मुलींसाठी फारच सुरक्षित आहे. तसेच या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी कलाकारच तुमची फार मदत करतात. मात्र, तुम्हाला तुमच्या कामाच्या शैलीतून स्वत:ला वारंवार सिद्ध करावेच लागते,’’ असे सांगतानाच जिद्द आणि संयम या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या क्षेत्रात नक्कीच यश मिळवू शकता असा विश्वास सारिकाने व्यक्त केला.  

कोलॅबरेशनचा खेळ सारा

अलीकडे इन्स्टाग्रामवर कोलॅबरेशन प्रकार ट्रेण्डी आहे. अगदी लहान-सहान ब्रॅण्डदेखील नवोदित कलाकारांसोबत कोलॅब करताना दिसतात. फोटोग्राफर्सनादेखील या कोलॅबरेशनचा नक्कीच फायदा होतो असे आशय म्हणतो. कोलॅबरेशन म्हणजे काय तर दोन कलाकारांनी एकत्रित येत एखादी कलाकृती तयार करणे आणि समाजमाध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचवणे. ज्यातून कलाकार आणि फोटोग्राफर या दोघांचीही प्रसिद्धी होते आणि त्यांना कामे मिळतात. ‘‘सुरुवातीला तुमचे नाव या क्षेत्रात पोहोचण्यासाठी मोफत कोलॅबरेशन करावे लागतात. परंतु त्यानंतर आपल्या कामाची आणि आपल्या मेहनतीची किंमत आपण स्वत:च ठरवून त्याचे पैसे आकारले पाहिजेत,’’ असा मोलाचा सल्ला आशयने दिला. ‘‘शिवाय केवळ सेलिब्रिटी फोटोग्राफी क्षेत्रातच अडकून न राहता प्रॉडक्ट, वेडिंग, पार्टी अशी विविध प्रकारची फोटोग्राफीची कामेदेखील सतत केली पाहिजेत, जेणेकरून सर्वच क्षेत्रांत आपला हातखंडा राहतो,’’ असे मयूरने सांगितले.