विशाखा कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लो फाय (Lo-Fi) अशी काही गोष्ट तुमच्या कानावर पडली आहे का? हल्ली यूटय़ूब आणि गाण्यांच्या प्रत्येक अ‍ॅपवर लो-फाय गाण्यांची प्लेलिस्ट दिसते. संगीताचा हा अगदी वेगळाच प्रकार आहे, पण लो-फाय म्हणजे नेमकं असतं तरी काय?

आपण सिनेमात ऐकतो ती सिनेमातील गाणी अद्ययावत तंत्रज्ञानाने रेकॉर्ड केलेली असतात. यात प्रत्यक्ष वाद्यसंच आणि गायकाचा आवाज याव्यतिरिक्त इतर कसलाही आवाज चुकूनही येणार नाही याची अतिशय काळजी घेऊन ही  गाणी रेकॉर्ड केलेली असतात. या गाण्यांमध्ये हाय फ्रिक्वेन्सीजचा वापर केलेला असतो. त्यामुळे आपल्या अद्ययावत हेडफोन्स- मोबाइलमधून ही गाणी अतिशय सुस्पष्ट आणि चांगल्या दर्जात ऐकू येतात, यालाच ‘हाय-फाय’ किंवा ‘हाय फिडेलिटी’ गाणी म्हणतात. याउलट ‘लो-फाय’ अर्थात ‘लो फिडेलिटी’ संगीतामध्ये कमी फ्रिक्वेन्सीचे आवाज असतात. एरवी गाणी रेकॉर्ड करताना गाण्याव्यतिरिक्त इतर आवाज येऊ नयेत याची जशी बारकाईने काळजी घेतली जाते तशी यात घेतली जात नाही, आणि यामुळेच या संगीतात वेगळेपणा येतो.

सध्या अनेकांना काम करताना, अभ्यास करताना, लाँग ड्राइव्हवर असताना लो- फाय गाणी ऐकण्याची आवड निर्माण झाली आहे. ही गाणी ऐकताना खूप रिलॅक्स, निवांत ‘चिल’ वाटत असल्याचा अनुभव अनेक जण व्यक्त करतात. लो-फाय संगीताच्या आपल्या अनुभवाबद्दल बोलताना संगीतकार आदित्य बेडेकर सांगतात, ‘‘लो-फाय संगीत ऐकणं हा ऐकणाऱ्याला स्वत:त मग्न व्हायला लावणारा अनुभव आहे. अनेक जुन्या-नवीन हिंदी गाण्यांचेदेखील लो-फाय व्हर्जन्स आलेले आहेत, हे रिमिक्स नसून गाण्याचा वेगळा प्रकार आहे. एखादं आवडतं जुनं गाणं लो-फाय संगीत प्रकारातून ऐकलं तर अतिशय वेगळा अनुभव येतो.’’ लो-फाय गाणी तयार करताना वेगळय़ा पद्धतीने तयार करावी लागतात, या गाण्यांचा बेस जास्त असतो, यात खालच्या पट्टीतले वाद्य वापरण्याला प्राधान्य दिले जाते. लो-फाय गाण्यात दुरून गाणे वाजत असल्यासारखा आवाज ऐकू येतो, यामध्ये आवाजाचे वेगळेपण जाणवत नाही असंही ते सांगतात. एरवीच्या गाण्यांचं रेकॉर्डिग करताना ते अचूक आणि सुस्वर असणं महत्त्वाचं असतं, तर लो-फायमध्ये सूर इकडे-तिकडे झालेले चालतात, गाणं मुद्दामच ‘रॉ’ ठेवलं जातं.

धकाधकीच्या जीवनात कानावर सतत मोठय़ा आवाजातील, खूप धांगडिधगा असलेल्या संगीताचा मारा होत असताना एखाद्या विसाव्याच्या क्षणी ऐकलेलं लो-फाय गाणं मनाला शांतता देतं. शिवाय ही गाणी अगदी हळू चाल असलेली, शांत स्वरूपाची असली तरी त्याने मुळीच झोप येत नाही. अनेकांना काम करताना रेडिओवर जुनी गाणी ऐकण्याची सवय असते किंवा पावसाच्या आवाजासोबत सुंदर हिंदी-मराठी गाणी ऐकण्याचा आनंदच वेगळा असतो. लो-फाय गाणी ऐकताना असाच काहीसा अनुभव येतो. गंमत म्हणजे लो-फाय हा संगीतप्रकार लोकप्रिय होण्यापूर्वी याच कारणासाठी कुण्या संगीतकाराला तुझं गाणं चांगलं नाही- लो-फाय वाटतं आहे असं सांगून हाकललं जाई.

हा प्रकार लोकप्रिय कसा झाला? 

‘लो फिडेलिटी’चा सरळ अर्थ ‘लो क्वॉलिटी’ असा घेतला जाई, पण पाश्चात्त्य संगीतामध्ये १९५० च्या दशकात आपल्याकडे आहे त्या सामग्रीमध्ये अनेक प्रयोग करून पाहिले जाऊ लागले. त्यातूनच गाण्यात रेकॉर्ड होणारे नको ते आवाज, खरखर किंवा पूर्वी टेपरेकॉर्ड खराब झाल्यावर येतो तसा आवाज गाण्यांमध्ये परत आला. ऐंशीच्या दशकात पाश्चात्त्य संगीतातील हिप-हॉपच्या वाढत्या  लोकप्रियतेबरोबर लो-फायला एक वेगळा संगीतप्रकार म्हणून मान्यता मिळाली, याची मुळे पूर्वीच्या जॅझ, रॉक, हिप-हॉप संगीतात मिळतात.

सतत काही तरी नवं हवं असण्याऱ्या मनुष्यस्वभावाला संगीत तरी कसे अपवाद ठरेल? त्यामुळे संगीतातदेखील एखादा संगीतप्रकार अतिशय लोकप्रिय होण्याची लाट येते. पूर्वीसारखे धांगडिधगा असलेले ढिंच्यॅक संगीत ऐकण्यापेक्षा लोक हल्ली शांतता देणारं अनप्लग्ड, स्लो संगीत ऐकू लागले आहेत. मग या स्लो आणि रिव्हर्ब, अनप्लग्ड संगीतात आणि लो-फायमध्ये नेमका फरक तरी काय? या प्रश्नाचं उत्तर देताना कॉर्पोरेट क्षेत्रातील आघाडीचे गायक आणि संगीतकार वरुण  बिडये सांगतात, ‘अनप्लग्ड म्युझिक म्हणजे ज्यात वाद्य आणि गायक यांच्यात कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर न करता, पारंपरिक पद्धतीने आवाजावर कमीत कमी प्रक्रिया करून ते रेकॉर्ड केलं जातं. भारतीय शास्त्रीय संगीत हे याचं उत्तम उदाहरण आहे’.  स्लो आणि रिव्हर्ब हा रिमिक्सचा प्रकार म्हणता येईल, असं ते म्हणतात. या प्रकारामध्ये ओरिजिनल गाणी कमी असतात. यात एखादा संगीतकार किंवा डीजे हे गाणं डिजिटल ऑडिओ वर्कस्टेशनच्या मदतीने अतिशय स्लो करतो आणि त्यात अशा प्रकारे बदल करतो की ऐकणाऱ्याला एखाद्या मोठय़ा हॉलमध्ये बसून गाणी ऐकल्याचा अनुभव घेता येईल. यात आणि लो-फायमध्ये मुख्य फरक हा की, लो-फाय गाणी ही मुळात कमी फ्रिक्वेन्सीने आणि स्लो रेकॉर्ड केली जातात, तर स्लो आणि रिव्हर्ब प्रकारामध्ये हे संगणकीय प्रणालीच्या मदतीने केलं जातं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भारतात लो-फाय हा प्रकार येणं ही खूप छान गोष्ट आहे असं संगीत क्षेत्रातल्या अनेकांना वाटतं. नव्याने संगीत क्षेत्रात आलेल्या तसेच संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग करायला आवडतं अशा सगळय़ांनी या संगीतप्रकारामध्ये नक्की काही तरी करावं, असं आवाहनही संगीतकार वरुण बिडये यांनी केलं आहे. तुम्ही ऐकलं आहे कधी असं लो-फाय गाणं? तुम्हाला आवडलं का? ऐकलं नसल्यास एका वेगळय़ाच अनुभवासाठी नक्की ऐकून बघा!

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cool song youtube songs app songs playlist looks movies recorded technology ysh
First published on: 22-04-2022 at 00:02 IST