|| तन्मय गायकवाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीईंग डिजिटल

करोना काळात सर्वतोपरी काळजी घेऊन न्यू नॉर्मल वागण्याचं तंत्र आपल्या सगळ्यांना सरावाचं झालं आहे. गेल्या दोन वर्षात आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले असले तरी मुख्यत: डिजिटल तंत्रज्ञानाचा खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनशैलीवर पडला आहे. शिक्षण, कार्यालयीन काम, बँकेचे व्यवहार, रोजच्या भाजीपाला खरेदीपासून गुगल पे वा तत्सम अ‍ॅपवरून होणारे सगळे व्यवहार, फिटनेस, फॅशन, मनोरंजन ते औषधं किंवा लस धुंडाळण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहे. नव्या वर्षात डिजिटल जीवनशैलीचा हा फंडा अधिकच बळकट होत जाणार आहे.

टेक्नॉलॉजीत सातत्याने होत जाणारे बदल आपलं आयुष्य कायमच ढवळून काढत आले आहेत. करोनामुळे गेल्या दीड वर्षात या टेक्नॉलॉजीला डिजिटलचं सुकाणू जोडलं गेलं. आभास हा… असं म्हणावं तर ही आभासी ओळखच आपली नवी ओळख ठरू पाहते आहे. पूर्वी फक्त गंमत म्हणून पाहिली जाणारी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीची टेक्नॉलॉजी आता या नव्या डिजिटल पर्वात आयुष्याचा अविभाज्य भाग बनू पाहते आहे. क्रिप्टो करन्सीपासून ते मेटाव्हर्सपर्यंत वेगाने विकसित होत चाललेल्या संकल्पनांमुळे आत्तापर्यंत अनुभवलेल्या भौतिक जगापेक्षा एका वेगळ्याच आभासी जगात आपलाच आपल्याला नवा अवतार बघायला मिळणार आहे…

डिजिटल पैसे ही संकल्पना याच काळात जास्त ट्रेण्डमध्ये आली. ‘क्रिप्टो करन्सी’ ही या ट्रेण्डमधली सगळ्यात जास्त गाजलेली करन्सी होती. खरं तर ही करन्सी आधीपासूनच अस्तित्वात होती, फक्त करोनाच्या काळात ती जास्त प्रसिद्ध झाली. कदाचित लोकांकडे असलेला मोकळा वेळ याला कारणीभूत ठरला असावा. याचा अभ्यास करून लोकांनी यात गुंतवणूक करायला सुरुवात केली. ‘डॉज कॉइन’ची सुरुवात याच काळात झाली. निव्वळ एक मिम म्हणून सुरू झालेल्या या कॉइनला भरपूर भाव आला. उद्योगपती आणि ‘टेस्ला’चे सर्वेसर्वा एलॉन मस्कच्या एका ट्वीटमुळे या कॉइनला अधिकच प्रसिद्धी मिळाली. बघता बघता भारतीय तरुण या डिजिटल पैशांकडे वळू लागले आहेत. यातली गुंतवणूक खूप महाग असल्यामुळे तरुणाई याचा अभ्यास करून, समजून घेऊन मग गुंतवणूक करताना दिसते आहे.

‘एनएफटी’(नॉन फंजीबल टोकन) नुकतीच आलेली ही संकल्पना भारतात अनेकांना फारशी माहिती नाही आहे. डिजिटल स्वरूपात आर्ट जपण्याचे हे एक तंत्रज्ञान आहे. त्यात तांत्रिकदृष्ट्या काहीही डिजिटल असू शकते, ज्यामध्ये रेखाचित्रे, अ‍ॅनिमेटेड जीआयएफ, गाणी किंवा व्हिडीओ गेममधील घटक समाविष्ट आहेत. ‘एनएफटी’ तुम्हाला युनिक डिजिटल वस्तूंची मालकी, खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या मालकी स्वरूपात असलेल्या कलात्मक ऐवजाचा ट्रॅक ठेवता येतो. वास्तव आयुष्यात कोणी एकाने साकारलेलं अमूल्य र पेटिंग किंवा अशा एखाद्या पेटिंग, दुर्मीळ छायाचित्राची प्रत अशा कोणत्याही स्वरूपातील कलात्मक गोष्टींची एनएफटी करता येते. ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे त्या फाइलची मालकी कोणाकडे आहे याचा ट्रॅक ठेवते.

आभासी नेटवर्कच्या जगात आणखी एकाची भर पडली आहे. ‘मेटाव्हर्स’ हा नावाप्रमाणे आभासी जगात वावरायची संधी देणारा, पण प्रत्यक्षात असलेल्या व्यक्तीशी वा व्यवहाराशी आपल्याला जोडून देणारा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या नानाविध तंत्रज्ञानाचा वापर हे एक आभासी जग निर्माण करण्यासाठी एकवटलं आहे. फेसबुकचा नेक्स्टजेन अवतार असलेल्या या प्लॅटफॉर्मवर फेसबुकप्रमाणेच आपण आपल्या आभासी ओळखीद्वारे डिजिटल जगात प्रवेश करू शकतो. इथे नवे मित्रमैत्रिणी करता येतील. तुम्ही त्यांच्यापासून शेकडो मैल दूर असलात तरी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर वा त्यांच्या घरात बसून गप्पा मारल्याचा अनुभव तुम्हाला इथे घेता येईल. तुमच्या आवडीच्या ठिकाणची भ्रमंती, एखाद्या जिवलगाची आठवण आल्यास त्याची लगोलग भेट घेणं इथपासून तुमच्या आवडीच्या खरेदीपर्यंत सगळ्याचा अनुभव तुम्हाला मेटाव्हर्सच्या माध्यमातून घेता येणार आहे. वास्तव आणि आभास यांच्यातील अंतर पुसून टाकत वेगळ्या अर्थाने जग जवळ आणणारं किंवा आपल्याला त्याच्याशी जोडून घेणारं हे नवं तंत्रज्ञान आपल्याला अंतर्बाह्य बदलून टाकणारं ठरणार आहे.

या करोनाकाळातच केजी ते पीजी सगळ्याच वर्गातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची ओळख झाली. पीपीटी स्वरूपात डिजिटली प्रोजेक्टरवर शिक्षण याआधीही दिलं जात होतं, पण करोनाने त्याला अजून अपग्रेड केलं. बघता बघता नोट्सची जागा डिजिटल नोट्सने घेतली. आता मुलांना परीक्षाही ऑनलाइनच द्यायची असल्याने मुलांचं लिखाण बंद झालं. सगळंच ऑनलाइन आहे म्हटल्यावर कॉलेज, शाळेने यात टेक्नॉलॉजीचा वापर करत डिजिटली प्रयोग केले. एखाद्या विषयाला व्हिडीओरूपी, थ्रीडी प्रतिमा स्वरूपात शिकवायला सुरुवात केली. यामुळे अनेकांना अवघड विषय समजायला मदत झाली. मुलांच्या असाइनमेंट्सही डिजिटल झाल्या. इंटर्नशिप करणं शक्य नसल्याने कंपन्यांनी मुलांना डिजिटल ट्र्रेंनगही दिलं. याखेरीज पदवी वितरण सोहळ्यातही टेक्नॉलॉजीचा वापर झाला. मुलांना ऑनलाइन कार्यक्रमातच डिग्री देताना त्यांच्या या खास क्षणाची आठवण जपता यावी म्हणून सिस्टीम तयार करत काळा कोट आणि टोपी घातलेले फोटो, व्हिडीओ काढण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं. मुलांना कॉलेजमध्येही येणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना जोडून घेण्यासाठी कॉलेजेसही टेकसॅव्ही झाले. अशा प्रकारे अनेक गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजीचे अनेक प्रयोग गेल्या दीड वर्षात झाले. यातल्या बऱ्याच गोष्टी अजून काही काळ ट्रेण्डमध्ये राहणार आहेत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत एकच ट्रेण्ड बराच काळ राहत नाही. सातत्याने होणाऱ्या अपग्रेडेशनमुळे नवनवीन संकल्पना सतत बदल घेऊन येतच असतात. फक्त या संकल्पनांची भरारी आपल्या आयुष्यात काय काय कमाल करते आहे हे अनुभवणंही थरारकच आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection virtual take off new normal mechanism bank transactions akp
First published on: 07-01-2022 at 01:09 IST