– अश्विनी खांडेकर
‘चल चहा प्यायला जायचं का?’ आजकाल ऑफिसमध्ये हे वाक्य खूपदा ऐकायला येतं. ‘स्ट्रेस आलाय? चल चहा पिऊया’. ‘काहीतरी बोलायचं आहे? फिरायला जायचं आहे? आधी चहा पिऊया…’
नाही म्हटलं तरी कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये चहा आणि कॉफीने एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. भले आपलं त्याकडे फारसं लक्ष जात असेल वा नसेल… पण हा चहा किंवा कॉफीचा एक कप फार महत्त्वाचा असतो, कारण त्या कपाबरोबरच संवाद घडतात. कधी कधी चाय पे चर्चा म्हणत झालेले हे संवाद जास्त लक्षात राहतात किंवा जास्त उपयोगी पडतात, कारण ते थेट अनुभवातून आलेले असतात.
काही संवाद मीटिंग रूममध्ये होतात. काही वन-ऑन-वन होतात. काही ई-मेल्स आणि चॅटवर होतात. पण, काही अतिशय महत्त्वाच्या विषयांवर कॉरिडॉरमध्ये किंवा चहा पिताना, एकत्र जेवताना चर्चा होतात. ऑफिसमध्ये कोणाचातरी वाढदिवस साजरा करताना किंवा कामाची वेळ संपल्यावर निघता निघता मारलेल्या निवांत गप्पांमध्ये अनेकदा काही महत्त्वाच्या विषयांची देवाणघेवाण होते. गंमत म्हणजे अनेकदा हेच संवाद टीमला एकमेकांच्या अधिक जवळ आणतात.
प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक मीटिंगमध्ये उत्तम बोलून लोकांचं मन जिंकतात. काहीजण वन-ऑन-वनमध्ये मोकळेपणाने बोलतात. तर काही लोक अनौपचारिक गप्पांमध्येही खूप छान काही विचार मांडून जातात. म्हणून फक्त मीटिंगमधील एखाद्याचा सहभाग आणि तिथे बोलण्याचं कौशल्य पाहून त्या व्यक्तीचं मूल्यमापन करणं योग्य ठरत नाही. कुठल्याही क्षेत्रात काम करताना फक्त मीटिंग रूममध्येच टीम घडवल्या जातात असं नाही. ऑफिसच्या बाहेर एकत्र येण्यातून कधीतरी जेवण्यासाठी किंवा चहाच्या वेळेत एकत्र येणं, कोणाचे खास क्षण साजरे करणं, कधी कधी अतिशय कठीण अशा दिवसानंतर मन मोकळं करणं या सगळ्यातून एकमेकांबरोबरचं बॉन्डिंग वाढतं.
आजच्या कॉर्पोरेट जगात आपण टीम बिल्डिंगबद्दल खूप बोलतो. वर्कशॉप्स, ऑफसाइट्स, स्ट्रॅटेजी सेशन्स, टीम एंगेजमेंट उपक्रम यावर वेळ आणि पैसा खर्च करतो, पण हेल्दी टीम घडवण्यासाठी नेमक्या काय गोष्टी गरजेच्या आहेत, याचा आपण क्वचितच विचार करतो. माझा अनुभव सांगतो, हेल्दी टीम घडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे एकमेकांवरचा विश्वास आणि त्यासाठी हे रोजच्या रोज होणारे छोटे-छोटे संवाद, गप्पा फार उपयोगी ठरतात. याच संदर्भाने ऑफिसमधील केबिन संस्कृतीचा विचार करणंही महत्त्वाचं वाटतं. केबिन म्हणजे फक्त चार भिंती नव्हेत. कधी कधी ही केबिन एक अदृश्य भिंत तयार करते. पदाची भिंत, दुराव्याची भिंत, ‘आत जाऊ का?’ या संकोचाची भिंत… या भिंतींमुळे अनेकदा मनमोकळा संवाद होत नाही, मनातलं काही व्यक्त केलं जात नाही. मग ही केबिन संस्कृतीच चुकीची आहे का? तर तसंही नाही. अनेकदा एकांतही खूप गरजेचा असतो. काही कामांसाठी संपूर्ण एकाग्रता आवश्यक असते. काही चर्चा गोपनीय असतात. काही निर्णय शांतपणे विचार करून घ्यावे लागतात, त्यामुळे केबिनची गरज नेहमीच भासणार आहे. पण, हेही तितकंच खरं की टीम लीड करणार्या व्यक्तीभोवतीच जर खूप भिंती असतील तर संवादाचं प्रमाण हे कमीच असतं. अनेकदा लोक प्रश्न विचारण्यापूर्वी दोन-दोनदा विचार करतात. आणि मग भीतीने किंवा संकोचाने मनातल्या गोष्टी, शंका मनातच राहतात. एखादी समस्या मोठी होईपर्यंत ती समोर येतच नाही. म्हणूनच आज अनेक संस्थांमध्ये फ्लॅट संस्कृती किंवा ओपन ऑफिसची संकल्पना लोकप्रिय होते आहे. त्यामागे फक्त जागेची बचत हा उद्देश नाही, तर संवाद अधिक सुलभ व्हावा हा विचार असतो.
एकाच जागी जेव्हा काम करण्यासाठी लोक एकत्र बसतात, तेव्हा त्यांच्यातलं अंतर गळून पडतं आणि आपोआपच संवादाला वाट सापडते. मग एखादी नवीन कल्पना सुचवण्यासाठी मीटिंगची गरज लागत नाही, एखाद्या समस्येवर लगेच चर्चा होते. लोक एकमेकांना अधिक जवळून ओळखू लागतात. आणि जिथे ओळख वाढते, तिथे विश्वास वाढतो. हेल्दी टीम तयार करण्यासाठी समोरच्यांकडे फक्त कर्मचारी म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही पाहणं आवश्यक असतं. प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात झोकून देऊन काम करत असते, पण त्या पलिकडेही त्यांचं एक आयुष्य असतं, कुटुंब असतं, आव्हानं असतात, स्वप्नं असतात, चिंता असतात, हे लक्षात घ्यायला हवं.
अनेकदा आपण ङढक, ळं१ॠी३ आणि ढी१ऋः१ेंल्लूी फी५्री६ मध्ये इतके गुंतून जातो की आपल्याबरोबरच्या माणसांच भानही आपल्याला राहात नाही. पण, माणसं कितीही कामात गुंतलेली असली तरी ती संस्थेशी कमी आणि तिथल्या माणसांशी जास्त जोडलेली असतात हे वास्तव आहे. आणि म्हणूनच अनौपचारिक संवाद होणं गरजेचं आहे. प्रत्येक चर्चा मीटिंगमध्ये होऊ शकत नाही. काही अवघड गुंते चहाच्या कपाबरोबर होणार्या चर्चांमध्ये सुटत जातात. काही कल्पना या लंच टेबलवर जन्माला येतात, तर नेमकी काय समस्या आहे हे कॉरिडॉरमध्ये झालेल्या अगदी पाच मिनिटांच्या संभाषणातही चटकन लक्षात येतं. या संदर्भातली एक गमतीशीर थिअरीही आहे. ‘द वॉटर कूलर इफेक्ट’ म्हणून ओळखल्या जाणार्या या थिअरीनुसार काही संशोधकांनी केलेल्या निरीक्षणातून असं लक्षात आलं की ऑफिसमधली किंवा एखाद्या संस्थेमधली सर्वात महत्त्वाची माहिती किंवा कल्पना ही औपचारिक बैठकांपेक्षा अशा अनौपचारिक गप्पांमधून हाती लागते. कॉफी मशीनजवळ, कॅफेटेरिया किंवा वॉटर कूलरजवळ, अगदी चहाच्या टेबलवर घडणारे संवादही अनेकदा नव्या कल्पनांना जन्म देतात, असं ही मॅनेजमेंट थिअरी सांगते.
नवीन कल्पना किंवा नवा शोध फक्त एकत्र बसून काम केलं म्हणजे लागतो असं नाही. काही अनपेक्षितपणे झालेल्या भेटीतूनही एखादी नवी कल्पना हाती लागते. एका टीमच्या समस्येवर दुसर्या टीमकडे उपाय सापडतो. एखादा विषय मीटिंगमध्ये मांडायचा राहून जातो, पण सहज गप्पा मारताना लक्षात येतो. त्यामुळे जगभरातील काही नावाजलेल्या कंपन्यांनी अनौपचारिक भेटी घडतील, सहज संवाद होऊ शकेल अशा जागा आणि शक्यता निर्माण केल्या आहेत. कारण, काही संवाद हे नियोजनाने घडत नाहीत, तर ते सहजपणे होतात हे त्यांना पुरेपूर माहिती आहे. चहा, लंच किंवा छोटे सेलिब्रेशन हे वेळेचा अपव्यय आहेत असं मला वाटत नाही. उलट हे क्षण टीममधील नाती अधिक मजबूत करत असतात. अनेकदा लोकांना संस्थेपेक्षा तिथली माणसं आठवतात. त्यांच्याबरोबर एकत्र घालवलेला वेळ आठवतो. त्यांच्याकडून अनुभवलेला आपलेपणा आठवतो.
आज हायब्रिड आणि डिजिटल कामकाजाच्या जगात ही गरज आणखी वाढली आहे. आपण दिवसभर ऑनलाइन जोडलेले असतो, पण अनेकदा भावनिकदृष्ट्या दूर असतो. कॅलेंडर मीटिंग्स, मेसेजेस, अपडेट्स वाढले, पण खरा संवाद कमी झाला आहे. माहितीची देवाणघेवाण होते, नात्यांची नाही. त्यामुळे मी माझ्या टीमबरोबर मनमोकळ्या गप्पा कधी मारल्या होत्या, कामाव्यतिरिक्त त्यांच्याशी संवाद साधला होता का? हा प्रश्न टीम लीडरने स्वत:ला विचारायला हवेत.
हेल्दी टीमसाठी नेहमी मोठमोठे उपक्रमच हवेत असं नाही, कधी कधी दहा मिनिटं चहा घेत मारलेल्या गप्पा, एकत्र केलेलं जेवण किंवा पाच मिनिटांच्या गप्पाही पुरेशा असतात. कारण, असं घट्ट बॉन्डिंग असलेली टीम फक्त एकत्र काम करत नाही, तर ती एकमेकांना घेऊन पुढे जात राहते.
viva@expressindia.com
