गायत्री हसबनीस viva@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरबसल्या हास्याचे खाद्य देणाऱ्या मीम्सची बाराखडी तिसरी लाट, ओमायक्रॉन, डोलो ६५०, टेलिप्रॉम्प्टर ते अगदी ममता दीदी, अरिवद केजरीवाल अशा नानाविध विषयांचा वेध घेत सुरू झाल्याने नववर्षांचा प्रारंभच हास्यरसाने झाला आहे. राजकारण, समाजकारण तापलेले असताना तरुण मीमकरांनी या विषयांना हास्याची फोडणी दिली आणि बघता बघता डेल्टा की ओमायक्रॉन, ऑनलाइन की ऑफलाइन, वर्क फ्रॉम होम की प्रत्यक्ष कार्यालय अशा दुविधेत सापडलेल्या तरुण मनांना दिलासा मिळाला..

गेल्या वर्षी मीम्सनी लोकांना तुफान हसवले. यंदाही दररोज काही ना काही करोना, ओमायक्रॉनसंबंधित बातम्या, त्याचे परिणाम म्हणून शिक्षण क्षेत्रापासून राजकारण ते बॉलीवूडपर्यंत सगळय़ाच क्षेत्रांत घडणारे बदल, निवडणुकांचा धुरळा आणि त्यावरून राजकारण्यांमध्ये सुरू असलेले डावपेच या सगळय़ाचा भार घेण्यापेक्षा त्याची खिल्ली उडवत ताण हलका करण्याचा प्रयत्न तरुणाईकडून सुरू आहे. मीम्स हे त्यासाठी प्रभावी माध्यम ठरले असून गेल्या महिन्याभरात डोलो ६५० खाऊन खाऊन कंटाळलेल्या तरुणाईने डझनावारी मीम्सच्या माध्यमातून आपल्या ताणाला विनोदी वाट करून दिली आहे..

२०२२ हे वर्ष सुरू झालं आहे यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. गेली दोन वर्ष करोनाच्या विळख्यातच सगळय़ांनी काढली असल्याने वर्षांमागून वर्ष सरत चालली आहेत याचा पत्ताच लागत नाही आहे. वाऱ्याच्या वेगाने गेलेला हा काळ कधी पसार झाला याचा हिशोब कुठे लागत नाही तोच २०२२ आले? २०२० गेले, २०२१ गेले आणि चक्क २०२२ आले?.. कधी?.. कसे? या प्रश्नांमागे चेहऱ्यावरच्या आश्चर्याच्या खुणा मीमकरांनी हेरल्या आणि नववर्षांची सुरुवातच त्यावर तयार केलेल्या मीम्सने झाली.

या मीम्सनी जरी नववर्षांची सुरुवात हसत-हसवत केली असली तरी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच घटनाचक्र वेगात फिरू लागले होते. ओमायक्रॉनचा शिरकाव झाला होता आणि डेल्टा जास्त गंभीर की ओमायक्रॉन, अशी चाचपणीही सुरू झाली होती. एकीकडे करोना रुग्णांची वाढती संख्या तर दुसरीकडे शाळा, कॉलेज, लग्नसमारंभ, सगळीकडे अंमळ जास्त उत्साहाने वावरणारी मंडळी यामुळे तिसरी लाट नेमकी कुठली? करोनाची?.. की ओमायक्रॉनची? की राजकारणाची? की बॉलीवूडची? की अशी कुठली लाट नसून हा कल्पनांचा इमला आहे, अशा नाना तऱ्हेच्या भावना जनमानसात उमटल्या. त्यामुळे ही न दिसणारी तिसरी लाट आहे, असा अंदाज वर्तवल्यावर बॉलीवूड सिनेमांची डायलॉगबाजी मीम्सच्या पटलावर फिरायला लागली. त्यातील न घाबरलेल्या, लस घेतलेल्यांच्या तिसऱ्या लाटेवरील भावना, प्रतिक्रिया मीम्समधून उमटायला लागल्या. ‘सन्डे को नहा धो के आना’, ‘तो अब में क्यां करू मर जाऊ’, ‘इस बार कितने दिन का प्रोग्रॅम है’, ‘अख्खा पब्लिक को मालूम हैं कोई नहीं आने वाला हैं’ अशा तऱ्हेच्या संवादांची पेरणी करून रंगवलेले मीम्स लोकांसमोर आले.

त्यातच ओमायक्रॉन हा तर न्यू ईयर पार्टी, परीक्षा, शाळा, महाविद्यालये आणि नववर्षांच्या संकल्पनांवर पाणी फिरवणार हे स्पष्ट झाल्यानंतर हा सगळा त्रागा मीम्समधून व्यवस्थित उमटला. मीम्ससाठी करोनाचे नवीन अपत्य ओमायक्रॉन हे अगदी केंद्रिबदू झाले होते. या नव्या व्हेरिएंटचे रूप नक्कीच आधीच्या व्हेरिएंटपेक्षा घातक असल्याने त्याचा चेहरामोहराही मीम्समधून जितका भयानक, विद्रूप दाखवता येईल तितका दाखवला जात होता. त्यावरही हास्यास्पद रचना केल्या गेल्या. गॉडझिला, भूतप्रेत, पिशाच, पिसाळलेला कुत्रा अशी नानाविध रूपं त्या बिचाऱ्या ओमायक्रोनला दिली गेली. व्यंगचित्रकारांनाही ओमायक्रॉन व्यंगात्मक पद्धतीने साकारण्याचा मोह आवरला नाही. त्यातून डेल्टाक्रॉन आल्याने तर अजूनच मीम्सना खतपाणी मिळाले. डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संयागोने डेल्टाक्रॉन तयार झाला आहे, त्यामुळे डेल्टाक्रॉन कसा तयार होऊ शकतो याचे मार्मिक चित्रण करताना डेल्टा आणि ओमायक्रॉनची रूपे अशी निवडली की तयार होणारा डेल्टाक्रॉन हा अधिकच विचित्र दिसून हसू यावं. थंडीच्या निमित्ताने मनालीमध्ये करोना- ओमायक्रॉनच्या केसेस वाढल्याने तिथे फिरायला गेलेल्या उत्साही लोकांना टार्गेट करून मनालीमध्ये ओमायक्रॉनने धुमाकूळ घातला असताना कशा प्रकारे लोक तिथे ‘मजा’ करतायेत याचीही खिल्ली मीम्सच्या माध्यमातून उडवली गेली. 

या वर्षी सगळय़ात जास्त मीम कुठला व्हायरल झाला असेल तर तो ‘डोलो ६५०’ चा. सलमानचा ‘राधे’ हा सिनेमा आला तेव्हा ज्या प्रकारे मीम्स व्हायरल झाले त्याहीपेक्षा जास्त डोलो ६५० वरील मीम्स व्हायरल झाले. पॅरासिटॅमॉल डोलो ६५० चा खप भारतात तुफान वाढल्याने आणि सगळेच डोलो ६५० घेत असल्याने भारतीय नागरिक डोलो ६५० ला संरक्षण कवच मानत आहेत आणि त्या गोळीला इतक्या वेगाने सगळय़ांना ताप, डोकेदुखीवर औषध म्हणून घ्यायला सांगतायत की डोलो ६५०चं नाव कुणाच्या तोंडी नसेल तरच नवल. भारतीयांसाठी डोलो ६५० म्हणजेच फाय प्रॉब्लेम्स वन सोल्यूशन म्हणत मीमधारकांनी पुन्हा खिल्ली उडवायला सुरुवात केली. याचा प्रसार इतका झाला की सिनेमातील सुपरहिरोंनाही डोलो ६५० ची उपमा देत मीम्सवर त्यांचे फोटो पसरू लागले. ‘डोलो’ या एका शब्दावरूनही लोकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणादरम्यान टेलिप्रॉम्प्टर मध्येच बिघडल्याने त्यावरही मीम्स फिरू लागले. त्यात पत्रकारांच्या प्रतिक्रिया, विरोधकांच्या आणि समर्थकांच्या प्रतिक्रियांना एकत्र करून विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला.

या सर्व मीम्समध्ये लोकप्रिय झालेल्या चेहऱ्यांमध्ये कलाकार होते तसेच सामान्य नागरिकही होते. तरीही एस.टी संपावरून सदावर्ते, आपल्या प्रायव्हसीवर बोलणारी अनुष्का शर्मा, शाप देण्याची धमकी देत सुनेची पाठराखण करणाऱ्या जया बच्चन, मंत्री अरिवद केजरीवाल, निवडणुकांच्या रणधुमाळीतील ममता दीदी, मंत्री योगी आदित्यनाथ इत्यादी मोठे चेहरेही या मीम्सपासून वाचले नाहीत. चित्रपटांच्या प्रमोशनच्या अर्थाने तरी मीम्सकडे सकारात्मक पद्धतीने पाहणारे कलाकारही ‘आरआरआर’ या दाक्षिणात्त्य चित्रपटावरील ‘नाचो नाचो’ या गाण्याचे मीम्स तसेच स्पायडर मॅनवरील मीम्सही एन्जॉय करत होते. एकीकडे ‘विकॅट’च्या लग्नावरूनही मीम्सचा आनंद घेणारी मंडळी आयपीएल आणि स्टॉक मार्केटवरील उतारचढावावरही मीम्स करण्यात व्यग्र झालेली पाहायला मिळाली. ज्यांना सामाजिक, राजकीय विनोदबुद्धी आहे त्या तरुणाईला अशा मीम्सच्या माध्यमातून हास्याचे फटकारे मारण्यासाठी वाव मिळाला आहे यात काहीच शंका नाही.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 third wave dolo 650 and teleprompter zws
First published on: 28-01-2022 at 01:56 IST