ओढ शास्त्रीय नृत्याची

गेल्या आठवडय़ात २९ एप्रिल हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस’ या नामे जगभर साजरा केला गेला.

मितेश रतिश जोशी
गेल्या आठवडय़ात २९ एप्रिल हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस’ या नामे जगभर साजरा केला गेला. गेली काही र्वष बॉलीवूड, हिप हॉपकडे तरुण सहजतेने वळताना दिसतात. शास्त्रीय नृत्य म्हटलं की मात्र नृत्यांगनांचं चित्र पहिल्यांदा नजरेसमोर येतं. आजही शास्त्रीय नृत्याचा करिअर म्हणून विचार करणाऱ्या पुरुष कलाकारांना घरापासून समाजापर्यंत अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे..

कथक असो वा भरतनाटय़म.. शास्त्रीय नृत्यप्रकारात नैपुण्य मिळवून त्याचा पूर्णवेळ करिअर म्हणून विचार करणाऱ्या किंवा शास्त्रीय नृत्याची आवड जोपासत त्याच्या अभ्यासासाठी स्वत:ला झोकून देणाऱ्या तरुण नर्तकांची संख्या आजही तुलनेने कमी आहे. शास्त्रीय नृत्य आणि नृत्यांगना असं समीकरण सगळय़ांनाच परिचयाचं असतं, पण पुरुष नर्तक म्हटलं की अजूनही भुवया उंचावल्या जातात. पंडित बिरजू महाराज हे या क्षेत्रातलं मोठं नाव. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणं म्हणजे बॉलीवूडमधील कलाकारांसाठीही सन्मानाची गोष्ट. त्यांचं परफेक्शन, हावभाव, शब्दांची समज, पदलालित्य हे सगळंच अलौकिक होतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक तरुण या क्षेत्राकडे वळले; पण त्यापैकी काहींनीच करिअर म्हणून त्याची निवड केली. नकुल घाणेकर, आशीष पाटील, मयूर वैद्य ही सारी शास्त्रीय नृत्यात नावाजलेली तरुण मंडळी होय. वेगवेगळय़ा क्षेत्रांत पदवीधर असले तरी नृत्यविषयक त्यांची आवड, निष्ठा त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणूनच आपापली नोकरी, क्षेत्रं बाजूला ठेवून त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ शास्त्रीय नृत्यासाठी दिला.
शास्त्रीय नृत्यात यशस्वी ठरलेल्या या तरुण नर्तकांची उदाहरणं समोर असतानाही पुरुषांना या क्षेत्राकडे वळणं एवढं कठीण का जात असावं? कला ही आनंदाचं आदानप्रदान करण्याचा सेतू आहे. असं असताना तिला जेंडरच्या चौकटीत का अडकवलं जातं, या प्रश्नाचा आपापल्या परीने शोध घेत तरुणांना शास्त्रीय नृत्याकडे वळवण्याचा प्रयत्न पुण्यातील गिरीश संध्या मनोहर यांच्यासारखे तरुण करत आहेत. गिरीशने स्वत: पुढाकार घेऊन तरुणांना कथक नृत्य प्रशिक्षण देणारी ‘नादयोगी कथक अकॅडमी’ सुरू केली आहे. ‘कथककडे मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन हा शुद्ध असतो, पण पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा जरा वेगळा असतो,’ असं गिरीश म्हणतो. कुठलीही कला शिकण्यासाठी सर्वात आधी घरातूनच मुलांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे. आणि ते प्रोत्साहन मुलांची आवड जपणारं असायला हवं, पालकांची आवड जपणारं नको. पण तेच नेमकं होताना दिसत नाही. त्यातही शास्त्रीय नृत्य तर नकोच नको. कारण बॉलीवूड डान्ससारखे ते सोपे नाही आणि बॉलीवूड डान्स शिकून दोन-चार टीव्ही शोमध्ये आपण झळकलो तर किमान सेलिब्रिटी होऊच हा फाजील आत्मविश्वास पालकांकडूनच मुलांना मिळालेला असतो. त्यामुळे (त्यांच्या मते प्रचंड) अवघड असणारं शास्त्रीय नृत्य उगीच कोण शिकणार? हा अविश्वास सर्वप्रथम पालकांनी मनातून काढायला हवा, असं तो सांगतो.
लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाकडून कथकचे धडे गिरवून घेत असताना अनेक विचित्र अनुभव येतात, असं तो म्हणतो. ‘नर्तक म्हणून वावरताना मी नर्तकाचा पेहराव, डोळय़ात काजळ, कपाळावर मोठं गंध लावून आपली कला सादर करतो. तर खासगी आयुष्यात मित्रांबरोबर मी याच्या पूर्णपणे उलट वावरत असतो. मग एखादवेळी जिममधला शर्टलेस फोटो जरी समाजमाध्यमांवर टाकला तरी लोकांच्या भुवया उंचावल्या जातात. कथक नर्तक असून तू जिमपण करतोस? असे प्रश्न विचारले जातात. असाच वारंवार येणारा अनुभव म्हणजे तुम्ही काय करता? या प्रश्नावर मी कथक करतो आणि शिकवतो, असं उत्तर दिलं तरी तुम्ही अर्थार्जनासाठी काय करता, हा प्रश्न विचारला जातोच. कथक नृत्य करून मी पोट भरू शकतो, यावर विश्वास ठेवला जात नाही. अशा वेळी मी त्यांना भूतपूर्व कथक नर्तकांची उदाहरणं देतो, त्यांचं योगदान समजावून सांगतो, असा अनुभव गिरीशने सांगितला. त्याच्या अकॅडमीमध्ये दहा मुलं कथक शिकत आहेत, बाकीच्या सर्व मुली आहेत. मात्र कथक नुसते न शिकवता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यांदा गिरीश त्यांना समजावून सांगतो. तो म्हणतो, पंडित शामाताई भाटे यांनी माझ्यावर कथकचे संस्कार केले. मुलांची शरीरयष्टी व मुलींची देहबोली यात फरक असतो. कथक करताना मुलंही थोडी मुलींसारखी देहबोली करून मुद्रा करतात. हे चूक नाही, पण यात मुद्रांना व स्टेप्सना कुठेही गालबोट न लावता थोडासा पुरुषीपणा कसा कमी केला जाईल यावर मी सतत रिसर्च करत असतो व मुलांमध्ये ते बदल घडवत असतो.
मुंबईमधील सोमय्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या आदित्य गरुड या तरुणानेसुद्धा कथकची वाट निवडली. कंपनी सेक्रेटरीचा अभ्यासक्रम करत असताना महिन्याभराची सुट्टी छंद जोपासून घालवावी या विचाराने आदित्यने मयूर वैद्य यांच्याकडे एक महिन्याच्या बोलीवर कथक क्लासमध्ये प्रवेश घेतला तो कायमचाच. तो एक महिना अजून पूर्ण झालेला नाही, असं आदित्य सांगतो. आदित्यची ही वेगळी वाट त्याच्या आईवडिलांना स्वीकारायला जड गेली, कारण त्याच्या घरात तो सोडला तर कोणीही कलाकार नाही. सगळे उच्चशिक्षित, उच्चपदांवर नोकरी करणारे होते. छंद जोपासायला त्यांचा विरोध नव्हता, पण मी पूर्णवेळ व्यवसाय म्हणून ते करणार हे स्वीकारणं त्यांना कठीण जात होतं. माझं पुढे कसं होणार याची चिंता त्यांना होती, जी दूर व्हायला काही र्वष गेली, असं आदित्य सांगतो. एक पुरुष कथक नर्तक म्हणून कला जपताना अनेक आव्हानं येतात. तू कथकव्यतिरिक्त अजून काय करतोस, हा प्रश्न आदित्यलाही सातत्याने विचारला जातो. त्याविषयी आदित्य सांगतो, सुरुवातीला जेव्हा लोक हा प्रश्न विचारायचे तेव्हा मी माझं शिक्षण पूर्ण करतोय हे उत्तर असायचं. त्यामुळे लोक उत्तर ऐकून जरा थंड व्हायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर कथककडे पूर्ण वळल्यावर, सतत शो सुरू झाल्यावर लोकांचे हे प्रश्नच बंद झाले. मी मूव्हमेंट थेरपीमध्ये डिप्लोमा पूर्ण केला असून त्याचे सेशन सध्या मी घेतो आहे. कथकव्यतिरिक्त काही तरी करतो आहे. माझं कथकमध्येच नाव झाल्याने आता अजून काय करतो हे जाणून घेण्यात लोकांना रस नाही हेच खरं.. अशी खंतही तो व्यक्त करतो.
केवळ कथकच नाही तर भरतनाटय़म किंवा ओडिसी या क्षेत्रातही अधिकाधिक मुलांनी वळायला हवं. तीस विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये केवळ दोन ते तीन मुलं असतात. ही संख्या कुठे तरी बदलायला हवी. मुलगा शास्त्रीय नृत्य शिकतो या वाक्याला जरी समाजात प्रतिष्ठा नसली, तरीही माझ्या मुलाचा कथकचा शो आहे आणि त्याला अमुक अमुक सेलिब्रिटी येणार आहे या वाक्याला प्रतिष्ठा आहे. जसं शाहू महाराज सांगतात, गवताच्या काडीला नाही, पण पेंढीला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे अधिकाधिक मुलांनी शास्त्रीय नृत्याकडे वळून ही कला जिवंत ठेवायला हवी. एकी दाखवायला हवी. भले तुम्ही पूर्णवेळ वळू नका, पण एक आवड म्हणून कथक वा अन्य नृत्यप्रकार शिकायला कुठलीच लाज बाळगू नका. कोणतीही कला कुठल्या एका जेंडरपुरती कधीही मर्यादित असू शकत नाही, असं आदित्य ठामपणे सांगतो.
शास्त्रीय नृत्यप्रकार आपली जुनी परंपरा आहे आणि ती टिकणारच. नृत्यकलेचा प्रसार व प्रचार करण्याच्या हेतूने युनेस्कोच्या ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ डान्स’ या शाखेतर्फे दरवर्षी २९ एप्रिल हा ‘जागतिक नृत्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. नृत्य-गायनासारख्या कला पोटापाण्यासाठी उपयोगाच्या नाहीत असं समजण्याचे दिवस आता गेले. नृत्यात करिअर करण्यासाठी अनेकविध शाखा आता उपलब्ध आहेत. त्याचा गांभीर्याने विचार केल्यास मुलेही नृत्यात उत्तम करिअर साधू शकतात, असा विश्वास या क्षेत्रातील तरुण धुरीणांकडून व्यक्त केला जातो.
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Craving classical dance career artists bharatanatyam pandit birju maharaj bollywood kathak amy

Next Story
मन:स्पंदने: ब्रेकअप के बाद
फोटो गॅलरी