vv13नृत्यकलेचा एक नवीन आयाम सध्या अनेकांच्या लक्षात आलाय.. कॅलरी बर्निगसाठीचा. सध्या जमाना आहे फिटनेस डान्सचा. काय आहे हा फंडा? कुठले डान्स यामध्ये येतात? हे नृत्य कुणालाही करता येतं का?

प्रसिद्ध अभिनेते आणि नृत्यकलाकार नकुल घाणेकर यांनी मिरजेच्या गांधर्व महाविद्यालयातून कथक नृत्यालंकार पदवी मिळवली असून ठाण्यात ते डिफरंट स्ट्रोक्स डान्स अ‍ॅकॅडमी चालवतात. आजवर २००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी कथकबरोबरच लॅटिन बॉलरूम, सालसा, बचाटा आदी नृत्यप्रकार शिकवले आहेत. कथक नृत्यांगना सोनिया परचुरे यांचे ते शिष्य असून सालसा नृत्यशैली त्यांनी सॅनफ्रान्सिस्को, सिंगापूर आणि मुंबईतल्या प्रशिक्षकांकडून आत्मसात केली आहे.

चैताली.. मुंबईच्या एका आघाडीच्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षांला शिकणारी मुलगी. तिला दोन वर्षांपूर्वी ‘डान्स एरोबिक्स’चा क्लास लावायचा होता. चैतालीला खरं तर नृत्याची मनापासून आवड होती. तिच्या या डान्स एरोबिक्सची चौकशी करायला आली तेव्हाच तिची आवड माझ्या लक्षात आली. तिचं थोडं कौन्सेलिंग केल्यावर तिला पटलं की, कुठलीही नृत्यकला शिकली, कुठल्याही प्रकारचं नृत्य केलं तरीही त्यातून एरोबिक्ससारखा व्यायाम होऊ शकते. एरोबिक्स ही काही नृत्यशैली नाही. एरोबिक्स हा व्यायामाचा प्रकार आहे. चैतालीला ते पटलं. ती आता आमच्या स्टुडिओत दोन वर्षे सालसा आणि बचाटा हे लॅटिन अमेरिकन नृत्यशैलीतले प्रकार शिकते आहे.
आपल्या आसपास आणि तुम्हा वाचकांमध्ये अशा अनेक चैताली असतील, ज्यांना नृत्याची आवड आहे. व्यायामही करायचाय पण म्हणजे नेमकं काय ते कळत नाहीय. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांमध्ये अजूनही मुला-मुलींना नाचापेक्षा आधी अभ्यासात लक्ष दे, असं ऐकवलं जातं. दहावीनंतर व्हेकेशनमध्ये किंवा शरीरानं स्थूल झाल्यामुळे व्यायाम तरी होईल म्हणून नृत्यवर्गाला जायची त्यांना परवानगी मिळते.
खरं तर नृत्यासारखा दुसरा कोणताही व्यायामाचा प्रकार नाही. शारीरिक तंदुरुस्तीसाठी किंवा फिटनेससाठी व्यायामशाळा (जिम), खेळ, योगासनं, जॉगिंग या गोष्टी अनेक वर्षे प्रचलित आहेत. पण फिटनेससाठी डान्स हा प्रकार तसा नवा आहे. नृत्याकडे आता व्यायाम म्हणून पाहणारी पिढी तयार होते आहे. हा विषय तसा नवीन असल्याने साहजिकच अनेक शंका असतात. उचित मार्गदर्शन मिळालं नाही, तर मुलांना पालकांकडूनही योग्य प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे आपल्याला नेमकं काय करायचंय आणि कशासाठी याबाबत आधी तरुण मुला-मुलींच्या मनात क्लॅरिटी हवी.
वाढतं वजन शरीरावर दिसू लागल्यावर किंवा दहावी-बारावी झाल्यावर, क्वचित उच्चशिक्षण झाल्यावरही मुला-मुलींना फिटनेसबद्दल जाग येते. मग नृत्याची आवड जपत फिटनेस सांभाळता येईल अशा डान्स अँड फिटनेस पर्यायाकडे तरुण वळतात. खरं तर पाचव्या-सहाव्या वर्षांपासूनच शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायची आणि आपली नैसर्गिक आवड जपायची आवश्यकता आहे. पण लहान मुलंदेखील लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर जास्त दिसतात. तोंडात आलेल्या नवीन दातांपेक्षा त्यांच्या क्लासची संख्या जास्त असते. सोफ्यावर बसून व्हिडीओ गेम किंवा मोबाइल गेम खेळून मुलं टेक सॅव्ही होतात पण चपळ होत नाहीत. मग वयाच्या १५-१६ व्या वर्षांपासून ओबेसिटी, भूक मंदावण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. हे टाळायचं असेल तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यही आवश्यक आहे. त्यासाठी आठवडय़ातून दोन-तीन दिवस नृत्य आणि दोन-तीन दिवस खेळ किंवा जिम असं चांगलं रुटीन या वयापासूनच रुजू करायला हवं.
नृत्याचा फिटनेसच्या अंगानं विचार ही अलीकडच्या काळातली गोष्ट असली, तरी नृत्यप्रकार आपल्याला नवे नाहीत. नृत्याला १० वर्षांपूर्वी जे सामाजिक स्थान होतं, त्यापेक्षा आता वेगळं स्थान आहे. नृत्य हे आता गुरू-शिष्य परंपरेपुरतं मर्यादित न राहता डान्स स्टुडिओज, डिस्कोथेक, संगीत पार्टी आणि डान्स वर्कशॉप्सपर्यंत गांभीर्यानं पसरलं आहे. गांभीर्यानं हा शब्द यासाठी वापरला की, काही कोरिओग्राफर या सगळ्यातून अर्थार्जनही करू लागले आहेत. पूर्वी संगीत आणि नृत्यकला परंपरेने घराघरात उतरायची. आज नृत्याला मिळालेल्या फिटनेस कोशंटमुळे त्याचं सोशल स्टेट्स वाढलंय. पीअर प्रेशरमुळेदेखील मुलं नृत्याकडे वळतात. म्हणजे ग्रुपमध्ये सगळ्यांना चांगलं नाचता येतं. आपल्यालाही शिकलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. पण बऱ्याच वेळा त्यांना योग्य माहिती मिळत नाही. गल्लोगल्ली बोकाळलेले डान्स स्टुडिओज किंवा फिटनेस स्टुडिओज बघितल्यावर त्याकडे वळावंसं वाटतं पण मनातला गोंधळ कमी होत नाही. कारण सगळ्या ठिकाणी प्रशिक्षक स्वत: प्रशिक्षित असतीलच असं नाही. अशा ठिकाणी आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाण्याचा संभव असतो आणि यातून डान्स फिटनेसकडे बघायची दृष्टीही दूषित होऊ शकते.
काही विशिष्ट व्यायामाचे प्रकार सध्या जगभर प्रचलित आहेत. त्यातले काही प्रकार नृत्यसदृश प्रकार म्हणून ट्रेण्डमध्ये आहेत. काही फिटनेस स्टुडिओज या प्रकारांना नृत्यशैलीचा दर्जाही देत आहेत. पण यावर कुठलंच आणि कुणाचं नियंत्रण नाही. त्यामुळे नृत्याकडे फिटनेसच्या दृष्टीने बघणाऱ्यांना उचित माहिती मिळत नाही. चालणे, धावणे, जॉगिंग, सायकलिंग, दोरीच्या उडय़ा हे कॅलरी बर्निग एक्झरसाइज आहेत. शारीरिक स्वास्थ्यासाठी हे व्यायाम आवश्यक आहेत. पण एखादा नृत्यप्रकार आपण करतो तेव्हाही कॅलरी बर्निगचं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं. पण त्याहून किती तरी अधिक पटीनं तणावमुक्ती (स्ट्रेस बस्टिंग) होऊ शकते. ही तणावमुक्ती आजच्या तरुणांची खरी गरज आहे आणि म्हणूनच पावलं आपोआप डान्स स्टुडिओकडे वळत आहेत. एकदा गुगलवर सर्च करताना एका पानावर वाचलेली ओळ इथे आठवतेय..
Why walk, when you can dance?
    viva.loksatta@gmail.com

तुमच्या मनातल्या शंका विचारा
या सदराचा उद्देश डान्स आणि फिटनेससंदर्भातले गैरसमज दूर करणं हा आहे आणि तरुणाईच्या मनातला गोंधळही त्यामुळे दूर व्हायला मदत होईल. कंटेम्पररी, हिप-हॉप, बॉलीवूड, सालसा, बचाटा आदी नृत्यशैली म्हणजे नेमकं काय, त्यातला फरक कोणता, फिटनेससाठी यातलं काय निवडावं, हे आपल्याला जमेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही या सदरामधून करणार आहोत. तुमच्या मनात कुठल्या विशिष्ट नृत्यशैलीबद्दल शंका असतील, तर बिनधास्त आमच्या viva@expressindia.com या इ मेल आयडीवर बझ करा.