मृण्मयी पाथरे

मीरा (वय वर्षे ७) गेले कित्येक दिवस शाळेत जात नव्हती. अभ्यास झेपत नाही, शिकवलेलं कळत नाही, शाळेतील इतर विद्यार्थी त्रास देतात आणि शिक्षक मीराचं म्हणणं ऐकून घेत नाहीत, असं म्हणून मीरा घरीच असायची. सुरुवातीला तिच्या पालकांनी मीराच्या शाळेत जाऊन चौकशी केली, शिक्षकांची भेट घेतली आणि मीराच्या समस्या जाणून घेतल्या. मीराला अभ्यास करण्यात अडचणी येत असल्यामुळे तिला एखादी लर्निग डिसॅबिलिटी (’ learning disability) आहे का, हेसुद्धा एका मानसशास्त्रज्ञाकडे जाऊन पडताळून पाहिलं; पण त्या निदानसूचक चाचणीचा (diagnostic test) निकाल निगेटिव्ह आल्यामुळे मीराला तिच्या पालकांनी परत मानसशास्त्रज्ञाकडे नेलं नाही. कालांतराने मीरा किती आळशी आहे, ती घरी राहून झोप काढण्यात किंवा एका कोपऱ्यात टक लावून बसून राहण्यात उगाचच वेळ वाया घालवत आहे आणि तिच्या आजूबाजूची समवयस्क मुलं मात्र तोच अभ्यासक्रम कुरबुर करून का होईना पण वाचत आहेत आणि परीक्षांना सामोरं जात आहेत, असं तिच्या पालकांना नेहमी वाटायचं. आताच एवढा कंटाळा करते आहे, तर पुढे काय होईल, या विचाराने त्यांचंही डोकं दुखायचं.

लहानपणापासूनच रोहन (वय वर्षे २४) अभ्यासात, एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज आणि कामात हुशार होता. जवळपास सगळय़ाच स्पर्धा परीक्षांमध्ये त्याला भरपूर यश मिळायचं. त्याच्या घरच्यांचा त्याला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा होता. त्याचा मित्रपरिवार पण बऱ्यापैकी मोठा होता. दर आठवडय़ाला एकदा तरी सगळी मित्रमंडळी एकमेकांना वेळात वेळ काढून भेटायची आणि दर दोन महिन्यांनी एकदा तरी ट्रेकला जायची; पण रोहनला मात्र आतून एकाकी वाटायचं. त्याच्या आयुष्यात आलेले आनंदाचे क्षण त्याला मनासारखे अनुभवता यायचे नाहीत. कितीही यशाची शिखरं पार केली, तरी आपल्यात काही तरी कमी आहे असं त्याला सारखं वाटत राहायचं. आपल्याकडे सगळं असूनही आपण सुखी का नाही, या विचाराने त्याला हळूहळू झोप येईनाशी झाली. झोप अपुरी झाल्याने अ‍ॅसिडिटी वाढू लागली. अ‍ॅसिडिटी वाढल्याने रोहन बेचैन होऊ लागला आणि लहानसहान गोष्टींवरून त्रागा करू लागला. त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा आणि सवयीसुद्धा बदलल्या. रोहनमध्ये अचानक झालेल्या या बदलामुळे त्याच्या आजूबाजूच्या मंडळींना त्याची काळजी वाटू लागली. 

सीमाने (वय वर्षे ३३) गेल्या महिन्यात एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ सुदृढ असल्यामुळे सगळय़ांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. सीमा आपल्या बाळाला वेळोवेळी स्तनपान करायची, रात्रंदिवस जागून बाळाची काळजी घ्यायची, अंगाईगीत गायची, बाळ लहान असलं तरी गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवायची आणि घरातील इतर कामंही चोखपणे आटपायची; पण एवढं सगळं करूनही सीमाला मात्र तिच्या बाळासोबत कोणतंच कनेक्शन जाणवत नव्हतं. बाहेरून बाळाला बघायला येणारी मंडळी बाळाची चौकशी करायचे, त्याच्यासोबत खेळायचे, पण बाळाने कुरकुर केली की त्याला सीमाकडे सोपवायचे. दिवसेंदिवस सीमाची चिडचिड वाढत होती. ‘मी एक वाईट आई आहे का?’, ‘मी बाळासोबत जितका वेळ घालवता येईल, तितका घालवते आहे; पण इतर जण जसा बाळाचा सहवास एन्जॉय करतात, तसं मला का करता येत नाही?’, ‘बाळाप्रति असलेल्या साऱ्या जबाबदाऱ्या मी पार पाडत असले, तरी मला समाधानी का वाटत नाहीये?’, ‘माझ्यातच काही दोष आहे का?’ अशा प्रश्नांनी तिला ग्रासलं होतं; पण मनातील ही घालमेल कोणाला कळली, तर ते आपल्याला जज (judge) करतील या भीतीपोटी ती गप्प बसायची.

ही उदाहरणं वाचताना बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की, ‘काय हे एकविसाव्या शतकातील प्रॉब्लेम्स आहेत! सगळय़ा सुखसोयी आसपास असतानाही उगाचच दु:ख का कुरवाळत बसायचं? सगळं आयतं मिळतंय म्हणून हे नखरे! आम्हीसुद्धा अभ्यास केला, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी चांगल्यातील चांगली नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, मूलबाळ झाल्यावर त्यांना काय हवं नको ते पाहिलं. शेवटी पाण्यात पडल्यावर प्रत्येकाला पोहावंच लागतं! आजकालच्या पिढीला जरा काही झालं की लगेच मनाला लागतं. त्यांच्या आजूबाजूला कितीही कुटुंबातील मंडळी किंवा मित्रमैत्रिणी असल्या तरीही त्यांना थेरपीची गरज भासते? आमच्यासाठी आमचं कुटुंब आणि मित्रपरिवारच थेरपी होते. असो.’ पण आपल्या डोळय़ांना दिसतात तशा सगळय़ा समस्या असतातच असं नाही. या समस्यांचं मूळ कधीकधी खोलवर रुतलेलं असतं. याला फक्त मानसिकच नव्हे, तर कित्येक आनुवंशिक (genetic), न्यूरोकेमिकल (neurochemical), सामाजिक, पर्यावरणविषयक आणि अगदी राजकीय घटकही कारणीभूत असू शकतात.

आपण नैराश्य (depression) आणि चिंता (anxiety) अशा मानसिक समस्यांबद्दल वाचलं, तर उदासीनता, असहायता, हताशपणा, अभ्यासात किंवा कामात लक्ष न लागणं, ताणामुळे परफॉर्मन्स कमी होणं, अतिविचार करणं, सतत कसली तरी भीती वाटत राहणं, शारीरिक आणि मानसिक एनर्जी कमी होणं, अस्वस्थ वाटणं, घाम फुटणं, श्वासोच्छवासात अडथळा येणं, खाण्याच्या आणि झोपेच्या सवयींमध्ये बदल होणं अशा कित्येक लक्षणांची माहिती मिळते. हे सगळं वाचताना समजायला सोपं वाटतं. मात्र जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती ही लक्षणं प्रत्यक्ष अनुभवत असते, तेव्हा ती डिप्रेशन किंवा एन्झायटी अनुभवत असेल हे आपल्याला सहसा लक्षात येत नाही आणि आपण या लक्षणांकडे जाणते-अजाणतेपणी दुर्लक्ष करतो. अगदी त्यातही जर एखाद्या व्यक्तीचं घर, शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमधील काम उत्तम असेल, तर त्यांना कोणताही मानसिक त्रास असूच शकत नाही हे गृहीत धरतो. याला   high functioning depression/anxietyअसंही म्हटलं जातं.

आपल्याला बऱ्याचदा वाटतं की, आपण आपल्या वेळेस ज्या प्रकारे समस्यांवर मात केली, ते ऐकून आपल्या आजूबाजूची मंडळी प्रेरित (motivated) होतील; पण अशा बोलण्यामुळे इतर माणसं मोटिव्हेट होण्यापेक्षा त्यांच्या समस्या आपल्याशी शेअर करताना आढेवेढे घेऊ शकतात. आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम्स समजतच नाहीत आणि त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याला सांगितलेच, तर त्याचा गाभा पूर्णपणे न समजता आपण प्रॉब्लेम्सना उडवून लावतो आणि केवळ सल्ले देतो असंही त्यांना वाटू शकतं. आपण बऱ्याचदा ज्या व्यक्तीला मानसिक त्रास होत असेल, ती व्यक्ती कशी कमकुवत आहे, आपलं अटेन्शन मिळवण्यासाठी प्रॉब्लेम्स उकरून काढत आहे असा विचार करून त्याच व्यक्तीला दोष देतो. एवढंच नव्हे तर, या मानसिक समस्या लहान मुलांच्या आणि वयस्कर मंडळींच्या आयुष्यात नसतात, असंही काही जणांना वाटतं. त्यामुळे कधीकधी त्यांना वेळीच प्रोफेशनल मदत मिळण्यापूर्वी आपण त्यांच्या समस्यांचं अस्तित्वच नाकारतो. त्यामुळे यापुढे आपल्या आसपास एखाद्या व्यक्तीचं वागणं आपल्याला कळत नसेल, तर त्यांना दोष देण्याऐवजी किंवा टोमणे मारण्याऐवजी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून त्यांना या कठीण प्रसंगात आपण कसा आधार देऊ शकतो, हे विचारलं तर? आणि त्यांनी सांगितल्यानुसार आपल्याला त्यांना मदत करणं शक्य नसेल, तर त्यांना थेरपीला जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर?

viva@expressindia.com