टीम व्हिवा
दिवाळीसारख्या मोठय़ा सणांत खऱ्या अर्थाने पारंपरिक आणि फॅशनेबल दोहोंचा मेळ साधणारे फ्युजन कपडे वापरण्याची संधी अधिक मिळते. वेस्टर्न वेअरवर नक्षीकाम, जरीकाम अशी जोड देत केलेले कपडे किंवा एम्बेलिश्ड ड्रेसेस आणि सिक्विन साडया, ड्रेसेस या सणासुदीच्या काळात ट्रेण्डमध्ये आले आहेत. सिक्विन आणि बीड्सचं डिझाईन असलेले गाऊन्स, ड्रेसेस याच्या जोडीला एम्बेलिश्ड साडया यावरही सध्या तरुणाईची पसंतीची मोहोर उमटते आहे. या दिवाळीत गोल्डन, ब्रॉन्झ आणि सिल्वर मेटॅलिक कलरमधील ड्रेसेस अधिक लोकप्रिय होते.
साडी, ड्रेपिंग आणि बरंच काही..
सणासुदीला साडयांना आजही पर्याय नाही. कितीही फॅशन ट्रेण्ड्स आले आणि गेले तरी साडीबद्दलचं प्रेम तिळभरही कमी होत नाही. उलट या साडीचे अनेक आकर्षक आणि सोप्या पध्दतीने वापरता येतील, उठून दिसतील असे ड्रेप्स अधिक लोकप्रिय होत आहेत. ऑफबीट साडयांमध्येही छोटी बॉर्डर आणि ब्लॉक प्रिंट असलेल्या साडया, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज यांच्या पेअरिंगला साजेशा मॉडर्न ड्रेपिंगमुळे आपल्याला उठावदार लूकही साधता येतो आणि साडी नेसल्याचं समाधानही मिळतं. यंदा अनेक अभिनेत्रींनीही सिल्क साडयांपेक्षा सिक्विन आणि मेटॅलिक कलरच्या साडयांना अधिक पसंती दिलेली पाहायला मिळाली. खादीच्या साडयांनाही तितकीच मागणी होती. खादीच्या साडयांवर जॅकेट्सची जोड देत केलेला वेगळा लूकही ट्रेण्डी ठरला.
पलाझो पॅन्ट्सचं वाढतं माहात्म्य..
पलाझो पॅन्ट्स आणि क्रॉप टॉप, पलाझो पॅन्ट्स आणि टय़ुनिक्स, पलाझो आणि शॉर्ट कुर्ते किंवा लॉंग कुर्त्यांखाली वेगवेगळय़ा पध्दतीने डिझाईन केलेले पलाझो असे अनेक प्रकार सध्या पलाझो पॅन्ट्सची लोकप्रियता वाढवत आहेत. साध्या कॉटन ड्रेसपासून ते सिल्क ड्रेसपर्यंत चुडीदार वापरण्यापेक्षा पलाझो पॅन्ट वापरण्याचा कल अधिक आहे. पलाझोच्या जोडीने शरारा सेट्सही तितकेच आकर्षक दिसतात. ब्राईट कलरचा एम्बेलिश्ड टॉप आणि त्याखाली डिझाईनर शरारा हा दिवाळीत तरुणींबरोबरच लहान मुलींमध्येही लोकप्रिय लूक होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हेही वाचा >>> फुडी आत्मा : खाणं आहे सोबतीला..
इंडो – वेस्टर्न फ्युजन
इंडो – वेस्टर्न फ्युजन कपडे हे केवळ सणासुदीतच नव्हे एरव्हीही भाव खाऊन जातात. त्यामुळे सणाच्या दिवसांत या प्रकारावर भर असतोच असतो. खास सणावाराला धोती पॅन्ट आणि क्रॉप टॉप किंवा ब्रालेट आणि धोती पॅन्ट असा लूक असतो. त्यातही ब्रालेट-धोती, ब्रालेट – लेहंगा आणि त्यावर लांबलचक पायघोळ जॅकेट किंवा शॉर्ट डेनिम जॅकेट, ब्लेझर पेअरिंग करत हटके लूक साधला जातो. शिमरिंग शर्ट्स आणि स्कर्ट्स हे पेअरिंगही लोकप्रिय आहे. किंवा एम्ब्रॉयडरी केलेला भरजरी लेहंगा आणि केप टॉप हाही प्रकार सध्या लक्ष वेधून घेतो आहे. फ्लोरल प्रिंट्स आणि पेस्टल कलर्समधील केप ट़ॉप आणि लेहंगा या पेअरिंगला सणासुदीच्या दिवसांतही पसंती मिळते. फ्लोरल प्रिंट्समधील साडया आणि अनारकली सेट्सही सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. ज्यांना अगदीच चकचकीत रंग आणि फॅब्रिक आवडत नाहीत त्यांना फ्लोरल प्रिंट्स, त्यावर गोटापट्टी वर्क असलेल्या साडया, अनारकली ड्रेसेस, शरारा किंवा अगदीच फ्जुजन हवं असेल तर केप टॉप आणि लेहंगा, स्कर्ट हे पेअरिंग अधिक आवडतं.
सिक्विन, वेल्वेट..
सिक्विन एम्ब्रॉयडरी वर्कने आता साडयांपासून वनपीसपर्यंत सगळीकडेच स्थान पटकावलं आहे. अनेकदा संपूर्ण साडीवर सिक्विन वर्क असतं, किंवा साडयांचे पदर सिक्विन वर्कने भरलेले असतात. साध्या रंगातील साडी आणि सिक्विन वर्क असलेला ब्लाऊज, मेटॅलिक रंगाची साडी आणि सिक्विन ब्लाऊज असे विविध पर्याय सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. सिक्विनने फक्त साडीच नव्हे तर पारंपरिक पंजाबी कुर्ते, अनारकली या पारंपरिक प्रकारांबरोबर नव्हे तर अनेक नव्या कपडय़ांमध्ये शिरकाव केला आहे. सिक्विन जॅकेट्स, सिक्विन वनपीस, सिक्विन केप टॉप्स कितीतरी प्रकारात सिक्विन वर्क ट्रेण्डमध्ये आहे. सिक्विन इतकंच सध्या वेल्वेट फॅब्रिक कपडय़ांनाही पसंती मिळते आहे. वेल्वेटची कुर्ती, काफ्तान टॉप लोकप्रिय आहेत. सणासुदीच्या सणांमध्ये केवळ सिल्कच्या साडयांचा झगमगाट अधिक पाहायला मिळायचा. सिल्कचे कपडे आजही तेवढेच लोकप्रिय असले तरी आता खास सणांना किंवा अगदी पार्टी-समारंभांनाही सिक्विन, एम्बेलिश्ड वर्क, मेटॅलिक कलर्स असलेल्या ट्रेण्डी कपडय़ांचा झगमगाट अधिक खुलून दिसतो आहे.
viva@expressindia.com