गोविंदा गोविंदा

गोविंदा पथकात निवड प्रक्रिया नेमकी कशी होते? गोविंदा पथकालासुद्धा आव्हानं असतात का? या आणि अशा मुद्दय़ांवर गोविंदा भरभरून बोलतात.

गोविंदा गोविंदा
(संग्रहित छायाचित्र)

मितेश रतिश जोशी

दोन वर्षांनंतर दहीहंडी पथकातील तरुण मंडळी पुन्हा एकदा हा थरार रंगवण्यासाठी एकत्र आली आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांत हुकलेली संधी आणि आता पुन्हा एकत्र येणं तितकंच सोपं, तितकंच उत्साहवर्धक होतं की नव्याने काही समस्या त्यांना जाणवताहेत? अशा अनेक मुद्दय़ांवर या तरुण गोविंदांशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न..

गोविंदा पथकाचे नेत्रसुखद थर, गोविंदा रे गोपाळाचा गजर, प्रत्येक गोविंदामध्ये असलेला सळसळता उत्साह या गोष्टी दहीहंडीच्या सणाशी अबालवृद्धांना जोडून घेतात. गोपाळकालाच्या निमित्ताने वर्षांतून एकदाच पण दहीहंडीचा हा खेळ खेळला जातो. दहीहंडीचा थरावर थरचा थरार रंगवण्यासाठी त्याचा कसून सरावही दहीहंडी पथकांकडून केला जातो.

थरावर थर रचणारी पथके, गाण्यांच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात यंदा दहीहंडीचा उत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होतो आहे. गोविंदांचे थर पाहून मिळणाऱ्या नेत्रसुखामागे प्रत्येक गोविंदाचे महिन्याभराचे कष्ट, साहस आणि चिकाटी असते. गोविंदाचा सराव नेमका केव्हापासून सुरू केला जातो? गोविंदा पथकात निवड प्रक्रिया नेमकी कशी होते? गोविंदा पथकालासुद्धा आव्हानं असतात का? या आणि अशा मुद्दय़ांवर गोविंदा भरभरून बोलतात.

दोन वर्षांनंतर दहीहंडीचा सराव करताना तसेच मुलांकडून तो सराव करून घेताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? याविषयीची माहिती देताना मुंबईतील डोंगरी भागातील उमरखाडी गोविंदा पथकाचा कार्याध्यक्ष असलेला कमलेश भोईर म्हणाला, ‘‘सर्वसाधारणपणे सर्वच गोविंदा पथकांचा सराव हा गुरुपौर्णिमेपासून सुरू होतो. गुरुपौर्णिमा ते दहीहंडी या दरम्यानच्या सव्वा महिन्याच्या काळात सर्वत्र सराव सुरू असतो. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर रोज रात्री ९ वाजता सगळे जण एकत्र येऊन, एकत्र गाऱ्हाणं घालून सरावाला सुरुवात व्हायची, पण कोविडनंतर नोकरीच्या बदललेल्या वेळा, वाढलेल्या जबाबदाऱ्या यामुळे या वर्षीपासून सराव रात्री दहा वाजता सुरू व्हायचा. सराव संपायला रात्रीचे बारा ते साडेबारा सहज होतात. रविवारी ज्यादा सराव केला जायचा. दहीहंडीच्या ठिकाणी एकूण सात ते आठ थर लावले जातात. वजनदार गोविंदा सगळय़ात खाली असतात. त्यांच्यावर कमी वजनाचे गोविंदा, त्यांच्यावर त्यांच्यापेक्षा कमी वजनाचे गोविंदा असे थर लावून हंडी फोडली जाते.’’ मात्र या वेळी हे थर जमवतानाच नाकीनऊ का आणि कसे आले? यामागची गंमतही त्याने सांगितली. ‘‘साधारणपणे एक गोविंदा एका थरात तीन वर्ष तरी राहतो. म्हणजे वरच्या चार नंबरच्या थरात जर गोविंदा असेल तर तो तीन वर्ष त्याच थरात असतो. सर्वसाधारणपणे प्रत्येक गोविंदाला आपल्या वजनाच्या अनुषंगाने आपण कोणत्या थरात दरवर्षी असतो हे लक्षात असतं, पण गेल्या दोन वर्षांत दहीहंडीच न झाल्याने गोविंदांना याचा विसर पडला. त्यात काही तरुण गोविंदांची वजनं वाढल्याने ते अचानक खालच्या थरात आले तर काही गोविंदा अनपेक्षितपणे बारीक झाल्याने वरच्या थरात गेले. त्यामुळे कोण कोणत्या थरात असणार हे ठरवण्यापासून यंदा तयारी करावी लागली,’’ असं कमलेशने सांगितलं. 

दहीहंडीच्या दिवशी आयोजन स्थळी अलोट गर्दी लोटते. त्यामुळे गोविंदा पथकांना गर्दीचा सामना करत खेळ खेळावा लागतो. याविषयी कमेलश सांगतो, काही दहीहंडी स्पर्धा आयोजक गोविंदा पथकांना अक्षरश: वेठीस धरतात. आमचे पाहुणे यायचे आहेत त्यामुळे तुम्ही आता थर रचू नका, असं स्पष्ट सांगितलं जातं. अशा घाईच्या वेळी आम्हाला ताटकळत राहावं लागतं. दुसऱ्या ठिकाणी जायला उशीर होतो. प्रत्येक आयोजकांनी स्पर्धेच्या स्थळी गोविंदा पथकांना आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठीच्या रस्त्याची स्वतंत्र सोय करायला हवी, जेणेकरून चेंगराचेंगरी होणार नाही, असं तो नमूद करतो.

 ‘पार्ले स्पोर्ट्स क्लब’चं महिलांचं गोविंदा पथक केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही लोकप्रिय आहे. २००२ सालापासून ‘फक्त महिलांसाठी’ सुरू झालेल्या या गोविंदा पथकाने यंदा विसाव्या वर्षांत पदार्पण केलं आहे. या पथकाची संचालिका गीता विनोद झगडे त्यांच्या पथकाविषयी सांगते, ‘‘आम्ही दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीला नमस्कार करून नारळ फोडून सरावाचा श्रीगणेशा करतो. दोन वर्षांपासून दहीहंडी न झाल्याने या वर्षी मात्र सर्वच गोपिकांमध्ये सळसळता उत्साह पाहायला मिळतो आहे. सर्वसाधारणपणे इतर गोविंदा पथकात क्रीडा क्षेत्रातील अग्रेसर खेळाडूलाच प्राधान्य दिलं जातं, पण आमच्या पथकात असे नियम नाहीत. आमच्या पथकात शाळा-कॉलेजच्या मुली आहेत, पण त्याचबरोबर घरकाम करणाऱ्या मावशींपासून, बँकर, गृहिणी, परदेशातून शिक्षण पूर्ण करून आलेली व आयटीमध्ये नोकरी करणारी मुलगीसुद्धा पथकात आहे. सगळय़ा जणी आपापल्या घरातील जबाबदाऱ्या, नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळून हौसेने व जिद्दीने दरवर्षी सहभाग घेतात.’’ परदेशात आपण बघतो घरातल्या तीन पिढय़ा एकत्र येऊन स्पोर्ट्ससाठी वेळ देतात. तो त्यांच्या राहणीमानाचा व कल्चरचा एक भाग आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला दहीहंडी हा उत्सवाबरोबरच खेळ आहे, तर तो खेळायलाही वेगवेगळय़ा पिढय़ांनी एकत्र यावं, अशी अपेक्षा गीता व्यक्त करते. मी असं म्हणत नाही की आजीने थर लावायला पुढे यावं, मात्र तिने किमान आपल्या नातीला सरावाला घेऊन यावं. तिला प्रोत्साहन देऊन तिला आपल्या संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून द्यावी. ज्या तरुण सुदृढ माता असतील त्यांनी आपल्या मुलींबरोबर थर लावावेत. तरच ही अस्मिता टिकून राहील, अशा शब्दांत खेळ म्हणून दहीहंडीविषयी पुढच्या पिढीत आकर्षण कसं निर्माण करता येईल, याबाबतचा मुद्दा तिने मांडला.

दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथकांची होणारी वणवण समाजाला दिसत नाही. दिसतात ते केवळ नेत्रदीपक थर. गीता याविषयी सांगते, आमच्या पथकात एकूण सव्वाशे महिला गोविंदा आहेत. प्रत्येक पथकात साधारणपणे १०० ते १८० गोविंदा असतात. दहीहंडीचं आयोजन आयोजक स्वत: न करता कोणाकडून तरी करून घेतो, पण त्यामध्ये कोणीच गोविंदांच्या खाण्यापिण्याचा विचार करत नाही हे दुर्दैव आहे. टीशर्ट आणि बेल्ट दिले की त्यांची जबाबदारी संपते.

आयोजक सेलिब्रिटींच्या स्वागतात गर्क झालेले असतात. त्या दिवसाचा जेवणाचा, पाण्याचा खर्च हा पथकाला करावा लागतो. प्रत्येक आयोजकाने गोविंदांसाठी पाणी, अल्पोपाहार आणि फिरते स्वच्छतागृह याची सोय करायलाच हवी. जेणेकरून पथकांवर आर्थिक भार येणार नाही. 

 मुंबई-ठाण्यासारखा दहीहंडीचा उत्साह पुण्यातसुद्धा पाहायला मिळतो, पण तो मर्यादित कालावधीसाठीच असतो. याविषयी सांगताना पुण्यातील कसबा पेठेतील शिवतेज ग्रुप दहीहंडी संघातील सागर भोकरे हा गोविंदा म्हणाला, ‘‘मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा उत्सव सकाळीच सुरू होतो. तो रात्रीपर्यंत सुरू असतो. पुण्यात मात्र दहीहंडीचं आयोजन संध्याकाळी सातपासून ते रात्री दहापर्यंत केलं जातं. त्यात हंडी ही आठच्या सुमारासच सगळीकडे फोडली जात असल्याने आम्हा गोविंदांवर वेळेचं दडपण फार असतं.’’ मुंबईसारखंच पुण्यातही दिवसभर दहीहंडीचं नियोजन करण्यासंदर्भात आयोजकांना कित्येकदा विनवणी करूनही आत्तापर्यंत दाद मिळालेली नाही, असं त्याने सांगितलं.

पुणे उपनगरातील काही आयोजक कृष्ण जन्म झाल्यावर रात्रीच दहीहंडी बांधतात. त्यामुळे तिथे जाणं सोपं होतं, पण केवळ दोन तासांत सगळय़ा ठिकाणी हजेरी लावणं फार कठीण असतं, असं ते सांगतात. दहीहंडीची आवड पिढय़ानपिढय़ा राहावी यासाठी सागर व त्याचे साथीदार दरवर्षी विशेष मेहनत घेतात. याविषयी तो म्हणतो, आमच्या पथकात काही आजोबा त्यांच्या नातवाला सरावासाठी घेऊन येतात, तर काही आजोबा स्वत: सहभागीसुद्धा होतात. काही तरुण बाबा त्यांच्या पाच ते सात वयोगटातील मुलांना घेऊन येतात. अशा लहान मुलांकडून आम्ही थर लावण्याचा सराव काही वर्ष करून घेतो. जेणेकरून त्यांच्या मनातील भीती निघून जाईल व योग्य वयात उत्साहाने कोणतीही भीती न बाळगता ते पथकात सामील होतील. भविष्यातले गोविंदा तयार होण्यास यामुळे मदत होईल. या गोविंदांवरही आम्हाला महिन्याभराच्या सरावात मेहनत घ्यावी लागते, असं त्याने सांगितलं.

दहीहंडी फोडून गोविंदा पथक एकाच दिवशी हजारो रुपयांची उलाढाल करतात. ते पैसे साठवून वर्षभराचे सणवार साजरे केले जातात. दोन वर्षांच्या करोनाच्या महामारीत या पैशांचं या पथकांनी काय केलं असेल, हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. सागरच्या कसबा पेठेच्या पथकाने ते सर्व पैसे पुण्यातल्या दुर्गम भागात जिथे इतर समाजसेवकांची मदत पोहोचत नव्हती अशा भागातील गरजूंसाठी खर्च केल्याची माहिती दिली. 

प्रत्येकालाच आयुष्यात कोणत्या ना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो. गोविंदा पथकही त्याला अपवाद नाही. लहान मुलांना सर्वात वरच्या थरावर चढवताना त्यांच्या संरक्षणाचे दडपण पथकावर असते. दहीहंडी उत्सवाच्या काळात काही पथकं स्वत:च आपला विमा काढतात, तर काही पथकांना विमा काढणं शक्य होत नाही. म्हणून गोविंदा पथकांसाठी शासनाने विमा कवच द्यावं, अशी मागणी गेले कित्येक वर्ष होत होती. या मागणीनुसार दहीहंडी पथकातील गोविंदांना या वर्षांपासून १० लाखांचं विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, पण एवढय़ावरच भागणार नाही. दहीहंडी हा पारंपरिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे. त्यामुळे या उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळावा यासाठी अनेक गोविंदांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर फळ आलं आहे.

दहीहंडीचा खेळ वर्षांतून एकदाच खेळला जातो आणि त्याच काळात केवळ सराव केला जातो. या खेळाचा नियमित सराव होत नसल्यामुळे गोविंदा तंदरुस्त नसतात. त्यांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. क्रीडा प्रकारात समावेश होऊन या खेळाची प्रो कब्बडीच्या धर्तीवर स्पर्धा झाली तर खेळाडू वर्षभर सराव करतील आणि त्यांना आरोग्यविषयक समस्यांचाही सामना करावा लागणार नाही. शाळा आणि महाविद्यालयातील क्रीडा प्रकारात दहीहंडी खेळाचा समावेश केला तर त्यातून चांगले गोविंदा तयार होतील, असा विचार मांडणाऱ्या तरुणाईचा दहीहंडीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्ण वेगळा आहे हे जाणवल्याशिवाय राहात नाही.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘ब्रॅण्ड’ टेल : जयपोर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी