अभिषेक तेली

सध्याच्या घडीला आधुनिक तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्र प्रगतीचा एक नवा उच्चांक गाठत आहे. विविध क्षेत्रांमध्ये कमालीची चुरस वाढली असून प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात वरचढ ठरण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागत आहेत. स्वत:चा जनसंपर्क वाढविण्यासाठी विविध माध्यमांचा अवलंब केला जातो आहे. आपण केलेले काम प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि स्वत:ची  प्रतिमा अतिशय प्रभावीपणे जनमानसांत निर्माण करण्यासाठी, आजच्या युगात  ‘सोशल मीडिया’ हे अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून समोर आले आहे. जसं मनोरंजन क्षेत्रात पडद्यामागच्या कलाकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, तसंच सोशल मीडियाच्या जगातही त्याचे व्यवस्थापन करणारे महत्त्वाचे ठरतात. अलीकडच्या काळात राजकीय व्यक्ती व कलाकारांच्या सोशल मीडिया खात्यांना व्यवस्थित आकार देण्याचे काम मोठय़ा प्रमाणात तरुण मंडळींकडून केले जात आहे. सोशल मीडिया व्यवस्थापनाचे क्षेत्र आता करिअरची नवीन संधी म्हणून समोर आले आहे.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

पूर्वीच्या काळात फलकबाजी करून व घरोघरी भेट देऊन लोकांशी संवाद साधला जायचा आणि स्वत:चे काम पोहोचवले जायचे; परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी कोणाकडे वेळ उरलेला नाही. सध्याच्या स्पर्धात्मक जगात आपलं काम क्षणार्धात एका क्लिकवर लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरले आहे. राजकीय क्षेत्रात नेहमीच धुरळा उडालेला पाहायला मिळतो. सत्ताधारी व विरोधकांमधली जोरदार खडाजंगी असो वा त्यांनी केलेले विविध काम जनमानसांत पोहोचवण्यासाठी, आपली प्रतिमा उंचावण्यासाठी राजकीय व्यक्तींना सध्या सोशल मीडियाचे व्यवस्थापन गरजेचे झाले आहे. सोशल मीडिया व्यवस्थापन क्षेत्रात असलेली कोमल झेंडे ही तरुणी सांगते, ‘कोणत्याही व्यक्तीला सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने ट्रोल केले जाते. जेव्हा राजकीय व्यक्तीचे सोशल मीडिया हँडल्स व्यवस्थापनासाठी आमच्याकडे येतात, तेव्हा आम्हाला त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती, त्यांचे व्यक्तिमत्त्व याबद्दल तपशीलवार सांगितले जाते. यामुळे संबंधित राजकीय व्यक्तीच्या विचारांच्या अनुषंगानेच आम्ही त्यांच्या मीडिया हँडल्सवर पोस्ट करत असतो. कुठेही त्या राजकीय व्यक्तीच्या प्रतिमेला धक्का न लागण्याची पुरेपूर काळजी घेतली जाते. एखाद्या पोस्टची पोहोच दर अर्ध्या तासाने तपासत असताना, आम्हाला अर्वाच्य भाषेतील प्रतिक्रिया व पोस्ट दिसल्या तर त्या आम्ही तात्काळ डिलीट करतो. एखाद्या पोस्टवरून वाद निर्माण होऊ शकतो, हे संबंधितांना सांगून ती पोस्ट तात्पुरत्या काळासाठी हटविली जाते आणि वाद निवळल्यानंतर ती पोस्ट पुन्हा प्रेक्षकांसमोर आणली जाते.’

कलाकारांच्या झगमगाटालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थित आकार देण्याचे काम सोशल मीडिया व्यवस्थापक करतात. मराठी मनोरंजनसृष्टीतील विविध कलाकारांच्या सोशल मीडिया हँडल्सच्या व्यवस्थापनाचा अनुभव गाठीशी असलेली पौर्णिमा खडकेच्या मते, ‘सध्याचे युग हे डिजिटल माध्यमांवर सर्वाधिक अवलंबून असल्याने प्रेक्षकांना जर एखाद्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर ते पहिल्यांदा त्या कलाकाराचे सोशल मीडिया हँडल्स तपासून पाहतात.’ कलाकार फेसबुक, इन्स्टाग्रामसह आता यूटय़ूबवरही सक्रिय झाले आहेत. प्रत्येक कलाकाराचा प्रेक्षकवर्ग हा निराळा असतो. तो प्रेक्षकवर्ग आणि चालू असलेला ट्रेण्ड ओळखून पोस्ट तयार केल्या पाहिजेत. अशोकमामांवरील ‘अशीही बनवाबनवी’च्या मीम स्वरूपातील पोस्ट सर्वानाच प्रचंड आवडतात, असं ती सांगते. सोशल मीडिया व्यवस्थापन करताना कामाची आखणी करणे किती महत्त्वाचे असते, याबाबत बोलताना पौर्णिमा सांगते, ‘माझी दैनंदिन यादी नेहमी तयार असते. आमचा कलाकार आज अथवा आठवडय़ाभरात कुठे जाणार आहे? कोणत्या पुरस्कार सोहळय़ात दिसणार आहे? या सर्व गोष्टींची मी व्यवस्थित नोंद ठेवते आणि मग यानुसार पोस्ट व कॅप्शन्स तयार करते. अनेक कलाकारांचे सोशल मीडिया व्यवस्थापन करत असल्यामुळे, माझा प्रत्येक कलाकार कसा विचार करतोय? हे मी सर्वप्रथम जाणून घेते आणि मग त्यानुसार पोस्ट तयार करते. तो कलाकार ट्रोल न होता, त्याला प्रेक्षकांपर्यंत आणण्याची मी पुरेपूर काळजी घेते.’ 

जाहिरात क्षेत्रात आपले पाय भक्कम रोवून असलेला आशीष शिंदे हा तरुण सोशल मीडिया व्यवस्थापन क्षेत्राकडे करिअर या दृष्टीने कसे पाहावे याबद्दल सविस्तरपणे सांगतो, ‘टेलीव्हिजन, रेडिओ, वृत्तपत्र, नियतकालिके, चित्रपट या पारंपरिक माध्यमांपेक्षा सध्याच्या युगात सोशल मीडियाला पहिली पसंती दिली जाते. सुरुवातीला जर तुम्ही सोशल मीडिया व्यवस्थापनाचे योग्य ते प्रशिक्षण घेऊन, या क्षेत्रात प्रवेश केलात तर त्याचे फायदे खूप वेगळे आहेत. सोशल मीडिया टूल्सचा योग्य वापर करणे जमले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज पोहोचता येते. या व्यवस्थापनामुळे तुमची माहितीही व्यवस्थित संग्रहित राहते, तुमचे अपडेट्स हे सातत्याने तुमच्या जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. यामुळे सोशल मीडिया व्यवस्थापन हे काळानुसार अधिकाधिक गरजेचे होत चालले आहे.’ तरुणाई सोशल मीडियामध्ये सर्वाधिक रुळली असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचे योग्य ज्ञान आणि हाताळण्याचे कौशल्य तरुण पिढीकडे असल्याने ते सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने योग्य त्या पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करू शकतात, असेही आशीषने सांगितले. आधी सोशल मीडियाकडे टाइमपास व मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जायचे, आता हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. तुम्हाला जर चांगले फोटोज् काढता येत असतील, उत्तम लिखाण जमत असेल आणि तंत्रज्ञानाचे पुरेपूर ज्ञान असेल तर तुम्ही सोशल मीडिया व्यवस्थापनाच्या जगात निश्चितच स्वत:चे नाव निर्माण करू शकता.

करिअरची नवीन संधी

सध्या अनेक कंपन्यांनी सोशल मीडिया व्यवस्थापक या पदाची मोठय़ा प्रमाणात भरती केली असल्यामुळे करिअरच्या दृष्टीनेही हे क्षेत्र महत्त्वपूर्ण ठरते आहे. सोशल मीडिया व्यवस्थापक म्हणून काम करताना तुम्ही भविष्यात डिजिटल क्रिएटर म्हणूनही काम करू शकता. वृत्तपत्रांना जशा मर्यादा येतात, तशा इथे येत नाहीत. कुठूनही आपल्याला क्षणार्धात  जगाच्या कानाकोपऱ्यात लोकांशी संवाद साधून, एखाद्या व्यक्तीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येते. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूटय़ूब, विविध संस्था, एखाद्या विशिष्ट मोहिमेचे व्यवस्थापन आदी विविध गोष्टींसाठी कलाकार तसेच राजकीय व्यक्तींना स्वत:च्या प्रतिमानिर्मितीसाठी व्यवस्थित सोशल मीडिया व्यवस्थापनाची गरज असते. यामुळे या क्षेत्रात तरुणाईला रोजगाराच्या दृष्टीने निश्चितच संधी निर्माण होत आहेत, अशी विविध मते तरुण सोशल मीडिया व्यवस्थापकांनी मांडली.

वेळेचे गणित जमले पाहिजे

सोशल मीडिया व्यवस्थापन करताना सर्वप्रथम तुम्हाला वेळेची योग्य जाण असली पाहिजे. जर तुम्ही एका दिवसात कोणत्याही वेळी भरमसाट पोस्ट केल्या, तर तुम्हाला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येणार नाही. जर तुम्ही वेळेची योग्य पारख करून मोजक्याच पोस्ट अपलोड केल्या तर त्याला छान एंगेजमेंट मिळेल. फोटोला छानसे कॅप्शन असले पाहिजे. ग्राहक आपल्याला भरमसाट फोटोज पाठवितात; पण त्यातील कोणते फोटो आपल्या प्रेक्षकांना भावतील, याची निवड करता आली पाहिजे. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूटय़ूब आदी सोशल मीडिया व्यासपीठांचा वयोगट व त्यांची पोहोच ओळखता आली पाहिजे. तरुणाईला आकर्षित करणारी पोस्ट सर्वप्रथम इन्स्टाग्रामवर अपलोड करावी आणि मग ती फेसबुकवर अपलोड केली तर चालते. स्टोरी, रिल्स यांसारख्या नवीन पर्यायांचासुद्धा अभ्यास करून, त्याचा योग्य तो वापर करावा, असे कोमल झेंडे सांगते.

ट्रोलिंगच्या विरोधात व्यवस्थित रणनीती महत्त्वाची

ट्रोलिंगचे मूळ शोधणे अत्यंत महत्त्वाचे असते. ऑनलाइन रेप्युटेशन मॅनेजमेंटअंतर्गत सोशल लिसिनग हा एक महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये आम्ही सर्वप्रथम विविध सोशल मीडिया माध्यमांवर आमच्या ग्राहकांबद्दल प्रेक्षकांकडून काय बोलले जाते आहे, ते तपासून पाहतो. सकारात्मक, नकारात्मक व तटस्थ प्रतिक्रिया किती आहेत, हे पाहून त्याचे मूल्यमापन करतो. ट्रोलिंगच्या वेळेस नकारात्मक व तटस्थ प्रतिक्रिया व अभिप्रायांचा आलेख जास्त असतो. यानंतर मग तो फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर व यूटय़ूब कोणत्या व्यासपीठावर आहे, हे पाहिले जाते. आपल्या ग्राहकांच्या सहमतीने  प्रतिक्रियांचा भाग बंद करणे हे कधीही उपयुक्त ठरते. यानंतर वेगवेगळय़ा सोशल मीडिया व्यासपीठांवर नकारात्मक वातावरण दूर सारून सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जातो. यासाठी सकारात्मक व्हिडीओज्, लेख, मुलाखती व विविध पोस्ट्स अपलोड केल्या जातात, जेणेकरून ट्रोलिंगला आळा बसेल. ही एक महत्त्वाची रणनीती आहे, असे विक्रम सुळे सांगतात.