एव्हाना साफसफाई उरकत आली असेल, कंदील, लायटिंगच्या माळा, तोरणं, पणत्या माळ्यावरून खाली आल्या असतील. फराळाची यादी, सामान, ऑर्डर्स फायनल झालं असेल, कारण ‘इट्स दॅट टाइम ऑफ द इयर!’ पुढच्या गुरुवारी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे. सण म्हटलं की दारातली रांगोळी, मातीच्या पणत्या, फुलांची तोरणं या सगळ्यांबरोबर आता लगबग असते ती म्हणजे टेबल डेकोर, घरातल्या कोपर्‍यातील फोटो कॉर्नर, फराळाची ॲस्थेटिक मांडणी, रंगसंगतीत केलेली संपूर्ण घराची सजावट या सगळ्याची. फेस्टिव्ह डेकोर आणि दिवाळी पार्टीचा ट्रेंडच जेन झी आणि मिलेनिअल पिढीमध्ये प्रचलित झाला आहे.

दिवाळीनिमित्ताने कामाचा ताण, रोजचं रुटीन याला ब्रेक देऊन आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणे, मजा मस्ती करणे, गप्पा मारणे याला तरुण मुलं-मुली प्राधान्य देऊ लागली आहेत. मग नुसतं न भेटता त्याला पार्टीचं स्वरूप देणे, थीमप्रमाणे घर सजवणे, कपडे परिधान करणे या ट्रेंडलाही उधाण आले आहे. तरुणाईच्या दिवाळी पार्टीमध्ये कोण-कोणते ट्रेंड्स आहेत ते बघूया.

खाण्यापिण्याची हौस

तरुणांच्या कुठल्याही पार्टीत महत्त्वाच्या असतात त्या आधुनिक आणि नावीन्यपूर्ण रेसिपीज. बदलत्या जीवनशैलीसोबत दिवाळी पार्टीच्या मेन्यूमध्येही अनेक नवे प्रयोग पाहायला मिळतात. पारंपरिक चकली, करंजी, चिवडा आणि लाडू यांचं महत्त्व तर आहेच, पण त्याचबरोबर अशा गेट टुगेदर्समध्ये फ्युजन पदार्थ असतात. चाटचे हटके प्रकार, फ्युजन मिठाई, रंगीबेरंगी मॉकटेल्स, छोट्या आकारातील स्टार्टर आणि आकर्षक फूड प्लॅटर्स यामुळे दिवाळी पार्टीचा मेन्यू अधिक रंजक होतो आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खाता येतील, आवडतील आणि बनवायलाही सोयीचे होतील असे पदार्थ आणि पेय यात असतात. विशेषत: उभं राहून गप्पा मारत खाण्यासाठी सोयीचे असलेले फिंगर फूड्स आणि छोट्या प्लेटमधील पदार्थ पार्टीसाठी उपयुक्त ठरतात. यासाठी विशेष क्रोकरी आणि इले्ट्रिरक इक्विपमेंट्ससुद्धा बाजारात पाहायला मिळतात.

पोर्टेबल स्टार्टर मेकर, ज्युसर्स, ग्राईंडर्स, चॉपर्स ज्याने पदार्थ बनवणे सोपे आणि झटपट होईल अशा उपकरणांना प्रचंड मागणी आहे. तसेच, अशा पार्टीजमध्ये क्रोकरी प्लॅटर्स खूप उपयोगी असतात. क्युरेटेड फूड प्लॅटर्स, रेडी-टू-सर्व्ह स्नॅक्स आणि पार्टी बॉक्सेस यांचा वापर यासाठी करता येतो. एका प्लॅटरमध्ये मिनी समोसे, पनीर टिक्का, विविध डिप्स, क्रॅकर्स आणि भाजलेले नट्स ठेवता येतात. तर डेझर्ट बॉक्समध्ये लहान आकारातील मिठाई, ट्रफल्स आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करता येतो. या पद्धतीमुळे पदार्थांची मांडणी आकर्षक होते, पाहुण्यांना वेगवेगळे पर्याय मिळतात आणि पार्टीचा आनंद घेण्यासाठी अधिक वेळ मिळतो. फक्त साधे ५-६ पदार्थांचे जेवण न राहता, अशा पार्टीज फोर-कोर्स मिल पद्धतीने आयोजित केल्या जातात. आकर्षक सिग्नेचर पेय, हेल्दी फराळाचे ऑप्शन्स, तळलेल्या पदार्थांऐवजी बेक्ड पदार्थ हेसुद्धा या पार्टीचे खास आकर्षण असते.

वेलकम डेकोर

फेस्टिव्ह डेकोरला सध्या भारीच महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत सजावटीचे प्रकारसुद्धा इतके नावीन्यपूर्ण आले आहेत की ते घेतल्याशिवाय राहावतच नाही. दरवाजापासून ते रेखीव पणत्या, कंदील, शोपीसपर्यंत या सजावटीचा खूप बारकाईने विचार केला जातो. ‘रेडी टू युज’ रांगोळ्यांच्या प्रकारांना उधाण आले आहे. आपली नेहमीची रांगोळी तर असतेच, पण त्याव्यतिरिक्त हल्ली वेळेचा अभाव, आणि हौस याचा मेळ साधण्यासाठी एमडीएफच्या रांगोळ्या ज्यामध्ये फक्त रंग भरून ती दारासमोर ठेवता येईल अशा रांगोळ्या प्रचलित आहेत. रांगोळ्यांच्या विविध स्टेन्सिल, साचेसुद्धा बाजारात असंख्य डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. थ्री डी रेडिमेड रंगीबेरंगी रांगोळी मॅट्स, रांगोळी स्टिकर, चायनीज साच्यातल्या समया, टी-लाइट होल्डर्स, लाकडी साचे, कार्डबोर्डवर कापडी जर लावलेल्या रांगोळ्या असे नाना प्रकार ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

प्लास्टिकच्या साच्यांमुळे कमी वेळेत एकसारखी आणि सुबक रांगोळी काढता येते. ॲक्रेलिक आणि मेटलच्या रांगोळ्यांमध्ये आरसे, मोती, खडे आणि सुंदर रंगांचा वापर केलेला असतो, त्यामुळे त्यांना अधिक उठावदार लुक मिळतो. लाकडी रांगोळ्यांमध्ये कोरीवकाम, पारंपरिक आकृत्या आणि रंगीत सजावटीचा मिलाफ दिसतो. तर फ्लोटिंग रांगोळीमध्ये पाण्याने भरलेल्या भांड्यात फुले, पाकळ्या आणि तरंगणार्‍या दिव्यांच्या साहाय्याने सजावट केली जाते. याशिवाय, रांगोळीच्या डिझाइनला उंची आणि खोलीचा भास देणार्‍या थ्रीडी रांगोळ्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. कमी वेळात घराला उत्सवी आणि देखणा साज देण्याची इच्छा असणार्‍यांसाठी हे पर्याय उपयुक्त ठरतात.

पारंपरिक आकाशकंदील

दिवाळीची सजावट कंदिलाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. यंदा आपले पारंपरिक ब्राइट रंग असणारे आणि दिवाळीचा कंदील म्हटलं की जी आकृती आपल्या डोळ्यांसमोर येते ते डिझाइन आणि ट्रेंड्स परत आले आहेत. आत्ताची पिढी ही आधुनिकतेबरोबरच परंपराही हौशीने साजरी करताना दिसते, त्यामुळे लाल, पिवळे, हिरवे, केशरी रंगसंगतीचे आकाशकंदील बाजारात दिसू लागले आहेत. सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती आणि शाश्वत पर्यावरणाची जागरूकता पाहता कागदी, बांबू, लाकडी आणि कापडी कंदिलांनाही बाजारपेठेत मागणी वाढली आहे.
पारंपरिक ताराकृती, पंचकोनी, षटकोनी आणि बहुकोनी आकारातील रंगीत कागदी कंदील आजही लोकप्रिय पर्याय आहेत. त्यातील नक्षीकाम आणि झिरमिळ्यांची सजावट घराच्या प्रवेशद्वाराला, खिडकीला पारंपरिक लुक देते. बाजारपेठ, कंदील गल्ल्या, आठवडी बाजार, प्रदर्शने इथे असे पारंपरिक कंदील पाहायला मिळत आहेत.

बांबू, ज्यूट, पुनर्वापर करता येणारा कागद आणि नैसर्गिक तंतूंपासून तयार केलेल्या इको-फ्रेंडली कंदिलांनाही मागणी आहे. त्यात आणखी नावीन्य म्हणजे फॅब्रिक आणि वेल्वेट कंदील. रेशमी किंवा मखमली कापड, भरतकाम, लेस आणि सोनेरी किनार असलेले कंदीलही बाजारात आले आहेत. याशिवाय, चौकोनी, दंडगोलाकार, अंडाकृती आणि साध्या भौमितिक आकारांतील कंदील ही त्यावरील कमी नक्षीकाम आणि उठावदार रंगसंगतीमुळे लक्ष वेधून घेतात. एलईडी आणि इल्यूमिनेटेड कंदील म्हणजेच आतमध्ये एलईडी दिवे असलेले, रंग बदलणार्‍या प्रकाशाची सुविधा असलेले किंवा बॅटरीवर चालणारे कंदील इतर वेळीही हॉलमध्ये शोपीस म्हणून वापरता येतात. हाताने केलेले कागदी कटवर्क, जरतारी वर्क, बांबूच्या पट्ट्यांचे विणकाम आणि लाकडी कोरीवकाम अशाप्रकारच्या कलात्मक कंदिलांनाही मोठी मागणी आहे.

घराचे देखणेपण

दिवाळीत पै-पाहुण्यांनी घर भरते. त्यामुळे दिवाळीसाठी घराची अंतर्गत सजावटही तेवढ्याच आग्रहाने केली जाते. त्यामध्ये डायनिंग टेबलवरचे पैठणी, वेलवेट, जयपुरी, राजस्थानी अशा वेगवेगळ्या फॅब्रिकमधील टेबल रनर्स, पडदे, कुशन कव्हर, सोफा कव्हर, फ्लॉवर मॅट्स, गालिचे यांची आवर्जून खरेदी केली जाते.

एलईडी आणि लेयर्ड लाइटिंग

तरुणांच्या होमी डेकोर ट्रेंड्समध्ये सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे फेरी लाइट्स. लिव्हिंग रूम, छोटासा कॉर्नर, बाल्कनी, बेडरूमचा छोटासा कॉर्नर अशा ठिकाणी या लाइट्सची सजावट करून अगदी साधेसे घरसुद्धा ॲस्थेटिक दिसते. दिवाळी पार्टीसाठी तर स्टार आणि पणत्यांच्या आकारांचे एलईडी लाइट्स खूपच ट्रेंडिंग झाले आहेत. एकच माळ दरवाजे, बाल्कनीच्या रेलिंगभोवती लावली की संपूर्ण घराचा लूक बदलतो. मल्टिकलर लाइट्स, लॅम्प्स, दिवे याचे कॉम्बिनेशन करून सजावट अधिक प्रभावी करता येते.

फेस्टिव्ह टेबलस्केपिंग

जेन झी आणि मिलेनिअल्सच्या इव्हेंट्सचा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे डायनिंग टेबलची सजावट. घरात कितीही कमी जास्त माणसं असली तरी आता डायनिंग टेबलचा ट्रेंड परत येऊ लागला आहे. त्या निमित्ताने घरात एकत्र बसून जेवण किंवा गप्पा मारत वेळ घालवता येतो. खास दिवाळीत डायनिंग टेबलची खूप छान पद्धतीने मांडणी केली जाते. आकर्षक टेबल रनर, क्रोकरी, मल्टि लेअर्ड स्टँड्स, स्र्हिहंग ट्रे, फुलांची मांडणी आणि मध्यभागी ठेवण्यासाठी समई / शोपीस यांची खरेदी केली जाते.

सुगंधी आणि सेन्सरी डेकोर

सुगंधी मेणबत्त्या, डिफ्यूझर्स, फुलांचा नैसर्गिक सुगंध यांचा वापर घरातील वातावरण अधिक प्रसन्न करण्यासाठी केला जातो. याशिवाय, पितळ किंवा धातूच्या उर्लीमध्ये पाणी, झेंडूच्या पाकळ्या, गुलाबाची फुले आणि तरंगणारे दिवे ठेवून प्रवेशद्वार किंवा दिवाणखान्यात केली जाणारी सजावटही आकर्षक दिसते.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे घराचा प्रत्येक कोपरा आकर्षक दिसावा, सजावटीचे फोटो आणि रील्स तयार करता याव्यात, तसेच सणाच्या आठवणी अधिक खास बनाव्यात, या धारणेतून सजावटीचा विचार केला जातो. पारंपरिक सजावटीला आधुनिक रंगसंगतीची जोड, स्वत: तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू, पर्यावरणपूरक पर्याय आणि कमी जागेतही प्रभावी दिसणार्‍या डेकोरला पसंती मिळते आहे. दिवाळी सजावट ही केवळ घर उजळवण्यापुरती मर्यादित न राहता, सर्जनशीलता, वैयक्तिक आवड आणि कुटुंबीयांसोबतच्या आनंदी क्षणांना अभिव्यक्त करणारे एक माध्यम बनले आहे.
viva@expressindia.com