मितेश रतिश जोशी

ठिपक्यांच्या रांगोळीपासून सुरू झालेला रांगोळीचा प्रवास संस्कार भारतीची रांगोळी ते आताच्या पोट्र्रेट रांगोळीपर्यंत झाला आहे. रांगोळीचे हे एक से बढकर एक हटके प्रकार जन्माला घालण्यात आणि त्याहीपेक्षा ते लोकप्रिय करण्यात तरुणाईचा मोठा वाटा आहे. रांगोळीचे नवीन प्रकार, या तरुण रांगोळी कलाकारांच्या समस्या व त्यांची मतं नेमकी काय आहेत हे त्यांच्याशी बोलून जाणून घेण्याचा ‘व्हिवा’ने प्रयत्न केला.

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध

भारतातील एक पारंपरिक कला प्रकार. पांढरी भुकटी किंवा पूड यांचा उपयोग करून जमिनीवर हाताने काढलेला आकृतिबंध म्हणजे रांगोळी होय. ही रांगोळी राजस्थानात ‘मांडणा’, सौराष्ट्रात ‘सथ्या’, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ‘चौकपूरना’ किंवा ‘सोनारख्ना’, आंध्र प्रदेशात ‘मुग्गू’, बिहारमध्ये ‘अरिपण’ अथवा ‘अयपन’, तमिळनाडूमध्ये ‘कोलम’, केरळात ‘पुविडल’, ओरिसात ‘झुंटी’, बंगालमध्ये ‘अलिपना’ आणि गुजरातमध्ये ‘साथिया’, कर्नाटकात ‘रंगोली’ व महाराष्ट्रात ‘रांगोळी’ अशा विविध नावांनी ओळखली जाते. रांगोळी म्हणजे खरं तर अंगणाचा जन्मसिद्ध हक्क. झाडलोट केलेलं मातीचं सपाट, घट्ट अंगण. त्यावर शिंपलेला मृद्गंधी सडा. पाणी जिरलं की पुसटसा ओलावा तेवढा माघारी ठेवून, रांगोळीला हाक मारणारं हे अंगण! पूर्वीच्या काळी वाडय़ाच्या मागील दारी रांगोळी सजवण्याची ही चैन केवळ मुलीच मनमुराद लुटायच्या. आता ही रांगोळी मागच्या दारातून पुढच्या दारात, पुढच्या दारातून रस्त्यावर, रस्त्यावरून चक्क पाण्यावर आणि आता पाण्याखाली जाऊन पोहोचली आहे. रांगोळी काढणाऱ्या कलाकारांमध्ये मुलगा- मुलगी असा भेददेखील उरलेला नाही. नवल वाटायला लावतील असे रांगोळीचे प्रकार हल्ली पाहायला मिळत आहेत. यंदाच्या दिवाळीत तर ते प्रकर्षांने जाणवले. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करताना वेगवेगळय़ा प्रकारांत सजलेली रांगोळी या वर्षी पाहायला मिळाली ते तरुणाईच्या जिद्दीमुळे..

अनेक तरुण सध्या आपली नोकरी सांभाळून रांगोळी कलेला वेळ देत आहेत, तर बरेच रांगोळी कलाकार नोकरी सोडून पूर्णवेळ रांगोळीकडे वळले आहेत. त्यातीलच एक पुण्यातील श्रीरंग कलादर्पणचा सर्वेसर्वा प्रा. अक्षय शहापूरकर हा तरुण. ‘एमआयटी’ आळंदी येथील प्राध्यापक पदाच्या नोकरीला नारळ देऊन पूर्णवेळ रांगोळीत आपले करिअर घडवण्यात अक्षय व्यग्र आहे. नोकरी करत असतानाच त्याने पुण्यात शुक्रवार पेठेत लहानशा जागेत श्रीरंग कलादर्पण या संस्थेची स्थापना केली. रांगोळी हा एक स्वतंत्र कला प्रकार असल्याने त्यात अनेक बदल अक्षयने केले. पाण्याच्या मधोमध रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी, सिलिंग रांगोळी, टू इन वन रांगोळी, परमनंट रांगोळी, थ्रीडी गॉगल घालून पाहता येईल अशी रांगोळी असे विविध रांगोळी प्रकार अक्षयने निर्माण केले आहेत आणि ते तितकेच लोकप्रियही झाले आहेत. अक्षयकडून या रांगोळीच्या नव्या प्रकारांची सविस्तर माहिती मिळते.

पाण्याच्या मधोमध रांगोळी

पाण्याच्या मधोमध रांगोळी काढण्यासाठी पाण्याचा अभ्यास तसेच त्यावर तरंगणाऱ्या पदार्थाचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये अर्धवट भरलेल्या पाण्यावर रांगोळी काढण्यात येते आणि त्यानंतर पाणी सोडण्यात येते. सहा सेंटिमीटरचे पाणी सोडण्यासाठीसुद्धा जवळपास सात ते आठ तास लागतात. इतक्या कमी वेगाने हे पाणी सोडावे लागते. त्यामुळे ही रांगोळी पाण्याच्या मधोमध साकारल्याचे आपल्याला दिसून येते. हे त्याचे वैशिष्टय़ आहे.

टू इन वन रांगोळी (लेंटिक्युलर रांगोळी)

नावाप्रमाणेच एकाच रांगोळीमध्ये दोन चित्रं आपल्याला या प्रकारात पाहायला मिळतात. अशा रांगोळीसाठी जवळपास चार ते पाच दिवस लागतात. डावीकडून एक चित्र पूर्ण करण्यात येते. त्यानंतर त्याच्यावरती हार्डिनग ट्रीटमेंट केली जाते. ते फ्रीज होण्यासाठी एक अख्खा दिवस लागतो. त्यानंतर दुसऱ्या बाजूची रांगोळी पूर्ण करून पुन्हा हार्डिनग ट्रीटमेंट करावे लागते. त्यानंतर ते अँग्युलर माऊंटिंग करावे लागते. तेव्हा आपल्याला एका बाजूने एक चित्र आणि दुसऱ्या बाजूने दुसरे चित्र दिसते.

चलचित्र रांगोळी

ही रांगोळी पाहत असताना त्यात हलते चित्र दिसून येते. यामध्ये वरती एक विशिष्ट प्रकारची स्क्रीन लावण्यात येते. त्यामध्ये त्या स्क्रीनला मोमेंट दिली की खालचे चित्रही हलल्याचा भास होतो. खाली दोन चित्रे असतात. एखादा चित्ता धावतोय असे दाखवायचे असेल, तर तेव्हा एका चित्राचे पाय जवळ असलेली मुव्हमेंट, तर दुसऱ्या चित्रांमध्ये त्याचे पाय लांब असलेली मुव्हमेंट दाखवण्यात येते. त्याखाली टाकत ए व बीची स्ट्रिप एकापाठोपाठ एक टाकण्यात येते आणि ती स्क्रीन मूव्ह केली की ते चित्र आपोआपच हलत असल्याचा भास होतो.

प्रतिबिंब रांगोळी

ही रांगोळी प्रतिबिंब पाहिल्यावर स्पष्ट होते. कारण खाली रेखाटताना ती नेमकी काय चित्राकृती आहे हे समजून येत नाही. खाली काढलेल्या रांगोळीवर एक सुपर फिनिश पाइप ठेवला तर ते कसे दिसेल यासाठी खालचे चित्र तयार करण्यासाठी दोन ते तीन तास लागू शकतात. रांगोळी साकारल्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेल्या पाइपमध्ये रांगोळीचे प्रतिबिंब उमटून रांगोळीत साकारलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब उमटते.

कायमस्वरूपी रांगोळी

रांगोळी पुसली जाणार हे माहिती असूनही ती अत्यंत सुंदर पद्धतीने रेखाटण्याचा कलाकाराचा प्रयत्न असतो; परंतु ती कधी पुसली न जाता कायमस्वरूपी का ठेवता येऊ नये, या विचाराने झपाटून गेलेल्या अक्षयने जवळपास तीन वर्ष त्याच्यावर प्रयोग केले. शेकडोपेक्षा जास्त प्रयोग केल्यानंतर एक कायमस्वरूपी रांगोळी निर्माण करण्यात त्याला यश मिळाले. ही रांगोळी कधीच पुसली जात नाही, ती आपण फ्रेम करून घरात टांगूदेखील शकतो. कोणालाही सहज भेट करू शकतो.

थ्रीडी रांगोळी

आपण सर्वानी थ्रीडी गॉगल घालून अनेक चित्रपट किंवा चित्रं पाहिलेली आहेत. त्याच धर्तीवर अक्षयने थ्रीडी रांगोळी रेखाटली असून थ्रीडी गॉगल घालून ती पाहता येते. त्याच्या या कार्याची दखल ‘इंडिया बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’नेसुद्धा घेतली आहे. ही रांगोळी आपण उघडय़ा डोळय़ांनी पाहू शकत नाही. त्यासाठी त्याला थ्रीडी गॉगल लागतो.

भारतीय सण आणि रांगोळी यांचं अतूट नातं आहे. खरं तर रांगोळी हा स्त्रियांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आजही कित्येक स्त्रियांची (शहरी भागातीलसुद्धा) रोज सकाळी तुळशीच्या पुढय़ात, देवाच्या पुढय़ात रांगोळी काढल्याशिवाय दिवसाला सुरुवात नाही. अशा या रांगोळीला हटके करताना सुरुवातीला भीती वाटली होती. लोकांनी हा आपला प्रकार स्वीकारला नाही तर काय करायचं? असे अनेक नकारात्मक प्रश्न डोक्यात पिंगा घालत होते; पण माझ्या कष्टाची व कलेची जाण लोकांनी ठेवली हा उल्लेख अक्षय आवर्जून करतो. रांगोळीसाठी अक्षयने ३ राष्ट्रीय, ९ राज्यस्तरीय तर ४० पेक्षा अधिक जिल्हास्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. दिवाळीत ऑफिसमध्ये, कारखान्यात, दुकानात रांगोळी काढण्यासाठी रांगोळी कलाकारांना मोठी मागणी असते. त्यांच्या बजेटनुसार आम्ही रांगोळीचा प्रकार रेखाटतो, असं तो सांगतो. रांगोळी हा खरं तर अल्पजीवी असा कला प्रकार आहे. तो दीर्घकाळ टिकणारा नसल्यानेच रांगोळीकारांना अनेकदा कलाकार म्हणून मान्यतादेखील मिळत नाही, अशी खंतही अक्षयने व्यक्त केली.    

रांगोळी कलावंत असे आहेत, जे जीव ओतून रांगोळी साकारतात. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये रांगोळीचा प्रसार अधिक व्हायला हवा, असं मत मालवणच्या समीर चांदरकरने व्यक्त केले. समीर हा पेशाने कलाशिक्षक असून तो कट्टा मालवण येथे सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या रांगोळय़ा रेखाटतो. समीर सांगतो, बदलत्या काळानुसार सणावाराचं रूपही झपाटय़ाने बदलत चाललं आहे. सणांचे आता ‘इव्हेंट’ झाले आहेत. सणासुदीचं अद्याप टिकून राहिलेलं मनोहर रूप म्हणजे दारी उमटणारी प्रसन्न रांगोळी! इतर सर्व गोष्टींपेक्षा सणाचं रांगोळीशी जडलेलं विलोभनीय नातं मला नेहमीच मोहवून टाकत आलं आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात रांगोळी कलाकाराला अच्छे दिन आले आहेत. शहरी भागात सतत होणारी रांगोळी प्रदर्शनं, रांगोळी स्पर्धा यामुळे तेथील रांगोळी कलाकाराचे अस्तित्व टिकून आहे. नवीन रांगोळी कलाकार घडवण्यासाठी ही रांगोळी प्रदर्शनं व स्पर्धा हे व्यासपीठ ठरलं आहे. अशी स्पर्धा – प्रदर्शनं कोकणात होत नसल्याने नवीन रांगोळी कलाकार घडत नाहीत, अशी खंत त्याने व्यक्त केली. यापुढे समीर म्हणाला, कोकणात दिवाळीच्या निमित्ताने गावी घरी आलेल्या तरुण मुली यूटय़ूबवर बघून रांगोळी रेखाटण्यामध्ये तल्लीन होत्या. रांगोळी ही वर्षांतून केवळ एकदा हातात घेण्याची कला नाही. ती सतत जोपासायला हवी. स्थिरता व एकाग्रता असल्याशिवाय रांगोळी घडणारच नाही, असं तो सांगतो. कोकण पट्टय़ात पोट्र्रेट रांगोळीसाठी सर्वश्रुत असलेल्या समीरने कोकणात पोट्र्रेट रांगोळीची, सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या रांगोळीची क्रेझ निर्माण केली आहे.    

‘संस्कार भारती’ या अखिल भारतीय संघटनेने महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर व मोठय़ा आकृत्या असलेल्या रांगोळय़ा काढण्याची एक नवीन पद्धत सुरू केली आहे. दोर, पेन्सिल अशा साध्या वस्तूंच्या मदतीने स्वस्तिक, गोपद्म, चक्र, शंख, गदा, पद्म, ध्वज इत्यादी प्रतीके एकमेकांना जोडून भव्य रांगोळय़ा काढल्या जातात. संस्कार भारतीने विकसित केलेल्या या तंत्राच्या साहाय्याने काढलेल्या रांगोळय़ा या सध्याच्या काळात महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. डोंबिवलीचा उमेश पांचाळ हा तरुण त्याच्या नेत्रदीपक संस्कार भारती रांगोळीसाठी प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांच्या वेळी, शोभायात्रेत, दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना काही मैल लांबीच्या रांगोळय़ा लाइव्ह काढणं ही उमेशची खासियत ठरली आहे. रांगोळीत नवीन कलाकारांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग घ्यायला हवा, असा आग्रह उमेश धरतो.

शोभायात्रेत किंवा एखाद्या कार्यक्रमात मी रेखाटलेली रांगोळी पाहून अनेक तरुण- तरुणी हुरळून जाऊन माझ्याकडे रांगोळी शिकण्यासाठी येतात, पण ते पूर्णत्वास नेत नाहीत. आजकालच्या मुलांमध्ये स्थिरता आणि संयम नाही. हे दोन गुण ज्याच्या अंगी आहेत तोच रांगोळी कलाकार होऊ शकतो, असं उमेश म्हणतो. असे कलाकार घडवण्याची व रांगोळीला अच्छे दिन आणण्याची गरज आहे. यासाठी सर्व रांगोळी शिक्षकांनी तसेच कलाकारांनी एकमेकांच्या कामाविषयी व कलेविषयी असणारी मत्सरी भावना बाजूला ठेवून एक होण्याची गरज आहे, चर्चा करण्याची गरज आहे. तरच रांगोळीत वैविध्य येईल. तसेच रांगोळी टाकतो म्हणजे काय करतो? तर समर्पण करतो. ही समर्पणाची भावना प्रत्येक रांगोळी कलाकारात असायला हवी, असंही तो नमूद करतो.     

काँक्रीटचे रस्ते दारा- फाटकांना भिडले, इमारतींचे परिसर शिस्तबद्ध फरशांनी ताब्यात घेतले. मातीचं अंगणच लुप्त झालं खरं, पण सुदैवाने या अंगणावरची सुरेख रांगोळी कला मागे राहिली आहे. रांगोळीही आता मोठी समजूतदार झाली आहे. ओल्या मातीच्या अंगणाचा हट्ट तिने केव्हाच सोडून दिला! कुठल्याही पृष्ठभागावर आता ती आनंदाने बैठक जमवते. रांगोळी आता या तरुण कलाकारांमुळे अधिक औरस-चौरस, ठसठशीत आणि ‘चिरतरुण’ झाली आहे!