वाचन हे व्यक्तिमत्त्वाला आकार देतं आणि जगणं समृद्ध करतं, म्हणून पुस्तकं हीदेखील मित्रासारखीच सोबत असतात, असं अनेकजण मानतात. उत्तम पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि वाचकही असलेल्या ज्ञानेश झोटिंगचंही मत काहीसं असंच आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एखाद्या खंबीर मित्राइतकंच वेळोवेळी पुस्तकांची सोबत मला लाभली आणि त्यामुळे जगताना कायमच बळ मिळत गेलं. म्हणून पुस्तकांवर माझी श्रद्धा आहे. एखाद्या मित्राशी बर्याच दिवसांत गप्पा झाल्या नसतील, भेट झाली नसेल तर जसं वाटतं अगदी तसंच मला पुस्तकांच्या बाबतीत वाटतं. मध्येच जेव्हा वाचनात काहीसा खंड पडला होता तेव्हाही असंच रितं वाटत होतं, मात्र त्यानंतर पुन्हा वाचनाची शिस्त लावून घेतली, असं ज्ञानेश सांगतो.
ज्ञानेश मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. घरात सर्वच शिक्षक असल्याने वाचनाची आवड असणारे. आजी-आजोबा, आई-वडील सर्वच शिक्षक असल्यामुळे ज्ञानेशसाठी पुस्तकं वाचणं हे छंदापलीकडे होतं. वाचनाचे संस्कार त्याच्यावर आपसूकच होत गेले. पुस्तकांशी जोडलेल्या या शहरातील असंख्य आठवणी त्याच्याकडे आहेत. तो म्हणतो, ‘पुस्तकं हा आमच्या घरातील एक महत्त्वाचा भाग होताच, मात्र पुढे अनेक दु:खाच्या प्रसंगांत आणि संघर्षाच्या काळात पुस्तकं माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली, नव्हे ती मित्रासारखीच सोबत राहिली. त्यामुळे पुस्तकातील पात्रं ही मला कायमच मित्रांसारखी वाटत आली आहेत.’
ज्ञानेशचं शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित केंद्रात झालं. तिथे शिक्षण घेत असताना नाटक विषयावरील पुस्तकांचं आणि संहितांचं भरपूर वाचन मी करत असे. विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाच्या समृद्ध वास्तूत गेलं की एखाद्या हॅरी पॉटरच्या ‘हॉगवर्ट्स स्कूल’मध्ये गेल्यासारखं वाटतं, असं त्याने सांगितलं. वाचनालय, तिथली पुस्तकं आणि वाचनालयांच्या वास्तू हा ज्ञानेशचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आतापर्यंत त्याने पाहिलेल्या वाचनालयांविषयी तो भरभरून बोलतो. मग ती वाचनालये छत्रपती संभाजीनगरमधील असो, पुण्यातील किंवा अगदी तो मुंबईत नव्याने राहायला आल्यानंतर इथल्या वाचनालयांना भेट देणं असो, वाचनालय हा त्याच्या वाचन प्रवासातील एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. ह्य्मुंबईत अगदी नवीन असताना फारशी पुस्तकं खरेदी करणं शक्य नव्हतं आणि आर्थिकदृष्ट्याही ते शक्य नव्हतं. अशा वेळी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय किंवा अन्य ग्रंथालयात नियमित जाणं व्हायचं. त्याशिवाय एशियाटिक ग्रंथालयाला भेट दिली तरी प्रसन्न वाटायचं. यामुळे मला कायमच वाचनालयं आवडत गेली. अगदी छत्रपती संभाजीनगरमधील बळवंत वाचनालय आणि पुण्यातील ब्रिटिश लायब्ररी, फर्ग्युसन महाविद्यालयाचे ग्रंथालय अशी सगळीच माझी आवडती वाचनालयं आहेत. म्हणजे कसं, घरात देवघर असलं तरीही आपल्याला मंदिराची ओढ असते. माझं अगदी तसंच आहे. आज माझ्याकडे भरपूर पुस्तकांचा संग्रह असला तरी माझं मन वाचनालयांकडेच धावत असतंह्ण असं तो म्हणतो.
ज्ञानेश सध्या अमेरिकन कार्टूनिस्ट आर्ट स्पीगेलमन यांचं ‘माऊस’ हे पुलित्झर पुरस्कारप्राप्त ग्राफिक नॉव्हेल वाचतोय. या पुस्तकाविषयी सांगताना तो म्हणतो, ‘दुसर्या महायुद्धातील ‘होलोकॉस्ट’ या हिटलरच्या छळछावणीतून वाचलेल्या आपल्या वडिलांच्या अनुभवावर ही कादंबरी स्पीगेलमन यांनी लिहिली आहे. तसंच, मराठीतील विक्रम पटवर्धन याचं ‘दर्या’ नावाचं ग्राफिक नॉव्हेलही फार सुंदर आहे.’ ज्ञानेश नाट्य आणि चित्रपटविषयकही अनेक पुस्तकं वाचत असतो. ती केवळ या क्षेत्रात काम करणार्या मंडळींनी नव्हे तर इतर वाचकांनीही वाचायला हवीत, असं त्याचं मत आहे. ‘हिचकॉक/ ट्रूफॉट’, ‘व्हर्नर हर्जोग : अ गाइड फॉर द पर्प्लेक्स्ड’, ‘रेबल विदाऊट अ क्रू’, अरुण खोपकर यांचं ‘गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका’, ‘महानिर्वाण : समीक्षा आणि संस्मरणे’ (रेखा साने ) , ‘खेळता खेळता आयुष्य’ (गिरीश कर्नाड) ही काही पुस्तकं आवर्जून वाचण्यासारखी आहेत, असं त्याने सांगितलं. मुंबईमधील एनसीपीए येथेही उत्तम नाट्यविषयक पुस्तकांचा संग्रह असल्याचं त्याने सांगितलं. प्रवासात काही सुंदर पुस्तकांची दुकानं दिसतात आणि ती लक्षातही राहतात. कोलकाता येथील पार्क स्ट्रीटवर असणारं ‘ऑक्सफर्ड बुक स्टोअर’ आणि ‘बाहरिसन्स बुक स्टोअर’ ही आवर्जून भेट देण्यासाठी पुस्तकांची दुकानं आहेत, असं त्याने सांगितलं.
ज्ञानेशच्या घरीही पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. त्याच्या घरात प्रवेश केला की कलात्मक वस्तूंच्या सान्निध्यात रचून ठेवलेली पुस्तकं आपलं लक्ष वेधून घेतात. वैचारिक, चित्रपटविषयक पुस्तकं, कादंबर्या असा कितीतरी संग्रह त्याच्याकडे आहे. ‘निवडक नरहर कुरुंदकर’ तसेच कुरुंदकर लिखित ‘जागर’ , ‘शिवरात्र’, याबरोबरच ‘जी. एं. ची निवडक पत्रे’, बाबासाहेब आंबेडकरांचं ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ आणि ‘हु वेअर दि शूद्राज’, दुर्गा भागवत यांचं ‘विचारसंचित’ आणि ‘डांगच्या लोककथा’ , तारा भवाळकर लिखित ‘सीतायन’ , फ्रेडरिक नित्शे यांचं ‘बियॉन्ड गुड अँड इव्हिल’ ,‘दि सेकंड सेक्स’ हे सिमॉन-द-बोव्हार यांचं पुस्तक तसेच हृषीकेश गुप्ते यांचं ‘दंशकाल’ आणि गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ ही ज्ञानेशच्या काही आवडत्या पुस्तकांची यादी आहे. ज्ञानेश चित्रपट या माध्यमात काम करत असल्याने विविध चित्रपट, नाटकं पाहणं हे होतंच असतं. या सगळ्यात पुस्तक वाचनाची आवडही तो नेमाने जपतो. पुस्तकांचं वाचन ही त्याची गरज आहे, असं त्यानं सांगितलं. तो पुढे म्हणतो, ‘मी आणि माझी पत्नी तन्मयीने अशी एक सवयच लावून घेतली आहे की कितीही कामात असलो तरी अर्धा तास का असेना, पुस्तकांचं वाचन करायचंच.’ पुस्तकांमुळे आपल्या जवळच्या नात्यातील माणसांशी आपलं नातं अधिक दृढ होतं, असंही तो मानतो. याविषयी सांगताना तो म्हणतो, वाचलेल्या पुस्तकांवर माझ्या आईशी आणि पत्नीशी गप्पा होतात. पुस्तकांमुळे नाती अधिक घट्ट होतात, एकमेकांविषयीचे नवे आयाम कळतात, असं मला वाटतं.
viva@expressindia.com
