scorecardresearch

परंपरेतील नवता

सणासुदीच्या दिवसांत हल्ली प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीनिवडीनुसारच घरात आणण्याचा आग्रह हल्ली वाढत चाललेला दिसतो. घरातील पूजेपासून उत्सवांपर्यंत आनंद साजरा करण्यासाठी निमित्त काहीही असो, फॅशनची हौस हमखास पुरवून घेतली जाते.

viva1 fashion trend
परंपरेतील नवता

प्रियांका वाघुले

सणासुदीच्या दिवसांत हल्ली प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीनिवडीनुसारच घरात आणण्याचा आग्रह हल्ली वाढत चाललेला दिसतो. घरातील पूजेपासून उत्सवांपर्यंत आनंद साजरा करण्यासाठी निमित्त काहीही असो, फॅशनची हौस हमखास पुरवून घेतली जाते. त्यातही पारंपरिक साज हवाच, पण त्यात इतरांपेक्षा वेगळं काही तरी असायला हवं हे कटाक्षाने पाहिलं जातं. त्यामुळे यंदा गणेशोत्सवातही पारंपरिक साडय़ा वा फॅब्रिकचा वापर करत नव्या पद्धतीचे ड्रेसेस शिवून घेण्याकडे तरुणींचा कल अधिक असल्याचं फॅशन डिझायनर सांगतात.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
IND vs AUS: It's not easy to hit the ball where there is no fielder Aussie legend Mark Waugh's big statement on Suryakumar
Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

खास गणेशोत्सवात मिरवण्यासाठी अजूनही तरुणींकडून साडीलाच प्राधान्य दिलं जातं. पारंपरिक पोशाखांमध्ये साडीचा विचार पहिल्यांदा केला जातो. साडीत साडी पैठणी हाच प्रभाव आजही अनेकींच्या मनात आहे. त्यामुळे मुलींना एकतर आईची ठेवणीतली पैठणी नेसायची असते. अगदीच घर-ऑफिस ही तारेवरची कसरतही सांभाळायची असेल तर मग साडी नेसणं सहजशक्य होणार नाही. त्यामुळे मग पैठणीचा ड्रेस शिवण्यासाठी एकच धांदल उडते. हल्ली मार्केटमध्ये पैठणीचे पंजाबी ड्रेसेस, गाऊन, वनपीस असे वेगवेगळे रेडिमेड पर्याय सहज उपलब्ध झाले आहेत. पैठणी किंवा कॉटन-सिल्कच्या साडय़ांपासून कुर्ते डिझाइन करून घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे मत फॅशन डिझायनर वैष्णवी कावळे हिने व्यक्त केले. ‘सध्या बाजारात रेडिमेड गाऊन मिळत असले तरीही आईच्या, आजीच्या साडीचा कुर्ता, गाऊन बनवून घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकदा आई किंवा आजीच्या साडीशी एखादी आठवण जोडलेली असते किंवा ती साडी खूप आवडीची असते. अशा वेगवेगळय़ा कारणांमुळे का होईना, पण या साडय़ांचे ड्रेस परिधान करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो असं मुली सांगतात. शिवाय, आपल्याला हवा तसा ड्रेस शिवून घेता येतो. साडीचे ड्रेस शिवतानाही साडीचे काठ वा पदर वापरून ते ठसठशीतपणे दिसेल अशा पद्धतीचे डिझाइन करून घेण्यावर त्यांचा अधिक भर असतो’ असे वैष्णवीने सांगितले.

उत्सव साडीशिवाय अपूर्ण ही भावना जोर धरून असल्याने पारंपरिक काठपदराच्या भरजरी साडय़ा, पैठणी, इरकल, कांजीवरम वा खणाच्या साडय़ांना अधिक मागणी असते. त्यातही पारंपरिक साडीवर मॉडर्न पद्धतीने शिवलेला ब्लाउज पेअर केला जातो. अनेकदा साडी साधीच असते, मात्र त्यावरचा ब्लाऊज फॅन्सी वा वेगळय़ा पद्धतीने डिझाइन करून घेतला जातो. बाजारात आणि ई कॉमर्स साइट्सवरही रेडिमेड ब्लाऊज ३०० ते ४०० रुपयांपासून सहज उपलब्ध आहेत. साडी आणि ब्लाऊज यांची रंगसंगती साधता आली तर पारंपरिकपणा जपणं आणि वेगळा लुक मिळवणं या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. ‘गणेशोत्सवाच्या काळात ब्लाऊजला मोठय़ा प्रमाणात मागणी असते’ असे फॅशन डिझायनर प्रियांका लांजेकर सांगते. पारंपरिक साडीवरही मॉडर्न लुक मिळेल अशा पद्धतीने डिझाइन केलेले ब्लाऊज उत्तम पर्याय ठरतात. या ब्लाऊजच्या किमती साधारणपणे हजार रुपयांपासून सुरू होतात. त्यातही मागच्या बाजूने केलेले पॅचवर्क वा डिझाइन असलेल्या आणि खासकरून गडद रंगांच्या ब्लाऊजना अधिक मागणी असते, असेही प्रियांकाने सांगितले.      

साडीबरोबरच गणपतीच्या दिवसांत रेडिमेड वा शिवून घेतलेल्या एथनिक ड्रेसेसना अधिक मागणी असते, असे फॅशन डिझायनर दिशा पाटील हिने सांगितले. गणेशोत्सवासाठी ड्रेसेस हवे असतील तर दोन ते तीन महिने आधी ड्रेसेसची ऑर्डर घेतली जाते. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार फॅब्रिक, डिझाइन ठरवून ड्रेसेस शिवले जातात. या काळात दहा हजारांपासून ते पन्नास हजार किमतीपर्यंत ड्रेसेस शिवून घेतले जातात, असे दिशाने सांगितले. अगदीच पारंपरिक नको, पण सणात खूप मॉडर्न कपडेही नकोत असा विचार करणाऱ्यांसाठी सध्या बाजारात भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. ‘कॉर्ड सेट’ नावाने बाजारात आलेला प्रकार प्रचंड गाजतोय. यामध्ये वरचा आणि खालचा कपडा हा सारखाच असतो. मग यात कुर्ता आणि पँट्स तसंच शर्ट आणि पँट्स, कुर्ता आणि पायजमा असे प्रकार बघायला मिळतात. कॉटन, सॅटिन अशा वेगवेगळय़ा फॅब्रिक्समध्ये असणारे हे कॉर्ड सेट अगदी इझी टू गो आणि तितकेच सणासुदीला उठून दिसणारे आहेत. यात विशेषत: गडद हिरवा, लिंबू कलर, गुलाबी, मरून रंगाच्या सेट्सना मागणी आहे. कॉर्ड सेट्स आणि त्यावर नाकात छोटीशी नथ जरी घातली तरी इंडो वेस्टर्न लुक छान साधला जातो. अंगठी, नथ अशा मोजक्या अ‍ॅक्सेसरीज यावर मिसमॅच करता येतील.

मिसमॅच हा पर्यायही तुम्हाला ड्रेसेसमध्ये वेगवेगळे पर्याय देऊ शकतो. सिल्क, चंदेरी, कॉटन कोणत्याही फॅब्रिकचे प्लेन कुर्ते आणि त्यावर भरजरी वा डिझाइन केलेल्या वेगवेगळय़ा रंगसंगतीच्या ओढण्या पेअर करणे शक्य आहे. कुर्ते आणि जीन्स हाही प्रकार अजून लोकप्रिय आहे. त्यासाठी नवीन ड्रेस खरेदी केले पाहिजेत असेही नाही, तुमच्या कपाटात असलेल्या खास कलमकारी, इकत प्रिंटच्या ओढण्या आणि प्लेन कुर्ते अशा ठेवणीतल्या गोष्टींचा वापर करून पारंपरिक तरी मॉडर्न लुक साधता येईल. याशिवाय, रेडिमेड नऊवारी साडय़ा, मॉडर्न पद्धतीच्या रेडी टु वेअर साडय़ा, सारी ड्रेस, वा विविध पद्धतीचे ड्रेपिंग करून साडी नेसलेली साडी, त्यावर सोन्याचे वा ऑक्सिडाइज्ड दागिने, गजरे, अंबाडा असा उत्तम पारंपरिक लुक करता येईल. ड्रेसेसवर एखादी पिंट्रेड बॅग, साडीवर पोटली अशा काही अ‍ॅक्सेसरीज कपाटात असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे खूप धावपळ न करताही तुम्ही गणेशोत्सवात तुम्हाला हवी तशी कपडय़ांची फॅशन करू शकता. खास डिझायनर्सकडून शिवून वा बुटिकमधून रेडिमेड एथनिक ड्रेसेसचेही भरपूर पर्याय उपलब्ध असल्याने परंपरेतही नवं काही शोधण्याचा तुमचा हट्ट नक्कीच पूर्ण होऊ शकतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-09-2023 at 02:45 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×