मितेश रतिश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२० आणि २०२१ या वर्षांत कोव्हिडमुळे पदार्थावर नवीन प्रयोग झाले नाहीत. या वर्षी खाऊच्या आणि कामाच्या बाबतीतही बाहेरचे जग पूर्णपणे खुले झाले असले तरी अनेक क्षेत्रांत अजूनही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे अशा संमिश्र वातावरणात यंदा खाऊच्या विश्वात कोणते नवीन बदल घडून येतील, याचा हा लेखाजोखा..

कोव्हिडमुळे गेल्या दोन वर्षांपासून नवीन फूड ट्रेण्ड्स फारसे आलेले नाहीत. जसजसा काळ पुढे जातो, तसतसे बदल पृथ्वीतलावर घडत जातात. मग त्यात भौगोलिक परिस्थिती, हवामान, प्राणी, पशू-पक्षी इत्यादींबरोबरच आपल्या खाण्याच्या सवयीसुद्धा बदलल्या जातात. थोडक्यात बदल हा अटळ आहे आणि आवश्यकही आहे. ख्यातनाम सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांच्या मते, पुढील येणाऱ्या काळात घरी पदार्थ तयार करण्याचं प्रमाण हे अशंत: कमी होईल आणि जेवण ऑर्डर देण्याकडे लोकांचा कल जास्त असेल. याचंच स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, ‘‘करोनाकाळापासून जन्माला आलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेमुळे घरात बसून लॅपटॉपवर काम करणे व बसल्या – बसल्या खाणे याचे पेव फुटले आहे. यातूनच क्लाऊड किचनचा जन्म झाला असे मला वाटते. या सगळय़ातून फूड इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच स्पर्धा निर्माण झाली ती अशी की, नवनवीन पदार्थ देण्याकडे रेस्टॉरंटचा कल वाढला. मग त्यातून फ्युजनचे प्रकार ताटात आले. त्याचबरोबर असे दिसून आले की, सध्याची पिढी कॅलरी-कॉन्शस झालेली आहे. टक्केवारीत सांगायचे झाले तर पन्नास टक्के मुलं-मुली ही मोजून, मापून खाताना दिसतात. मग आठवडय़ातील एक किंवा दोन दिवस ते मनाला जे वाटेल ते खाण्यासाठी राखून ठेवतात. त्या दिवसात नवनवीन रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथे नवीन काय मिळतं ते बघतात. त्याचबरोबर यूटय़ूबवर येणाऱ्या  जगभरातल्या लाखो पदार्थाचे प्रयोग काही मंडळी घरी करतात. रेडी टू युज, रेडी टू कुक, रेडी टू इट अशा पदार्थाची मागणी वाढली.’’ म्हणजेच लॅपटॉपवर काम करता-करता मायक्रोव्हेवमध्ये नुसतं पाकीट उघडून त्यात पाणी किंवा गरज असेल तिथे दूध, दही, क्रीम घातलं की पदार्थ तयार. हा ट्रेण्ड पुढच्या काळातही सुरू राहील, असे शेफ विष्णू मनोहरांचे मत आहे.

खाद्यपदार्थाच्या क्षेत्रातही टेक्नॉलॉजीचा एक वेगळाच प्रभाव पडतो आहे. त्याकडे लक्ष वेधताना, पुढच्या काही वर्षांत आयओटीकडे लोकांचा कल वाढेल, असं विष्णू मनोहर सांगतात. ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ म्हणजे रोबोट तुमचं जेवण बनवेल, तोच तुमचं जेवण हॉटेलमधून आणून देईल, तुम्हाला कांदे कापण्यापासून पदार्थ बनवेपर्यंत हरतऱ्हेची मदत रोबोट  करेल. ही अशी टेक्नॉलॉजी अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात बघायला मिळते आहे. हळूहळू त्यांचे पाय भारतातही पसरत आहेत आणि याला लोकांचीसुद्धा साथ असेल. कारण लोकांच्या मते, त्यांची सर्जनशीलता आणि वेळ स्वयंपाकात घालवण्यापेक्षा कामात घालवला तर त्याचा किती तरी मोठा फायदा होईल. ज्याप्रमाणे घराबाहेर असताना मोबाइलवरून तुम्ही पाण्याचा पंप, एसी, डोअर लॉक सिस्टीम ऑपरेट करू शकता त्याचप्रमाणे जेवणाचे काही पदार्थ रोबोट तुमच्यासाठी तयार करतील. हा ट्रेण्ड लवकरच बघायला मिळेल, असं ते सांगतात. अमेरिकेत असताना टेक्नॉलॉजी आणि फूडचा एकमेकांच्या बरोबरीने सुरू असलेला प्रकार अनुभवला असल्याची माहिती त्यांनी दिली. तुम्हाला झोपेतून उठल्यावर कॉफी लागत असेल तर तुमचा त्या पद्धतीने सेट करून ठेवलेला गजर वाजल्याबरोबर तुमचं वॉटर हीटर सुरू होतं. पाणी गरम झाल्याबरोबर त्यात कॉफी पडते आणि तुम्ही तोंड धुऊन येईस्तोवर तुमच्यासमोर कॉफी तयार असते.

थोडक्यात, करोनाकाळात पदार्थाचे प्रकार फारसे बदलले नाहीत. मात्र नेहमीचे पदार्थ बनवण्यापासून तुमच्याकडे येण्यापर्यंतचे फंडे मात्र या आणि येत्या काही वर्षांत कमालीचे बदललेले पाहायला मिळणार आहेत. काही प्रमाणात पदार्थ बनवण्याचा वेळ वाचवण्यासाठीही प्रयोग केले जातील. संचारमुक्ती व जमावबंदीच्या काळात लोकांनी वेळ जावा म्हणून समाजमाध्यमांवर आसपासच्या भागातील खाऊच्या ठेल्यांचे अनेक व्हिडीओ बघून कुठेकुठे जायचं खायला याची लिस्ट केलेली अनेक उदाहरणं आजूबाजूला बघायला मिळत आहेत. ‘मेहुला द फर्न’ हॉटेलचे शेफ परिमल सावंत यांच्या मते, या वर्षभरात स्ट्रीट फूड खाण्यावर लोकांचा भर हा अधिक असेल. अनेक ठिकाणी तो पदार्थ पेश करण्याची पद्धत ही अतिशय रंजक असते किंवा तो पदार्थ इतका हटके असतो की, तो खाण्यासाठी लोक गर्दी करतात. ही गर्दी या वर्षभरात वाढता वाढता वाढे असेल. वेगवेगळय़ा हॉटेलमध्ये वेगवेगळी रंजक वातावरणनिर्मिती केली जाते. ती अनुभवण्यासाठी लोक गर्दी करत आहेत व करत राहतील. किमान हे वर्ष तरी काही तरुण तुर्क हे डाएट बाजूला ठेवतील व स्ट्रीट फूडचा आनंद घेतील, असेही परिमल यांचे मत आहे. याशिवाय, वीकेंड मजेत घालवण्यासाठी मित्रांबरोबर किंवा घरच्यांबरोबर भ्रमंतीला सतत जाणे आणि गेल्या दोन वर्षांत बाहेर न गेल्याची खंत भरून काढणे ही मानसिकतादेखील लोकांची असेल. रिसॉर्ट निवडताना ते युनिक असण्याबरोबरच तिथे अस्सल गावरान पदार्थ मिळतील का, याची चाचपणी तरुण वर्गाकडून होताना दिसते, असंही त्यांनी सांगितलं. एकामागून एक वर्ष सरतात. बदल होत राहतात. शेवटी बदल हा अटळ आहे आणि काळानुसार बदल हा व्हायलाच हवा. खाऊतला हा बदल आणि खाऊच्या नवीन तऱ्हाही स्वीकारायला हव्यात तरच त्यातील गंमत अनुभवता येईल.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat different substance eat world completely open food trends celebrity chef ysh
First published on: 29-04-2022 at 00:02 IST