होळी आणि रंगपंचमी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. रंगांचा हा सण उत्साह, आनंद आणि मैत्रीचे प्रतीक असला, तरी या सणाच्या निमित्ताने वापरल्या जाणार्‍या बाजारातील रासायनिक रंगांमुळे त्वचा, डोळे आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर शहरातील काही तरुण पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेऊन मागील दोन तीन वर्षांपासून नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा घेण्याचे प्रयत्न केले आहेत.

बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक कृत्रिम रंगांमध्ये लीड, मक्र्युरीसारखे घटक असतात, जे त्वचाविकार, ॲलर्जी आणि पाण्याचे प्रदूषण वाढवतात. नैसर्गिक रंग मात्र त्वचेसाठी सुरक्षित असतात आणि जैवविघटनशील असल्याने पर्यावरणपूरक ठरतात. हीच बाब लक्षात घेऊन काही तरुणांनी नैसर्गिक पर्याय पुढे आणण्याचा निर्धार केला.

‘नॅचरल एक्सप्लोरल’ ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवते आहे. त्यांच्या या कार्यशाळेत झेंडू, शेवंती, पलाश, बीट, हळद आणि पालक यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून रंग तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष शिकवण्यात येते. फुलांची वाळवून पूड करणे, भाजीपाल्यापासून द्रवरूप रंग तयार करणे, तसेच रंग अधिक टिकाऊ करण्यासाठी वापरले जाणारे नैसर्गिक घटक याविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येते. सहभागी मुलांना स्वत: रंग तयार करून त्यामागील वैज्ञानिक कारणेही जाणून घेण्यास मदत केली जाते.

हेही वाचा

दरवर्षी होळी झाल्यानंतर जलप्रदूषण वाढल्याच्या तक्रारी येतात. तलाव आणि नद्यांमध्ये मिसळलेले कृत्रिम रंग जलीय जीवसृष्टीसाठी घातक ठरतात. त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर हा केवळ ट्रेंड नसून काळाची गरज आहे, असे ‘नॅचरल एक्सप्लोरल’ची प्रियल भरत सोनी हिने सांगितले. काही ठिकाणी तांदळाचे पीठ, बेसन यांचा वापर करून रंग अधिक मऊ आणि त्वचेस सुरक्षित कसे बनवावे या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

मुंबईतील काही पर्यावरणप्रेमी तरुण अशा प्रकारच्या कार्यशाळा होळीच्या निमित्ताने आयोजित करतात. यामधून ते पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देतात आणि नैसर्गिक रंगांची ओळखही करून देतात. शालेय विद्यार्थ्यांना बाजारातून आणलेले रंग कशापासून बनवलेले असतात. त्यांपासून होणारे धोके काय याची पूर्ण माहिती नसल्याचेही प्रियलने यावेळी सांगितले. कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांना याबाबत माहिती देणे हा मुख्य उद्देश असल्याचे ती सांगते. या उपक्रमातून केवळ रंगनिर्मितीच नव्हे तर पाण्याची बचत, कोरडी होळी साजरी करण्याचा संदेशही देण्यात येतो.

सणांचा मूळ हेतू निसर्गाशी आणि समाजाशी नाते दृढ करणे हा आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करणे ही काळाची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमी सचिन राणे याने व्यक्त केले. सचिनने करोनाकाळातही ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करून मुलांना नैसर्गिक रंग बनविण्याचे धडे दिले आहेत.

आजही तो विविध शाळांमध्ये जाऊन मुलांना नैसर्गिक रंगाविषयी माहिती देऊन ते बनविण्याचे प्रशिक्षण देतो. ‘पर्यावरणपूरक होळी’चा संदेश देणारी ही कार्यशाळा समाजात सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, सचिनचे कुटुंबीय होळीनिमित्त दरवर्षी नैसर्गिक रंग बनवून त्याचा वापर करतात. याचबरोबर लहान मुलांमध्ये रंग खेळण्याची विशेष उत्सुकता असते. मात्र त्यांच्या नाजूक त्वचेवर रासायनिक रंगांचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

नैसर्गिक रंग त्वचेस सौम्य आणि सुरक्षित असल्याने पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. मुलांना आनंद मिळावा आणि आरोग्याचीही काळजी घेता यावी, या दुहेरी हेतूने अनेक पालकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतल्याचे सचिन सांगतो.

होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला, तरी तो साजरा करताना पर्यावरणाची जबाबदारी पार पाडणे तितकेच आवश्यक आहे. नैसर्गिक रंगांचा वापर, पाण्याची बचत आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास सण अधिक अर्थपूर्ण ठरू शकतो. तरुणांच्या या पुढाकारामुळे समाजात काही प्रमाणात का होईना सकारात्मक बदल घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

viva@expressindia.com