नाटक ही एकमेव कला आहे जी वेगवेगळे प्रांत, वेगवेगळे देश, प्रदेश आणि संस्कृतींना जोडते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून जगात अमूलाग्र बदल झाले, उत्क्रांती झाली, तंत्रज्ञान आले, पण एक चळवळ शांतपणे, आपल्या वेगाने कित्येक वर्षे सुरू आहे आणि त्यातून कलाकार घडवते आहे ती म्हणजे प्रायोगिक नाटकांची चळवळ.
ओटीटी, व्हीएफएक्स-ॲनिमेशनपटांच्या गर्दीतही सध्या प्रायोगिक नाटकांकडे प्रेक्षक आकर्षित होत आहेत. प्रायोगिक नाटकांमध्येही आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण संहिता असे अनेक बदल झाले आहेत. पण, या बदलांचा हात धरून आशय-मांडणीमध्ये सातत्याने प्रयोग करत नव्या जाणिवा पोहोचवणं हा प्रायोगिक रंगभूमीचा गाभा जपत आजची तरुण पिढी ही चळवळ पुढे नेताना दिसते आहे.
गेल्या काही दशकांत तरुणाईच्या आधुनिक विचारांची जोड प्रायोगिक रंगभूमीला मिळाली आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये अगदी महाविद्यालयांपासूनच प्रायोगिक रंगभूमीचे धडे गिरवले जातात. नाटकांचे ग्रुप विविध नाट्य स्पर्धा भरवतात, नावीन्यपूर्ण विषयांवर वाचन, अध्ययन, तालिमी होत असतात. सध्या रंगभूमीवर ‘रंगपंढरी’ संस्थेचे ‘बरड’, अभिनेत्री विभावरी देशपांडे लिखित-दिग्दर्शित ‘मग तू मला खा’, ‘महापूर’, ‘इथेच टाका तंबू’ अशी प्रायोगिक नाटकं सुरू आहेत. या नाटकांमध्ये आघाडीचे तरुण अभिनेते, अभिनेत्री आहेतच, त्याचबरोबरीने फक्त मनापासून प्रायोगिक नाटक करू पाहणार्या महाविद्यालयीन कलाकारांची संख्याही तितकीच लक्षणीय आहे.
प्रायोगिक नाटकांकडे केवळ ‘छंद’ म्हणून न बघता, त्याकडे एक ‘कलाप्रकार’ आणि ‘जीवनशैली’ म्हणून सध्याची तरुण पिढी बघते आहे. याबद्दल बोलताना अभिनेत्री शर्वरी लहाडे सांगते, ‘प्रायोगिक नाटक म्हणजे साचेबद्ध चौकटी मोडणं. तरुण पिढीला भिडणारे विषय निवडताना कलाकार आजच्या अस्वस्थतेकडे पाहतात, करिअरचं दडपण, सोशल मीडियामुळे येणारा एकटेपणा किंवा जेंडर फ्लुइडिटीसारखे मुद्दे या नाटकांमध्ये केंद्रस्थानी असतात. दैनंदिन जीवनातील विरोधाभास, कॉर्पोरेट पोकळपणा, नात्यांतील गुंतागुंत आणि जनरेशन गॅप, नव्या दृष्टिकोनातून मांडले जातात. तसंच, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जात-धर्म संघर्ष यांसारख्या सामाजिक-राजकीय प्रश्नांचीही रुपकात्मक पद्धतीने मांडणी केली जाते.’
प्रायोगिक एकांकिकांमधून व्यावसायिक नाट्यनिर्मिती ही नवीन गोष्ट राहिलेली नाही, मात्र एकांकिका यशस्वी ठरल्यावर त्याच नाटककाराच्या हातात त्या एकांकिकेचे व्यावसायिक नाटक करण्याची जबाबदारी सोपवत रंगभूमीवर आलेले ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ हे नाटकसुद्धा सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेते आहे. या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना हा तरुण नाटककार गेला दशकभराहून अधिक काळ पुण्यात प्रायोगिक नाटक जपण्याची आणि वाढवण्याची धडपड करतो आहे.
प्रायोगिक रंगभूमीवर तरुण पिढीचा सहभाग नेमका कसा आहे, याबद्दल विनोद सांगतो, ‘काही तरुण कलाकारांनी प्रायोगिक रंगभूमीवरच करिअरचं करायचं ठरवलं आहे, तर काहीजण फक्त आवड म्हणून प्रायोगिक नाटक करत आहेत. याशिवाय, नोकरीधंद्याचा प्लॅन ‘ए’ वेगळा आहे आणि नाटक हे प्लॅन ‘बी’मध्ये असणारेही बरेच आहेत.’
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’च्या बाबतीत बोलायचं तर सुदैवाने या नाटकाची व्यावसायिक निर्मिती झाली आणि त्याला छान यश मिळतं आहे, असं सांगतानाच ‘फोक आख्यान’ सारख्या वेगळ्या प्रयोगालाही भरपूर लोकप्रियता आणि यश मिळालं आहे, याकडे त्याने लक्ष वेधलं. ‘अशा कलाकृतींमुळे तरुण कलाकारांचा दृष्टिकोन बदलतो आहे, आपण प्रयत्न करत राहिलं तर हळू हळू का होईना यश मिळतं आहे हे त्यांना लक्षात आलं आहे. त्यामुळे ज्यांना खरंच प्रायोगिक नाटकांमध्ये रस आहे, त्यांनी आता पूर्ण वेळ नाटकातच काम करायला सुरुवात केली आहे. ज्यांना मनापासून फक्त नाटक करायचं आहे, त्यांना प्रायोगिक आणि व्यावसायिक असा फार फरक जाणवत नाही, सध्या जी तरुण मंडळी कार्यरत आहेत त्यांचं खरोखर नाटकावर प्रेम आहे आणि म्हणून ते काम करतायेत, असंही विनोदने सांगितलं.
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकाची प्रसिद्धीही काहीशी आजच्या तरुण पिढीला आवडणार्या माध्यमातून झाली आहे. या नाटकात कलाकार ‘युवती मना’ हे नाट्य संगीत गातात, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाला. अगदी प्रयोगादरम्यानही या परफॉर्मन्सला प्रेक्षकांकडून वन्स मोर मिळतो. या नाटकाची निर्मिती संस्था असलेली कलादर्शन पुणे आणि विनोद रत्ना दिग्दर्शित ‘तिळगूळ घ्या गोडबोले’ ही आणखी एक नवीन एकांकिका लवकरच रंगभूमीवर येणार असून यातही तरुण जोडप्याची गोष्ट सांगितली आहे.
अजूनही प्रायोगिक नाटकांचे व्यावसायिकीकरण किंवा अर्थार्जन म्हणावे तेवढे बहरलेले नाही, तरीही तरुण पिढी मोठ्या संख्येने सध्या कलाकार म्हणून प्रायोगिक नाटकांकडे वळते आहे. शिवाय, प्रेक्षक म्हणूनही तरुणाईचा कल एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांकडे अधिक आहे. याबद्दल बोलताना शर्वरी सांगते, ‘प्रायोगिक नाटक हे पैसे कमावण्यापेक्षा ओळख आणि अनुभव देणारं क्षेत्र आहे; त्यामुळे फक्त त्यावर घर चालवणं कठीण असल्याने कलाकार वेब सिरीज, जाहिराती, व्यावसायिक नाटक किंवा डबिंगमधून उत्पन्न मिळवतात आणि त्या आधारावर प्रायोगिक रंगभूमीची भूक जपतात.
हीच रंगभूमी त्यांची प्रयोगशाळा ठरते, इथे मिळालेला अनुभव, ज्ञान पुढे चित्रपट किंवा मोठ्या पडद्यावर उपयोगी पडतं आणि अनेक दिग्गज कलाकार इथूनच घडले आहेत; आज ग्रँट्स, फेलोशिप्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे कामाच्या संधीही वाढत आहेत, काही प्रमाणात आर्थिक पाठबळही उपलब्ध होतं आहे.’ प्रायोगिक नाटकांचा खरा गाभा संहितेत दडलेला असून ती फक्त लिहिली जात नाही, तर घडवली जाते.
दैनंदिन आयुष्यातील निरीक्षण, स्टेजवरील उत्स्फूर्त प्रयोग, तसंच साहित्य, मुलाखती, मानसशास्त्र-सामाजशास्त्र आणि डिजिटल आर्काइव्ह्स यांच्या अभ्यासातून नाटकांची निर्मिती होते, त्यामुळे अनुभवाचा मोठा खजिना तरुण कलाकारांसाठी उपलब्ध असतो, असंही तिने सांगितलं.
सध्या रंगभूमीवर एकापेक्षा एक दर्जेदार प्रायोगिक नाटकं सुरू आहेत. या सगळ्याच नाटकांमध्ये तरुण कलाकारांचा सहभाग आहे, बर्याचशा नाटकांची निर्मिती, कथा, दिग्दर्शन यामध्येही तरुणांचा वाटा आहे. सर्वोत्कृष्ट नाटकासाठी ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार प्राप्त झालेल्या ‘बरड’ या नाटकात सामाजिक परिस्थितीनुसार बदलत चाललेल्या नातेसंबंधांचा चढता-उतरता आलेख आणि भवतालातील घटनांनी घेतलेला मनाचा ताबा यावर भाष्य केले असल्याने त्याला प्रेक्षकपसंती मिळते आहे.
याशिवाय, अभिनेत्री विभावरी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मग तू मला खा’ हे सोशल मीडिया आणि रूढ शारीरिक प्रतिमा हा विषय मांडणारे मनोवैज्ञानिक नाटक आहे. यात ऋचा आपटे, शर्वरीसारखे आघाडीचे तरुण कलाकार आहेत. दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित वर्तमान वास्तवावर थेट बोलणार्या ‘इथेच टाका तंबू’ या नाटकातही आजचे लोकप्रिय तरुण चेहरे ओंकार गोवर्धन, अश्विनी कासार, अमेय बर्वे आणि उमेश जगताप यांच्या भूमिका आहेत.
आजची प्रायोगिक नाटकं केवळ पर्यायी प्रयोग न राहता मुख्य प्रवाहाला दिशा देणारी ठरत आहेत. ती वैयक्तिक अनुभव, मानसिक आरोग्य, ओळख, तसंच जात, लिंग, पर्यावरण, शहरी जीवन आणि डिजिटल प्रभाव यांसारखे समकालीन विषय प्रतीकात्मक पद्धतीने मांडतात. सरधोपट कथनाला दिलेला फाटा, प्रतीकात्मकता, अब्सर्डिटी आणि विविध माध्यमांचा वापर करत प्रायोगिक नाटक सादर केलं जातं.
कथानकापेक्षा पात्रांची मानसिक अवस्था, कल्पना आणि अनुभव केंद्रस्थानी येतात, त्यामुळे अशा नाटकांचा उद्देश कथा सांगण्यापेक्षा प्रेक्षकांना त्यात सहभागी करून घेत प्रभावी अनुभव देणं हा असतो. आणि म्हणूनच मुक्ताविष्कार असणारं प्रायोगिक नाटक तरुण पिढीला अधिक भावतं आहे.
viva@expressindia.com
