सध्या फॅशन नगरीत दर आठवडय़ाला कुठला ना कुठला तरी फॅशन शो संध्याकाळ रंगवत असतो. या झगमगाटी फॅशन शोच्या रॅम्पमागे किती आणि कोणाची मेहनत असते, कसं असतं तिथलं वातावरण.. आँखो देखा हाल.
‘जरा एक मिनिट ऐकता का ती डिझायनर जिचा आता शो आहे.’
‘हां तिचं काय?’
‘कुठे भेटेल? मला जरा बोलायचं होतं तिच्याशी.’
(माझ्या गळ्यातला मीडिया पास बघत) ‘अहो असेल ती बॅकस्टेजला, विचारा तिकडे कुणाला तरी.’
‘अहो पण तिकडे नाहीय ती.. मी बघून आलीय.’ माझं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच तो मदतनीस गर्दीत गायब झाला होता.
साधारणपणे कुठल्याही फॅशन शोला जाऊन डिझायनरच्या टीमपकी कोणालाही भेटायचं असल्यास ‘बॅकस्टेजला जाऊन बघा.’ हे वाक्य माथी मारलं जातं. बॅकस्टेज हा कुठल्याही फॅशन शोमधला मोठा भूलभुलया असतो. ती जितकी घाई गडबडीची जागा असते तितकीच प्रत्येक शोसाठी महत्त्वाची जागा असते.
एक शो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शोच्या पाठीमागची – बॅकस्टेजची अख्खी एक टीम मेहनत घेत असते. या बॅकस्टेजला अनेक ठिकाणी स्पीकरच्या तारा लोंबकळत असतात तर कुठे जास्तीचे लाइट्स ठेवलेले असतात. एका कोपऱ्यात सेटचे जास्तीचे तुकडे ठेवलेले असतात, तर दुसरीकडे रंगाचे रिकामे डबे कलंडलेले पाहायला मिळतात. मजुरांची ये-जा तर कायमची असते. कुणी आर्टस्टि सेटचं वारंवार निरीक्षण करत असतो तर कुठे शोच्या आयोजकांची टीम सगळं काही सुरळीत पार पडतंय ना याची खातरजमा करत असते. हे सगळं होत असताना शोच्या काही तास आधी मॉडेल्सची टीम बॅकस्टेजला हजर होते. त्या शोसाठी तयार होण्यासाठी बांधलेल्या तात्पुरत्या खोल्यांमध्ये आपल्या नावाच्या खुर्चीवर विराजमान होतात. प्रत्येक खोलीत ६- ७ मॉडेल्स अशी या खोल्यांची विभागणी केलेली असते. बसायला खुर्ची, समोर टेबल आणि टांगलेला आरसा इतकीच प्रत्येकाची जागा आखलेली असते.

हरहुन्नरी मदतनीस
त्यांच्या आगमनानंतर लगेचच तिथे काम करणाऱ्या मजुरांची, मदतनीसांची बाहेर वर्णी लागते. एकदा सर्व मॉडेल्सची हजेरी लागली की मेकअप आर्टस्टि त्यांच्या मेकअपची तयारी सुरू करतात. मेकअप आर्टस्टिचा मेकअप चालू असताना मॉडेल्सना शोचे कोरियोग्राफर सरावासाठी बोलवतात. हा सराव करता करता मॉडेल्सना त्यांचा उरलेला मेकअप पूर्ण करायचा असतो.  एकदा मेकअप आर्टस्टिचं काम झालं की, त्यांच्या खोल्यांमध्ये मॉडेल्सच्या मदतनीसांचे आगमन होते.
हे मदतनीस कधी कॉलेजची मुले असतात, कधी शोच्या आयोजकांकडून पुरवलेली मंडळी असतात, तर कधी इतर कोणी. या मदतनीसांच्या हातात मॉडेल्सना वेळेवर तयार करायची जबाबदारी असते. एकदा ही मंडळी बॅकस्टेजला आली की शोच्या मुख्य कामाला सुरुवात होते. डिझायनर टीम प्रत्येक मदतनीसाला त्यांच्या मॉडेल्सनी घालायचा ड्रेस, इतर अ‍ॅक्सेसरीज, दागिने यांची माहिती देतात. एखादी गोष्ट विशिष्ट प्रकारे मॉडेलने घालायची असल्यास त्याची कल्पना या मदतनीसांना दिली जाते. त्याचबरोबर एखाद्या ड्रेसचं फिटिंग बरोबर झालंय की नाही, नसल्यास त्याला शोच्या वेळेस दुरुस्त करणे हे कामसुद्धा मदतनीसांचे असते. अशा वेळी शोच्या आधी मॉडेलला तो ड्रेस घालायला सांगून तिला आवश्यक असलेली दुरुस्ती करून ठेवावी लागते. ही दुरुस्ती करताना तो ड्रेस उसवण्याचे किंवा त्याला जादाची पिन लावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य या मदतनीसांना दिलेले असते. ब्रायडल वीकसारख्या काही महत्त्वाच्या शो दरम्यान या मदतनीसांच्या हाती सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिनेही दिले जातात. ते नीट जपून ठेवण्याची आणि शोनंतर जबाबदार व्यक्तीच्या हाती द्यायची जबाबदारी त्यांचीच असते.
फक्त ३० सेकंदात तयारी
शोच्या अर्धा तास आधी मॉडेल्सना तयार होण्याचा इशारा मिळतो आणि त्यांचं खरं काम सुरू होतं. एकदा मॉडेल्सना पहिल्या लूकमध्ये तयार केलं की, मदतनीस दुसऱ्या लूकची तयारी करू लागतात. कारण शो सुरू झाल्यावर प्रत्येक मॉडेलला तिच्या पुढील लूकसाठी तयार करण्यासाठी त्यांच्याकडे फक्त ३० सेकंदांचा कालावधी असतो. त्यामुळे या वेळेत कपडे हँगरवरून काढणं, त्यांची हुक-बटन्स खुली करून ठेवणं ही सर्व कामं त्यांना करावी लागतात. शोच्या अध्र्या तासात मॉडेल्स आणि मदतनीस यांच्या खेरीज कुणालाही बॅकस्टेजला जायला परवानगी नसते. स्त्री मदतनीसावर अजून एक महत्त्वाची जबाबदारी असते. ती म्हणजे जेव्हा जेव्हा तिची मॉडेल कपडे बदलत असते तेव्हा खोलीचा पडदा बंद आहे याची खातरजमा करणे. बॅकस्टेजला बांधलेल्या या खोल्यांना दरवाजे नसतात. मॉडेल्सना ये-जा करताना गरसोय होऊ नये म्हणून दरवाजांच्या जागी पडदे लावलेले असतात. शक्यतो शोच्या वेळेस त्या भागात कुणी फिरकत नाही, परंतु एखादा आंबटशौकीन किंवा चुकून कोणी तिथे आल्यास त्यांच्यामुळे मॉडेल्सची स्थिती अवघडून जाऊ नये यासाठी पडदे लावण्याची काळजी मदतनीसांना घ्यावी लागते.
शोच्या दरम्यान मॉडेल्स आणि त्यांची मदतनीस यांत विश्वासाचे नाते बनून जाते. मॉडेल तिच्या मदतनीसाकडे तिचा फोन, पाकीट कधी कधी तर चेन, अंगठी आणि कपडे सगळंच सोपवून निर्धास्त असते आणि ती मदतनीससुद्धा त्या गोष्टींची योग्य काळजी घेऊन तिचा आपल्यावरील विश्वास सार्थ करते. शो संपल्यावर सर्वजण आपापल्या वाटेला निघून जातात. मागे उरते ते विश्वासाचे नाते जे दुसऱ्या शोच्या वेळी पुन्हा दोन अनोळखी चेहऱ्यांमध्ये जोडले जाते.
फॅशन शो आणि उपस्थित मांदियाळी
जर फॅशन शोचा बॅकस्टेज हा भूलभुलया असेल तर तर मूळ शोच्या भागाला लोकांची जत्रा म्हणावी लागेल. फॅशन शोला तसं पाहायला गेलं तर या शोजची आमंत्रणं फार कमी लोकांना दिलेली असतात. त्यात प्रामुख्याने समावेश असतो तो म्हणजे प्रसिद्धीमाध्यमांचा आणि डिझायनरच्या ग्राहक वर्गाचा. अर्थात हा ग्राहक वर्ग म्हणजे एखाद दुसरा ड्रेस विकत घेणारे नसून मोठमोठय़ा डिझायनर दुकानांचे व्यवस्थापक, परदेशी ग्राहक हे असतात. या मंडळींकडे डिझायनर आधीच आपल्या कलेक्शनचे कॅटलॉग पाठवतो. परंतु चित्रात दिसणारा ड्रेस वास्तवात कसा दिसतो, कोणता ट्रेंड बाजारात चालेल हे सर्व पडताळण्यासाठी ते शोला हजेरी लावतात. याखेरीज काही उच्च वर्गातील मंडळी, एलिटिस्ट्स, सोशलाइट्स, सिने तारे-तारका यांची हजेरी शोज्ना असते.
आता या फॅशन शोज्ना यायची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. आधी सांगितल्या प्रमाणे डिझायनर दुकानांचे व्यवस्थापक आपण ज्या कलेक्शनवर पसे लावतोय ते कलेक्शन फायद्याचं आहे की नाही किंवा कोणत्या कलेक्शनवर पसे लावले पाहिजेत याची चाचपणी करायला तिथे येतात. या व्यवस्थापकांबरोबर आपापले जोडीदार असतात किंवा त्यांचे सहकारीदेखील शोला येतात. त्यानंतर क्रमांक लागतो तो म्हणजे प्रसिद्धीमाध्यमांचा. मोठमोठाले लेन्सवाले कॅमेरा घेऊन कॅमेरामन संपूर्ण शोचे फोटो काढत असतात किंवा व्हिडीओ शूटिंग करत असतात. त्यात कोणी सेलेब्रिटी आपल्या नजरेतून सुटली नाही ना याचे विचारचक्र सतत त्यांच्या डोक्यात चालू असते. दुसऱ्या बाजूला पत्रकार कोणाची मुलाखतच घे, शोचा आढावा घेत काही रसभरीत बातमी मिळतेय का याचा शोध घेत असतात.
कुठून तरी शोचा पास मिळवून शो बघायला आलेली तरुण उच्चभ्रू घराण्यातील मुलं नटूनथटून आपली उपस्थिती लावतात. ही मंडळी शक्यतो सेलेब्रिटीजच्या जवळ राहण्याचा, आपल्या फोनमध्ये त्यांना टिपण्याचा प्रयत्न करत असतात. मुख्य शो, त्यातील डिझाईन्स यांच्याशी त्यांचं फारसं घेणंदेणं नसतं. चाळिशी पार केलेल्या काही उच्चभ्रू घरातील बायकांचा घोळका येथे पाहायला मिळतो. आपण अमुक डिझायनरच्या शोचा पास मिळवू शकलो, आपण त्याचे किती निस्सीम चाहते आहोत, कितींदा त्याच्याकडून कपडे शिवून घेतलेत याचं प्रदर्शन करणं हे त्याचं काम. हे सगळं होत असताना एका कोपऱ्यात आपल्या कुटुंबाला घेऊन आलेला डिझायनरचा एखादा कारागीर गुपचूप एका कोपऱ्यात बसलेला असतो. त्याची छोटीसी चिमुकली ‘पप्पा वो देखिये’ म्हणत एखाद्या नटीकडे बोट दाखवते तेव्हा तो तिला दटवतो. कशी तरी डिझायनरला विनवणी करून त्यानं हे पास मिळवलेले असतात. उद्घोषणा होते. शो सुरू होतो आणि संपतोही. जेमतेम अध्र्या तासाचा तो शो. मानवी स्वभावाची कैक चित्र रंगवून जातो.