चिरतरुण पेशवाई

यंदा सणासमारंभांना, लग्नाला किंवा कुठल्याही तत्सम ओकेजनला अस्सल मराठी पेहराव मिरवला जातो आहे.

गायत्री हसबनीस, वैष्णवी वैद्य

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असतो, किंबहुना प्रत्येकाला तो तेवढा खास बनवायचा असतो. हल्लीच्या लग्न समारंभात पेशवाई थीम पुन्हा एकदा लोकप्रिय होताना दिसते आहे. अंगरखा, पगडी, शिरपेच, मोती पोळ्याच्या माळा, नऊवारी, दागिन्यांचा साज आणि बरंच काही.. लगीनघाईत असणारी तरुणाई जातीने हा सगळा साजशृंगार निगुतीने करण्यावर भर देत आहे. पेशवाई थाटातील दागिन्यांचा आणि कपडय़ांचा लुक लग्नात अगदी शोभून आणि साजेसा दिसतो, असे तरुणाईचे मत आहे. यंदाच्या मोसमात ऑथेंटिक मराठमोळ्या पोशाखांना पसंती मिळते आहे. फॅशन आणि ब्युटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून या ट्रेण्डबद्दल अधिक जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

यंदा सणासमारंभांना, लग्नाला किंवा कुठल्याही तत्सम ओकेजनला अस्सल मराठी पेहराव मिरवला जातो आहे. त्यासाठी या मराठमोळ्या पेहरावाचा इतिहास, नवे ट्रेण्ड याबद्दल संशोधन करून मग त्याची निवड करणारी तरुण मंडळीही आहेत. अशा प्रकारची पारंपरिक फॅ शन थीम आपल्या विवाहसोहळ्यासाठी निवडलेला तरुण मयूर देशपांडे सांगतो, ‘माझी बायको अदिती आणि तिच्या घरच्यांना नऊवारी पेहराव करायचा होता म्हणून मग त्याला साजेसा पेहराव आपलाही असावा असं मनात आलं. अंगरखा, पायजमा, उपरणे, कंबरपट्टा, पगडी असा पेशवाई लुक उठून दिसेल आणि नऊवारीची शोभाही वाढवेल असं ठरलं. आता हे पेशवाई ड्रेस आपल्या लग्नसमारंभात वापरले जातील पण नंतर काय? त्या रेशमी कापडाची किंमतही जास्त असते, मग एवढा खर्च एका वापरासाठी न करता ते सगळे भाडय़ाने घ्यायचे असे  ठरवले’.  भाडय़ाने एखादा ड्रेस घेणे म्हणजे कोणीतरी वापरलेले कपडे असणार असेच त्यालाही वाटले होते, पण तसे नाही. मास्टर रघुनाथ (पुणे रमणबाग) यांनी आमच्या मापाप्रमाणे नवीन कपडे शिवून दिले. आम्ही पेशवाई पेहराव घातला म्हणजे संस्कृती जपली जाईल असे मिरवण्याचा आमचा प्रयत्न नाही. या ड्रेसमधला कम्फर्ट मला खूपच आवडला, पैठणी काठ असलेले उपरणे व पगडी अदितीच्या साडीला मॅचिंग करता आले. पॅण्ट किंवा आजकालच्या आधुनिक पेहरावापेक्षा पारंपरिक असणारा राजेशाही थाट मांडवशोभा देऊन गेला हे नक्कीच, असं तो म्हणतो.

पेशवाई स्टायलिंगचा फंडा

आपल्या लग्नात स्वत:चा लुक डिझाइन करून घेणं हेसुद्धा तरुणांना आकर्षित करतं आहे. या थीम पेहरावाबद्दल सेलिब्रिटी स्टायलिस्ट श्वेता शिंदे सांगतात, ‘हे खरं आहे की आता मुलामुलींना लग्नसराईत अस्सल खराखुरा मराठमोळा लुक हवा असतो. अगदी लेहंगा हवा असेल तर तोही पैठणीच्या कापडाचा अशी मागणी के ली जाते. मुंबई, पुणे, नाशिक येथील मराठमोळ्या लग्नसराईत जुन्या पोशाखांचा आग्रह धरला जातो असे दिसून आले आहे. मुलांनाही बाराबंदी, अंगरखा याची जणू ओढ लागली आहे. आपण फॅशनमध्ये यू-टर्न घेत आहोत. आपल्या मुळांकडे परततो आहोत असं म्हणायला हरकत नाही’. सेलिब्रिटींच्या लग्नातही हा पारंपरिक पेहरावाचा ट्रेण्ड आवर्जून जपला जातो आहे. अभिनेत्री मिताली मयेकरने लग्नात ब्राइट पोपटी नऊवारी नेसली होती, त्याला साजेसे दागिनेही घातले होते. अभिनेत्री अभिज्ञा भावेने पेस्टल पर्पल रंगाची कस्टमाइझ्ड एम्ब्रॉयडरी असलेली नऊवारी नेसली होती. या दोघींनीही अस्सल मराठमोळा लुक केला होता, अशी माहिती त्यांनी दिली. लग्नाच्या पेहरावात नवे बदल करायला काहीच हरकत नाही, असं त्या सांगतात. आपण बऱ्याचदा लग्नात पिवळ्या रंगांच्या नऊवाऱ्या नेसतो, पण तुम्ही पेस्टल रंगाची नऊवारी नेसली तरीही चालेल. अभिज्ञाने पेस्टल पर्पल रंगाची नऊवारी नेसून खूप जणींना प्रेरित केलं आहे. एक डिझाइनर म्हणून मी हाच विचार करते की ग्राहकांच्या आवडीनुसार कल्पकतेने त्यांचा लुक कसा खुलवता येईल? आपल्या मराठमोळ्या पारंपरिक लुकवर जरूर मेहनत घ्या, असं सांगणाऱ्या श्वेता यांनी सध्या डिझाइनर मास्क घालून लग्नात मिरवण्याचा ट्रेण्ड नक्की जोर धरेल असा अंदाजही वर्तवला आहे.

पेशवाई लुकसाठी मेकअप

स्टायलिंगप्रमाणे पेशवाई फॅशन करताय तर तशी केशरचना, दागिने आणि चपला तर आल्याच, परंतु मेकअप नाही असं होऊच शकत नाही. ‘एनरिच’ सलॉनच्या क्रिएटिव्ह मेकअप एक्स्पर्ट प्रिया सूरेका मेकअप आणि स्टायलिंगबद्दल सांगताना मराठमोळ्या वधूसाठी निळा, जांभळा, मजेंडा अशा प्रकारचे बरेच रंग किंवा त्याला कॉन्ट्रास्ट असलेले रंग आय मेकअपसाठी वापरणे अगदी उत्तम आहेत असे सांगतात. तुमच्या कपडय़ांच्या रंगांनुसार तुम्ही डोळ्यावरील आणि ओठांवरील रंगाची शेड ठरवू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही पर्पल स्मोकी किंवा ब्ल्यू स्मोकी आय मेकअप करणार असाल तर ओठांवर न्यूड ग्लॉसी लिपस्टिक लावा. जर तुम्ही ओठांवर मजेंडा, रेड किंवा पिंक असे गडद रंग वापरणार असाल तर डोळ्यांसाठी तुमच्या साडीच्या एम्ब्रॉयडरीला मॅचिंग असा लुक ठेवा. उदाहरणार्थ, जरदौसी वर्क असेल तर गोल्डन किंवा सिल्व्हर रंग डोळ्यांसाठी ठेवा किंवा आरी वर्क असेल तर मणी आणि मोत्यांप्रमाणे तुम्हाला आय मेकअप करता येईल. परंतु हेही लक्षात ठेवा की तुमचे डोळे ग्लिटरप्रमाणे नक्की चमकतील, कारण तुमची ज्वेलरीही तितकीच गोल्डन असते. गालांवरती शक्यतो लिपस्टिकच्या जवळपास जाणारा ब्लश वापरा. वधूचा मेकअप लुक सरतेशेवटी चंद्रकोर बिंदीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. चंद्रकोर त्यावर मोत्याच्या मुंडावळ्या म्हणजे तुमचा अगदी हटके पारंपरिक लुक पूर्ण झालाच म्हणून समजा, असं त्या सांगतात. वधूप्रमाणे पेशवाई लुक करताना वरानेदेखील सिंपल मेकअप करायला हवा. तुमचे केस हेअर जेलने सेट करा. दाढी – मिशीचा लुक व्यवस्थित ट्रिम करा. चेहऱ्यावर थोडं फाउंडेशन लावा.

हौसेखातर केलेला हा साज तरुणाईला एक प्रकारे आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवणारा धागा आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या श्रीमंत संस्कृतीचे हे पैलू तरुण पिढी नावीन्याची झालर देऊन अभिमानाने मिरवते, हे आनंददायी आहे. तुम्हीही हा चिरतरुण पेशवाई साज मिरवायला हरकत नाही!

जुन्या दागिन्यांचा मोह!

चिंचपेटी आणि ठुशी असे पूर्वीच्या स्टाइलचे चोकर या पेशवाई लुकसाठी साजेसे ठरले आहेत. कोल्हापुरी साज ही अस्सल मराठमोळी ज्वेलरीही भाव खाऊन जाते आहे. कोल्हापुरी साज हा अस्सल मराठमोळा प्रकार जो जव मणी, तावीज, अष्टमंगळ अशा विविध प्रकारच्या मण्यांनी बनवतात. पूर्वीच्या काळी नाकापासून ते खालच्या ओठापर्यंत ठसठशीत नथ हा दागिना असायचा, आता क्लिप नथसुद्धा मिळते. तीन पदरी राणीहार जो पैठणीवर अगदी खुलून दिसतो. दंडावर घालायचा वाकी/ बाजुबंद दागिना पूर्वीच्या काळी दोन्ही दंडांवर घालायचे, आता शक्यतो एकाच दंडात घालतात. याशिवाय, चपलाहार, पोहेहार, बकुळीहार असे नानाविध प्रकार लोकप्रिय आहेत. मोहनमाळ हा २ ते ८ पदरांचा हारही पेशवाई लुकसाठी साजेसा असा. लक्ष्मीहार म्हणजे पूर्वीच्या काळची टेंपल ज्वेलरीही ट्रेण्डमध्ये आहे, त्याचबरोबर चिंचपेटी, खोपा (आंबाडय़ात घालण्याचा दागिना), बुगडय़ा (कानाच्या वर घालायचा दागिना) बाजुबंद आणि मोत्यांचे दागिनेही लक्ष वेधून घेत आहेत. वराच्या हातात पेशव्यांप्रमाणे तलवार घेऊनही पेशवाई लुक पूर्ण केला जात आहे.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fashion and beauty expert opinion on makeup and wedding dress selection zws

ताज्या बातम्या